Tuesday, September 29, 2020

 

225 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

216 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- मंगळवार 29 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 225 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 216 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 68 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 148 बाधित आले. 

आजच्या एकुण 986 अहवालापैकी 740 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 15 हजार 442 एवढी झाली असून यातील 11 हजार 715 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 242 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 32 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

 या अहवालात एकुण चार रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रविवार 27 सप्टेंबर रोजी कल्याणनगर नांदेड येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा, जुना मोंढा नांदेड येथील 72 वर्षाच्या एका पुरुषाचा यांच्या खाजगी रुग्णालयात तर सोमवार 28 सप्टेंबर रोजी सिडको नांदेड येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा तर मंगळवार 29 सप्टेंबर रोजी नायगाव तालुक्यातील कुटूंर येथील 67 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 398 झाली आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड 10, बिलोली कोविड केअर सेंटर 11, हदगाव कोविड केअर सेंटर 6, मुखेड कोविड केअर सेंटर 13, लोहा कोविड केअर सेंटर 3, बारड कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालय 20, अर्धापूर कोविड केअर सेंटर 2, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड 5, किनवट कोविड केअर सेंटर 7, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 6, नायगाव कोविड केअर सेंटर 5, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन / होमआयसोलेशन 120, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर 11, उमरी कोविड केअर सेंटर 4, भोकर कोविड केअर सेंटर 1 असे 225 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 25, अर्धापूर तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 1, हिंगोली 3, निर्मल 1, नांदेड ग्रामीण 18, हदगाव तालुक्यात 5, धर्माबाद तालुक्यात 3, मुखेड तालुक्यात 9, परभणी 1 असे एकुण 68 बाधित आढळले.

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 57, अर्धापूर तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 3, बिलोली तालुक्यात 4, हदगाव तालुक्यात 2, धर्माबाद तालुक्यात 7, किनवट तालुक्यात 3, भोकर तालुक्यात 8, वर्धा 1, नांदेड ग्रामीण 12, मुदखेड तालुक्यात 2, मुखेड तालुक्यात 30, उमरी तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 7, नायगाव तालुक्यात 6, परभणी 2, हिंगोली 1 असे एकूण 148 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 3 हजार 242 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 257, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित 1 हजार 747, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 88, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 38, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 23, नायगाव कोविड केअर सेंटर 53, बिलोली कोविड केअर सेंटर 31, मुखेड कोविड केअर सेंटर 141, देगलूर जैनब रुग्णालय कोविड केअर सेंटर 62, लोहा कोविड केअर सेंटर 38, हदगाव कोविड केअर सेंटर 46, भोकर कोविड केअर सेंटर 47, कंधार कोविड केअर सेंटर 20, बारड कोविड केअर सेंटर 12, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 65, मुदखेड कोविड केअर सेटर 35, माहूर कोविड केअर सेंटर येथे 15, किनवट कोविड केअर सेंटर येथे 86, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 56, उमरी कोविड केअर सेंटर 51, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 15, खाजगी रुग्णालयात 305 बाधित, हैद्राबाद येथे संदर्भित 1, औरंगाबाद 2, निजामाबाद 1, लातूर 2, अकोला 1, मुंबई 3, आदिलाबाद येथे संदर्भित 1 झाले आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 82 हजार 18,

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 62 हजार 327,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 15 हजार 442,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 11 हजार 715,

एकूण मृत्यू संख्या- 398,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 78.32 टक्के.

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-07

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 8,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 844,

आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 242,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 32. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000

 

मिनि ट्रॅक्टर योजनेसाठी बचतगटांची

ऑनलाईन पद्धतीने होणार निवड

नांदेड (जिमाका) दि. 29 :- मिनि ट्रॅक्टर योजनेसाठी सन 2019-20 या आर्थिक वर्षात प्राप्त तरतुदीनुसार पात्र बचतगटांमधून 97 बचतगटांची निवड ऑनलाईन पद्धतीने येत्या 5 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वा. इनकॅमेरा होणार आहे. कोणत्याही बचतगटांचे अध्यक्ष, सचिव किंवा सदस्यांनी या निवड प्रक्रियेच्या ठिकाणी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

सन 2018-19 या वर्षात मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळविण्यासाठी  एकूण 365 बचतगटांनी अर्ज केले  होते त्यापेकी 163 बचतगटांचे अर्ज तपासणी नंतर पात्र ठरविण्यात आले आहेत. अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या  स्वयंसाहाय्यता बचतगटांना 90 टक्के अनुदानावर  9 ते 18 अश्वशक्तीचे  मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनांचा पुरवठा करण्याची ही योजना कार्यान्वित आहे. 8 मार्च 2017 च्या निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या  स्वयंसाहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

 

शौर्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. विपीन

यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार संपन्न  

नांदेड (जिमाका) दि. 29 :- शौर्यदिनाचे औचित्य साधुन मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी यांना मालमत्ता कर माफी योजना  प्रमाणपत्र वाटपाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. यावेळी  जिल्हातील  विरनारी, विरपिता-विरमाता व माजी सैनिकांचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते करण्यात आला. कोविड-19 प्रादुर्भाव सुचनाचे पालन करीत हा कार्यक्रम साधेपणाने संपन्न झाला.

यावेळी मेजर बिक्रमसिंग थापा, निवासी उपजिल्हाधिकारी  डॉ. सचिन खल्लाळ, माजी सैनिक संघटना अध्यक्ष सार्जेन्ट रामराव थडके, सुभेदार हिंगोले मारोती, मा. सैनिक कर्मचारी विभागीय अध्यक्ष पठाण व विविध ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले माजी सैनिक उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी या दिनानिमित्त सर्व माजी सैनिकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी या प्रशिक्षण कालावधीत सैन्याच्या विविध ठिकाणी  सिमेवर भेटी दिल्याचे व सैन्यसेवेचा अनुभव घेतल्याचे नमुद करीत सैनिकांचे जीवन खडतर असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी येत्या 12 ऑक्टोंबर रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात येत असल्याबाबत  यावेळी त्यांनी सांगितले.

 

प्रास्ताविकात कल्याण संघटक सुभे शेटे कमलाकर यांनी शौर्यदिनाचे महत्व सांगून  भारतीय सैन्यदलाने 29 सप्टेंबर 2016 रोजी  पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जीकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्याचा खात्मा केला होता. ही कार्यवाही  जम्मु-कश्मीर उरी येथे  झालेल्या अतिरेक्याचा भ्याड हल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आली होती.  यानिमित्त 29 सप्टेंबर  हा दिवस शौर्यदिन म्हणुन साजरा करण्यात येतो असेही त्यांनी नमुद केले. या सर्जीकल स्ट्राईकमध्ये  जिल्ह्यातील माजी सैनिक पॅरा कमांडोज होते. त्यांचाही  विशेष सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. प्रदिर्घ सैन्य सेवा केलेले ऑन कॅप्टन किशन कपाळे, ऑन कॅप्टन प्रकाश कस्तुरे, ऑन कॅप्टन संजय कदम यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  सुभेदार काशिनाथ ससाने, मा. सै. शिसोदे, श्रीमती वर्षा सापणर, सुर्यकांत कदम, सुरेश टिपरसे यांनी परिश्रम केले.                                                                                               

000000

 

स्मार्ट प्रकल्पात सहभागासाठी

ऑनलाईन अर्ज करण्याचे कृषि कार्यालयाचे आवाहन  


नांदेड (जिमाका)दि. 29 :- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत नांदेड जिल्ह्यातील समुदाय आधारीत संस्था आणि संस्थात्मक खरेदीदारांकडून शेतमाल सोयाबीन, कापूस, मका, तूर, हरभरा, डाळी, भात, भरडधान्ये, संत्रा, पेरु, सीताफळ, आंबा, हळद, भाजीपाला पिके आणि  शेळ्या व परसबागेतील कुक्कुटपालन यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पांसाठी पात्र घटकांनी 15 डिसेंबर पर्यंत ऑनलाइन अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

 

पात्र घटकात समुदाय आधारित संस्थांमध्ये आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांचा समावेश आहे. यासोबतच अर्ज सादर करण्यासाठी पात्र खरेदीदारांमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील कॉर्पोरेटस, प्रक्रियादार, निर्यातदार, लघु-मध्यम उद्योजक,  स्टार्टअप्स, कोणताही खरेदीदार आदींचा समावेश आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जांपैकी प्राप्त स्पर्धात्मक व उत्कृष्ट अर्जांना प्रकल्पाच्या 60 टक्के अनुदान उपलब्ध होणार आहे. अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना, आदी माहितीसाठी  https://www.smart-mh.org  या संकेतस्थळावर भेट द्यावी. इच्छुकांना अर्ज दाखल करण्याची मुदत 15 डिसेंबरपर्यंत असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे श्री.चलवदे यांनी दिली आहे.

00000

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार

दिनानिमित्त प्रशिक्षण संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त आरटीआय ऑनलाईन व माहिती व तंत्रज्ञानाचा - माहिती अधिकार कायदा अंमलबजावणीत होणारा प्रभाव या विषयावरील प्रशिक्षणाचे आयोजन जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने जिल्‍हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली 28 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्‍यात आले होते. यावेळी जिल्‍हा सुचना विज्ञान अधिकारी प्रफुल्‍ल कर्णेवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व प्रथम अपिलीय अधिकारी व जनमाहिती अधिकारी तसेच सहाय्यक जनमाहिती अधिकारी, अधिकारी-कर्मचाऱ्यांना  या विषयावर प्रशिक्षण दिले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) शरद मंडलीक यांनी केले. 

 

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा देशभरात दिनांक 12 ऑक्टोंबर 2005 पासून लागू करण्‍यात आला आहे. शासनाने वेळोवेळी जाणीवपूर्वक उचलेल्‍या पावलांमुळे अल्‍पावधीतच राज्‍यात हा कायदा लक्षणीय स्‍वरुपात लोकाभिमुख झाला आहे. महाराष्‍ट्रात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायदयाच्‍या व्‍यापक प्रसिध्‍दी  व प्रभावी अमंलबाजावणीसाठी शासन स्‍तरावरून सर्वतोपरी उपयायोजना करण्‍यात येतात. 28 सप्‍टेंबर हा दिवस आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर माहिती अधिकार दिन म्‍हणून साजरा करण्‍यात येतो. या दिवशी माहितीचा अधिकार अधिनियम या कायदयातील तरतुदी आणि कार्यपध्‍दती, विविध दृकश्राव्‍य माध्‍यमातून व्‍यापक प्रसिध्‍दी देवून व विविध उपक्रम राबवून त्‍या जास्‍तीतजास्‍त नागरिकांपर्यत पोहचविण्‍याचा शासनाचा मानस आहे. यास्‍तव प्रतिवर्षी 28 सप्‍टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्‍हणून राज्‍यभर साजरा करण्‍यात यावा असे शासनाचे निर्देश आहेत.

 

माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायदयाच्‍या व्‍यापक प्रसिद्धी व प्रभावी अंमलबजावणीसाठी आरटीआय ऑनलाइन प्रणालीचा वापर प्रशासनाच्‍या कारभारात कसा करावा यावा याविषयी माहिती देण्‍यात आली आहे. शासनाकडून आरटीआय ऑनलाईन प्रणाली जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड, महानगरपालीका, पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड, जिल्‍हा परिषद नांदेड या कार्यालयात कार्यान्वित करण्‍यात आली आहे.    आरटीआय ऑनलाइन ही सुविधा https://rtionline.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. त्‍यानुसार नागरिकांनी या ऑनलाईन प्रणालीद्वारे माहिती अधिकार अर्ज व अपिल दाखल करु शकतात.  नांदेड जिल्‍हा संकेतस्‍थळ www.nanded.gov.in या वेबसाईटवर माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4 अन्‍वये प्रत्‍येक कार्यालयनिहाय, सर्वकार्यासन प्रमुख, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार कार्यालयाची 1 ते 17 मुद्यांची माहिती संकेतस्‍थळावर प्रसिद्ध केली आहे. त्‍यानुसार नागरिकास ही माहिती सहज उपलब्‍ध होऊ शकते. या प्रशिक्षणास सर्व प्रथम अपिलीय अधिकारी व जन माहिती अधिकारी, सहाय्यक जन माहिती अधिकारी व आरटीआय संकेतस्‍थळाचे कामकाज हाताळणारे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकाचे निरसन करून तहसिलदार (सामान्‍य) प्रसाद कुलकर्णी यांनी उपस्थितांचे शेवटी आभार मानले.

00000


 कोरोना पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा

- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि. 29 : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता दि.१७ ऑक्टोबरपासून सुरु होणारा या वर्षीचा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दसरा साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

त्याअनुषंगाने गृह विभागाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मार्गदर्शक सूचना :

१. सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवनागी घेणे आवश्यक राहील.

२. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

३. या वर्षांचा नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवी मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी.

४. देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची २ फूटांच्या मर्यादेत असावी.

५. या वर्षी शक्यतो पारंपरिक देवी मुर्तीऐवजी घरातील धातु/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्याने कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

६. नवरात्रोत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.

७. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित कर नयेत. त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रम/शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.

८. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदीचे पालन करण्यात यावे.

९. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

१०. देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात यावी.

प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सिंग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सँनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

११. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, विसर्जनाच्या पारंपरिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती देवी मुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

१२. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्विकृती केंद्राची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त प्रसिध्दी करण्यात यावी. १३. मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल.

१४. विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर, मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.

१५. दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्ती कार्यक्रमस्थळी हजर राहतील, प्रेक्षक बोलावू नयेत, त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी.

१६. कोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

अशा मार्गदर्शक सूचना गृह विभागाने जाहीर केल्या आहेत. त्या सूचनांचे सर्वांनी तंतोतंत पालन करून शासन, प्रशासनास सहकार्य करावे व कोरोना विरुद्धच्या युद्धात सर्व घटकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे.

००००

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...