Thursday, March 7, 2024

 वृत्त क्रमांक 216

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचा जीवंत आविष्कार

गुरुद्वारा मैदानावर, 9,10,11 मार्चला शिवगर्जना महानाट्य

 

·         हा 'विकेंड ' शिवचरित्राला रंगमंचावर बघण्यासाठी राखीव ठेवा

·         जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण ; सर्वांसाठी प्रवेश निशुल्क

·         महानाट्य बघण्यासाठी नियमित बस भाडे आकारून फेऱ्यांची सुविधा

·         आज आकाशवाणीवर ऐका 'शिवगर्जना ' चे वैशीष्टय

 

नांदेड, दि. 7 : छत्रपती शिवाजी महाराजाचे जीवन चरित्र म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याच्या चित्तथरारक घटनाक्रमांचा चढता आलेख. सामान्यातल्या सामान्य माणसाच्या आयुष्यात जगण्याची उमेद निर्माण करणाऱ्या या जीवन प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी शासनामार्फत आयोजित शिवगर्जना या छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावरील आधारित महानाट्याचा आनंद घेण्यासाठी हा 'विकेंड', राखीव ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महानाट्य शिवगर्जनाचा प्रयोग होत आहे. 9, 10 व 11 मार्च रोजी गुरुद्वारा मैदान हिंगोली गेट रेल्वे हॉस्पिटल समोर दररोज 6:30 वाजता महानाट्याच्या प्रयोगाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शनिवार, रविवार व सोमवार या तीन दिवसांपैकी एक दिवस प्रत्येक कुटुंबाने या महानाट्याचा अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.

 

ग्रुप शो साठी बसेसची व्यवस्था

नियोजन भवन नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जिल्ह्यातील तमाम नागरिकांना या नाट्य महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.हदगाव, नरसी-नायगाव, मुदखेड, अर्धापूर, लोहा, कंधार, उमरी, भोकर या ठिकाणावरुन प्रेक्षकांना नांदेडला येण्यासाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासासाठी नांदेड बसस्थानकावरुनही जादा बसेसची सोय करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, ज्या ठिकाणावरून अशा पद्धतीने गटाने प्रवासी या नाटकासाठी येत असतील त्यांना नियमित बस भाडे आकारून बसेस उपलब्ध केल्या जातील. 8055511199,9822409932 या क्रमाकांवर एसटी महामंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

 

विविध संघटनांना आवाहन

दररोज दहा हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे . प्रत्येक शाळेने या संदर्भातले दिवस वाटून घेतले असून प्रवेश सर्वांसाठी खुला आहे. अंगणवाडी सेविका, जिल्ह्यातील सर्व बचत गट सदस्य, आशा वर्कर व जिल्हा प्रशासनाच्या सेवेत असणाऱ्या आरोग्य यंत्रणा, विविध सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, उद्योजक तसेच समाजातील सर्व घटकांना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या आयोजन समितीला दिले आहेत. जिल्हाभरातील शाळांनी या संदर्भातील आपापले नियोजन करावे पाचवी इयत्ता वरील मुलांनी शाळेच्या शिक्षकांसोबत तर त्यापेक्षा लहान मुलांनी आपल्या कुटुंबासोबत शिवछत्रपतींचा इतिहास याची डोळा बघावा. प्रत्येकाने आपल्या घरातील मुलाला या इतिहासाचे साक्षीदार व्हायची संधी द्यावी, असे आवाहन केले आहे.

 

उत्तम बैठक व्यवस्था

राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित हे महानाट्य नांदेड जिल्ह्यामध्ये घेण्याबाबत राज्याचे ग्रामविकास पंचायत राज व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सूचना केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनाने रसिक प्रेक्षकांसाठी सर्व प्राथमिक सुविधा उपलब्ध करण्याची तयारी सुरू केली आहे.  यासाठी वाहनतळ, रस्ते मार्ग, आपत्ती व्यवस्थापन, बैठक सुविधा, जनजागृती आदि विषयांवर चर्चा व नियोजन करण्यात आले. 

 

उंट, घोडे धावणार मैदानावर

आजवर या महानाट्याने संपूर्ण भारतात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत 85 प्रयोग यशस्वीरित्या सादर केले आहेत.  या महानाट्यात 250 कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे. तर 140 फूट लांब आणि 60 फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य असणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदिपक आतिषबाजीही असणार आहे, तसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घातली आहे.12 व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत  आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेका पर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे.

 

कला क्षेत्रातील मान्यवरांनाही आवाहन

यासंदर्भात आज आणखी एक बैठक निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या कक्षात घेण्यात आली. या बैठकीला जिल्ह्यातील नाट्य, नृत्य,कला,गीत ,संगीत क्षेत्रातील मान्यवर तसेच सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रातील आयोजक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दहा ते पंधरा वर्षाच्या अंतराने असा एक प्रयोग नांदेड शहरात होत असून या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद द्यावा असे आव्हान विविध क्षेत्रातील मान्यवरांनी करावे असे आवाहनही यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱयांनी केले.

 

शुक्रवारी सकाळी रेडीओ कार्यक्रम

उद्या शुक्रवारी सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी शिवगर्जना या महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव यांची पत्रकार अनुराग पोवळे यांनी घेतलेली मुलाखत नांदेड आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येणार आहे.

शिवगर्जना महानाट्याचे ऐतिहासिक स्वरूप, संकल्पना, देशभरात झालेले प्रयोग याबाबतची माहिती या मुलाखतीतून पुढे येणार आहे.

00000






 वृत्त क्र. 215

 

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल संस्थाना पायाभूत

सोयी सुविधाबाबत अर्ज करण्यास 12 मार्च पर्यंत मुदतवाढ 

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2023-24 करीता या योजनेअंतर्गत कमाल 2 लाख रुपये अनुदानाच्या लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमूना http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्‍हा नियोजन समिती  जिल्हाधिकारी कार्यालयात इच्छूकांना अर्ज  सादर करण्यासाठी 12 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छूकांनी परिपूर्ण अर्ज कार्यालयीन वेळेत दिलेल्या मुदतीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा उच्चस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळांमध्ये अल्पसंख्याक समाजाचे (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शिख व पारसी मिळून) किमान  70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. शासन मान्यताप्राप्त अपंगाच्या शाळांमध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे.

 

या योजनेतर्गंत अनुज्ञेय असलेल्या पायाभूत सोयी-सुविधा या प्रमाणे आहेत. शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, शुध्द पेयजलाची व्यवस्था करणेग्रंथालय अद्ययावत करणे,  प्रयोगशाळा उभारणे, अद्ययावत करणेसंगणक कक्ष उभारणे, अद्ययावत करणे,  प्रसाधनगृह, स्वच्छतागृह उभारणे, डागडुजी करणे,विद्यार्थ्यांसाठी आवश्यक फर्निचर, इन्व्हर्टर, जनरेटरची सुविधा निर्माण करणे, झेरॉक्स मशीनअध्ययनाची साधने (लर्निग मटेरियल) एल.सी.डी.प्रोजेक्टर अध्ययनासाठी लागणारे विविध सॉफ्टवेअर इ., इंग्रजी लँग्वेज लॅब,  संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर इ. या योजनेतर्गंत यापूर्वी 5 वेळा अनुदान घेतलेल्या शाळा/संस्था यावर्षी अनुदानास पात्र असणार नाहीत. विहित मुदतीनंतर आलेले अर्ज, प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत, प्रत्येक शैक्षणिक संस्थेने, डायस कोड (DIES CODE), औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी इन्स्टिट्यूट कोड तसेच अपंग शाळांनी लायसन्स नंबर देणे आवश्यक आहे. विहीत मुदतीनंतर आलेले प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत असेही जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 वृत्त क्र. 214 

जिल्हा रुग्णालयात जागतिक कर्णबधिरता दिन व सप्ताहाचे उद्घाटन

 

नांदेड दि. 7 :  जागतिक कर्णबधीरता दिन  व सप्ताह 2 ते 9 मार्च या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. आज जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते कर्णबधिरता दिन व सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.  जागतिक कर्णबधिर दिन व सप्ताह साजरा केला जात आहे. तरी सर्व गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा  शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ  भोसीकर यांनी केले आहे. तसेच 8 मार्च 2024 रोजी जागतिक महिला दिनानिमित्ताने सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय  पेरके, ईएनटी तज्ञ डॉ. नागशेट्टीर,  एनसीडी नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील, आरएमओ  डॉ. एच. के. साखरे,  डॉ. पुष्पा गायकवाड, डॉ. विखारुनिसा खान, एनसीडी कार्यक्रम अधिकारी डॉ. उमेश मुंडे, डॉ. श्वेता शिंदे, कार्यक्रम समन्वयक विठ्ठल तावडे, मेट्रन सुनिता राठोड, ओपीडी इंचार्ज श्रीमती अनिता नारवाड, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना कानासंबंधी होणाऱ्या विविध आजारासंबंधी कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. अश्विन लव्हेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा रुग्णालयात कर्णबधिरतेसाठी उपलब्ध असलेल्या तपासणी व उपचार पद्धती संबंधी माहिती दिली. एखाद्या व्यक्तीचे सतत कान दुखत असेल, अशावेळी बरेच व्यक्ती कान स्वच्छ करण्यासाठी तीक्ष्ण वस्तुचा  वापर करत असतात. त्यामुळे त्यांच्या कानामध्ये जखम होण्याची शक्यता असते. कानासंबंधित कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष न करता वेळीच कान नाक घसा तज्ञ यांच्याकडून तपासणी करून घ्यावी, असे म्हणाले. तसेच डॉ. पुष्पा गायकवाड यांनी महिला दिनानिमित्त महिला आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती पिंपळे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानसशास्त्रज्ञ  प्रकाश आहेर,  दत्ता कपाटे व श्रीमती संगीता खंडेलोटे  यांनी परिश्रम घेतले.

0000





 वृत्त क्र. 213

शिवरात्रीच्‍या दिवशी भंडारे व महाप्रसाद वाटप करणाऱ्या

आयोजकांनी अन्‍न विषबाधा होऊ नये यांची दक्षता घ्‍यावी

 - जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड दि. 7 :- उद्या होणाऱ्या शिवरात्री निमित्त विविध ठिकाणी उद्या आयोजित होणाऱ्या भंडारामध्ये महाप्रसाद सेवन करणाऱ्यांनी व महाप्रसाद वाटप करणाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत विषबाधा होणार नाहीअन्न सेवन करणाऱ्यांना त्रास होणार नाही यासाठी व्यक्तिगतरीत्या काळजी घ्यावी तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नांदेड जिल्‍ह्यात गत काही दिवसात अन्‍न विषबाधेच्‍या घटना घडल्‍या आहेत. लोहा तालुक्‍यातील कोष्‍टवाडी येथे महाप्रसादामधून 7 फेब्रुवारी 2024 रोजी अन्‍न विषबाधेची मोठी घटना घडली होती. तसेच 6 मार्च 2024 रोजी मुदखेडहदगाव व भोकर येथेही अशा प्रकारच्‍या घटना घडल्‍या आहेत. उद्या 8 मार्च 2024 रोजी जिल्‍ह्यात शिवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी होत असूनया दिवशी अनेक ठिकाणी उत्‍सव व यात्रांचे आयोजन करण्‍यात येते. अशावेळी उत्‍सव व यात्रांचे ठिकाणी मंदीर परिसरात भंडारे असतात व महाप्रसादाचे वाटप होते. सदरील भंडारे व महाप्रसादाचे अन्‍न पदार्थांमधून विषबाधा होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. अन्‍न विषबाधेच्‍या घटना टाळल्‍या जाव्यात यासाठी भंडारा व महाप्रसाद आयोजकांनी आवश्‍यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. या अनुषंगाने सर्व संबधित विभागांना आवश्‍यक त्‍या सूचना दिल्‍या आहेत.

मागील अनुभव पाहात भंडारे व महाप्रसाद तयार करण्‍यात आलेले अन्‍न हे मुख्‍यतः भगर तसेच शाबूदानाराजगीरातेलआलूरताळी इ. या पदार्थांपासून बनविण्‍यात आल्‍याचे निदर्शनास आले आहे. तसेच कालही उपवासाला भगर या पदार्थाचा वापर केल्‍यामुळे बऱ्याच जणांना सौम्‍य ते तीव्र स्‍वरुपाची अन्‍न विषबाधा झाल्‍याचे निदर्शनास आले आहे. कोणालाही गंभीर विषबाधा झालेली नाही. आरोग्‍य विभागाच्‍या तत्‍परतेमुळे विषबाधा झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या स्थितीत औषधोपचाराने सुधारणा झालेली असून सध्‍या दवाखान्‍यात डॉक्‍टरांच्‍या निगराणीखाली आहेत. तसेच प्रशासनाकडूनही काही दुषित भगर साठ्यांबाबत कार्यवाही करण्‍यात येत आहे. त्‍यामूळे येणाऱ्या सणउत्‍सवयात्रा या निमित्‍ताने भंडारा व महाप्रसादासाठी तसेच घरगुती वापरासाठी भगर व तत्‍सम पदार्थांचा वापर टाळावाजेणे करुन अन्‍न विषबाधा होणार नाही. तसेच जेवण केल्‍यानंतर उलटीमळमळसंडास इ. लक्षणे आढळल्‍यास घाबरुन न जाता तात्‍काळ नजीकच्‍या दवाखान्‍यास संपर्क साधावा व उपचार घ्‍यावेत.

दुषित झालेले अन्‍न पदार्थ खाल्‍ल्‍यानंतर साधारणपणे 8 ते 10 तासात (विषबाधेस कारणीभूत जिवाणूंच्‍या प्रकारानुसार ) पोट दुखणेथंडीवाजून ताप येणेडोके दुखणेउलटीजुलाब वगैरे लक्षणे हळूहळू दिसू लागतात. विषद्रव्‍यांमूळे होणारी विषबाधा तीव्र व काही वेळा अतितीव्र असते. मळमळपोटात गुबाराचक्‍कर येणेपोटदुखीउलटी जुलाब अशी लक्षणे 2 ते 4 तासात दिसू लागतात. शरीराचे तापमान कमी होते. बंद डब्‍यातील विषद्रव्‍यामुळे दुषित झालेले अन्‍न पदार्थ खाल्‍यानंतर 1 ते 24 तासात डोके दुखणेउलटी जुलाब ही लक्षणे आढळतात अशी माहिती जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी दिली.

अन्‍न दुषित होण्‍यास सर्व साधारणपणे अस्‍वच्‍छताअन्‍न पदार्थ अर्धवट शिजवणेअन्‍न शिजवून बराच काळ ठेवून नंतर उपयोगात आणणेअन्‍नपदार्थ शिजविण्‍यासाठीवाढण्‍यासाठी वापरण्‍यात येणाऱ्या भांड्यांना कल्‍हई नसणेभांडी अस्‍वच्‍छ असणेअन्‍न शिजविण्यासाठी वापरण्‍यात येणाऱ्या दुषित पाण्‍यामुळे तसेच वैयक्तिक आरोग्‍याच्‍या बाबतीत उदा. सर्दी पडसे झालेल्‍याहातावर फोड असलेल्‍या व्‍यक्‍तींनी अन्‍न पदार्थ हाताळल्‍यास अन्‍न दुषित होते. योग्‍य ती दक्षता भंडारे व महाप्रसाद वाटप करणाऱ्या आयोजकांनी घ्‍यावीतसेच अन्‍न विषबाधेशी सबंधीत लक्षणे दिसून आल्‍यास वेळ वाया न घालवता तात्‍काळ नजिकच्‍या प्राथमिक आरोग्‍य केंद्रास व ग्रामीण रुग्‍णालयास याबाबत तात्‍काळ कळवावे व उपचार घ्‍यावेतअसे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 212

उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 7 :- उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात घडत आहेत. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये तयार होतात.  तापमान आणि आर्द्रता बूरशीच्या वाढीसाठी अनूकूल असते. अशी बूरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी उपवासाला भगर खाताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

भगर खाताना काय काळजी घ्यावी 

बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्या. ब्रँड नाव नसलेली  किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सूटी भगर घेऊ नका. भगर घेतांना पाकीटावरचा पॅकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा. भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी, व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवाजेणेकरुन वातावरणातील ओलाव्यामुळे बूरशीची वाढ होणार नाही.जास्त दिवस भगर साठवू नका. जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका. शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामूळे पिठाला बूरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी  खिचडी खावी. भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच  दळा. भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. दोन ते तिन दिवस सलग उपवास असताना या पदार्थांचे सेवन ॲसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटीमळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थांचे सेवन पचनशक्ती नुसार मर्यादेतच करावे.

 

भगरीचे सेवन करतांना या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे संभाव्य अपाय टाळता येईल.

 

·   भगर विक्रेत्यांसाठी सूचना

 

विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी. भगर खरेदी करतांना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी.

भगरीचे पॅकेटपोत्यावर उत्पादकांचा पत्ता,परवाना क्र.पॅकींग दिनांकअंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्या. मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करु नये. सुटी भगर व खुले भगर पिठ शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये.

 

अन्न व औषध प्रशासनाचेवतीने भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईल येईल असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

0000

वृत्त क्र. 211

आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण 

नांदेड दि. 7 :- आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात येत्या 1 एप्रिल 2024 पासून विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यांसाठी विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेण्यात येते. पात्र इच्छूक आदिवासी (अनुसूचित जमातीचे) उमेदवारांनी 27 मार्च 2024 पर्यंत शैक्षणीक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट यांनी केले आहे. 

या प्रशिक्षण सत्रात नौकऱ्यासाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करुन घेण्यात येते तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण केंद्रात 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणाऱ्या 108 च्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी 27 मार्च, 2024 तत्पुर्वी या कार्यालयास पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसूचीत जमातीचे ) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी या पत्त्यावर आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या बाजूस गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड नि कोड-431811,संपर्क दुरध्वनी क्रमांक 02469-221801/ 7620304096 / 7219709633 वर संपर्क करावा, असेही कळविले आहे. 


या प्रवेशाच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवार अनुसूचित जमाती पैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येइल. उमेदवार कमीत कमी शालांत परीक्षा उतीर्ण असावेत, उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधाण्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: रहाण्याची व जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महीने 15 दिवस असून शालांत परीक्षा उतीर्ण उमेदवारांना तसेच पदवी धारकांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा - उमेदवाराचे वय 27 मार्च 2024 रोजी 18 वर्ष पुर्ण असावे व 35 पेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थिचे विद्यावेतन संबंधीत प्रशिक्षणार्थिचे बँक खात्यामध्ये दर महा जमा करण्यात येणार असल्यामूळे प्रशिक्षणार्थिंचे बँक खाते चालू असणे आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा सदर प्रशिक्षण सत्र अर्ध्यातुन सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...