Friday, January 13, 2023

 जिल्ह्यात पीक पेरा नोंदणीसाठी

14 जानेवारी रोजी प्रत्येक गावात विशेष मोहिम

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यातील सर्व खातेदारांना /शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईल अप्लिकेशनची माहिती व जनजागृती होण्यासाठी व त्यांच्या शेतातील पीकांची माहिती गाव नमुना नं. सातबारावर नोंदविण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहिम शनिवार 14 जानेवारी रोजी मोहिम स्वरुपात प्रत्येक गावातील किमान 200 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घेवून आपली पीकपेरा नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

ई-पीक पेरणीची माहिती शेतकऱ्यांनी मोबाईल अॅपद्वारे गाव न. नं.12 मध्ये नोंदविण्याचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील तलाठी/कृषी सहाय्यक/पोलीस पाटील/रोजगारसेवक/रेशन दुकानदार/शेतीमित्र/कोतवाल/प्रगतीशील शेतकरी/आपले सरकार सेवा केंद्रचालक/सीएससी केंद्रचालक/संग्राम केंद्रचालक/कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी/तरुण मंडळाचे पदाधिकारी असे प्रत्येक गावासाठी किमान 20 स्वयंसेवक निश्चित केले आहेत. यांच्या सहाय्याने गावातील शेतकऱ्यांना पीकपेरा भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदविण्याची कार्यवाही करावी असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

वृत्त क्रमांक 25

 पत्रकार आणि सामाजिक संस्थाना

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे पुरस्कार

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :-लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणूका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत. निवडणूका नि:पक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही निवडणूक कार्यालयाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना प्रसारमाध्यमांचे आणि विविध स्वयंसेवी संस्थाचे निवडणूक आयोगाला सहकार्य लाभत असते. हे लक्षात घेवून यावर्षीपासून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पत्रकार आणि सामाजिक संस्थाना पुरस्कार जाहीर केले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

 

मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी माहितीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी निवडणूक वार्तांकन पुरस्कार दिला जाणार आहे. तर मतदार जागृतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या स्वयंसेवी संस्थाना मतदार-मित्र पुरस्कार दिला जाणार आहे. 10 हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हे पुरस्कार 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात वितरित केले जातील. पत्रकार आणि स्वयंसेवी संस्था या पुरस्कारासाठी स्वत: अर्ज करु शकतात. त्यासाठी मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी गेल्या वर्षभरातील आपल्या कार्याचा अहवाल स्वरुप माहिती आणि छायाचित्रांसह अर्ज democracybook2022/gmail.com या ई मेलवर पाठवावा. अधिक माहितीसाठी प्रणव सलगरकर मो.क्र.8669058325 याच्यांशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 

वृत्त क्रमांक 24

 निवडणूक निरीक्षक म्हणून शेखर चन्ने यांची नियुक्ती 

नांदेड (जिमाका) दि. 1:- भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये 05- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 च्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक म्हणून  शेखर चन्ने (भा.प्र.से.)महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक  यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने यांचे निवास व संपर्क कार्यालय शासकीय सुभेदारी विश्रामगृहातील 'मांजराहे असणार आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8956710497 तर दूरध्वनी क्रमांक 0240-299801 असल्याचे  निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...