Friday, January 24, 2020


दहावा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा  
मतदान प्रक्रीयेत युवकांचा सहभाग महत्वपूर्ण
-                 जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  
नांदेड दि. 24 :- देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. त्यासाठी युवा शक्तीचा सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केले. दहाव्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
            यावेळी प्रभारी पोलीस अधिक्षक उत्तम मुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी रोहयो सदाशिव पडदुणे, सांस्कृतिक समन्वयक तथा लेखाधिकारी निळकंठ पांचगे, जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी प्रफुल्ल कर्णेवार, विधी अधिकारी आनंद माळाकोळीकर, तहसीलदार (म.शा.) श्री.बिरादार, नायब तहसीलदार, निवडणूक सौ.उर्मिला कुलकर्णी, नायब तह. सारंग चव्हाण, नायब तह. विजयकुमार पाटे, नायब तह. श्री. शास्त्री, नायब तह. निवडणूक दिपक मरळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, मतदान हा पवित्र हक्क असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली पाहिजे. यासाठी प्रशासनाकडून विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत असे सांगून त्यांनी युवा मतदारांना या जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी उपस्थितांना मतदानाची प्रतिज्ञा दिली.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके यांनी प्रास्ताविकात लोकसभा व विधानसभा निवडणूका जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या कुशल मार्गदर्शनाने यशस्वी पार पडल्याबाबत सांगून सर्वांचे अभिनंदन केले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. खल्लाळ यांनी निवडणूक विषयक प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विविध महाविद्यालयातील युवक व युवतींनी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त निवडणूकीच्या अनुषंगाने बोधपर रांगोळ्या काढल्या होत्या. याचे अवलोकन करून  जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी प्रमाणपत्र देवून सन्मानित केले.
या मंचावर गुरूकुल इंग्लीश मिडीयम स्कुल वजिराबादच्या विद्यार्थींनी आर्या काबरा, श्रावणी दिलेराव, ईश्वरी नांदेडकर, यशश्री निलावार व स्नेहल सुरोशे यांनी विविध राष्ट्रीय थोर विदुषींच्या वेशभूषा करून राष्ट्रीय मतदार दिवसाचा अप्रतिम संदेश दिला. विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, दिव्यांग मतदान केंद्राचे कर्मचारी, मतदान जनजागृती करणारे कर्मचारी, उत्कृष्ट बी.एल.ओ., तसेच जिल्ह्यातील उकृष्ट काम केलेले अधिकारी व कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
नवयुवा मतदारांना मान्यवरांच्या हस्ते मतदान ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. आभार नायब तहसीलदार सौ. उर्मिला लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अव्वल कारकून कुणाल जगताप, लिपिक, माया मुनेश्वर, आर.जी.कुलकर्णी, अझरोद्दीन, गोविंद सोनकांबळे, विनोद जोंधळे, नारायण बर्वे व नांदेड तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
00000



पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा 
नांदेड, दि. 24 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 26 जानेवारी 2020 (गणराज्य दिन) रोजी सकाळी 9.15 वा. प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापन दिन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ – पोलीस कवायत मैदान नांदेड. सकाळी 10 वा. गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादिस वाटप करण्याच्या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- पोलीस परेड ग्राऊंड नांदेड. सकाळी 10.30 वा. कुसूम महोत्सव- क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- गुरुगोविंदसिंघजी स्टेडीयम नांदेड. सकाळी 11.30 वा. शिवभोजनालय थाळीच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- स्टेट बँक इंडिया समोर नवामोंढा नांदेड. दुपारी 12 वा. कै. डॉ. शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आरोग्य शिबीर व वाचनालयाचे उद्घाटन तसेच पोर्णिमानगर येथील स्थलांतरीत आरोग्य केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- स्वातंत्र्य सैनिक कॉलनी शोभानगर नांदेड. दुपारी 1 वा. पत्रकारांच्या कार्यक्रमासाठी राखीव. स्थळ- भक्ती लॉन्स मालेगाव रोड नांदेड. दुपारी 2.30 वा. कै. मारोतराव हंबर्डे यांच्या आठव्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- सहयोग एज्युकेशन कॅम्पस विष्णुपुरी नांदेड. सायं 6 वा. शांभविज फाउंडेशन नांदेडच्यावतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ कुसुम सभागृह नांदेड. सायं. 7.30 वा. अन्नदान केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड. रात्री 8 वा. गुरुकृपया मार्केटच्यावतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ गुरुकुपा मार्केट महाविर चौक नांदेड.  
00000


प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री
अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन
नांदेड, दि. 24 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार 26 जानेवारी 2020 रोजी नांदेड वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्यादृष्टिने सोबत बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ, आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.
000000


राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 24 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.  
00000


प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी
भारताच्या संविधानामधील उद्देशिकाचे सामुहिक वाचन
शासन शुद्धीपत्रकानुसार वाचन करण्याचे निर्देश   
नांदेड दि. 24 :- प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी सर्व विभागांनी भारताच्या संविधानामधील उद्देशिका / Preamble यांचे सामुहिक वाचन करण्याबाबत ग्रामविकास विभागाने शासन शुद्धीपत्रक 24 जानेवारी रोजी निर्गमीत केले आहे. त्यानुसार परिच्छेद क्र. 2 मध्ये शुद्धीपत्रकानुसार वाचन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी विभाग प्रमुखांना दिले आहेत.  
याबाबत ग्रामविकास विभागाने 22 जानेवारी 2020 रोजी शासन परिपत्रकामधील परिच्छेद क्र. 2 मध्ये त्यामुळे दिनांक 26 जानेवारी 2020 पासून ग्रामीण स्थानिक स्वराज संस्थांमध्ये (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) दरवर्षी होणाऱ्या ध्वजारोहन कार्यक्रमापुर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका (सरनामा) / Preamble याचे सामुहिक वाचन करण्यात यावे असे वाचण्यात यावे 24 जानेवारी 2020 रोजीच्या शासन शुद्धीपत्रकात नमुद केले आहे.
00000


पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार
मेळाव्याचे सोमवारी आयोजन
नांदेड, दि. 24 :-  जिल्ह्यातील बेरोजगार उमदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, कैलास इमारत, कैलास नगर वर्कशॉप रोड नांदेड येथे सोमवार 27 जानेवारी 2020 रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा सकाळी 10.30 वा. आयोजीत करण्यात आला आहे.  
याठिकाणी नामांकीत कंपनीच्यावतीने बेरोजगार उमदवारांना रोजगाराची संधी मिळावी याकरीता मुलाखती घेण्यात येणार आहेत. ट्रेनी ऑप्रेटर, कस्टमर रिलेशनशिप ऑफिसर,  डि.टी.पी. ट्रेनर, (प्रशिक्षक) टॅली ट्रेनर (प्रशिक्षक) डेटा इन्ट्री ऑपरेटर, ऑडिट ऑफिसर, मार्केटिंग, कॅम्प्युटर ऑपरेटर, टेली कॉलर, ऑफिस मॅनेजर, सोशीयल वर्कर, केमीस्ट  या पदासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. उमेदवारांनी येताना सोबत शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती आणव्यात. बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता नांदेड प्रशांत खंदारे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
000000


राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त
जिल्हा माहिती कार्यालयात प्रतिज्ञा
नांदेड, दि. 24 :- राष्ट्रीय मतदार दिना निमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची प्रतिज्ञा जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे आज घेण्यात आली. यावेळी नांदेड जिल्हा माहिती कार्यालयातील छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मतदारांसाठीची प्रतिज्ञा दिली.
         भारत निवडणूक आयोगाने सक्षम लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता ही यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाची संकल्पना निश्चित केली आहे. मतदारांसाठी प्रतिज्ञेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील विवेक डावरे, अलका पाटील, काशिनाथ आरेवार, शामराव सुर्यवंशी, अंगली बालनरस्या, श्रीकांत देशमुख यांनी उपस्थिती होती.
00000


 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144
नांदेड, दि. 24 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 27 जानेवारी 2020 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु: सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 जानेवारी 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 26 फेब्रुवारी 2020 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.
00000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...