Monday, November 25, 2024

  वृत्त क्र. 1136

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या तारखेत बदल

युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024

नांदेड दि. 25 नोव्हेंबर :- जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन 27 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, बास्केटबॉल मैदान नांदेड, कुसुम सभागृह नांदेड व डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम व श्री. गुरुगोबिंदसिंघजी स्टेडियम नांदेड या विविध ठिकाणी करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यात राज्यस्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतीना सहभागी होता यावे व त्यांना सरावासाठी पुरेसा वेळ मिळावा या हेतुने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील जास्त जास्त युवक-युवतीनी मोठया संख्येने सहभागी होता यावे, यामध्ये कृषी महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, अभियांत्रिकी, वैद्यकीय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महिला मंडळ, महिला बचतगट, युवकांसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) इत्यादी संस्थेतील 15 ते 29 वयोगटातील युवक व युवती सहभाग घेऊ शकतात. त्यांचे वय दिनांक 12 जानेवारी 2025 रोजीची परिगणना करण्यात येईल. युवा महोत्सवामध्ये प्रत्येक कलाप्रकारासाठी विजयी स्पर्धकांना आकर्षक रोख बक्षीस, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावर विजयी युवकांना विभागस्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याचा मान मिळणार आहे.

जिल्हास्तर युवा महोत्सवात पुढीलप्रमाणे कलाप्रकार अंतभुत आहेत.

सांस्कृतिक कला प्रकारात समुह लोकनृत्य (सहभाग संख्या 10), वैयक्तीक सोलो लोकनृत्य (सहभाग संख्या 5), लोकगीत (सहभाग संख्या 5), वैयक्तीक सोलो लोकगीत  (सहभाग संख्या 5).

कौशल्य विकास:- कथालेखन (सहभाग संख्या 3) चित्रकला (सहभाग संख्या 2), वक्तृत्व स्पर्धा  (इंग्रजी व हिंदी) (सहभाग संख्या २), कविता (500 शब्द मर्यादा सहभाग संख्या

संकल्पना आधारीत स्पर्धा :- विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना (सहभाग संख्या 40),

युवा कृती :- हस्तकल (सहभाग संख्या 7), वस्त्रोद्योग (सहभाग संख्या 7), ॲग्रो प्रोडक्ट (सहभाग संख्या 7)इत्यादी कलाकृती आयोजन करण्यात येणार आहे.

तरी नांदेड जिल्ह्यातील या कला प्रकारामध्ये ईच्छूक असणाऱ्या युवक युवतीनी आपली नावे, प्रवेशिका 30 नोव्हेंबर 2024 पर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्टेडियम परिसर , नांदेड यांना सादर कराव्यात व अधिक माहितीसाठी कार्यासन प्रमुख राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर यांचा संपर्क क्रमांक 9850522141, 7517536227 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

0000 

 वृत्त क्र. 1135

26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्याचे निर्देश   

नांदेड दि. 25 नोव्हेंबर :- भारतीय संविधानाची नागरिकांना माहिती असावी व त्यासंबंधी जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळण्यात येतो. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी हा दिवस साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी  दिले आहेत.  

या दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन शासकीय कार्यालये, महामंडळे, शाळा, महाविद्यालये इत्यादी ठिकाणी करण्यात यावे. तसेच वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित कराव्यात. विद्यापीठामधून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात यावे. तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी संविधानाविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रभात फेऱ्यांचे आयोजन करावे. संविधानातील महत्वाची कलमे ठळकरित्या दिसतील असे बॅनर्स, पोस्टर्स वापरण्यात यावे.  केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. या कार्यक्रमाचे आयोजन सर्व विभाग प्रमुखांनी करावे, असेही निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिले आहेत.

0000

 वृत्त क्र. 1134

मुखेड तालुक्यातील हिरानगर येथील जवान शहीद आज पार्थिव त्यांच्या मूळ गावीआणणार 

नांदेड दि. 25 नोव्हेंबर :- अति थंडी आणि बर्फाचा प्रभाव झाल्याने मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील हिरानगर तांडा येथील जवान हवलदार सुधाकर शंकर राठोड आज शहीद झाले आहेत.  

चंदीगड येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना आज 25 नोंव्हेंबर 2024 रोजी त्यांचा मृत्यू झाला. उद्या त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील हिरानगर तांडा येथे येणार आहे. 

हवलदार सुधाकर शंकर राठोड हे 127 लाईट एअर डिफेन्स रेजिमेंटचे जवान होते. त्यांची पारिवारीक माहिती पुढीलप्रमाणे आहे. वडीलाचे नाव दिवगंत शंकर सखाराम राठोड व आई श्रीमती धोंड्याबाई शंकर राठोड, भाऊ मधुकर शंकर राठोड, पत्नी श्रीमती आशा सुधाकर राठोड, मुलगा ओम सुधाकर राठोड (वय 8 वर्ष), मुलगी सपना सुधाकर राठोड (वय 6 वर्ष) आहे. भाऊ मधुकर शंकर राठोड असा त्यांचा परिवार आहे.

00000



जल प्रकल्पातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे - विभागीय आयुक्त दिलीप गावडे

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले रब्बी- उन्हाळी पाण्याचे नियोजन

छत्रपती संभाजीनगर, दि.25, (विमाका) : छत्रपती संभाजीनगर विभागातील प्रकल्पातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त तथा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जायकवाडी प्रकल्प, नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्प, निम्न दुधना प्रकल्प, माजलगाव प्रकल्प, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प, पूर्णा प्रकल्प (येलदरी व सिद्धेश्वर प्रकल्प), मांजरा प्रकल्प, निम्न तेरणा प्रकल्प, सिना कोळेगाव प्रकल्प या नऊ मोठया प्रकल्पावरील सिंचन तसेच पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची  (शासकीय सदस्यांची) बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. यावेळी दूरदृष्य प्रणालीव्दारे सबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त तसेच सबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकस्थळी मुख्य अभियंता लाभक्षेत्र तथा सदस्य जयंत गवळी, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) चे अधीक्षक अभियंता सं. को. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे, पल्लवी जगताप, महसूल उपायुक्त नयना बोंदर्डे, जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.1 चे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश गुजरे, जायकवाडी पाटबंधारे विभाग जालनाचे कार्यकारी अभियंता सुरेखा कोरके, लाभक्षेत्र पाटबंधारे विभाग क्र.-1 लातूरचे कार्यकारी अभियंता अमर पाटील, धाराशिव पाटबंधारे विभाग क्र-1 चे कार्यकारी अभियंता अ.ना.मदने, उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त श्री गावडे म्हणाले, पाऊस चांगला झाल्याने आपल्या विभागातील बहुतांश प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे. त्यामुळे या पाण्याचे पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच उद्योगासाठी सूक्ष्म नियोजन करावे. पाणीटंचाई भासणार नाही तसेच टँकरची गरज पडू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केंली. जलसंपदा विभागासह जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म पाणी नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

 लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सं. को. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे, पल्लवी जगताप तसेच प्रणालीव्दारे नांदेडचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांनी प्रकल्पातील सद्यस्थिती व नियोजनाबाबत माहिती दिली. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सिंचन प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात आले असून संबंधीत जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या यानंतर यानंतर होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय करण्यात येणार असल्याचेही ठरले.

जायकवाडी प्रकल्पातून आज रब्बीचे पहिले आवर्तन
जायकवाडी धरणामध्ये 2171.00 दलघमी (100.00%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून  सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना 31 जुलै 2025 अखेरपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. गाळघट व बाष्पीभवन वजा जाता उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे तीन व चार पाणी आवर्तन देणे प्रस्तावित आहे. जायकवाडी डाव्या कालव्याचे रब्बीचे पहिले आवर्तन आज 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सोडण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड व परभणी या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्प: रब्बी हंगामातील दोन पाणी आवर्तने डिसेंबरअखेर
नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्पाकरिता बांधण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्यातील मुकणे, भाम, भावली व वाकी  या चार धरणामध्ये 303.38 दलघमी (100%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. नांदूर मधमेश्वर कालवा मुखाशी  सिंचनासाठी उपलब्ध पाणीसाठयावर रब्बी हंगामात दोन पाणी आवर्तन देणे प्रस्तावित केलेले असून सदर आवर्तने अनुक्रमे डिसेंबर अखेर व फेब्रुवारी महिन्यात गोदावरी डावा व उजवा कालवा समवेत  घेणे  प्रस्तावित आहे. छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. उन्हाळी हंगामातील आवर्तनाबाबत निर्णय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कालवा सल्लागार बैठकीत घेण्यात येणार आहे.

निम्न दुधना प्रकल्प: रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे तीन पाणी आवर्तन प्रस्तावित
निम्न दुधना प्रकल्पामध्ये 181.780 दलघमी (75%) उपयुक्त पाणीसाठा झालेला असून  धरणावर अवलंबून असलेल्या सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना 31 जुलै 2025 अखेर पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. बाष्पीभवन वजा जाता उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे तीन पाणी आवर्तन देणे प्रस्तावित केले आहे. कालव्याचे रब्बीचे पहिले आवर्तन 25 नोव्हेंबर 2024 रोजी सोडण्यात येणार आहे. जालना व  परभणी या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

माजलगाव प्रकल्प: रब्बीचे पहिले आवर्तन 15 डिसेंबर 2024 रोजी सोडण्यात येणार
या वर्षी धरणामध्ये 263.20 दलघमी (84.35%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून  सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना 31 जुलै 2025 अखेर पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. बाष्पीभवन वजा जाता उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे तीन व चार पाणी आवर्तन देणे प्रस्तावित आहे. रब्बीचे पहिले आवर्तन 15 डिसेंबर 2024 रोजी सोडण्यात येणार आहे. याचा लाभ बीड व  परभणी या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना होणार आहे.

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प: रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे तीन व चार पाणी आवर्तन प्रस्तावित
ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पामध्ये 964.10 दलघमी (100%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना 31 जुलै 2025 अखेरपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. गाळघट व बाष्पीभवन वजा जाता उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे तीन व चार पाणी आवर्तन देणे प्रस्तावित आहे. रब्बीचे पहिले आवर्तन 1 डिसेंबर 2024 रोजी सोडण्यात येणार आहे. याचा लाभ यवतमाळ, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना होणार आहे.

पूर्णा प्रकल्प (येलदरी व सिद्धेश्वर धरण) : रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे चार व चार पाणी आवर्तन
पूर्णा प्रकल्पामध्ये 890.73 दलघमी (100%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून  सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना 31 जुलै 2025 अखेर पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. गाळघट व बाष्पीभवन वजा जाता उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे चार व चार पाणी आवर्तन देणे प्रस्तावित आहे. रब्बीचे पहिले आवर्तन आज 25 नोव्हेंबर 2024 रोजी सोडण्यात येणार आहे. परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

मांजरा प्रकल्प: रब्बीचे पहिले आवर्तन 20 डिसेंबर 2024 रोजी सोडण्यात येणार
मांजरा धरणामध्ये 176.963 दलघमी (100%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून  सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना 31 जुलै 2025 अखेर पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. बाष्पीभवन वजा जाता उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे 02 व 03 पाणी आवर्तन देणे प्रस्तावित आहे. रब्बीचे पहिले आवर्तन 20 डिसेंबर 2024 रोजी सोडण्यात येणार आहे. लातूर, बीड व धाराशिव या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

निम्न तेरणा प्रकल्प: रब्बीचे पहिले आवर्तन 15 डिसेंबर 2024 रोजी सोडण्यात येणार
या वर्षी दोन्ही धरणामध्ये 91.221 दलघमी (100.%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून  सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना 31 जुलै 2025 अखेर पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. बाष्पीभवन वजा जाता उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे तीन व पाच पाणी आवर्तन देणे प्रस्तावित आहे. रब्बीचे पहिले आवर्तन 15 डिसेंबर 2024 रोजी सोडण्यात येणार आहे. लातूर व धाराशिव या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

सिना कोळेगाव प्रकल्प: रब्बीचे पहिले आवर्तन 1 डिसेंबर 2024 रोजी
सिना कोळेगाव धरणामध्ये 89.34 दलघमी (100%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून  सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना 31 जुलै 2025 अखेर पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. बाष्पीभवन वजा जाता उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी  हंगामात दोन पाणी आवर्तन देणे प्रस्तावित आहे. रब्बीचे पहिले आवर्तन 1 डिसेंबर 2024 रोजी सोडण्यात येणार आहे. धाराशिव व सोलापूर या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

बैठकीला गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ, जलसंपदा विभाग छत्रपती संभाजीनगर, संबंधीत जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, प्रकल्पाशी संबंधित अधीक्षक अभियंता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्पाशी संबंधित कार्यकारी अभियंता, कृषी कार्यालयाचे जिल्हा कृषी अधीक्षक आणि महानगरपालिका व नगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
***





विशेष लेख        लोकसंस्कृतीचा आविष्कार माळेगाव यात्रा ! दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी माळेगाव यात्रा लोहा तालुक्य...