Monday, November 25, 2024

जल प्रकल्पातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे - विभागीय आयुक्त दिलीप गावडे

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले रब्बी- उन्हाळी पाण्याचे नियोजन

छत्रपती संभाजीनगर, दि.25, (विमाका) : छत्रपती संभाजीनगर विभागातील प्रकल्पातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त तथा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जायकवाडी प्रकल्प, नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्प, निम्न दुधना प्रकल्प, माजलगाव प्रकल्प, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प, पूर्णा प्रकल्प (येलदरी व सिद्धेश्वर प्रकल्प), मांजरा प्रकल्प, निम्न तेरणा प्रकल्प, सिना कोळेगाव प्रकल्प या नऊ मोठया प्रकल्पावरील सिंचन तसेच पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची  (शासकीय सदस्यांची) बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. यावेळी दूरदृष्य प्रणालीव्दारे सबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त तसेच सबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकस्थळी मुख्य अभियंता लाभक्षेत्र तथा सदस्य जयंत गवळी, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) चे अधीक्षक अभियंता सं. को. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे, पल्लवी जगताप, महसूल उपायुक्त नयना बोंदर्डे, जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.1 चे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश गुजरे, जायकवाडी पाटबंधारे विभाग जालनाचे कार्यकारी अभियंता सुरेखा कोरके, लाभक्षेत्र पाटबंधारे विभाग क्र.-1 लातूरचे कार्यकारी अभियंता अमर पाटील, धाराशिव पाटबंधारे विभाग क्र-1 चे कार्यकारी अभियंता अ.ना.मदने, उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त श्री गावडे म्हणाले, पाऊस चांगला झाल्याने आपल्या विभागातील बहुतांश प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे. त्यामुळे या पाण्याचे पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच उद्योगासाठी सूक्ष्म नियोजन करावे. पाणीटंचाई भासणार नाही तसेच टँकरची गरज पडू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केंली. जलसंपदा विभागासह जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म पाणी नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

 लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सं. को. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे, पल्लवी जगताप तसेच प्रणालीव्दारे नांदेडचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांनी प्रकल्पातील सद्यस्थिती व नियोजनाबाबत माहिती दिली. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सिंचन प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात आले असून संबंधीत जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या यानंतर यानंतर होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय करण्यात येणार असल्याचेही ठरले.

जायकवाडी प्रकल्पातून आज रब्बीचे पहिले आवर्तन
जायकवाडी धरणामध्ये 2171.00 दलघमी (100.00%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून  सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना 31 जुलै 2025 अखेरपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. गाळघट व बाष्पीभवन वजा जाता उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे तीन व चार पाणी आवर्तन देणे प्रस्तावित आहे. जायकवाडी डाव्या कालव्याचे रब्बीचे पहिले आवर्तन आज 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सोडण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड व परभणी या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्प: रब्बी हंगामातील दोन पाणी आवर्तने डिसेंबरअखेर
नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्पाकरिता बांधण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्यातील मुकणे, भाम, भावली व वाकी  या चार धरणामध्ये 303.38 दलघमी (100%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. नांदूर मधमेश्वर कालवा मुखाशी  सिंचनासाठी उपलब्ध पाणीसाठयावर रब्बी हंगामात दोन पाणी आवर्तन देणे प्रस्तावित केलेले असून सदर आवर्तने अनुक्रमे डिसेंबर अखेर व फेब्रुवारी महिन्यात गोदावरी डावा व उजवा कालवा समवेत  घेणे  प्रस्तावित आहे. छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. उन्हाळी हंगामातील आवर्तनाबाबत निर्णय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कालवा सल्लागार बैठकीत घेण्यात येणार आहे.

निम्न दुधना प्रकल्प: रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे तीन पाणी आवर्तन प्रस्तावित
निम्न दुधना प्रकल्पामध्ये 181.780 दलघमी (75%) उपयुक्त पाणीसाठा झालेला असून  धरणावर अवलंबून असलेल्या सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना 31 जुलै 2025 अखेर पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. बाष्पीभवन वजा जाता उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे तीन पाणी आवर्तन देणे प्रस्तावित केले आहे. कालव्याचे रब्बीचे पहिले आवर्तन 25 नोव्हेंबर 2024 रोजी सोडण्यात येणार आहे. जालना व  परभणी या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

माजलगाव प्रकल्प: रब्बीचे पहिले आवर्तन 15 डिसेंबर 2024 रोजी सोडण्यात येणार
या वर्षी धरणामध्ये 263.20 दलघमी (84.35%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून  सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना 31 जुलै 2025 अखेर पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. बाष्पीभवन वजा जाता उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे तीन व चार पाणी आवर्तन देणे प्रस्तावित आहे. रब्बीचे पहिले आवर्तन 15 डिसेंबर 2024 रोजी सोडण्यात येणार आहे. याचा लाभ बीड व  परभणी या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना होणार आहे.

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प: रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे तीन व चार पाणी आवर्तन प्रस्तावित
ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पामध्ये 964.10 दलघमी (100%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना 31 जुलै 2025 अखेरपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. गाळघट व बाष्पीभवन वजा जाता उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे तीन व चार पाणी आवर्तन देणे प्रस्तावित आहे. रब्बीचे पहिले आवर्तन 1 डिसेंबर 2024 रोजी सोडण्यात येणार आहे. याचा लाभ यवतमाळ, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना होणार आहे.

पूर्णा प्रकल्प (येलदरी व सिद्धेश्वर धरण) : रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे चार व चार पाणी आवर्तन
पूर्णा प्रकल्पामध्ये 890.73 दलघमी (100%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून  सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना 31 जुलै 2025 अखेर पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. गाळघट व बाष्पीभवन वजा जाता उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे चार व चार पाणी आवर्तन देणे प्रस्तावित आहे. रब्बीचे पहिले आवर्तन आज 25 नोव्हेंबर 2024 रोजी सोडण्यात येणार आहे. परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

मांजरा प्रकल्प: रब्बीचे पहिले आवर्तन 20 डिसेंबर 2024 रोजी सोडण्यात येणार
मांजरा धरणामध्ये 176.963 दलघमी (100%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून  सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना 31 जुलै 2025 अखेर पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. बाष्पीभवन वजा जाता उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे 02 व 03 पाणी आवर्तन देणे प्रस्तावित आहे. रब्बीचे पहिले आवर्तन 20 डिसेंबर 2024 रोजी सोडण्यात येणार आहे. लातूर, बीड व धाराशिव या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

निम्न तेरणा प्रकल्प: रब्बीचे पहिले आवर्तन 15 डिसेंबर 2024 रोजी सोडण्यात येणार
या वर्षी दोन्ही धरणामध्ये 91.221 दलघमी (100.%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून  सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना 31 जुलै 2025 अखेर पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. बाष्पीभवन वजा जाता उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे तीन व पाच पाणी आवर्तन देणे प्रस्तावित आहे. रब्बीचे पहिले आवर्तन 15 डिसेंबर 2024 रोजी सोडण्यात येणार आहे. लातूर व धाराशिव या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

सिना कोळेगाव प्रकल्प: रब्बीचे पहिले आवर्तन 1 डिसेंबर 2024 रोजी
सिना कोळेगाव धरणामध्ये 89.34 दलघमी (100%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून  सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना 31 जुलै 2025 अखेर पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. बाष्पीभवन वजा जाता उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी  हंगामात दोन पाणी आवर्तन देणे प्रस्तावित आहे. रब्बीचे पहिले आवर्तन 1 डिसेंबर 2024 रोजी सोडण्यात येणार आहे. धाराशिव व सोलापूर या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

बैठकीला गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ, जलसंपदा विभाग छत्रपती संभाजीनगर, संबंधीत जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, प्रकल्पाशी संबंधित अधीक्षक अभियंता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्पाशी संबंधित कार्यकारी अभियंता, कृषी कार्यालयाचे जिल्हा कृषी अधीक्षक आणि महानगरपालिका व नगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
***





No comments:

Post a Comment

​ वृत्त क्र.   1232 ​ स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप  प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद स...