Tuesday, April 22, 2025

  वृत्त क्रमांक 419

वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी

अनोखी मॉडेल मेकिंग स्पर्धा संपन्न   

नांदेड दि. 22 एप्रिल :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरक्रियाशास्त्र विभागामार्फत प्रथम वर्ष एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी अभिनव मॉडेल मेकिंग स्पर्धा नुकतेच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 150 विद्यार्थ्यांनी 15 गटांमध्ये विभागून सहभाग घेतला. सहसा इंजिनियरिंग शाखेतील विद्यार्थी मॉडेल तयार करतात मात्र डॉ. वंदना दुधमल यांच्या संकल्पनेतून वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेला अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी मान्यता दिली होती. विद्यार्थ्यांना शरीरक्रिया शास्त्राचा त्रिमितीय आकलनात्मक अभ्यास करता यावा तसेच संशोधन करण्यासाठीची चालना मिळावी या हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

 या स्पर्धेतील विजेते

प्रथम क्रमांक गट क्रमांक 1 (विलियम इंथवॉन) Reflex

द्वितीय क्रमांक गट क्रमांक 9 (बोरॉन गट) "HPO Axis "

तृतीय क्रमांक (संयुक्त) गट क्रमांक 2 व गट क्रमांक 8

गट क्रमांक 2 (परकींजे) "Descending Tracts"

गट क्रमांक 8 ( गानोग ग्रुप) "Molecular Basis of Muscle Contraction"

पोस्टर गट विजेते गट क्रमांक 11 (बर्न अँड लेव्ही) "Cardiac Cycle" 

अध्यक्षीय भाषणात डॉ. देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. अशा प्रकारची स्पर्धा वैद्यकीय महाविद्यालयात प्रथमच पाहत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्पर्धेचे परीक्षण व निकाल जाहीर करण्यासाठी तज्ज्ञ परीक्षक म्हणून डॉ. संजय देऊळगावकर (उपप्राचार्य, ग्रामीण पॉलीटेक्निक), डॉ. राजेंद्र गोणारकर (प्राध्यापक, मीडिया संकुल, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ), डॉ. अनिल साखरे (प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ), डॉ. संजय मोरे (विभागप्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग), डॉ. वैशाली इनामदार (विभागप्रमुख, शरीर रचना विभाग) यांनी सहभाग घेतला. डॉ. देऊळगावकर, डॉ. गोणारकर, डॉ. मोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वंदना दुधमल यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. मुकुंद कुलकर्णी यांनी केले.  

याप्रसंगी डॉ. हेमंत गोडबोले, डॉ. हुमेरा खान, डॉ. पंकज कदम, डॉ. जे. बी. देशमुख, डॉ. राहुल परसोडे, डॉ. मारुती आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सीमा टाकरस, डॉ. नौशीन, डॉ. भागवत कंधारे, डॉ. अनुव्रत मुखर्जी, डॉ. अक्षय कुमार, डॉ. अनिरुद्ध मुनेश्वर, डॉ. मोहम्मद अली आणि महाविद्यालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ व कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

000000

 वृत्त क्रमांक 418

तीन दिवस येलो अलर्ट जारी

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण, दमट हवामान राहण्याची शक्यता  

नांदेड दि. 22 एप्रिल :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 23, 2425 एप्रिल 2025 हे तीन दिवस येलो अलर्ट जारी केलेला आहे. या तीन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. याबाबत खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे. 

काय करावे

सर्वांसाठी अत्यावश्यक

·         तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या. अपस्मार, हृदयरोग, मूत्रपिंड, यकृतविषयक आजारांमुळे ज्यांना शरीरात द्रवपदार्थ टिकवण्याचा प्रश्न येतो, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच द्रवपदार्थ किंवा पाणी प्राशन करावे.

·         ओआरएस म्हणजेच तोंडान घ्यावयाचे शरीरातले पाणी वाढवणारे द्रवपदार्थ, घरगुती लस्सी, भाताची पेज, लिंबूपाणी, ताक, नारळाच पाणी घ्या. हलक्या रंगाचे, वजनाला हलके आणि सैलसर सुती कपडे वापरा.

·         घराबाहेर असाल तर डोके झाका. एखादे कापड वापरा, टोपी घाला किंवा छत्री वापरा. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी गॉगल वापरा आणि उन्हापासून कातडीचाही बचाव करायला सनस्क्रीन वापरा.

·         अतिउष्णतेमुळे ज्यांना सर्वाधिक हानी पोहोचेल असे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी किंवा स्थूल व्यक्तींची विशेष काळजी घ्या.

नोकऱ्या देणारे आणि कामगार यांच्यासाठी

·         कामाच्या जागी पिण्याचे थंड पाणी पुरवा.

·         सर्व कामगारांसाठी विश्रांतीसाठी जागा, स्वच्छ पाणी, ताक, प्रथमोपचार पेटी, आईस पॅक आणि ओआरएसही ठेवा.

·         थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात यायचे टाळा, हे कामगारांना बजावा.

·         कामाची आखणी अशी करा की, ताणाच्या श्रमाच्या कामांसाठी दिवसातला तुलनेने कमी वेळ निवडला जाईल.

·         उघड्यावर काम करणाऱ्यांना विश्रांतीच्या वेळा अधिक ठेवा आणि कालावधीही वाढवा.

·         अतिउष्णतेच्या क्षेत्रात नव्याने काम करत असलेल्या कामगारांना हलके काम द्या, कामाचे तास कमी ठेवा.

·         गरोदर महिला आणि आजार असलेल्या कामगारांकडे अधिक लक्ष द्या.

तुलनेनं थंड घरासाठी

·         सूर्यप्रकाश परावर्तित करणारा पांढरा नग वापरा, छत थंड ठेवणारं तंत्रज्ञान, हवेशीर, हलके, थर्मोकोलचे आवरण वापर ज्याद्वारे कमी किमतीत थंडपणा राखता येईल. छतावर गवत वाढवा किंवा हिरवेगार होईल हे बघा.

·         उष्णता बाहेरून आत येण्याऐवजी टी बाहेरच फेकली जावी, यासाठी तात्पुरते अल्युमिनियम आच्छादित पुट्ट्यांसारखे परावर्तक खिडक्यांवर बसवा.

·         घर थंड ठेवा, गडद रंगाचे पडदे वापरा. रात्री काळ्या काचा, उन्हापासून बचावाची सोय असलेली छते, खुल्या खिडक्या असू द्या. शक्यतो सर्वात खालच्या मजल्यावरच राहा.

·         हरित छप्पर, हरित भिंती, घरांतर्गत वनस्पती इमारत नैसर्गिकरीत्या थंड बनवून उष्णता कमी करतात. त्याद्वारे वातानुकूलन यंत्रणेचा वापर कमी होऊन उष्णताही बाहेर फेकली जात नाही.

·         वातानुकूलन यंत्राचे तापमान २४ डिग्री अंश किंवा त्यापेक्षा जास्त ठेवा. यातून विजेचे बिलही कमी येईल आणि आरोग्यही चांगले राहील.

पशुधनासाठी

·         पशुधन सावलीच्या छताखाली ठेवा आणि त्यांना भरपूर स्वच्छ आणि थंड पाणी द्या.

·         त्यांच्याकडून सकाळी 11 ते दुपारी 4 काम करून घेऊ नका.

·         प्राण्यांच्या आसऱ्याच्या ठिकाणी छतावर स्ट्रॉच्या नळ्यांनी आच्छादन करा, त्याला पांढरा रंग द्या किंवा शेणाच्या प्लास्टरद्वारे तापमान कमी करा.

·         पशुधनाच्या शेडमध्ये पंखे, पाण्याचे फवारे आणि फेस तयार करणारे यंत्र वापरा.

·         अतिउष्णतेच्या वेळी पाण्याचे फवारे मारा आणि प्राण्यांना जवळच्या पाण्याच्या स्त्रोतावर थंड करण्यासाठी न्या.

·         त्यांना हिरवे गवत, प्रोटीन फॅटला फाटा देणारा पूरक आहार द्या, मिनरल्सचे मिश्रण आणि मीठ द्या. तुलनेनं थंड हवेत त्यांना चरू द्या.

काय टाळावे

·         उन्हात जायचे टाळा, विशेषतः दुपारी १२ ते ०३ मध्ये दुपारी बाहेर असताना श्रमाची कामे टाळा.

·         अनवाणी बाहेर जाऊ नका.

·         अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक करणे टाळा. दारं खिडक्या उघड्या ठेऊन अन्न शिजवण्याचे क्षेत्र स्वयंपाकघर हवेशीर राहील हे बघा.

·         अल्कोहोल म्हणजे दारू, चहा, कॉफी, शीतपेये टाळा त्यातून शरीरातले पाणी कमी होते.

·         उच्च प्रथिनयुक्त मिठाचं प्रमाण जास्त असलेले किंवा तिखट तसेच तेलकट अन्न खाऊ नका. शिळंपाकं खाऊ नका.

·         चारचाकी वाहन लावून ठेवताना त्यात लहान मुले किंवा प्राणी ठेऊ नका.

·         चमकणारे दिवे किंवा बल्ब्ज वापरू नका, त्यातून अनावश्यक उष्णता निर्माण होते.

00000

वृत्त क्रमांक 417

परिवहन विभागाच्या 115 अधिसूचित सेवा  

नांदेड दि. 22 एप्रिल :- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत परिवहन विभागाच्या एकूण 115 अधिसूचित सेवा असून त्यापैकी 85 ऑनलाईन व 30 ऑफलाईन सेवा आहेत. राज्यातील नागरिकांना राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक व कालबद्ध पद्धतीने देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात संबंधित माहिती व देण्यात येणाऱ्या सेवांचा डिजिटल फलक प्रदर्शित करण्यात आला आहे. अनुज्ञप्ती संबंधीच्या सेवा सारथी पोर्टलवर वाहन संबंधी सेवा वाहन पोर्टलवरून पुरविण्यात येतात. काही सेवा आधारबेस फेसलेस स्वरूपात दिल्या जात आहेत. जिल्ह्यातील सर्व वाहन-चालक व वाहनधारकांनी परिवहन विभागातील कामकाजासंबंधी नोंद घेऊन या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 416

अनाधिकृत विक्रेत्याकडून बियाणे-खते खरेदी करु नये

नांदेड दि. 22 एप्रिल :- जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी बियाणे व खते खरेदी करते वेळेस अधिकृत परवाना धारकांकडून पक्की पावती घेऊनच खरेदी करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

जिल्ह्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी अनाधिकृत बियाणे व खत विक्रेते गावो-गावी फिरुन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्याची अमिष दाखवून बियाणे व खते विक्री करु शकतात. अशा प्रकारचे अनाधिकृत बियाणे व खते विक्रेते गावात फिरून विक्री करत असल्यास संबंधीत तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती व जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क, साधावा असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

0000

महात्मा फुले जनआरोग्य योजना #नांदेड

 

महात्मा फुले जनआरोग्य योजना #नांदेड




 

  वृत्त क्रमांक 525   अंगणवाडी मदतनिस (मानधनी)  पद भरतीची गुणवत्ता व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध   नांदेड दि. 22 मे :- महाराष्ट्र शासन महिला...