Thursday, September 4, 2025

वृत्त क्रमांक 938  

दहावी-बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना

खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरण्यासाठी मुदतवाढ   

नांदेड, दि. 4 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त इ. 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नावनोंदणी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यासाठी सोमवार 15 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

इ. 10 वी व इ. 12 वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्याकरिता उपलब्ध आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा. 

फेब्रु मार्च 2026 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12वी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. 17) नियमित शुल्कासह ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखांना पुढीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आली आहे. 

विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरुन मूळ अर्ज, ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोहोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे या तपशीलानुसार नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्याच्या तारखा (मुदतवाढ) सोमवार 1 ते 15 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे.  खाजगी विद्यार्थ्यांना इ. 10 वी व इ. 12 वीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. 

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळाचा वापर करावा, भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. या संदर्भात अधिक माहितीसाठी शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय/विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. 

विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत ), नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वतःजवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरतांना सदर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत. 

पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. आवेदनपत्रे भरल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संबंधित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडून परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.

00000

 प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 04 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 11:50 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज 04 सप्टेंबर 2025 या एक दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 04 सप्टेंबर 2025 या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी.


या गोष्टी करा :
1) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
2) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
3) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
4) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.
5) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.


या गोष्टी करु नका:
1) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.
2) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
3) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.
4) धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.
5) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

0000

वृत्त क्रमांक  937

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ मेळाव्याचे आयोजन

 नांदेड, दि. 4 सप्टेंबर : मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने सोमवार 8 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता आयटीआय उत्तीर्ण तसेच व्यवसाय अभ्यासक्रमातील अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ मेळाव्याचे (PMNAM) भरती मेळावा तसेच विशेष भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आयटीआय उत्तीर्ण व व्यवसाय अभ्यासक्रमातील अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था] नांदेड येथे सोमवारी सकाळी 10.30 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस.व्ही. सुर्यवंशी  व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार पी.के. अन्नपूर्णे यांनी केले आहे. 

या मेळाव्यासवाठी पुढील व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांची शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे. महिंद्रा ॲन्ड महिंद्रा जहीराबाद या कंपनीद्वारे सर्व अभियांत्रिकी व्यवसाय उमेदवारांची भरती करण्यात येणारी आहे. एलजीबी जालना या अभियांत्रिकी व्यवसाय उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड या आस्थापनेवर इलेक्ट्रीशीयन, वायरमन, एमआरएसी प्लंबर, कारपेंटर, कोपा, कॉम्प्युटर हार्डवेअर ॲण्ड नेटवर्कींग टेक्नी, आयसीटीएसएम या व्यवसाच्या उमेदवांराची भरती करण्यात येणार आहे. कुंटूरकर शुगर फॅक्टरी ता. नायगाव जि. नांदेड या आस्थापनेद्वारे इलेक्ट्रीशियन, फिटर, वेल्डर, या व्यवसायाच्या उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.   या आस्थापनाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

00000

वृत्त क्रमांक  936

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीचे 13 ते 16 सप्टेंबर कालावधीत एकत्रीकरण 

17 सप्टेंबरपासून ग्राहकांसाठी सर्व सेवा सुरळीत  

नांदेड, दि. 4 सप्टेंबर : अर्थमंत्रालय तथा वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार यांच्या मार्फत 7 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानूसार, तत्कालीन महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक या बँकांचे एकत्रीकरण होऊन 1 मे 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी नवीन महाराष्ट्र ग्रामीण बँक अस्तित्वात आली आहे. पूर्वी प्रमाणेच महाराष्ट्र ग्रामीण बँक हि संपूर्ण शासकीय मालकीची बँक असून या बँकेचे भागभांडवल हे भारतसरकार, महाराष्ट्र राज्य सरकार व बँक ऑफ महाराष्ट्र यांचे आहे. 

या एकत्रीकरणाच्या अनुषंगाने, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या संगणकीय प्रणालीचे म्हणजेच कोअर बँकिंग सेवा प्रणालीचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कोअर बँकिंग सेवा प्रणाली सोबतची एकत्रीकरण प्रक्रिया 13 ते 16  सप्टेंबर, 2025 पर्यंत नियोजित करण्यात आलेली आहे. या एकत्रीकरण प्रक्रियेच्या कालावधीत सर्व डिजिटल व इतर बँकिंग सेवा जसे की एटीएम, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, युपीआय, आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस, डीबीटी, व्हीकेवायसी, आधार आधारित पेमेंट प्रणाली, धनादेश वटविणे, स्थायी सूचनांसह नियत आदेश या सर्व सेवा कालावधीत तात्पुरत्या विलंबित किंवा खंडित होऊ शकतात. ही एकत्रीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्व सेवा पुन्हा पुर्ववत सुरू होतील. 

या मुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल बँक दिलगीर आहे असे बँकेच्यावतीने कळविण्यात आले आहे. तसेच वरील कालावधीत येणाऱ्या तातडीच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी पूर्व नियोजित व्यवस्था करण्याची ग्राहकांना नम्र विनंती बँकेच्या मार्फत करण्यात येत आहे. कृपया कोणतीही अडचण, शंका किंवा तक्रार असल्यास बँकेच्या नजीकच्या शाखेशी अथवा www.mahagramin.in या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा. महाराष्ट्र ग्रामीण बँक आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. 17 सप्टेंबर पासून सर्व सेवा ग्राहकांसाठी पुन्हा सुरळीत होतील व त्या अधिक तत्पर व ग्राहकांसाठी अधिक सोयीच्या असणार आहेत असे नांदेड महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक नरेंद्र न. खत्री यांनी  प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

00000

 वृत्त क्रमांक  935

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी

पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

प्रलंबित अर्जासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

नांदेड दि. 4 सप्टेंबर:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. तरी जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित/ विनाअनुदानीत/कायम विनाअनुदानीत महाविद्यालयात सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे नवीन व नूतनीकरण अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन महाडिबीटी पोर्टल 30 जून 2025 पासून सुरु झालेले आहे. तरी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये या योजनांबाबत जनजागृती करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

तसेच महाविद्यालयाच्या स्तरावर असलेले शैक्षणिक वर्ष सन  2024-25 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित अर्जाची तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. सन 2024-25 या शैक्षणिक  वर्षातील अर्जाची छाननी करून पात्र अर्ज कार्यालय स्तरावर मंजुरीसाठी लवकरात लवकर पाठवावे जेणेकरून विद्यार्थ्याना पुढील शैक्षणिक वर्षाचा अर्ज भरण्यास मदत होईल. त्रुटीतील अर्ज विद्यार्थ्यांच्या स्तरावर परत पाठवून त्रुटी पूर्तता करून घ्यावी, जेणेकरून विद्यार्थ्याना लाभ देणे सोयीचे होईल. तरी जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित/ विनाअनुदानीत/कायम विनाअनुदानीत महाविद्यालयात  समाज कल्याण कार्यालयाने यांची नोंद घ्यावी असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाने केले आहे.

00000

वृत्त क्रमांक  934

आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करण्याचे आवाहन

नांदेड दि. 4  सप्टेंबर :-  हंगाम 2025-26 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीएफ च्यावतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची (मूग,उडीद, सोयाबीन व तुर ) खरेदी करण्यात येणार आहे. आधारभूत दराने खरेदी करण्याकरीता ई-पिक पाहणी असलेला 7/12 उतारा आवश्यक आहे. तसेच सदर खरेदी प्रक्रिया ही शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीव्दारे पार पाडली जाणार आहे. 

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्याकरीता महाराष्ट्र्रातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पुर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक  933 

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी

विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी   

नांदेड, दि. 4 सप्टेंबर :- व्यावसाईक अभ्यासक्रमाच्या इच्छुक विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याची सोमवार 15 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह यशवंतनगर नांदेड, बिलोली, धर्माबाद, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह रायगडनगर नांदेड, मुखेड, देगलूर, गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह धनगरवाडी नांदेड, 125 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नांदेड, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अर्धापूर, नायगाव व मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह भोकर, हदगाव, उमरी असे एकूण 16 शासकीय वसतिगृहामध्ये सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी व्यावसाईक अभ्यासक्रमासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. त्यामुळे गरजू व पात्र विद्यार्थी-विद्यार्थीनींकडून https://hmas.mahait.org या पोर्टलद्वारे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सोमवार 15 सप्टेंबर 2025 पर्यंत स्विकारण्यात येत आहेत. 

शासकीय वसतिगृहात निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येतात. गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणचे व तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडून माहिती प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरून त्याची प्रिंट काढून एक प्रत संबंधित वसतिगृहाकडे सादर करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 विशेष लेख

राज्य महोत्सव : गणेशोत्सव

 

गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अतिशय उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा महत्त्वपूर्ण सण आहे. श्री गणेश हे विघ्नहर्ताबुद्धीचे दैवत व मंगलकार्याचे अधिपती मानले जातात. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यचळवळीच्या काळात या उत्सवाला सार्वजनिक रूप दिले. त्यामागचा उद्देश समाजातील एकता वाढवणे व स्वराज्याच्या लढ्यासाठी लोकांना एकत्र आणणे हा होता. त्यामुळे गणेशोत्सवाला सामाजिकसांस्कृतिक आणि ऐतिहासिकही महत्त्व प्राप्त झाले.

गणेशोत्सव हा फक्त धार्मिक उत्सव नसून तो समाजाला एकत्र बांधणारासंस्कृती जपणारा आणि पर्यावरणपूरकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उत्सव आहे.  गणेशोत्सवाच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटनत्यावर आधारित विविध उद्योग व  व्यवसाय यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळतेराज्याची परंपरा व संस्कृती जपली जातेही परंपरा आणि  संस्कृती अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आपला गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याची 18 जुलै 2025 रोजी विधीमंडळात घोषणा केलीत्यानुसार शासनाने 14 ऑगस्ट 2025 रोजी गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून जाहीर केले.

गणेशोत्सवाला शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आल्यानंतर या महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रम आणि इतर कार्यक्रम समन्वयनासाठी पु..देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमुंबई या कार्यालयाकडे जबाबदारी देण्यात आली.

घरगुती तसेच सार्वजनिक श्री गणेश मंडळे :

या गणेशोत्सव काळात घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत  'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे'चा या वर्षापासून तालुकास्तरापर्यंत विस्तार करण्यात आला. यात राज्यस्तरीय प्रथम विजेत्याला रूपये 7.50 लाख तर जिल्हास्तरावरीय प्रथम विजेत्यास रूपये 50 हजार आणि तालुकास्तरीय विजेत्यांना रूपये 25 हजार व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेआजमितीस महाराष्ट्रभरातील 404 पेक्षा जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे घरोघरीच्या श्री गणेशांचे दर्शन व सार्वजनिक मंडळांच्या श्री गणेशांचे दर्शन घरबसल्या घेणे शक्य व्हावे यासाठी घरगुती व सार्वजनिक श्री गणेशांचे छायाचित्र अपलोड करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले. पु..देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या https://ganeshotsav.pldmka.co.in/ या पोर्टलद्वारे मोठ्या संख्येने भाविक आपल्या श्री गणेशांची छायाचित्रे सर्व गणेशभक्तांच्या दर्शनासाठी अपलोड करत आहेत. या पोर्टलद्वारे आजवर 200 हून अधिक जणांनी आपल्या घरच्या व 70 हून अधिक सार्वजनिक मंडळांनी फोटो अपलोड केले आहेत.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती मंदिरे व प्रसिद्ध सार्वजनिक मंडळाच्या गणपतींचे थेट दर्शन जगभरातील गणेशभक्तांना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेयाकरिता सुरू करण्यात आलेल्या पोर्टलला देखील गणेशभक्तांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. या पोर्टलमुळे प्रामुख्याने मुंबईचा लालबागचा राजामुंबईचा राजाखेतवाडीचा गणराजपुण्याचा दगडूशेठ हलवाईश्री सिद्धिविनायक मंदिरातील सिद्धिविनायकाचे दर्शनअष्टविनायकांचे व टिटवाळ्याच्या गणपतीचे दर्शन एकाच क्लिकवर उपलब्ध झाले आहे. या दोन्ही पोर्टलमुळे जगभरातील गणेशभक्तांना घरबसल्या विविध जिल्ह्यातील व शहरातील गणपतींचे अतिशय सुलभ दर्शन होत आहे.

भजनी मंडळ :

गणेशोत्सव काळात भजनी मंडळांचा मोठा सहभाग असतोयाच अनुषंगाने राज्यातील नोंदणीकृत तसेच भजन क्षेत्रातील शिखर संस्थांना रूपये 5 कोटी अनुदान देण्याबाबतची तरतूद करण्यात आलीराज्यात 1800 भजनी मंडळे नोंदणीकृत असून त्यांना प्रत्येकी 25 हजार रूपये अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.

रील  स्पर्धा :

गणेशोत्सवाला रील स्पर्धेच्या माध्यमातून देश-विदेशात नवे आयाम मिळावेयासाठी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. ही स्पर्धा राज्यातील महसूल विभागीय स्तरराज्यस्तर आणि महाराष्ट्राबाहेर व भारताबाहेरील खुला गट अशा तीन गटात  होत आहे. रील तयार करण्यासाठी पर्यावरण संवर्धनस्वदेशीगडकिल्लेसंस्कृतीऑपरेशन सिंदूर या थीम मध्यवर्ती ठेवून 30 सेकंद ते 60 सेकंदापर्यंत रील तयार करावयाची आहे.

महसूल विभागीय स्तरावरील विजेत्या स्पर्धकाला प्रथम पारितोषिक 25 हजार रुपयेद्वितीय पारितोषिक रुपये 15 हजारतृतीय पारितोषिक 10 हजारउतेजनार्थ विजेत्यास 5 हजार अशा स्वरुपात पारितोषिक दिले जाईल. या स्पर्धेतील राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास 1 लाख रुपयेद्वितीय पारितोषिक 75 हजार रुपयेतृतीय पारितोषिक 50 हजार रुपयेउतेजनार्थ पारितोषिक 25 हजार रुपये देण्यात येईल. तर महाराष्ट्र व भारताबाहेरील विजेत्या गटातील स्पर्धकाला प्रथम क्रमांकाचे 1 लाख रुपये बक्षीसद्वितीय क्रमांकासाठी 75 हजार रुपयेतृतीय क्रमांकासाठी 50 हजार रुपयेउतेजनार्थ म्हणून 25 हजार रुपये देण्यात येणार आहे.

विशेष उपक्रम :

गणेशोत्सवाच्या 10 दिवसाच्या काळात राज्याच्या प्रत्येक विभागात विशेष उपक्रमस्पर्धारोषणाई आदींसह विशेष उपक्रम अंतर्गत "ऑपरेशन सिंदूर"द्वारे माजी सैनिकांचा जिल्हानिहाय सत्कार करण्यात येणार आहेत्याचबरोबर आत्मनिर्भर भारत व स्वदेशी संकल्पना राबविणाऱ्या व्यक्तींचाही गौरव करण्यात येणार आहेप्रधानमंत्री नरेंद्र मोदीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांच्या संकल्पनेतील वर्ल्ड युनेस्को मानांकन मिळालेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्लेऑपरेशन सिंदूरआत्मनिर्भर भारतस्वदेशी संकल्पना असे विविध विषय घेऊनही हा कार्यक्रम राबविण्यात येत आहेश्री गणेशाला वंदन करण्यासाठी पु..देशपांडे अकादमीकडून ‘आला रे आला… गणराया आला…’ या विशेष गीताचीही निर्मिती करण्यात आली.

जागतिक व्यासपीठ :

गणेशोत्सवानिमित्त कलाकारांना महाराष्ट्र राज्याबाहेर  देखील व्यासपीठ मिळणार आहे. याचाच एक भाग म्हणून  27 ते 29 ऑगस्ट2025 दरम्यान वन संशोधन केंद्र डेहराडून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आला. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे 1 सप्टेंबर 2025 सांस्कृतिक कार्यक्रम झाला तर सप्टेंबर 2025 रोजी के एम गिरी सभागृहबेळगाव या सीमावर्ती भागात गणेशोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आलेसर सयाजीराव नगर वडोदरा गुजरात या ठिकाणी  म्हणजेच 4 सप्टेंबर 2025 रोजी भाग्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच  5 सप्टेंबर 2025 रोजी गोवा राज्यात मराठी बांधवांसाठी भव्य संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

गणेशोत्सवाला "राज्य महोत्सव" दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशात एक भरीव वाढ झाली आहे. लोकसहभागडिजिटल प्रसारआंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता आणि पर्यावरणपूरक उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता जगाला एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरणारहे नक्की

 

संजय डी.ओरके,

विभागीय संपर्क अधिकारी

000

 राजगड - स्वराज्याच्या आत्म्याचे मूर्तिमंत प्रतीक...

#छत्रपतीशिवाजीमहाराज #राजगड  


वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...