Monday, March 17, 2025

वृत्त क्रमांक 302

आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण 

                                                                                                                                                                        नांदेड दि. 17 मार्च :  आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात येत्या 1 एप्रिल 2025 पासून विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यांसाठी विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेण्यात येते. पात्र इच्छूक आदिवासी (अनुसूचित जमातीचे) उमेदवारांनी 27 मार्च 2025 पर्यंत शैक्षणिक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट यांनी केले आहे. 

या प्रशिक्षण सत्रात नौकऱ्यासाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करुन घेण्यात येते तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण केंद्रात 1 एप्रिल 2025 पासून सुरू होणाऱ्या 111 च्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी 27 मार्च, 2025 तत्पुर्वी या कार्यालयास पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसूचीत जमातीचे ) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी या पत्त्यावर आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या बाजूस गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड नि कोड-431811 वर संपर्क दुरध्वनी क्रमांक 02469-221801/ 9423748008/ 7219709633 वर संपर्क करावा, असेही कळविले आहे. 

या प्रवेशाच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवार अनुसूचित जमाती पैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येइल. उमेदवार कमीत कमी शालांत परीक्षा उतीर्ण असावेत, उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधाण्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: रहाण्याची व जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महीने 15 दिवस असून शालांत परीक्षा उतीर्ण उमेदवारांना तसेच पदवी धारकांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा - उमेदवाराचे वय 27 मार्च 2025 रोजी 18 वर्ष पुर्ण असावे व 35 पेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थिचे विद्यावेतन संबंधीत प्रशिक्षणार्थिचे बँक खात्यामध्ये दर महा जमा करण्यात येणार असल्यामूळे प्रशिक्षणार्थिंचे बँक खाते चालू असणे आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा सदर प्रशिक्षण सत्र अर्ध्यातुन सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 301

लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांचा दौरा                                                                                      

नांदेड दि. 17 मार्च :  छत्रपती संभाजीनगर महसूली विभाग महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार 18 मार्च 2025 रोजी सकाळी 8 वाजता नंदीग्राम एक्सप्रेसने किनवट व माहूरकडे प्रयाण. सकाळी 9 वा. माहूर येथे आगमन. सकाळी 9 ते 10.30 राखीव. सकाळी 10.30 ते 12 या कालावधीत उपविभागीय अधिकारी किनवट, गटविकास अधिकारी माहूर, तहसिलदार माहूर व प्रकल्प अधिकारी किनवट यांचे समवेत बैठक. दुपारी 12 वा. माहूर येथून किनवटकडे प्रयाण. दुपारी 1.44 वा. नंदीग्राम एक्सप्रेसने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.  

00000

 वृत्त क्रमांक 300

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू                                                                            

नांदेड दि. 17 मार्च :- नांदेड जिल्ह्यात 18 मार्च 2025 चे सकाळी 6 वाजेपासून ते 1 एप्रिल 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 18 मार्च 2025 चे सकाळी 6 वाजेपासून ते 1 एप्रिल 2025 मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

वृत्त क्रमांक 299

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड दि. 17 मार्च :- देशातील युवकांना कंपनी, आस्थापनेमध्ये अनुभवाची संधी प्राप्त करून देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 24 वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे. प्रधानमंत्री इंटर्नशिपसाठी नांदेड जिल्ह्यात एकूण 11 आस्थापनांनी http://pminternship.mca.gov.in/ यासंकेतस्थळावर रिक्तपदे अधिसुचित केलेली आहेत.

या योजनेचा जिल्हयातील दहावी, बारावी,  ग्रॅज्युएट, आयटीआय या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या  सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क साधावा, असेही कळविले आहे. 

कंपनी, आस्थापनाचे नाव  बजाज फायनान्सं लि., बायरक्रॉप सायन्सं लि., हॅवल्स इंडिया लि. गोदरेज कंज्युमर प्रॉडक्टस लि., एच.डी.एफ.सी. बँक लि.,  इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.,  इंड्युसंड बँक लि. ज्युब्लीयंट फूडवर्कस लि., रिलायंन्स इंडस्ट्रीज लि., मेघा इंजिनियरिंग & इन्फ्रास्ट्रक्चरलि. टाटा कन्सन्टल्सी सर्व्हिसेस लि. या नामांकीत कंपनी/आस्थापना यांनी http://pminternship.mca.gov.in/ यासंकेतस्थळावर रिक्तपदे अधिसुचित केलेली आहेत. यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 24 पर्यंत असावे व दहावी/बारावी/ ग्रॅज्युएट/ आय.टी.आय. या शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करावा : या योजनेसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करून प्रोफाईल तयार करावी व विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा. या योजनेंतर्गत युवकांना 12 महिन्यांसाठी इंटर्नशिपचा लाभ घेता येईल. तसेच यासोबतच त्यांना दरमहा 5 हजार रुपये इंटर्नशिप रक्कम मिळेल. याशिवाय इंटर्नशिप पुर्ण झाल्यानंतर 6 हजार रुपये एकरकमी अनुदान मिळेल. या योजनेंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाईल.

000000

 वृत्त क्रमांक 298

प्रगतीशील व प्रयोगशील शेतकऱ्यांनी नांदेडच्या कृषी क्षेत्राचे नेतृत्व करावे : जिल्हाधिकारी कर्डिले  

•   जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे थाटात उद्घाटन  

•  नांदेडकरांना धान्य खरेदीचे आवाहन  

नांदेड दि. 17 मार्च :- नांदेड जिल्ह्यातील 80 टक्के नागरिक शेतीवर आधारीत अर्थव्यवस्थेशी जुळले आहेत. मात्र कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, जलसंधारण, कृषी यांत्रिकीकरण सर्वच क्षेत्रात आम्हाला सुधारण्यास वाव आहे. त्यामुळे ज्यांनी सेंद्रियशेतीपासून शेतीवर आधारीत अर्थव्यवस्थेत प्रगती केली आहे त्या प्रथीतयश शेतकऱ्यांनी नांदेडच्या कृषीक्षेत्राचे नेतृत्व करावे. कृषी विभाग त्यांना पाठबळ देईल, अशा आश्वासक शब्दात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रगतीशील शेतकऱ्यांना जिल्ह्याच्या विकासात पुढे येण्याचे आवाहन केले आहे. 

जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा आणि नांदेड येथील रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कृषी व धान्य महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान येथे 17 व 18 मार्च दोन दिवस हा महोत्सव सुरू असणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते या कृषी, माती, शेती व यासंदर्भातील तंत्रज्ञानाला जोडल्या गेलेल्या या कृषी महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले. यावेळी 29 वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या यशस्वी शेतकऱ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार झाला. या शेतकऱ्यांनी कृषीक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करून अवघ्या काही गुंठे शेतामध्ये लक्षावधीचे उत्पादन घेतले आहे. या सर्व शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग लोकांपर्यंत पोहोचावे व त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.  

यावेळी बोलतांना जिल्हाधिकाऱ्यांनी काही मोजकी उदाहरणे दिली. ते म्हणाले अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जितके दुध उत्पादन होते तेवढे उत्पादन आपल्या अनेक जिल्ह्यांचे मिळून होत नाही. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, समूहशेती, आयात-निर्यात निगडीत शेती यासंदर्भात अनेक चांगले प्रयोग जिल्ह्यात झाले पाहिजेत. त्यामुळे या दोन दिवसांमध्ये याठिकाणावरून ज्ञान घेऊन जा. त्यानंतर त्याबाबतीत प्रयोग करा. कृषीक्षेत्र प्रयोगशील लोकांना भरभरून परतफेड करणारे क्षेत्र आहे. 

कर्मचारी-नागरिकांनी भेट द्यावी 

यावेळी त्यांनी नांदेड महानगरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील या जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन केले. सेंद्रिय शेतीमध्ये तयार झालेले धान्य तसेच भाजीपाला व विविध वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी आवर्जून नवीन मोंढा येथील महोत्सवाला भेट द्यावी व मोठ्याप्रमाणात खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

 29 प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार 

आज जिल्हा कृषी व धान्य महोत्सवामध्ये 29 प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये नांदुसा येथील खिरबाजी नागोराव कंगारे, भोसी येथील नंदकिशोर दिगांबर गायकवाड, दापशेड येथील विश्वनाथ गोविंदराव होळगे, सायाळ येथील रत्नाकर ढगे, मालेगाव येथील भगवान इंगोले, धारापूर येथील सदानंद ढगे, सोनवाडी येथील वनिता श्रीराम फोले, रेणापूर येथील सुनिता अशोक कावळे, धामदरी येथील गंगाबाई शामराव कदम, हिमायतनगर येथील गजानन प्रकाश तुप्तेवार, बारड येथील बालाजी मारोती उपवार, लगळूद येथील योगेश पोताजी टाकळे, कामठा बु येथील महानंदा केशवराव कल्याणकर, बोधडी येथील अभिजीत प्रभाकर जमादार, बनचिंचोली येथील बळवंत देवराव पौळ, सुजनवाडी येथील कृष्णा माधवराव भालेराव, हुंडा येथील श्रीधर शंकर गुंजकर, बितनाळ येथील गंगाधार दत्ताराम मुकदमे, नायगाव तालुक्यातील दिलीप शेळगावे, मांजरम येथील गणपती आनंदराव शिवारेड्डी, कासराळी येथील बसवंत शंकरराव कसराळीकर, बाळापूर येथील रविंद्र मलकन्ना पोतगंटीवार, मनाठा येथील संजय पांडुरंग सुर्यवंशी, साप्ती येथील कबिरदास कदम, कलंबर येथील मोहन विठ्ठल सोरगे, मनाठा येथील संतोष पांडुरंग सुर्यवंशी, चैनपूर येथील माधव शंकरराव पाटील, कुडली येथील सुनिल नामदेव चिमणपाडे, मालेगाव येथील अमोल बालाजी सावंत या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी यावेळी या प्रगतीशील शेतकऱ्यांच्या कार्यकर्तुत्वाला जाणून घेतले.  

यावेळी व्यासपिठावर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय पतंगे, रोटरी क्लबचे सचिव सुरेश अंबुलगेकर, जिल्हा समन्वयक डॉ. सुरेश साबू, कृषी विकास अधिकारी निलकुमार ऐतवाडे, सहायक प्रांतपाल मुरलीधर भुतडा, केदार साळुंके, सत्यजित भोसले, निलेश देशमुख बारडकर, डॉ. देविकांत देशमुख, कृषी उपसंचालक एच. एम. नागरगोजे, उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार रणवीर, बिलवल गिते, अनिल शिरफुले आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषी सहायक वसंत जारीकोटे यांनी केले.  

 एकदा अवश्य भेट द्या 

जिल्हा कृषी व धान्य महोत्सवात उत्पादक ते ग्राहक थेट विक्री करण्यात येते. याठिकाणी स्थानिक गुळ, भाजीपाला, विविध दाळी, फळे, ऊस, ज्यूस, महिला बचतगटांचे स्टॉल, वनऔषधी, लाकडी घाणा तेल याशिवाय सेंद्रीय शेतीत पिकविण्यात आलेली गहू, ज्वारी, तूर, मुग, उडीद, हरभरा दाळ, मध, डिंक, सेंद्रिय टरबूज, खरबूज याशिवाय नित्य उपयोगी जीवनावश्यक वस्तूंचे 82 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे असणारे हे स्टॉल विक्रीसाठी नांदेडकरांची वाट बघत असल्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

 शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद 

दुसऱ्या सत्रामध्ये याच व्यासपीठावरुन शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती व पीक व्यवस्थापन, डॉ. पी. एच. गौरखेडे यांनी सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, श्री. हर्षल जैन यांनी सेंद्रिय शेती प्रमाणिकरण कार्यपध्दती, सुदाम शिरोळे यांनी कार्बन क्रेडिट संकल्पना व भविष्यातील संधी, दिनकर पाटील यांनी मधूमक्षिका पालन काळाची गरज, डॉ. अनंत लाड यांनी हवामान बदल आणि एकात्मिक किड व्यवस्थापन याविषयावर मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीेतेसाठी तंत्र अधिकारी जाधव के एम , प्रमोद गायके ,संदीप स्वामी, कृषी अधिकारी सुनील सानप, कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण हांडे,  तंत्र व्यवस्थापक सोहेल सय्यद आदींनी परिश्रम घेतले.

00000














 वृत्त क्रमांक 297

नांदेड जिल्हा परिषदेच्या 22 कोटी 26 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता

लाभार्थ्यांचे सशक्तीकरण हे या बजेटचे मुख्य उद्दिष्ट- सीईओ मीनल करनवाल

शेतकरी, महिला, शिक्षण, आरोग्य व कचरामुक्त गाव यावर विशेष भर 

नांदेड, दि.17 मार्च :- जिल्हा परिषदेच्या स्वःउत्पन्नाच्या सन 2024-25 च्या सुधारित व सन 2025-26 च्या मूळ अर्थसंकल्पाला आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मंजुरी दिली. या अर्थसंकल्पानुसार जिल्हा परिषदेच्या 2025-26 या आर्थिक वर्षासाठी एकूण अपेक्षित जमा 22 कोटी 26 लाख रुपये असून एकूण अपेक्षित खर्च 22 कोटी 21 लाख रुपये आहे. त्यामुळे अर्थसंकल्प 5 लाख 16 हजार रुपयांच्या शिल्लकीसह मंजूर करण्यात आला आहे.

या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य, अनुसूचित जाती-जमाती, महिला सशक्तीकरण, शेती आणि पशुसंवर्धन तसेच ग्रामीण विकास या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण विभागासाठी 1 कोटी 12 लाख रुपयांची तरतूद असून, सीमावर्ती भागातील शाळांमध्ये सोलार बसविण्यासाठी 50 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये बाला उपक्रम राबवण्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली असून, श्वानदंश व साप चावल्याने होणारे मृत्यू रोखण्यासाठी 20 लाख रुपये तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील अत्याधुनिक प्रसूती कक्षासाठी 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अनुसूचित जाती-जमाती आणि दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी 1 कोटी 56 लाख रुपयांची तरतूद असून, मागासवर्गीयांना विविध व्यवसायांसाठी 55 लाख तर महिलांना व्यवसायासाठी 50 लाख रुपये देण्यात येणार आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 10 लाख रुपये आणि रोजगार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी 10 लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांसाठीही 10 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.

 शेतीच्या आधुनिकीकरणावर भर देत शेतकरी गटांना ड्रोन खरेदीसाठी 20 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. तसेच जैविक कीटकनाशक प्रयोगशाळेसाठी 16 लाख, सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी 21 लाख आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी 18 लाख रुपयांची मदत निश्चित करण्यात आली आहे. पशुधन विभागासाठी 89 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, विविध औषधोपचार, इमारत दुरुस्ती आणि लसीकरणासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. लघु पाटबंधारे विभागासाठी 43 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, अतिवृष्टीमुळे बंधारा फुटल्यास शेतकऱ्यांना अनुदान देण्याचीही तरतूद या बजेटमध्ये आहे.

महिला व बालविकास क्षेत्रासाठी 78 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये महिलांना मार्केटिंग प्रशिक्षणासाठी 8 लाख रुपये, स्वयंसहाय्यता गटांतर्गत शिलाई मशीन व पीठ गिरणी यासाठी 15 लाख रुपये तसेच अंगणवाडी केंद्रात बाला संकल्पना राबवण्यासाठी 16 लाख रुपयांचा समावेश आहे.

अर्थसंकल्प मंजुरीच्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी हे बजेट लाभार्थ्यांचे सशक्तीकरण हे मुख्य उद्दिष्ट ठेवून तयार करण्यात आल्याचे सांगितले. जिल्हा परिषद प्रशासनाने शेतकरी, महिला, शिक्षण, आरोग्य व गावस्तरावर कचरामुक्त गाव या विषयांवर विशेष भर दिला आहे. तसेच आधीच गावस्तरावर वाटप करण्यात आलेल्या जनावरांसाठी शेड उभारणीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उपस्थित पत्रकारांनी विविध विषयांवर विचारलेल्‍या प्रश्‍नांना मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी उत्‍तरे दिली. शिक्षण, आरोग्य व महिला सबलीकरणासह बजेटमधील सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात येणार असून लाभार्थ्यांना वेळेत सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही सातत्याने नियोजन करणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगीतले. 

या अर्थसंकल्पीय बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, सामान्‍य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, प्राथमिक विभागाच्‍या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्‍यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, नियोजन शिक्षण अधिकारी दिलीप बनसोडे, कृषी अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, समाज कल्याण अधिकारी सत्‍येंद्र आऊलवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.डी. रावसाहेब, कार्यकारी अभियंता अशोक भोजराज तसेच जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.

बजेटची वैशिष्ट्ये 

या बजेटमध्ये शेतकरी, महिला, शिक्षण, आरोग्य व कचरामुक्त गाव यांसाठी विशेष भर देण्यात आला आहे. तसेच गावपातळीवर आधीच जनावरांचीसाठी देण्‍यात आलेल्‍या खोडयास शेड उभारणीसाठी देखील निधीची तरतूद करण्यात आली आहे.

00000









वृत्त क्रमांक 296

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतून

शेतकऱ्यांनी जमीनीची पत वाढवावी :   जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

हिब्बट ते माऊली व आळंदीपर्यतच्या 9 कि.मी. नाला खोलीकरण व रुंदीकरणाचा शुभारंभ

नाल्याच्या दुर्तफा 14 ते 15 हजार बांबू लागवड करण्याचे नियोजन

नांदेड दि. १७ मार्च :- गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आपली जमीन सुपीक, कसदार व चांगल्या प्रतीची करण्यासाठी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

आज मुखेड तालुक्यातील हिब्बट ते माऊली आणि पुढे आळंदीपर्यत अशा 9 कि.मी नालाखोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी  जिल्हा जलसंधारण अधिकारी ए.एस.काबंळे, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी भोजराज, उपविभागीय जलसंधारण अधिकारी कातडे, अनुलोमचे विश्वनाथ देशमुख, मोटरगाचे सरपंच शेळके, हिब्बटचे सरपंच केंद्रे, नंदगावचे सरपंच हनमंत पाटील, नाम फाऊंडेशनचे राजाभाऊ शेळके तसेच परिसरातील शेतकरी आदींची  उपस्थिती होती.

 जलयुक्त शिवार 2.0 या महत्वाकांक्षी योजनेमधून जिल्ह्यात अनेक जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येत आहेत. तलाव, नाले यातील काढलेल्या गाळामुळे तलाव व नाल्याची साठवण क्षमता मोठया प्रमाणात वाढणार असून त्यातून निघालेला गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पसरविण्यासाठी उपयोगात आणावा. या योजनेच्या उद्दिष्टामुळे पाण्याच्या स्त्रोतात वाढ होवून शेतकऱ्यांच्या जमीनी सुपिक होण्यास मदत होणार आहे. तरी शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत निघालेला गाळ नेण्यासाठी प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही राहुल कर्डिले यांनी केले आहे.  

जलसंधारण विभाग यांच्यासोबत नाम फाऊंडेशन व टाटा मोटर्स सहकार्याने जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतील कामे मोठया प्रमाणात करण्यात येत आहेत. मुखेड तालुक्यातील हिब्बट ते माऊली आणि पुढे आळंदीपर्यत अशा 9 कि.मी नाल्यात खूप गाळ साठलेला होता. त्यांचे खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. या कामासोबतच हिब्बटच्या तलावाच्या दुरुस्त्याही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे. 

तसेच या नाल्याच्या दुतर्फा 14 ते 15 हजार बांबु लागवड करण्यात येणार असून यामुळे नाल्याच्या काठावरील गाळ परत नाल्यात जाणार नाही. तसेच बांबुमुळे शेतकऱ्यांना विविध फायदे होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी त्यांनी यावेळी परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या प्राध्यान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.

00000












 वृत्त क्रमांक 295

अतिदक्षता विभागातील वातानुकुलित यंत्राची लवकरात लवकर दुरुस्ती

पर्यायी व्यवस्था केली असून रुग्णांची गैरसोय होणार नाही –अधिष्ठाता

नांदेड, दि. 16 मार्च :- समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या कोणत्याही व्हीडीओने विचलित न होता नागरिकांनी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावरील आपला विश्वास कायम ठेवावा. गरीब गरजू लोकांसाठी दर्जेदार उपचाराचे केंद्र  म्हणूनही हे रुग्णालय काम करते व भविष्यात ही करेल असा विश्वास डॉ. शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिला.

मागील काही दिवसापासून अतिदक्षता विभागाकडील वातानुकूलीत यंत्र ( एसी )बंद आहेत. या वातानुकुलित यंत्रांची देखभाल व दुरुस्ती ही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येते. हे वातानुकुलित यंत्र दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेशी लेखी स्वरुपात संपर्क केला आहे. या वातानुकुलित यंत्राच्या दुरुस्तीसाठी लागणारे स्पेअर पार्टस हे निविदा प्रक्रीयेद्वारे खरेदी करण्यात येणार आहेत. लवकरात लवकर  प्रक्रीया राबवून दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे अभियंता विद्युत शाखा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी अधिष्ठाता डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना कळविले आहे.

आज 16 मार्च 2025 रोजी अभियंता विद्युत शाखा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दिलेल्या माहितीनुसार यांनी दुरुस्तीचे काम सुरु झालेले असून लवकरच पूर्ण करण्यात येईल. त्या अनुषंगाने रुग्णसेवेबाबत रुग्णालय प्रशासन विभागामार्फत विविध अतिदक्षता विभागात स्टॅन्ड फॅन लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णाची गैरसोय होणार नाही व रुग्णांना कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. याबाबत रुग्णालय प्रशासनाचे पुर्णपणे त्वरीत व्यवस्था करण्यात आलेली आहे. याबाबत रुग्णसेवेवर कुठलाही परिणाम झालेला नाही अशी माहिती डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे.

0000

वृत्त क्रमांक 294

आज जिल्‍हा कृषि व धान्य महोत्‍सव 

शेतकऱ्यांच्या शेतमालाची होणार थेट खरेदी विक्री 

नांदेड, दि. १६ मार्च:- महाराष्ट्र शासन, कृषि विभाग व रोटरी क्लब, नांदेड यांचे संयुक्‍त विद्यामाने आयोजित“जिल्‍हा कृषि व धान्य महोत्‍सव 2025 ’’ परिसंवाद व चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री व प्रदर्शन उद्यापासून दोन दिवसीय 17 ते 18 मार्च 2025 या कालावधी सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यत कृषिउत्‍पन्‍न बाजार समिती, नवा मोंढा, नांदेड येथे आयोजित करण्‍यात आलेले आहे. 

या कृषि महोत्‍सवात कृषि प्रदर्शन, कृषि विज्ञान केंद्र / कृषि विद्यापीठाचे स्‍टॉल, हरिद्रा (हळद), विविध कृषि निगडीत तंत्रज्ञानाचे प्रदर्शन व कृषि संलग्‍न शासकीय विभागाचे स्‍टॉल असे एकूण 75 स्‍टॉल उभारण्‍यात आलेले आहेत. 

त्‍याचबरोबर विविध विषयांचे परिसंवाद व चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. यामध्‍ये जिल्‍हयातील शेतकरी गट, शेतकरी उत्‍पादक कंपनी व महिला आर्थिक विकास महामंडळाच्‍या महिला गटांचा सक्रिय सहभाग या महोत्‍सवात राहणार आहे. महोत्‍सवांच्‍या ठिकाणी आपल्‍या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल गहु, ज्वारी, तांदूळ, तुर, मुग,उडीद, चनाडाळ, हळद, मिरची, मसाले, विविध प्रकारचे सेंद्रीय उत्पादने (गुळ, हळद पावडर, सेंद्रीय डाळी) तसेच नाविन्यपूर्ण उत्पादने जसे, मध, गुळाचा पाक व महिला बचतगटांची उत्पादने (चटणी, लोणचे, पापड, कुरडई इत्यादी) टरबुज, खरबुज, स्ट्रोबेरी, ड्रगन फ्रुट आदी फळे व भाजीपाला थेट विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत.

तसेच जात्‍यावरील सेंद्रीय डाळ, गोदाकाठची ज्‍वारी,  सेंद्रीय हिरव्‍या भाज्‍या, फळभाज्‍या व फूलभाज्‍या व रानफळांची व शेतक-यांनी विविध उत्‍पादीत केलेले लाकडी घाण्‍याचे करडई, भुईमुग, जवस, तीळाचे तेल, बांबुपासुन तयार करण्‍यात आलेले वस्‍तु केळीचे वेफर्स यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. डिंक, बिब्याची गोडंबी आदी कच्‍चा माल  उपलब्‍ध राहणार आहे.

या महोत्सवात कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, हरिद्रा येथील शंशोधन संस्थाचे शास्त्रज्ञ – शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती निविष्ठा निर्मिती, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, रेशीम शेती, मधुमक्षिका पालन, केळी लागवड, पौष्टिक तृणधान्य व आहारातील महत्व, हवामान बदल पीकपद्धती व आधुनिक शेती तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

तरी मोठया संख्‍येने शहरातील व जिल्‍हयातील शेतक-यांनी भेटी द्याव्यात याचे नियोजन करण्‍यात आलेले आहे. हा महोत्‍सव नांदेड शहरवासीयांना मेजवानी असुन सर्वांनी यास भेट देवून शेतमाल खरेदी करुन जिल्‍हयातील शेतक-यांना प्रोत्‍साहन देवून आनंद द्विगुणित करावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

०००००

 वृत्त क्रमांक 293

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून

दोन दिवसात एकूण 18 कारवाया

कारवाईत 3 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड, दि.16 मार्च :- धुलिवंदनामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी 14 मार्च 2025 रोजी किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तीस कोरडा दिवस घोषित करण्यात आला होता. या काळात अवैध मद्याची वाहतुक व विक्री मोठया प्रमाणात शक्यता नाकारता येत नसल्याने अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील भरारी पथकाने 14 व 15 मार्च रोजी जिल्ह्यात एकूण 18 कारवाया केल्या.

यात एकूण 18 गुन्हे, वारस 18, अटक आरोपी 18, रसायन 200, देशी मद्य 71.64 लि, विदेशी मद्य 1.80 लि, ताडी 611 लि, जप्त वाहन संख्या 2 असा एकूण 3 लाख 18 हजार 605 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली जावेद कुरेशी, आशिष महिंद्रकर, लक्ष्मण पाटील, सरकाळे, सर्व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, सचिन शेट्टे, अमित वालेकर, रेणुका सलगरे, रामप्रसाद पवार, अमित आढळकर, मोनिका पाटील, संदीप देशमुख, श्रीमंत बोरुडे, अमोल शिंदे, श्री परते, कार्यकारी दुय्यम निरीक्षक शिवदास कुबडे, बळीराम इथर, दुय्यम निरीक्षक तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक, जवान आणि जवान-नि-वाहनचालक राज्य उत्पादन  शुल्क विभाग यांनी कार्यवाहीत भाग घेतला.

नांदेड जिल्ह्यात कोणीही अवैध मद्य खरेदी करु नये, तसेच अवैध मद्य, बनावट व परराज्यातील विदेशी मद्य कोणी बाळगून असेल किंवा विक्री करीत असेल तर यांची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागास द्यावी. तसेच या विभागाचा फोन नंबर टोल फ्री क्र. 1800833333 व व्हॉटसअप क्रमांक 8422001133 वर संपर्क करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी केले आहे.

0000

 #नांदेड जिल्हा कृषी व धान्य महोत्सव

वृत्त क्रमांक 292

जिल्हा कृषि व धान्य महोत्सवात सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी  

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर सोमवार 17 व मंगळवार 18 मार्च रोजी जिल्हा कृषि व धान्य महोत्सवाचे आयोजन 

नांदेड दि. १५ मार्च :-  महाराष्ट्र कृषी विभाग व रोटरी क्लब, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी व धान्य महोत्सव 2025 चे आयोजन दिनांक 17 ते 18 मार्च 2025 या कालावधीत करण्यात आले आहे. हा कृषी महोत्सव कृषि उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा, नांदेड येथे सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यत आयोजित केला आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी , ग्राहकानी या कृषी व धान्य महोत्सवास भेट देवून शेतमाल खरेदी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. 

या कृषी महोत्सवात परिसंवाद व चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री व कृषि प्रदर्शन, कृषि विज्ञान केंद्र, कृषी विद्यापिठाचे स्टॉल, विविध कृषी निगडित तंत्रज्ञानाचे प्रदर्शन व कृषी संलग्न शासकीय विभागाचे 50 स्टॉल  उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला गटांचा सक्रिय सहभाग या महोत्सवात राहणार आहे. 

या महोत्सवांच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल गहु, ज्वारी, तांदुळ, तुर, मुग, उडीद, चनादाळ, हळद, मिरची, मसाले विविध प्रकारचे सेंद्रीय उत्पादने गुळ, हळद पावडर, सेंद्रीय डाळी तसेच नाविण्यपूर्ण उत्पादने जसे. मध, गुळाचा पाक व महिला बचतगटांची उत्पादने चटणी, लोणचे, पापड, कुरडई इत्यादी. तसेच टरबूज, खरबूज आदी फळे व भाजीपाला थेट विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. तसेच जात्यावरील सेंद्रीय डाळ, गोदाकाठची ज्वारी, सेंद्रीय हिरव्या भाज्या, फळभाज्या व फूलभाज्या व रानफळे विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यांनी विविध उत्पादित केलेले लाकडी घाण्याचे करडई, भुईमुग, जवस, तीळाचे तेल, बांबुपासून तयार करण्यात आलेले वस्तु केळीचे वेफर्स यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. डिंक, बिब्याची गोडंबी आदी कच्चा माल उपलब्ध राहणार आहे. 

या महोत्सवामध्ये शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी भेटी द्याव्यात याचे नियोजन करण्यात येणार आहे. हा महोत्सव नांदेड शहरवासियांसाठी मेजवानी असून सर्वानी यास भेट देवून शेतमाल खरेदी करावा व शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून त्यांचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्माचे दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

0000

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन 8 ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक  समता  सप्ताहाचे आयोजन   ना...