Monday, March 17, 2025

वृत्त क्रमांक 294

आज जिल्‍हा कृषि व धान्य महोत्‍सव 

शेतकऱ्यांच्या शेतमालाची होणार थेट खरेदी विक्री 

नांदेड, दि. १६ मार्च:- महाराष्ट्र शासन, कृषि विभाग व रोटरी क्लब, नांदेड यांचे संयुक्‍त विद्यामाने आयोजित“जिल्‍हा कृषि व धान्य महोत्‍सव 2025 ’’ परिसंवाद व चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री व प्रदर्शन उद्यापासून दोन दिवसीय 17 ते 18 मार्च 2025 या कालावधी सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यत कृषिउत्‍पन्‍न बाजार समिती, नवा मोंढा, नांदेड येथे आयोजित करण्‍यात आलेले आहे. 

या कृषि महोत्‍सवात कृषि प्रदर्शन, कृषि विज्ञान केंद्र / कृषि विद्यापीठाचे स्‍टॉल, हरिद्रा (हळद), विविध कृषि निगडीत तंत्रज्ञानाचे प्रदर्शन व कृषि संलग्‍न शासकीय विभागाचे स्‍टॉल असे एकूण 75 स्‍टॉल उभारण्‍यात आलेले आहेत. 

त्‍याचबरोबर विविध विषयांचे परिसंवाद व चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. यामध्‍ये जिल्‍हयातील शेतकरी गट, शेतकरी उत्‍पादक कंपनी व महिला आर्थिक विकास महामंडळाच्‍या महिला गटांचा सक्रिय सहभाग या महोत्‍सवात राहणार आहे. महोत्‍सवांच्‍या ठिकाणी आपल्‍या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल गहु, ज्वारी, तांदूळ, तुर, मुग,उडीद, चनाडाळ, हळद, मिरची, मसाले, विविध प्रकारचे सेंद्रीय उत्पादने (गुळ, हळद पावडर, सेंद्रीय डाळी) तसेच नाविन्यपूर्ण उत्पादने जसे, मध, गुळाचा पाक व महिला बचतगटांची उत्पादने (चटणी, लोणचे, पापड, कुरडई इत्यादी) टरबुज, खरबुज, स्ट्रोबेरी, ड्रगन फ्रुट आदी फळे व भाजीपाला थेट विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत.

तसेच जात्‍यावरील सेंद्रीय डाळ, गोदाकाठची ज्‍वारी,  सेंद्रीय हिरव्‍या भाज्‍या, फळभाज्‍या व फूलभाज्‍या व रानफळांची व शेतक-यांनी विविध उत्‍पादीत केलेले लाकडी घाण्‍याचे करडई, भुईमुग, जवस, तीळाचे तेल, बांबुपासुन तयार करण्‍यात आलेले वस्‍तु केळीचे वेफर्स यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. डिंक, बिब्याची गोडंबी आदी कच्‍चा माल  उपलब्‍ध राहणार आहे.

या महोत्सवात कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, हरिद्रा येथील शंशोधन संस्थाचे शास्त्रज्ञ – शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती निविष्ठा निर्मिती, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, रेशीम शेती, मधुमक्षिका पालन, केळी लागवड, पौष्टिक तृणधान्य व आहारातील महत्व, हवामान बदल पीकपद्धती व आधुनिक शेती तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

तरी मोठया संख्‍येने शहरातील व जिल्‍हयातील शेतक-यांनी भेटी द्याव्यात याचे नियोजन करण्‍यात आलेले आहे. हा महोत्‍सव नांदेड शहरवासीयांना मेजवानी असुन सर्वांनी यास भेट देवून शेतमाल खरेदी करुन जिल्‍हयातील शेतक-यांना प्रोत्‍साहन देवून आनंद द्विगुणित करावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक  441 उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा दौरा  नांदेड दि. 27 एप्रिल :- राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उप...