Tuesday, June 18, 2024

 वृत्त क्र. 494

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यशवंत महाविद्यालयात आजपासून मल्टिमिडीया चित्र प्रदर्शन 

बुधवारी सकाळी ११ वाजता यशवंत महाविद्यालयात प्रदर्शनाचे उद्घाटन  

नांदेड दि. 18 :-  आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी जगभर साजरा करण्यात येतो.  त्यानिमित्त यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त नांदेड येथे 19 ते 21 जून 2024 दरम्यान येथील यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातील बहूउद्देशीय क्रीडा संकुल येथे, योग अभ्यासावर आधारित मल्टीमिडीया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 या प्रदर्शनाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्युरो, नांदेड व श्री शारदा भवन एज्यूकेशन सोसायटी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 19 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. 

 यावेळी माजी मंत्री तथा श्री. शारदा भवन एज्यूकेशन सोसायटीचे सचिव डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके, जिल्हा क्रिडा अधिकारी सुनिल बेतीवार, नगर रचना विभागाचे सहायक संचालक पी.एल. आलूरकर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, द आर्ट ऑफ लिविंगचे समन्वयक शिवा बीरकले, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल आणि सर्व प्राध्यापक वर्ग तसेच संस्थेचे कर्मचारी-विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनानिमित्त संपूर्ण योग अभ्यासाची माहिती विद्यार्थी आणि शिक्षकांना मिळावी यासाठी 19 ते 21 जून दरम्यान यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातील बहुउद्देशीय क्रीडा संकूल येथे द आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या सहकार्याने सकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. योगाभ्याची माहिती विद्यार्थांना मिळावी यासाठी विविध शाळांमध्ये योगावर आधारित पोष्टर स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

दिनांक 21 जून 2024 रोजी जनजागृती रॅलीचे आयोजनही करण्यात आले आहे. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाची संकल्पना "महिला सक्षमीकरणासाठी योग" ही असून यावर्षी 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होणार आहे. महिलांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करून आणि जागतिक आरोग्य आणि शांतता यांना प्रोत्साहन देऊन योगाभ्यासाला एक व्यापक चळवळ म्हणून चालना देणे हा योग महोत्सव 2024 चा उद्देश आहे.

00000



वृत्त क्र. 493 दि. 15 जून 2024

 बकरी ईद सण शांततेत साजरी करण्याचे आवाहन

·  शांतता समितीची बैठक संपन्न

नांदेड दि. 15 :- बकरी ईद सणानिमित्त जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी. यासाठी जिल्ह्यात व शहरात बकरी ईद सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरी करण्यात यावी, यासाठी सर्वानी नियमाचे पालन करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी सर्व विभागाना सूचना केल्या.

आज जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात मंथन हॉल येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराय धरणे व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आणि शांतता समितीचे सदस्य व सर्व संबंधित विभागप्रमुख आदीची उपस्थिती होती.  

0000






वृत्त क्र. 492 दि. 15 जून 2024

युवाशक्ती करीअर शिबिराच्या माध्यमातून ; युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध 

             -  आमदारांची कार्यक्रमाला उपस्थिती 

·  युवाशक्ती करीअर शिबिरात 800 युवक-युवतींचा सहभाग 

·  युवक- युवतीनी करिअर शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड दि. 15 :- दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी या विषयावर शासनाच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबिर संकल्पना राबविण्यात येत आहे. या युवाशक्ती करीअर  शिबिराच्या माध्यमातून युवक-युवतींना रोजगाराच्या संधी व मार्गदर्शन मिळेल, या संधीचा युवक-युवतीनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार बालाजी कल्याणकर व आमदार आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केले.

औद्यागिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन आज कामगार कल्याण मंडळाचे ललीतकला भवन लेबर कॉलनी येथे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते दोघे उपस्थित होते.  

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई , शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्यावतीने आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे उदघाटन आज आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते झाले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास राठी , उद्योजक अरुण फाजगे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर. बी. गणवीर , रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सहाय्यक आयुक्त  रेणूका तम्मलवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.व्ही. सुर्यवंशी, उद्योजक अरुण फाजगे आदीची उपस्थिती होती.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून आयोजित शिबिरातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी व मार्गदर्शन मिळून मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. या युवाशक्ती करीअर शिबिराचा युवक-युवतीनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केले. तसेच त्यांनी या मेळाव्यात उपस्थित युवक- युवकांना शुभेच्छा दिल्या.  

या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून 800 युवक व युवतींनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी व उज्वल भविष्यासाठी प्रा. सारिका बकवाड यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता 10 व 12 वी नंतरच्या संधी याबाबत संजय सारडा यांनी मार्गदर्शन केले. सुहास राऊत यांनी शैक्षणिक कर्ज व स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय योजना याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्तावना जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी. गणवीर यांनी केले. करीअर मार्गदर्शन संबंधी विविध महामंडळामार्फत प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे उपप्राचार्य कंदलवाड व्ही.डी. यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राका यांनी केले.

00000













  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...