Tuesday, June 18, 2024

 वृत्त क्र. 494

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यशवंत महाविद्यालयात आजपासून मल्टिमिडीया चित्र प्रदर्शन 

बुधवारी सकाळी ११ वाजता यशवंत महाविद्यालयात प्रदर्शनाचे उद्घाटन  

नांदेड दि. 18 :-  आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी जगभर साजरा करण्यात येतो.  त्यानिमित्त यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त नांदेड येथे 19 ते 21 जून 2024 दरम्यान येथील यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातील बहूउद्देशीय क्रीडा संकुल येथे, योग अभ्यासावर आधारित मल्टीमिडीया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 या प्रदर्शनाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्युरो, नांदेड व श्री शारदा भवन एज्यूकेशन सोसायटी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 19 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. 

 यावेळी माजी मंत्री तथा श्री. शारदा भवन एज्यूकेशन सोसायटीचे सचिव डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके, जिल्हा क्रिडा अधिकारी सुनिल बेतीवार, नगर रचना विभागाचे सहायक संचालक पी.एल. आलूरकर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, द आर्ट ऑफ लिविंगचे समन्वयक शिवा बीरकले, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल आणि सर्व प्राध्यापक वर्ग तसेच संस्थेचे कर्मचारी-विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनानिमित्त संपूर्ण योग अभ्यासाची माहिती विद्यार्थी आणि शिक्षकांना मिळावी यासाठी 19 ते 21 जून दरम्यान यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातील बहुउद्देशीय क्रीडा संकूल येथे द आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या सहकार्याने सकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. योगाभ्याची माहिती विद्यार्थांना मिळावी यासाठी विविध शाळांमध्ये योगावर आधारित पोष्टर स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

दिनांक 21 जून 2024 रोजी जनजागृती रॅलीचे आयोजनही करण्यात आले आहे. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाची संकल्पना "महिला सक्षमीकरणासाठी योग" ही असून यावर्षी 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होणार आहे. महिलांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करून आणि जागतिक आरोग्य आणि शांतता यांना प्रोत्साहन देऊन योगाभ्यासाला एक व्यापक चळवळ म्हणून चालना देणे हा योग महोत्सव 2024 चा उद्देश आहे.

00000



No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...