Thursday, January 9, 2025

 वृत्त क्रमांक 35

11 जानेवारीपासून वित्त व लेखा विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा

नांदेड दि. 9 जानेवारी : छत्रपती संभाजीनगर विभागातील संचालनालय लेखाकोशागारे कर्मचारी कल्याण समिती मार्फत वित्त व लेखा विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा नांदेड येथे 11 जानेवारीपासून होत आहे.11 जानेवारीला सकाळी आठ वाजता सायन्स कॉलेज नांदेड येथे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ होणार आहे.

11 व 12 जानेवारी या दोन दिवसात विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन कुसुम सभागृह नांदेड येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण 12 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लेखा व कोषागारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन लेखा व कोषागार विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 34

नांदेड जिल्हयातही 'मिशन 100 डे ' 

 ७ कलमी कार्यक्रमाची धडाकेबाज अंमलबजावणी सुरू 

नांदेड, दि. ९ जानेवारी :  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ७ कलमी कार्यक्रमाच्या  'मिशन 100 डे ' अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या उपक्रमांतर्गत शंभर दिवसांत नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासनातील सुधारणा आणि गुंतवणूक प्रोत्साहन यावर भर दिला जाणार आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांना प्रमुख मुद्द्यांवर काम करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 7 जानेवारी रोजी आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नंतर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लेखी आदेश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील सात सूत्रांचा वापर करण्यात आला आहे.

७ कलमी कार्यक्रमाचे मुख्य मुद्दे

१. वेबसाईट अद्यावत करणे: जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटचा दर्जा सुधारून ती माहितीपूर्ण आणि नागरिकांसाठी उपयुक्त करण्यावर भर दिला जाणार आहे. नागरिकांना ऑनलाइन सुविधांचा जलद लाभ घेता यावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. ज्या कार्यालयांच्या वेबसाईट आहेत त्या सर्व अपडेट करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

२. इज ऑफ लिविंग वाढविणे: 

नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी, विविध सेवांचे सुसूत्रीकरण व सरळीकरण करण्याचे आणि समस्यांवर सोयीस्कर उपाययोजना हाती घेतल्या जातील.

३. कार्यालयीन स्वच्छता: 

सुंदर माझे कार्यालय या शासन निर्णयाप्रमाणे प्रशासनातील प्रत्येक कार्यालय स्वच्छ, सुटसुटीत आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवली जाईल.

४. तक्रार निवारण: 

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतींचा वापर केला जाईल. विशेषता यासाठी आपले सरकार पोर्टल, सीपी ग्राम व पीजी पोर्टल व इतर ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून तक्रारी निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

५. सोयीसुविधा वाढविणे: 

नागरी सुविधा सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली जातील. शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे कार्यालयातील स्वच्छतागृहे अद्यावत ठेवणे कार्यालयामध्ये अभ्यास कक्ष निर्माण करणे कार्यालय परिसराचे सुशोभीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे

६. गुंतवणूक प्रोत्साहन: 

 जिल्ह्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि नवीन उद्योगांची स्थापना करण्यासाठी विशेष धोरणे आखली जातील. तातडीने सर्व परवाने संबंधितांना उपलब्ध होतील कुठेही अडवणूक होणार नाही याबाबत दक्ष राहण्याची सूचना त्यांनी केली आहे.

७. क्षेत्रीय भेटी वाढविणे: 

अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवस क्षेत्रीय भेटीसाठी राखून ठेवावे तसेच क्षेत्रीय भेटीमध्ये शासनाच्या महत्त्वकांक्षी व पथदर्शी योजनांचा आढावा घेण्याची निर्देश त्यांनी विभागप्रमुखांना दिले आहे.

 वेळापत्रक आणि प्रगती आढावा 

या कार्यक्रमाची सर्व अंमलबजावणी १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, ५० दिवसांनंतर या प्रकल्पाचा आढावा घेण्यात येईल. सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करत या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शंभर दिवसाच्या कालमर्यादेत परिपूर्णतेचे आदेश दिले आहेत.

000000

 वृत्त क्रमांक 33

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत तुरूंगातील कैद्यांना मिळणार

 30 दिवसांचे उद्योग उभारणीबाबतचे प्रशिक्षण

                                                                                                                                                                           नांदेड दि. 9 जानेवारी :-  कारागृहातून सुटून गेल्यानंतर बंधीवासांना ( तुरूंगातील कैद्यांना ) त्यांच्या स्व:ताच्या स्वबळावर उद्योग स्थापन करुन समाजात स्थान मिळावे, या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत नांदेड जिल्हा कारागृहातील 30 बंद्याना उद्योग उभारणीबाबतचे 30 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात यावे, असे निर्देश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सुरेखा कोसमकर यांनी दिल्या. 

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांचे अध्यक्षेतेखाली मा. सर्वोच्च न्यायालय, सुकन्या विरुध्द युनियन ऑफ इंडिया व इतर या प्रकरणात दिलेल्या निर्देशानुसार व मॉडल प्रिझन मॅन्युअल सन 2016 नुसार नांदेड कारागृहामध्ये नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांनी कारागृहाची पाहणी करुन बंद्याची विचारपूस केली. तसेच कारागृहात बंद्याना जातीनिहाय काम दिले काय याबाबत त्यांची माहिती घेतली. यावेळी बंद्यानी स्वच्छेने हे काम स्विकारल्याचे तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे मासिक वेतन मिळते याबाबतची माहिती दिली.

                                                                                                                                                                           या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, न्यायाधीश-१ चंद्रशेखर मराठे, जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाच्या सचिव व न्यायाधीश दलजीत कौर जज, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुरज गुरव व संबंधित विभागाचे अधिकारी, अशासकीय सदस्य यांची उपस्थिती होती. या बैठकीस सर्वोच्च न्यायालयानी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कारागृहात बंद्याना देण्यात येणाऱ्या कामाची, स्वच्छता, साफसफाई, कुंडाकाम, स्वयंपाक काम, धान्यगोडाम इ. कामाची समितीपुढे बंद्याना देण्यात आलेल्या कामाची तपासणी केली. यावेळी कारागृहाचे अधिक्षकांनी कारागृहात येणाऱ्या अडी-अडचणी, समस्या व जिल्हा कारागृहात बंद्यासाठी नव्याने शिक्षण व प्रशिक्षण चालू करण्याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाच्या अध्यक्षा व जिल्हाधिकारी यांच्याकडे विनंती केली.

00000

  वृत्त क्रमांक 32

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिमायतनगर येथे

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड दि. 9 जानेवारी :-  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिमायतनगर येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त 12 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त निबंध, वादविवाद स्पर्धा तसेच उद्योजकांचे मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तरी माजी प्रशिक्षणार्थी, नियमित प्रशिक्षणार्थी व त्यांचे पालकांनी या उपक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य जे. एल. गायकवाड यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्रमांक 35 11 जानेवारीपासून वित्त व लेखा विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा नांदेड दि. 9 जानेवारी : छत्रपती संभाजीनगर विभागातील संचाल...