‘9 वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची’
या संकल्पनेवर नांदेड येथे मल्टिमिडीया प्रदर्शनाचे आयोजन
शासनाच्या विविध विभागांच्या वतीने माहिती स्टॉल लावण्यात येणार
नांदेड (जिमाका) दि. 24:- केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालय अखत्यारीतील नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्यावतीने व रेल्वे विभागाच्या सहकार्याने हुजूर साहीब, रेल्वे स्टेशन नांदेड येथे केंद्र सरकाच्या सेवेला 9 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त “9 वर्षे-सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची” या संकल्पनेवर आधारित ३ दिवसांसाठी मल्टिमिडीया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 26 ते 28 जुलै 2023 दरम्यान सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत सर्वांसाठी मोफत प्रवेश असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांमध्ये केलेली उल्लेखनिय कामगिरी आणि देशाचा जलदगतीने केलेल्या विकासाची गाथा तसेच जनतेच्या कल्याणासाठी सरकारकडून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या नवनवीन योजनांची माहिती या मल्टीमिडीया प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. गेल्या 9 वर्षांच्या कालावधीत जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी विविध अनेक कल्याणकारी योजनांना सुरुवात करून त्या योजनांची अमंलबजावणी केली. यात जनधन योजना, मुद्रा योजना, पीएम गरीब कल्याण योजना,प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री पिक विमा योजना, कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, पी एम किसान योजना, आयुष्मान भारत योजना, लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट निधीचे वितरण, डिजिटल इंडिया, महामार्गांची बांधणी अशा अनेक महत्वाच्या योजना राबवून जनसामान्य लोकांना त्याचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी लाभार्थांच्या खात्यावर थेट रक्कम जमा करण्यात येत आहे.
या चित्र प्रदर्शनात कृषी विभाग, टपाल विभाग व जिल्हा परिषदेच्यावतीने स्टॉल्सच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती आणि सेवा देण्यात येणार आहे. तसेच विविध शाळांमध्ये कारगील विजय दिनानिमित्त निबंध स्पर्धा आणि रॅली काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉं. महेंद्रकुमार डोईफोडे, दक्षिण मध्य रेल्वेचे अपर विभागीय व्यवस्थापक राजेद्र मीना, वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक नागेंद्र प्रसाद, टपाल विभागाचे डाक अधिक्षक, राजीव पालेकर, कृषी विभागाचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनास मोठ्या संख्येने नागरिक आणि प्रवाशांनी भेटी द्याव्यात असे आवाहन प्रसिध्दी अधिकारी माधव जायभाये, रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे व सहायक प्रसिध्दी अधिकारी सुमित दोडल यांनी केले आहे.
00000