Sunday, March 19, 2017

वृक्ष म्हणजे जीवन, त्यांना जीव लावा - मुनगंटीवार
बोंढार येथील जैव विविधता उद्यानास भेट ,
तुळशीच्या विविध प्रजातींचे जतन

नांदेड, दि. 10 :-  वृक्ष म्हणजे जीवन, त्यांना जीव लावला, तर ते सर्वच जिवांना प्राणवायू देतात. त्यासाठी वृक्षांच्या विविध प्रजातींचे जतन करणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे अर्थ व नियोजन तथा वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे व्यक्त केले. नांदेड शहराजवळील बोंढार गावाच्या शिवारातील सामाजिक वनीकरण विभागाच्या स्वर्गीय उत्तमराव पाटील जैव विविधता उद्यानाची श्री. मुनगंटीवार यांनी पाहणी केली, तसेच येथील विविध प्रजातींच्या तुळशींच्या लागवडीच्या वाटीकेचेही उद्घाटन केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.


याप्रसंगी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, औरंगाबाद वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक ए. एन. भोसले, नांदेडचे उपवनसंरक्षक सुजय डोडल, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपसंचालक सामाजीक वनीकरण सुर्यकांत मंकावार, सहायक संचालक शंकर बिलोलीकर, डी. एस. पवार, व्ही. एन. गायकवाड, विभागीय सर्वेक्षक मोहन कोसकेवार, कृष्णा पांडे,  लागवड अधिकारी के. वाय. शेख, जयश्री जाधव तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, डॅा. अजित गोपछडे, व्यंकटेश चाटे, चैतन्यबापू देशमुख, संजय कोडगे, प्रविण साले आदींची उपस्थिती होती.
            याप्रसंगी श्री. मुनगंटीवार यांनी अभिप्रायाद्वारे संदेश दिला. त्यात म्हटले आहे की, वृक्ष म्हणजे जीवन. वृक्षांना जीव लावला, तर ते सर्वच जीवांना प्राणवायू देतात. त्यामुळे वृक्षांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानाने आपले वैशिष्ट्य जपले आहे. त्यामुळे ते जैवविविधतेने नटले आहे.
सुरवातीला श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्यानातील तुळशीच्या वाटीकेचे उद्घाटन झाले. तसेच विविध वृक्षांचेही रोपण करण्यात आले. तुळशी वाटीकेत पंढरपुरी, रानतुळस, कृष्ण तुळस, लवंगी तुळस, विष्णू तुळस, सरदार तुळस, कापुरी तुळस, वैजयंती तुळश, त्रिगुना तुळश अशा दहा प्रजातींच्या सुमारे 217 रोपांचे जतन करण्यात आले आहे. यातून या प्रजाती संवर्धीत करण्यात येणार आहे. श्री. मुनगंटीवार यांनी या प्रजातींचे वैशिष्ट्यही जाणून घेतले. मानगा बांबू निर्मिती प्रकल्पाचीही त्यांनी माहिती घेतली. रोपवाटिकेलाही त्यांनी भेट देऊन पाहणी केली. वड, पिंपळ, कडूलिंब या देशी वृक्षाची लागवड वाढावी यासाठी त्यांच्या रोपनिर्मितीवर अधिक भर दयावा, असे निर्देशही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.
सुमारे पंचवीस एकर क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या जैव विविधता उद्यानात तेरा प्रकारची वने विकसित केली आहेत. तसेच 2.25 टीसीएम क्षमतेचे शेततळे, 80 मीटर्सचा माती नाला बांधही बांधण्यात आला आहे. उद्यानात आँक्सीजन वन, तसेच नक्षत्रवन तसेच विविध फळ, औषधी वनस्पती, सर्वधर्म वृक्ष वन आदीं वने समाविष्ट आहेत. विशेष प्रयत्नातून हे जैवविविधता उद्यान विकास आणि संवर्धनाच्या प्रयत्नालाही श्री. मुनगंटीवार यांनी दाद दिली.

0000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...