Thursday, November 21, 2019


विधी सहाय्य मिळविण्यासाठी जनजागृती ;
पोलीस अधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न
नांदेड दि. 21 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशांनुसार व प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण दिपक धोळकिया, यांच्या मार्गदर्शनाखाली अटकपूर्व, अटक आणि रिमांड स्तरावरील न्याय सर्वांसाठी या संकल्पनेतून जनजागृतीबाबत पोलीस अधिकाऱ्यांसोबत आज 21 नोव्हेंबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेस अध्यक्ष म्हणून प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात माननीय सर्वोच्य न्यायालयाचे व उच्च न्यायालय यांचे वेगवेगळया न्याय निर्णयामधील निर्देशनाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व पोलीसांना दिले.
पोलीसांनी त्यांचे कर्तव्य बजावत असताना आरोपीच्या हक्काची पायमल्ली होऊ नये याची दक्षता घ्यावी. तसेच आरोपीचा पूर्व इतिहास, गुन्हेगारी पार्श्वभूमी या सर्व बाबी विचारात घ्याव्यात, असे त्यांनी सांगितले.  
या कार्यशाळेस जिल्हा न्यायाधीश के. एन. गौतम, मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. हिवाळे,  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे, सहाय्यक सरकारी वकिल श्रीमती सुनंदा चावरे, हाके सर, सरकारी वकिल, नांदेड जिल्हयातील पोलीस अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. पोलीसांनी अटक पूर्व, अटक व रिमांड करताना या व्यक्तीस त्याच्या न्याय्य अधिकाराची त्यास जाणीव करुन देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. एस. रोटे यांनी केले. तसेच नय्युमखान पठाण, रिटेनर लॉयर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर एस. एम बेंडे, रिटेनर लॉयर यांनी मान्यवरांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केल्या बद्दल व उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानले.
00000


बागायतदारांनी ठिबक, तुषार सिंचन
पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन
               नांदेड दि. 21 :-  जिल्ह्यातील सर्व बागायतदारांनी, लाभाधारकांनी ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी केले आहे.
               महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, 2005 मधील कलम 14 (4) मध्ये निर्धारित केला जाईल अशा भागातील बारमाही पिकांना निर्धारित केला जाईल अशा दिनांकापासून ठिबक सिंचन, तुषार सिंचन अथवा प्राधिकरणाने मान्यता दिलेले अन्य पाण्याची बचत करणारे तंत्र वापरल्या खेरीज कालव्यामधून पाणी दिले जाणार नाही व या बचतीमधून भविष्यातील वाढीव पिण्याच्या पाण्याची मागणी भागवून शिल्लक राहिलेले पाणी लाभक्षेत्रातील तसेच लगतच्या भागात समन्यायी तत्वावर वाटप करण्यात येईल.
               या तरतुदीप्रमाणे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने 20 मे 2019 च्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- क 12 जुलै 2019 नुसार जलसंपदा प्रकल्पातील जलाशयावरील उपसा सिंचन योजनांना (वैयक्तिक, सामुहिक, सहकारी, पाणी वापर संस्था) ऊस, केळ व फळबागा इत्यादी बारमाही पिकांसाठी, शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन अथवा प्राधिकरणाने मान्यता दिलेले अन्य पाण्याची बचत करणारे तंत्र वापरल्याखेरीज, 31 ऑक्टोंबर 2020 नंतर जलाशयातून पाणी उपलब्ध करुन दिले जाणार नाही व या आदेशाचे पालन न करणाऱ्यांची जलाशयावरील पाणी उपसा परवानगी कालवा अधिकाऱ्यांमार्फत रद्द केली जाईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी केले आहे.
00000


 जिल्हा परिषद पेठवडजचा
पोटनिवडणूक कार्यक्रम रद्द
नांदेड दि. 21 :- राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेतील कंधार तालुक्यातील 50-पेठवडज या रिक्त पदाचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. जिल्हाधिकारी नांदेड यांचे आदेशान्वये जिल्हा परिषद 50-पेठवडज (ता. कंधार) या रिक्त निवडणूक विभागाची पोटनिवडणूक प्रक्रिया मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांच्या पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
0000


    महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी
माहिती अधिकार अधिनियमाचे प्रशिक्षण संपन्न  
नांदेड दि. 21 :- यशवंतराव चव्‍हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्‍त विद्यमाने महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे आज माहिती अधिकार अधिनियम-2005 व आरटीआय ऑनलाईन या विषयांबाबत एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते.  
या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. प्रशिक्षणास प्रमुख पाहुणे म्‍हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे  व निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. सचिन खल्‍लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रशिक्षणाचे आयोजन दोन सत्रात करण्‍यात आले होते. प्रथम सत्रात यशदा पुणे येथील व्‍याख्‍याते महेंद्र पांगळ, मिनाज शेख  व श्रीमती राजश्री पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना माहिती अधिकार अधिनियम-2005 या विषयावर मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात जिल्‍हा सुचना विज्ञान अधिकारी प्रफुल्‍ल कर्णेवार व सहा. जिल्‍हा सुचना विज्ञान अधिकारी प्रदिप डुमणे यांनी आरटीआय ऑनलाईन याविषयाबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्‍या अंतिम तासात मार्गदर्शकांनी प्रशिक्षणार्थींच्‍या प्रश्‍नांना उत्‍तरे देऊन त्‍यांच्‍या शंकांचे समाधान केले. जिल्‍हाधिकारी कार्यालयासह जिल्‍ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
प्रशिक्षणाच्‍या आयोजनाची जबाबदारी उपजिल्‍हाधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे व तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांनी पार पाडली. या कामात त्‍यांना नायब तहसिलदार सुनिल माचेवाड, श्रीमती संजिवनी मुपडे, श्रीमती सुचिता बोधमवाड, गणेश नरहिरे, माधव पवार, नागेश स्‍वामी, आनंदा कांबळे, रविकांत दहिवाळ, श्री धापसे, रामदास ढगे, श्रीमती कल्‍पना क्षीरसागर, श्रीमती सविता नागरगोजे, श्रीमती ज्‍योती कदम व गजानन घोटाळे यांनी सहकार्य केले.
00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...