Monday, June 3, 2024

 वृत्त क्र. 462


आज मतमोजणी ; 23 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार

·  प्रशासनाची जय्यत तयारी
·  सकाळी ८ पासून सुरु होईल मतगणना
.  पहिल्या फेरीचा निकाल 11 वाजेपर्यंत
·  मतमोजणी परिसरात चोख बंदोबस्त


नांदेड दि. 3 :-  १६ - नांदेड मतदार संघातील २३ उमेदवारांपैकी अठराव्या लोकसभेमध्ये खासदार म्हणून कोण जाणार याचा निवाडा उद्या मतमोजणी प्रक्रियेद्वारे होणार आहे. नांदेड जिल्हा प्रशासनाने मतमोजणी प्रक्रियेची जय्यत तयारी केली असून आज दोन्ही निवडणूक निरीक्षक तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम घेण्यात आली. उद्या सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल कळेल तर सायंकाळी उशिरापर्यंत अंतिम निकाल येईल अशी शक्यता आहे.

    नांदेड लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडले. नांदेड जिल्हयात एकूण 18 लाख 51 हजार 843 मतदार होते. यात 9 लाख 55 हजार 84 पुरुष तर 8 लाख 96 हजार 617 महिला तर 142 तृतीयपंथीयाचा समावेश होता. जिल्हयामध्ये ६०.९४ टक्के मतदान झाले एकूण ११ लक्ष २८ हजार ५६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज निवडणूक निरीक्षक शशांक मिश्न, समीरकुमार ओ. जे. यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवडणूक निरीक्षकासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

 ८० दिवसांचा निवडणूक कार्यक्रम

१६ मार्च पासून उदया ४ जून असे एकूण ८० दिवस प्रशासन निवडणूक प्रक्रीयेत व्यस्त होते.  नांदेड जिल्‍ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍यात आली. नांदेड दक्षिण मतदार संघातील विष्णुपुरी येथे पर्यावरणपूरक मतदान केंद्र स्थापन केले होते. विविध मान्यवरांनी या केंद्राला भेटी दिल्या. महिला सखी मतदान केंद्र, वजीराबाद नांदेड येथे गुलाबपुष्प देऊन मतदारांचे स्वागत करण्यात आले होते. तसेच प्रशासनाने केलेली तयारी आणि आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी २६ एप्रिल 2024 रोजी मतदानाला भरभरुन प्रतिसाद दिला. यात महिला, पुरुष, नवमतदार, दिव्यांग, तृतीयपंथ यांनी मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 60.94 टक्के मतदान झाले.

 उदया स्ट्राँग रूम उघडणार

 या मतदानाच्या मतपेट्या तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्थेत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात स्ट्रॉगरूममध्ये २५ एप्रिलपासून ठेवण्यात आल्या आहेत. निवडणूक निरीक्षक, जिल्हाधिकारी, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम सिलबंद करण्यात आले आहे. यांची 24 तास इनकॅमेरा निगराणी ठेवण्यात आली होती. उदया सकाळी ७ वाजता स्ट्राँग रूम निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निरीक्षक व प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहे.

 २३ उमेदवाराचे भवितव्य उद्या ठरणार

लोकसभेसाठी विविध पक्ष व अपक्ष म्हणून लढलेल्या 23 उमेदवारांचे भवितव्य उद्या ठरणार आहे.यामध्‍ये चव्हाण वसंतराव बळवंतराव (इंडियन नॅशनल काँग्रेस) चिन्‍ह- हात,चिखलीकर प्रतापराव गोविंदराव (भारतीय जनता पार्टी)- चिन्‍ह कमळ, पांडुरंग रामा अडगुळवार (बहुजन समाज पार्टी) चिन्‍ह- हत्‍ती, अब्दुल रईस अहेमद (देश जनहीत पार्टी) चिन्‍ह-शाळेचे दप्‍तर, अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी) चिन्‍ह-शिट्टी , कौसर सुलताना (इंडियन नॅशनल लीग) चिन्‍ह-शिवण यंत्र, राहुल सुर्यकांत एंगडे (बहुजन मुक्ती पार्टी) चिन्‍ह-खाट, रुक्मिणीबाई शंकरराव गीते (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष) चिन्‍ह-ऑटो रिक्‍शा, सुशीला निळकंठराव पवार (समनक जनता पार्टी) चिन्‍ह-गॅस सिलेंडर, हरी पिराजी बोयाळे (बहुजन भारत पार्टी) चिन्‍ह-जहाज. तर अपक्षांमध्‍ये  कदम सुरज देवेंद्र (अपक्ष) चिन्‍ह-फुगा, कल्पना संजय गायकवाड (अपक्ष) चिन्‍ह-माईक, गजानन दत्तरामजी धुमाळ (अपक्ष) चिन्‍ह-कपाट, जगदीश लक्ष्मण पोतरे (अपक्ष) चिन्‍ह-टेबल, देविदास गोविंदराव इंगळे (अपक्ष) चिन्‍ह-ऊस शेतकरी, नागेश संभाजी गायकवाड (अपक्ष) चिन्‍ह-एअर कंडिशनर, निखिल लक्ष्मणराव गर्जे (अपक्ष) चिन्‍ह-हिरा, भास्कर चंपतराव डोईफोडे (अपक्ष) चिन्‍ह-सफरचंद, महारुद्र केशव पोपळाईतकर (अपक्ष) चिन्‍ह–पेन ड्राईव्‍ह, राठोड सुरेश गोपीनाथ (अपक्ष) चिन्‍ह-रोड रोलर, लक्ष्मण नागोराव पाटील (अपक्ष) चिन्‍ह-बेबी वॉकर, साहेबराव भिवा गजभारे (अपक्ष) चिन्‍ह-पेनाची निब सात किरणांसह, ज्ञानेश्वर रावसाहेब कपाटे (अपक्ष) चिन्‍ह-बांगड्या यांचा समावेश आहे.  

 तळ व पहिल्या माळ्यावर प्रत्येकी ३ केंद्र
 तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या तळमजल्यावर भोकर नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण या मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे तर पहिल्या मजल्यावर नायगाव,देगलूर व मुखेड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. पहिल्या माळ्यावरच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय थाटण्यात आले असून या ठिकाणावरून सहा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीचा एकत्रित फेरी निहाय निकाल निवडणूक आयोगाला तसेच जनतेला कळविण्यात येणार आहे.

 अतिरिक्त मंडप व पायाभूत सुविधा

 याठिकाणी सर्व पायाभूत सुविधा पूर्णतः कार्यरत झाल्या आहेत. मतमोजणी करताना आवश्यक असणारा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग, माध्यमांचा सहभाग, निवडणूक निरीक्षक आणि भारत निवडणूक आयोगाला तातडीने देण्यात येणारी माहिती, यासाठी आवश्यक पूरक तांत्रिक व भौतिक यंत्रणा या परिसरात तयार करण्यात आल्या आहेत. मतमोजणी कक्षामध्ये आवश्यक ती बैठक व्यवस्था तसेच कर्मचारी व मतमोजणी एजंट यांच्यासाठी उभी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी पिण्याचे पाणी तसेच खानपानाची व्यवस्था देखील प्रशासनाने केली आहे.

 स्ट्रॉंग रूम परिसरात बंदोबस्त
शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर, नांदेड येथे असणाऱ्या स्ट्रॉंग रूमसाठी तीनस्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात असून प्रवेशिका व तपासणी प्रक्रियेशिवाय या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही. दर्शनी भागात सहा स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही कॅमेरे 24 तास सुरू असून मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी सील लावण्यात आले आहे. स्ट्रॉंग रूममध्ये कोणालाही प्रवेश नसतो. २४ तास कॅमेऱ्याच्या माध्यमातून निगराणी केली जात आहे. उद्या सकाळी सात वाजता स्ट्रॉंग रूम उघडण्यात येणार आहे.जवळपास 500 कर्मचारी आतमध्ये या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत.. तेवढेच पोलीस अधिकारी -कर्मचारी सुरक्षा यंत्रणे संदर्भात काम करणार आहे.


सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ
सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. प्रथम पोस्टल बॅलेट पेपर व या वर्षी घरी जाऊन घेण्यात आलेल्या ज्येष्ठांच्या मतदानाची मोजणी होणार आहे. त्यानंतर एकाच वेळी सहा मतदारसंघातील मतमोजणीला प्रारंभ होईल. साधारणतः साडेदहा ते अकराच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल अपेक्षित आहे. मतमोजणी संदर्भातील प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या निर्देशित सूत्रानुसार व सूचनेनुसार चालते. यासाठी निवडणूक विभागाकडून नेमणूक करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक आणि जिल्हाधिकारी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पालन करीत मतमोजणी प्रक्रिया पार पाडतात. 4 जूनच्या सायंकाळपर्यंत सर्व फेऱ्यांची मतमोजणी पार पडण्याची शक्यता आहे.

प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी
नांदेड जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. एका विधानसभासाठी 14 टेबल असे एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे. याशिवाय पोस्टल बॅलेटसाठी १२ टेबल आहेत. थोडक्यात नांदेड जिल्ह्याची मतमोजणी 96 टेबलवर होणार आहे.

कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम
प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी असतात. यामध्ये मायक्रो ऑब्झर्वर म्हणजे सूक्ष्म निरीक्षक , दुसरे सुपरवायझर म्हणजे मतमोजणी पर्यवेक्षक, तिसरा काउंटिंग असिटंट म्हणजे मतमोजणी सहाय्यक आणि चौथा असतो एक शिपाई सहाय्य करण्यासाठी. या प्रत्येक पदाचे जवळपास प्रत्येकी 100 कर्मचारी कार्यरत असतात. आज या सर्व कर्मचाऱ्यांनी सकाळच्या सत्रात रंगीत तालीम पूर्ण केली आहे सकाळी सहा वाजता हे कर्मचारी आपल्या कर्तव्यावर पोहोचणार आहेत.

नांदेडमध्ये २६ फेऱ्याची मतमोजणी
नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी 23 तर सर्वात अधिक 26 फेऱ्यानंतर पूर्ण निकाल लागेल.एका फेरीला साधारण अर्धा तास लागतो. मात्र मतमोजणी कर्मचाऱ्यांना पुढे पुढे सराव झाल्यामुळे त्यापेक्षा कमी वेळ लागतो. जितके मतदान केंद्र तितके गुणेला १४ टेबल त्यामुळे उत्तर नागपूरला 23 तर सर्वात अधिक देगलूर नांदेडमध्ये २६ फेऱ्या होतील. साधारणतः आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीचा अंदाज निकाल दहा -साडेदहा ते ११ पर्यंत येईल, असा अंदाज आहे.

 मोबाईल नेण्यास प्रतिबंध

मतमोजणी केंद्रामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केलेल्या मोजक्या अधिकाऱ्यांशिवाय माध्यम प्रतिनिधी असो किंवा लोकप्रतिनिधी असो कोणालाही केंद्राच्या आतमध्ये मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाही. त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्वांनी आपले मोबाईल सोबत आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

लाऊडस्पिकर्सची व्यवस्था
शासकीय तंत्रनिकेतन परिसरात रस्त्यावर ऐकू येईल अशा पद्धतीने लाऊड स्पीकरची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना देखील या परिसरात लाऊड स्पीकरवर फेरीनिहाय निकाल ऐकता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने या परिसरात नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध केली आहे.

माध्यम केंद्राची उभारणी

नागरिकांना कळावे यासाठी निवडणूक आयोगाने ज्या पत्रकारांना प्रवेशिका दिल्या आहेत अशाच पत्रकारांना या ठिकाणी प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. त्यांच्यामार्फत उद्याच्या मतमोजणीचे वृत्तांकण होणार आहे. महादेव दालमिलकडील गेटमधून हा प्रवेश पत्रकारांना दिला जाणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गाड्यांची पार्किंग करता येणार आहे.
००००

वृत्त क्र. 461

 मतमोजणीमुळे नांदेड शहरातील वाहतुक मार्गात बदल

नांदेड दि. 3 :- लोकसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी 4 जून 2024 रोजी नांदेड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, बाबानगर, नांदेड येथे होणार आहे. मतमोजणी कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये 4 जून 2024 रोजी चे सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी कार्यक्रम पूर्ण होईपर्यत वाहतुकीच्या मार्गात बदल करुन पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना प्रसिध्द केली आहे.

4 जून 2024 रोजी वाहनांच्या वाहतूक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरुपात पुढील पर्यायी मार्गावरील वाहतुकीस वळण देऊन बदल करण्यात येत आहे.

वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग

नविन मोंढा कमान ते आयटीएम चौक (कुसूमताई सभाग्रह) कडे जाणारा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद राहील. महात्मा फुले हायस्कूल ते शंकरराव चव्हाण पुतळा (लॉ कॉलेज टि पॉईन्ट) कडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद राहील. उज्वल गॅस ऑफिस ते महादेव दाल मिलकडे येणारा रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद राहील.  

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

अण्णाभाऊ साठे पुतळा येथून आयटीआयकडे जाण्यासाठी नाईकचौक –आनंदनगर-वर्कशॉप ते आयटीआय वाहतुकीसाठी चालू राहील. नविन मोंढाकडे येण्यासाठी आयटीआय वर्कशॉप-आनंदनगर-नाईक चौक ते नविन मोंढा वाहतुकीसाठी चालू राहील. तरी 4 जून 2024 रोजी सकाळी 6 वा. ते मतमोजणी कार्यक्रम पूर्ण होईपर्यत वाहतुकीस अडथळा होवू नये यासाठी पर्यायी मार्गाची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.

0000

वृत्त क्र. 460

 मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक निरीक्षक समीरकुमार ओ.जे नांदेडमध्ये दाखल 

नांदेड दि. 3 :- 16 नांदेड लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणी उद्या 4 जून 2024 रोजी शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर, नांदेड येथे होणार आहे. यासाठी ८९-नायगाव, ९०-देगलूर, ९१-मुखेड या मतदारसंघासाठी समीरकुमार ओ.जे. हे नांदेड मध्ये दाखल झाले आहेत. 

वरिष्ठ सनदी अधिकारी असणारे समीर कुमार यांनी दाखल होताच आज मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. तसेच उद्या होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. यावेळी त्याच्यासोबत जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत, अन्य निवडणूक निरीक्षक शंशाक मिश्र यांची उपस्थिती होती. 

शशांक मिश्र हे भोकर, नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण या विधानसभा मतदार संघासाठी निरीक्षक म्हणून काम बघतील तर समीर कुमार ओ. जे. हे नायगाव, देगलूर, मुखेड या विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून काम करणार आहेत.

0000



 १६- नांदेड जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा निवडणूक तयारी संदर्भातील व उद्या होणाऱ्या निवडणूक प्रक्रिया बाबतचा सविस्तर बाईट माध्यमांसाठी🙏🏻





























 उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी नांदेड जिल्हा प्रशासनाची तयारी झाली असून आज विधानसभा निहाय रंगीत तालीम घेण्यात आली. उद्या सकाळी आठ वाजता पासून शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसाठी चित्रफित.



वृत्त क्र. 459 दि. 2 जून 2024

 महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या

इयत्ता पाचवी व आठवीसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाव नोंदणी   

नांदेड (जिमाका) दि. २ :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व 8 वी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज येत्या 3 जून ते 15 जून 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यत करावेत, असे आवाहन सचिव माणिक बांगर यांनी  केले आहे. 

ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास तपशील पुढीलप्रमाणे आहे. विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्यासाठी सोमवार 3 जून ते शनिवार 15 जून 2024 च्या रात्री 11.59 वाजेपर्यंत तर ऑनलाईन नावनोंदणी अर्ज मंगळवार 5 जून ते 18 जून 2024 या कालावधीत विद्यार्थ्यांना  मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे  अर्जावर नमूद केलेला संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे लागतील. सोमवार 24 जून 2024  रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करतील. या कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी 8 वीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी http:/msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.   

000000

वृत्त क्र. 458 दि. 1 जून 2024

 मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतीम टप्यात 

 ९६ टेबलवर नांदेडमध्ये होणार मतमोजणी 

नांदेड दि.१ जून : 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी नांदेड जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन परिसरात सर्व मतयंत्र स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले असून याच ठिकाणी मतमोजणी सकाळी आठ वाजता पासून सुरू होणार आहे.

  जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व त्यांच्या अधिनस्त वरिष्ठ अधिकारी यासंदर्भात दररोज आढावा बैठक घेत असून सोमवारी दुपारपर्यंत सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी पूर्णतः कार्यरत होणार आहे.

 मतमोजणी करताना आवश्यक असणारा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग, माध्यमांचा सहभाग, निवडणूक निरीक्षक आणि भारत निवडणूक आयोगाला तातडीने देण्यात येणारी माहिती, यासाठी आवश्यक पूरक तांत्रिक व भौतिक यंत्रणा या परिसरात तयार करण्यात येत आहे.


    सध्या शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर, नांदेड येथे असणाऱ्या स्ट्रॉंग रूमसाठी तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. प्रवेशिका व तपासणी प्रक्रियेशिवाय या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही. दर्शनी भागात सहा स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही कॅमेरे 24 तास सुरू असतात. मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी सील लावण्यात आले आहे. स्ट्रॉंग रूममध्ये कोणालाही प्रवेश नसतो. तसेच २४ तास कॅमेऱ्याच्या माध्यमातून निगराणी केली जाते.

 ५०० कर्मचारी नियुक्त 

    मतदान प्रक्रियेच्या तुलनेत मतमोजणी प्रक्रियेसाठी कमी कर्मचारी लागतात. मात्र जवळपास 500 कर्मचारी आतमध्ये या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी असतील. तेवढेच पोलीस अधिकारी कर्मचारी सुरक्षा यंत्रणे संदर्भात काम करणार आहे.


 ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ 

 सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. प्रथम पोस्टल बॅलेट पेपर व या वर्षी घरी जाऊन घेण्यात आलेल्या ज्येष्ठांच्या मतदानाची मोजणी होणार आहे. त्यानंतर एकाच वेळी सहा मतदारसंघातील मतमोजणीला प्रारंभ होईल. साधारणतः साडेदहा ते अकराच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल अपेक्षित आहे.

 मतमोजणी संदर्भातील प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या निर्देशित सूत्रानुसार व सूचनेनुसार चालते यासाठी निवडणूक विभागाकडून नेमणूक करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डोळ्यात तेल घालून संपूर्ण यंत्रणेकडून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पालन करीत मतमोजणी प्रक्रिया पार पाडतात. 4 जूनच्या सायंकाळपर्यंत सर्व फेऱ्यांची मतमोजणी पार पडण्याची शक्यता आहे.


किती टेबलवर मतमोजणी होणार ? 

नांदेड जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. एका विधानसभा साठी 14 टेबल असे एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे. याशिवाय पोस्टल बॅलेटसाठी १२ टेबल आहेत. थोडक्यात नांदेड जिल्ह्याची मतमोजणी 96 टेबलवर होणार आहे.

कोण करते मतमोजणी? 

प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी असतात.यामध्ये मायक्रो ऑब्झर्वर म्हणजे सूक्ष्म निरीक्षक , दुसरे सुपरवायझर म्हणजे मतमोजणी पर्यवेक्षक, तिसरा काउंटिंग असिटंट म्हणजे मतमोजणी सहाय्यक आणि चौथा असतो एक शिपाई. सहाय्य करण्यासाठी. या प्रत्येक पदाचे जवळपास प्रत्येकी१०० कर्मचारी कार्यरत असतात. 

यामधील सूक्ष्म निरीक्षक हे बँकेचे कर्मचारी असतात. सुपरवायझर हे साधारणतः अभियंते असतात. हिशेब ठेवण्यासाठी लागणारे मतमोजणी सहाय्यक महसूल विभागाचे तलाठी असतात व यांना पेट्या वगैरे आणून देण्यासाठी प्रत्येक टेबलवर एक शिपाई तैनात केला असतो.


 एकूण फेऱ्या कशा ठरतात? 

 प्रत्येक विधानसभा क्षेत्रात किती केंद्र आहे त्याला भागीले टेबलची संख्या यावरून फेऱ्या ठरतात. उदाहरणार्थ 87 नांदेड विधानसभा क्षेत्रात 312 मतदान केंद्र आहेत. त्यामुळे 312 भागीले 14. बरोबर 22.28 म्हणजे 23 फेऱ्या होतील.

थोडक्यात नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी 23 तर सर्वात अधिक 26 फेऱ्यानंतर पूर्ण निकाल लागेल.


एका फेरीला किती वेळ लागेल..?

एका फेरीला साधारण अर्धा तास लागतो. मात्र मतमोजणी कर्मचाऱ्यांना पुढे पुढे सराव झाल्यामुळे त्यापेक्षा कमी वेळ लागतो. पहिल्या फेरीच्या वेळेस मतमोजणी एजंटला प्रक्रियेची माहिती दिल्या जाते. मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळे टेबल ( सारणी ) भरणे याबाबतची सूचना केली जाते. यामुळे पहिल्या फेरीला थोडा वेळ लागतो.

नांदेडमध्ये साधारणतः आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीचा अंदाज निकाल दहा -साडेदहा पर्यंत येईल, असा अंदाज आहे.

000














वृत्त क्र. 457 दि. 1 जून 2024

नांदेड पंचायत समितीला आयएसओ मानांकन

जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती

नांदेड,१- आज शनिवार दिनांक १ जून रोजी नांदेड पंचायत समितीला नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. आयएसओ मानांकन मिळवणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या पंचायत समितीचा मान नांदेड पंचायत समितीला मिळाला आहे़.  

    यानिमित्त नांदेड पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, गट विकास अधिकारी पांडुरंग नारवटकर,  आयएसओ मानांकन परीक्षक योगेश जोशी, अनिल येवले, शुभम तेलेवार आदींची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. इतर पंचायत समितीने देखील प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी आयएसओ मानांकन प्रमाणपत्र गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर यांना प्रदान करण्यात आले.

     नांदेड पंचायत समितीने केंद्र तसेच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर  विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सामान्य प्रशासन, शिक्षण, पंचायत, कृषी व पशुसंवर्धन, आरोग्य, महिला व बालविकास, रोजगार, स्वच्छता व पाणी पुरवठा आदी विभागामध्ये केलेल्या प्रभावी कामगिरीची दखल या मानांकनावेळी घेण्यात आली. कामाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन यासह दस्तऐवजांचे वर्गीकरण अशा सर्व बाबींच्या माध्यमातून नांदेड पंचायत समितीने मानांकन मिळविले आहे. अशा प्रकारचा बहुमान मिळविणारी जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती नांदेड ठरली आहे. या कार्यक्रमाला ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय वडजे, रणजित हाटकर, श्रीनिवास मुगावे, संजय रामोड यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, कार्यालयीन कर्मचारी, सरपंच व ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी विठ्ठल कांबळे यांनी केले तर सुत्रसंचलन गोविंद मांजरमकर यांनी केले.

000000











वृत्त क्र. 456 दि. 1 जून 2024

नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी 

विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता 

नांदेड दि १ जून : नांदेड जिल्ह्यासाठी दोन ते पाच जून पर्यंत येलो अलर्ट हवामान शास्त्र विभागाने जाहीर केला आहे. विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता या सहा दिवसांमध्ये आहे.

 प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 01 जून 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 02 ते 05 जून 2024 या चार दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. 

या दरम्यान जिल्ह्यात तूरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या गोष्टी करा :

१) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

२) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

३) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

४) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

५) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.


या गोष्टी करु नका: 

१) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

२) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

३) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

४) धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

५) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...