Tuesday, August 25, 2020

 

डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त

भोसी येथे लवकरच प्रशिक्षण केंद्र

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

 नांदेड (जिमाका) दि. 25 :- इतर तालुक्याच्या तुलनेत भोकर तालुक्यातील आव्हाने वेगळी आहेत. इथली सर्वसामान्य जनता आजही आर्थिकदृष्ट्या किमान पातळीवरही सक्षम नाही. येथील वाडे, तांडे व आदिवासी बहुल लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी शासन स्तरावर जे काही शक्य आहे ते सर्व उपलब्ध करुन देण्यासाठी मी प्रयत्नरत असल्याची ग्वाही पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. 

भोकर येथे सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या भुमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, प्रकाशराव देशमुख भोसीकर, नागनाथराव घिसेवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

भोकरच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टिने मी सुरुवातीपासूनच यथाशक्य मदत करीत आलो आहे. आजही त्याच जबाबदारीने या भागात अधिक विकास कामे कसे होतील यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्हा ठिकाणापासून दूर असलेल्या गावांमध्ये जनतेच्या सुविधेसाठी ज्या काही आवश्यक शासकीय कार्यालयांची गरज आहे ती-ती कार्यालये त्या-त्या गावात जर आपण उपलब्ध केली तर सर्वसामान्यांचा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्या-येण्याच्या त्रासासह त्याला त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी शासनासंदर्भातील कामे पूर्ण करुन घेता येतील हा उद्देश मी डोळ्यासमोर ठेवला आहे. यादृष्टिने विचार करुन लवकरच नवीन न्यायालयाच्या इमारतीचे बांधकामही आपण सुरु करणार आहोत. यासाठी आर्थिक तरतुदही करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयही लवकरच भोकर येथे सुरु करु असे सुतोवाचही त्यांनी केले. 

इथल्या लोकांचे आर्थिक उत्पन्न जर वाढवायचे असेल तर कृषि विभागाला अधिक सक्षम करावे लागेल. शेतीला पाणी कसे उपलब्ध होईल हेही पहावे लागेल. याचदृष्टिने शासन स्तरावर विचार करुन आम्ही गोदावरी खोऱ्यातील जवळपास 29 टिएमसी पाणी ग्रामीण भागात पोहचवून लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागावा यासाठी मनापासून पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

भोकर रस्त्याचे काम अनेक कारणांमुळे आजवर रेंगळाले आहे. त्यातल्या त्यात भोकर-रहाटी हा रस्ता विविध अपघातांनाही निमंत्रण देत आहे. रस्ते विकासाच्या कामात जवळपास 18 ठिकाणी फेल झाले आहेत. या ठिकाणच्या रस्ते विकासाबाबत केंद्र सरकारच्या पातळीवरुन हे काम कसे करता येईल याबाबत मी प्रयत्नशील आहे. भोकर ते रहाटी हे काम आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करुन हा प्रलंबित असलेला रस्ता सुमारे दिडशे कोटी रुपयांचा निधी लावून लवकरच पूर्ण करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भोकर तालुक्यात बोरुड समाज मोठ्या प्रमाणात आहे. याचबरोबर वनामध्ये रोजगार अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. अशा ग्रामीण भागातील स्वयंरोजगाराच्या नव्या वाटा शोधणाऱ्यांना इथल्या नैसर्गिक संशाधनाशी मिळते-जुळते नवीन उद्योगाचे प्रशिक्षण त्यांना देता यावे यादृष्टिने नारवट येथे लवकरच बांबु प्रशिक्षण केंद्र व विक्री केंद्र साकारले जाईल, असे ते म्हणाले. म्हैसारोड ते किनवट नवा बायपास, नांदेड-मुदखेड-भोकर रस्ता, भोकर तालुक्यातील दलितवस्ती सुधार योजना यासाठी सुमारे चारशे कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केली आहे. सद्यस्थितीला रस्त्यांची बिकट स्थिती लक्षात घेता ज्या-ज्या ठिकाणी अपघाताला निमंत्रण देणारे मोठे खड्डे तयार झाले आहेत त्या ठिकाणी साधा मुरुम, खडी टाकून तात्पुरत्या स्वरुपात या मार्गाचे रखरखाव करण्याचे निर्देशही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. येत्या सहा महिन्यात रस्ते विकासाचे काम सुरळीत होईल असे सांगत त्यांनी हे वर्षे सर्वच दृष्टिने कठीन असून कोरोनाच्या काळातही आपण सर्वच बाजू सांभाळत जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधा अधिक चांगल्या कसा उपलब्ध होतील यावर भर दिला. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात आपण जुन्या इमारतीच्या जागेवर दोनशे खाटांचे बाह्य रुग्ण विभाग युद्ध पातळीवर पूर्ण करुन आपण सुरु केल्याचेही त्यांनी सांगितले. भोकरसाठी चार नवीन रुग्णवाहिका आपण दिल्या असून विकासासाठी जो मी निश्चय केला आहे तो मी पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी केले तर कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे यांनी प्रस्ताविक इमारतीची माहिती दिली. 

या भुमिपूजन समारंभासमवेत त्यांनी जिल्हा न्यायालयात वकील दिनानिमित्त वकिलांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. समाजात जाणीव जागृतीचे काम व कायदेविषयक साक्षरतेचे काम वकिलांनी हाती घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी भोकर येथील जिल्हा न्यायाधीश मुजिब शेख, उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, ॲड बी. डी. कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते. 

00000



 

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त

जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या अतिरिक्त मार्गदर्शक सूचना 

नांदेड (जिमाका),दि.25:- गणेशोत्सव सण 2020 च्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या सूचना, निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी यांनी 8 ऑगस्ट 2020 रोजी नांदेड जिल्ह्यात गणेशोत्सव सण साजरा करण्यासंबंधी 1 ते 12 सूचना व उपाययोजना निर्गमित केल्या होत्या. त्या सूचनामध्ये पुढीलप्रमाणे सूचनाचा समाविष्ठ करण्यात आला आहे.   

 

जिल्ह्यातील सर्व घरगुती व सार्वजनिक गणपतीचे विसर्जन शक्यतो स्थानिक स्वराज्य संस्थानी जसे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत इत्यादींनी गणपती विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तलाव, हौदामध्ये विसर्जनासाठीच्या संकलन केंद्रातच गणेशमूर्ती सुपूर्द, जमा करण्यात यावेत.

 

सार्वजनिक गणेशमंडळाच्या ठिकाणी व मुर्ती संकलन केंद्राच्या ठिकाणी 50 वर्षावरील नागरिकांना व 10 वर्षाखालील मुलांना प्रवेश असणार नाही. त्याचप्रमाणे कोव्हीड -19 या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने व जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी  निर्गत केलेले आदेश, निर्देशाचे पालन करणे बंधनकारक राहील. या आदेशाची अंमलबजावनी करीत असताना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.

0000

 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

परिसरात मियावाकी पध्दतीने केले वृक्षारोपण 

नांदेड (जिमाका),दि.25:- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी परीसरात 300 झाडांचे वृक्षारोपण मियावाकी पध्दतीने अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. वृक्षाचे संगोपन करणे महत्वाचे असून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष दयावे. मियावाकी पध्दतीने वृक्षारोपन केल्यामुळे कमी जागेत जास्त झाडे लावता येऊन पर्यावरण संतुलनास हातभार लागतो. यातुन भावी पिढीचे जगणे सुखकर होईल असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

00000

 

240 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

126 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू   

नांदेड (जिमाका) दि. 25 :- मंगळवार 25 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 240 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 126 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 56 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 70 बाधित आले. 

आजच्या एकुण 700 अहवालापैकी  547 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 5 हजार 276 एवढी झाली असून यातील 3 हजार 538 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 510 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 181 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.  

मंगळवार 25 ऑगस्ट 2020 रोजी जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील नवरंगपुरा येथील 55 वर्षाचा एक पुरुष, अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील 60 वर्षाची एक महिला, बिलोली तालुक्यातील चिंचाळा येथील 60 वर्षाचा एक पुरुष  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड तर किनवट येथील 52 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 18, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड 16, बिलोली कोविड केअर सेंटर 12, नायगाव कोविड केअर सेंटर 8, कंधार कोविड केअर सेंटर 14, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 133, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर 2, खाजगी रुग्णालय 26, मुदखेड कोविड केअर सेंटर 10, औरंगाबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 240 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.    

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 14, भोकर तालुक्यात 3, देगलूर तालुक्यात 2, किनवट तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 8, बिलोली तालुक्यात 2, नायगाव तालुक्यात 6, लातूर 2, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 1, हदगाव तालुक्यात 3, लोहा तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 3, मुदखेड तालुक्यात 2, धर्माबाद तालुक्यात 3, परभणी 1, हिंगोली 3 असे एकुण 56 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपाक्षेत्र 11, अर्धापूर तालुक्यात 5, कंधार तालुक्यात 3, किनवट तालुक्यात 6, मुदखेड तालुक्यात 4, धर्माबाद तालुक्यात 3, परभणी 1, नायगाव तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 1, हदगाव तालुक्यात 5, मुखेड तालुक्यात 17, बिलोली तालुक्यात 8, उमरी तालुक्यात 5 असे एकुण 70 बाधित आढळले. 

 जिल्ह्यात 1 हजार 510 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 178, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 556, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 55, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 37, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 39, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 140,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 38, लोहा कोविड केअर सेंटर येथे 42, हदगाव कोविड केअर सेंटर 39, भोकर कोविड केअर सेंटर 14,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 22,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 23, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 24, मुदखेड कोविड केअर सेटर 21,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 10, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 14, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 80,उमरी कोविड केअर सेंटर 41, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 2, बारड कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालयात 130 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 3, निजामाबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 51 हजार 172,

घेतलेले स्वॅब- 35 हजार 656,

निगेटिव्ह स्वॅब- 28 हजार 525,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 126,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 5 हजार 276,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-10,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 1,

एकूण मृत्यू संख्या- 192,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 3 हजार 538,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 510,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 88, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 181.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...