Monday, April 22, 2024
वृत्त क्र. 374
उन्हाला घाबरु नका, मतदानासाठी बाहेर पडा !
प्रतिक्षालयासोबतच वैद्यकीय व्यवस्थाही मतदाराच्या दिमतीला
आरोग्य विभाग सज्ज प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोचार पेटी
नांदेड दि. 22 एप्रिल :- नांदेड लोकसभेसाठी 26 एप्रिलला मतदान होत आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर गेले आहे. यामुळे अनेक मतदार उन्हात बाहेर पडण्याचे टाळून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आता घाबरण्याची गरज नसून आरोग्य विभागाने प्रत्येक केंद्रावर प्रथमोचार पेटी ठेवली आहे. याशिवाय एखाद्याला जास्त गरज भासल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात दाखल करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने घाबरून न जाता 26 एप्रिलला मतदानासाठी घराबाहेर पडावे व मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
एप्रिल महिना अर्धा पालटला असून जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली आहे. 26 एप्रिलला मतदानाच्या दिवशी मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदारांच्या आरोग्याची प्रशासनाकडून काळजी घेतली जाणार आहे. आरोग्य विभागाच्यावतीने प्रत्येक मतदार केंद्रावर प्रथमोपचार पेटीची सोय केली आहे. तसेच मतदानादरम्यान मतदारांची प्रकृती खालावली आणि त्यांना उपचारासाठी आरोग्य संस्थेत आणले तर शासनाच्या प्रत्येक आरोग्य संस्थेत मतदानाच्या दिवशी डॉक्टर कार्यरत राहणार असून ते मतदारांच्या प्रकृतीची काळजी घेणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचार किट ठेवण्यात आली आहे. पॅरासिटामोट, ओआरएस आणि प्रथमोपचारासाठी लागणारे सर्व साहित्य असलेली किट तयार करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्राला ही किट वाटप करण्यात आली आहे. तरी सर्व मतदारांनी उन्हाला न घाबरता मतदानासाठी बाहेर पडावे व मतदान करावे. मतदारांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले.
तसेच नागरिकांनी तीव्र उन्हापासून बचाव होण्यासाठी वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळच्या वेळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमानात करावेत. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत, सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे. अधून मधून उन्हामध्ये काम करणे थांबवावे व सावलीत विश्रांती घ्यावी. अस्वस्थ वाटल्यास ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व उपचार सुरु करावा. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे यांचा वापर करावा, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.
00000
वृत्त क्र. 373
शेकडोंच्या समुदायाने केला मतदानाचा संकल्प ;नांदेडच्या परेड मैदानात रंगारंग कार्यक्रमाची मेजवानी
गीत, गायन,पोवाडा, पथनाटय, ओव्या, रिल्समधून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन
नांदेड दि. २२ एप्रिल : 26 एप्रिल रोजी नांदेड येथे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने आज विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला साद घातली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांने किमान 50 मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा संकल्प आज शेकोडोंच्या संख्येने, उपस्थित कर्मचाऱ्यांनी नांदेड पोलीस परेड ग्राउंडवर केला.
सोमवारची सकाळ पोलीस परेड ग्राउंडवर नांदेड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या हजारोच्या एकत्रिकरणाने उल्हासित झाली होती. शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, बचत गटांचे सदस्य ,शाळकरी विद्यार्थ्यांच्या जोश पूर्ण सादरीकरणाने वातावरण भारावून गेले होते. निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर मोठ्या संख्येने दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनात व महानगरामध्ये मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. आज या दोघांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद व मनपा कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.
स्वीपच्या सर्वात मोठ्या उपस्थितीच्या या कार्यक्रमांमध्ये नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी आलेले खर्च निरीक्षक डॉ. दिनेशकुमार जांगिड, खर्च निरीक्षक मग्पेन भुटिया यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, माधव सलगर यांच्यासह जिल्हा परिषदेचे, मनपाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात लेझीम पथकाच्या स्वागताने झाली. त्यानंतर मतदान जनजागृती पोवाडा सादर करण्यात आला. राज्याच्या सदिच्छा दूत डॉ. सानवी जेठवाणी यांनी यावेळी उपस्थिततांपुढे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर हदगाव तालुक्यातील उमरी येथील विद्यार्थ्यांनी अप्रतिम पथनाट्य सादर केली. मतदान वाढविण्यामध्ये आपले योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून तालुकास्तरावरून निवड झालेल्या तीन विद्यार्थ्यांची भाषणे लक्षवेधी ठरली. एमजीएम कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे नृत्य यासोबतच एनसीसी, स्काऊट -गाईडच्या विद्यार्थ्यांचे पथसंचलन बचत गटांच्या महिलांसाठी व अंगणवाडी महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन, तसेच स्वीप उपक्रमांतर्गत मतदान वाढीसाठी बनविण्यात आलेले स्लोगन, रिल्स, शॉर्ट फिल्म, ओव्या, स्वीप प्रश्नमंजुषा आधीच स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,सीईओ मीनल करनवाल यांनी यावेळी बचत गट व अंगणवाडी महिलांनी लावलेल्या स्टॉलला भेटी दिल्या. तसेच त्यांच्या स्पर्धेनंतर त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. प्रत्येक गावातून व वार्डातून मोठ्या संख्येने मतदान होण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली. यावेळी मैदानावर साकारलेली संस्कार भारतीची प्रबोधनात्मक रांगोळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सान्वी जेठवानी व श्री. प्रलोभ कुलकर्णी यांनी केले.
शहरी लोकसंख्या मागे राहू नये
महानगरपालिकेचे कर्मचारी आयोजनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरवेळी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदान होते. मात्र शहरी मतदान कमी होत असल्याची सार्वत्रिक ओरड आहे. नांदेडमध्ये प्रत्येक नागरिकाने याची नोंद घ्यावी. गावात राहणाऱ्या माणसाला मतदानाबाबत जी जाणीव आहे तीच जाणीव ठेवून शहरी भागातही मतदान मोठ्या संख्येने व्हावे, अशी अपेक्षा यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांनी व्यक्त केली आहे.
0000
वृत्त क्र. 1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...