Monday, April 22, 2024

 वृत्‍त क्र. 374

उन्हाला घाबरु नका, मतदानासाठी बाहेर पडा !

प्रतिक्षालयासोबतच वैद्यकीय व्यवस्थाही मतदाराच्या दिमतीला

आरोग्य विभाग सज्ज प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोचार पेटी

नांदेड दि. 22 एप्रिल :- नांदेड लोकसभेसाठी 26 एप्रिलला मतदान होत आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर गेले आहे. यामुळे अनेक मतदार उन्हात बाहेर पडण्याचे टाळून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आता घाबरण्याची गरज नसून आरोग्य विभागाने प्रत्येक केंद्रावर प्रथमोचार पेटी ठेवली आहे. याशिवाय एखाद्याला जास्त गरज भासल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात दाखल करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने घाबरून न जाता 26 एप्रिलला मतदानासाठी घराबाहेर पडावे व मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

एप्रिल महिना अर्धा पालटला असून जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली आहे. 26 एप्रिलला मतदानाच्या दिवशी मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदारांच्या आरोग्याची प्रशासनाकडून काळजी घेतली जाणार आहे.  आरोग्य विभागाच्यावतीने प्रत्येक मतदार केंद्रावर प्रथमोपचार पेटीची सोय केली आहे. तसेच मतदानादरम्यान मतदारांची प्रकृती खालावली आणि त्यांना उपचारासाठी आरोग्य संस्थेत आणले तर शासनाच्या प्रत्येक आरोग्य संस्थेत मतदानाच्या दिवशी डॉक्टर कार्यरत राहणार असून ते मतदारांच्या प्रकृतीची काळजी घेणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचार किट ठेवण्यात आली आहे. पॅरासिटामोट, ओआरएस आणि प्रथमोपचारासाठी लागणारे सर्व साहित्य असलेली किट तयार करण्यात आली आहे.  प्रत्येक मतदान केंद्राला ही किट वाटप करण्यात आली आहे. तरी सर्व मतदारांनी उन्हाला न घाबरता मतदानासाठी बाहेर पडावे व मतदान करावे. मतदारांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले. 

तसेच नागरिकांनी तीव्र उन्हापासून बचाव होण्यासाठी वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळच्या वेळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमानात करावेत. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत, सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे. अधून मधून उन्हामध्ये काम करणे थांबवावे व सावलीत विश्रांती घ्यावी. अस्वस्थ वाटल्यास ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व उपचार सुरु करावा. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे यांचा वापर करावा, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...