Thursday, August 30, 2018


लोकशाही दिन 3 सप्टेंबर रोजी

नांदेड दि. 30 :-  जिल्हा प्रशासनाच्यावतीने महिन्याचा पहिला सोमवार म्हणून लोकशाही दिन दिनांक 3 सप्टेंबर, 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे लोकशाही दिन आयोजित केलेला आहे.
या दिवशी महसूल, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन, सहकार, कृषी  विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाकडे लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड बचत भवन येथे हजर राहतील निवेदनाच्या नोंदणीला सुरुवात सकाळी 12-00 वा. पासून होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर / निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.  लोकशाही दिनामध्ये अर्ज स्वीकारण्याचे व न स्वीकारण्याचे निकष खालील प्रमाणे आहेत.
अर्ज स्विकृतीचे निकष
अर्ज न स्विकृतीचे निकष
अर्ज विहीत नमुन्यात असावा
(नमुना प्रपत्र 1 ते 1 ड ) 
न्यायप्रविष्ठ प्रकरणे
तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी
राजस्व / अपिल्स
अर्जदाराचे विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतिमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पाठविणे आवश्यक आहे.
सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी.
तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर 1 महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे अर्ज करता येईल.
विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे / देण्यात येणार आहे. तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. 

 या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी / अडचणी एकत्रितरित्या समजून घेवून त्या शक्य तितक्या लवकरात लवकर सोडण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे. अशा प्रकरणाची पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी , नांदेड यांनी कळविले आहे.
00000



 वनहक्क कायदा अंमलबजावणी कार्यशाळा
प्रलंबित वैयक्‍तीक, सामुहिक वनहक्‍काचे तसेच सामुहिक सुविधाचे दावे निकाली काढावेत
   --- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

नांदेड दि. 30 :- पुणे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्‍था आयुक्‍त यांच्या सूचनेनुसार वनमित्र मोहिम राबविण्‍यात येत असून जिल्ह्यातील प्रलंबित वैयक्‍तीक, सामुहिक वनहक्‍काचे तसेच सामुहिक सुविधाचे दावे निकाली काढण्‍यासाठी कार्यशाळा आयोजीत करण्‍यात आली असून ग्रामस्‍तरीय, उपविभागस्‍तरीय व जिल्‍हास्‍तरीय समितीच्‍या अधिकारी / कर्मचाऱ्यांनी विशेष मोहिम राबवून प्रलंबित दावे तातडीने निकाली काढावीत असे जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आवाहन केले.
पुणे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्‍था आयुक्‍त यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्‍हयातील किनवट, माहूर, हदगांव, हिमायतनगर, भोकर, उमरी, कंधार, लोहा, अर्धापूर व मुदखेड तालुक्‍यात वनजमीन असलेल्‍या (401) गावातील अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वननिवासी (वनहक्‍कांची मान्‍यता) अधिनियम 2006, नियम 2008 व सुधारणा नियम 2012 अंतर्गत प्रलंबित दावे, अपिले व नाकारलेली दावे निकाली काढण्यासाठी वनमित्र मोहिम अंतर्गत जिल्‍हा व उपविभागस्‍तरावरील समिती सदस्‍य तसेच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, प्रकल्‍प अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, विस्‍तार अधिकारी, सरपंच, ग्राम वनहक्‍क समितीचे अध्‍यक्ष, तलाठी, ग्रामसेवक व मंडळ अधिकारी यांना कायदयाची माहिती होण्‍यासाठी व वनहक्‍कांचे दावे जलद गतीने निकाली काढण्‍यासाठी कुसूम सभागृह नांदेड येथे दोन सत्रात कार्यशाळा आयोजीत करण्‍यात आली होती. या कार्यशाळेस मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचारी, सरपंच आणि समिती सदस्‍य उपस्थित होते. 
जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष जिल्‍हा वनहक्‍क समिती अरुण डोंगरे यांच्या हस्ते दिप प्रज्‍वलन करुन या कार्यशाळेचे उद्घाटन करण्‍यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्‍हणून उप वनसंरक्षक आशिष ठाकरे उपस्थित होते. प्रास्‍ताविकात जिल्‍हाधिकारी यांनी सदर कार्यशाळेचा प्रमुख उद्देश उपस्थितांना सांगितला.
उप वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी वनहक्‍काचे दावे निकाली काढणेसाठी वनविभागाचे पूर्ण सहकार्य मिळेल असे सांगितले.  व्दितीय सत्रात अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील यांनी वनहक्‍क दावे निकाली काढण्याची कार्यपध्‍दती सांगितली. दोन्‍हीही सत्रात उप वनसंरक्षक सेवानिवृत्‍त एस.आर.वाघ यशदा पुणे यांनी वनहक्‍क कायदयाची पार्श्‍वभुमी विषद करुन वनहक्‍कांचे दावे निकाली काढण्‍यासाठी पंचायत विभाग, महसूल विभाग, वनविभाग व आदिवासी विभाग या चार विभागाने समन्‍वयाने वनहक्‍काचे दावे निकाली काढण्यासाठी कार्यपध्‍दती सांगितली. त्‍यात प्रामुख्‍याने ग्रामस्‍तरीय समितीने परिपूर्ण दावे उपविभागस्‍तरीय समितीकडे सादर केल्‍यास उपविभाग व जिल्‍हास्‍तर समितीकडून कमी कालावधीत दावे निकाली काढल्‍या जातील. वनहक्‍क कायदा व नियमाची टप्‍पानिहाय सविस्‍तर माहिती सादरीकरणातून सादर केली आणि उपस्थितांच्‍या प्रश्‍नाचे निरसन केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नायब तहसिलदार सौ. स्‍नेहलता स्‍वामी यांनी केले व उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) सौ. अनुराधा ढालकरी, यांनी आभार प्रदर्शन केले.    
****



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...