Wednesday, August 13, 2025

 वृत्त क्रमांक 847 

इस्राईलमध्ये हजार रोजगाराच्या संधी

 

नांदेड दि. 13 ऑगस्ट :जिल्ह्यातील पात्र उमेदवारांसाठी परदेशात रोजगार मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या माध्यमातून इस्त्राईल देशात होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्सच्या 5 हजार पदासाठी भरती होणार आहे. अर्जदाराने संकेतस्थळावर अर्ज करून नाव नोंदणी करावीअसे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.  

 

या भरतीसाठी महाराष्ट्र नर्सिग कौन्सिल मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर भेट देऊन सविस्तर कार्यविवरणवयोमर्यादाशैक्षणिक पात्रता व अर्ज प्रक्रियेची माहिती पाहून अर्ज सादर करावा. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्ह्यात जागरुकता मोहिम राबवून पात्र उमेदवारांना अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक सहाय्य केले जाणार आहे.

00000

 वृत्त क्रमांक 846 

गायरान जमिनीच्या जीईओ फेनसिंगबाबत कार्यशाळा संपन्न 

 

नांदेड दि. 13 ऑगस्ट :- जिल्ह्यात वाटप  करावयाच्या शिल्लक असणाऱ्या गायरान जमिनीबाबत गुगल अर्थ प्रणालीचा वापर करून शासकीय जमिनीचे जीईओ फेनसिंगबाबत कार्यशाळा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आयोजीत करण्यात आली होती. या कार्यशाळेत जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारीतहसीलदारनायब तहसीलदार व  ग्राममहसूल अधिकारीमंडळ अधिकारी आदींची उपस्थिती होती.

 

शासकीय जमिनीचा एकत्रित डाटा बँक तयार व्हावा व त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पेतून वरील कार्यशाळा घेण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या मिशन 150 दिवस अंतर्गत शासकीय कामामध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात सदर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या कार्यशाळेस जालना येथून विशेष उपस्थित राहिलेले ग्राम महसूल अधिकारी दुर्गेश गिरी यांनी मार्गदर्शन केले.

0000

वृत्त क्रमांक 845

एफसीए अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

नांदेड दि. 13 ऑगस्ट :- विविध शासकीय, निमशासकीय कामांसाठी वनखात्याच्या जमिनी  प्रदानाबाबत वनसंरक्षण अधिनियम, (सुधारणा) 2023 बाबत अनुसरायची कार्यपद्धतीबाबत आज कार्यशाळा संपन्न झाली. ही कार्यशाळा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनाच्या कॅबिनेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपवनसंरक्षक केशव वाबळे यासोबत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, महावितरण तसेच इतर विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

ही कार्यशाळा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत वन विभागाच्या परवानगी प्रलंबित राहू नयेत, यामुळे जिल्ह्यातील कोणताही प्रकल्प अपूर्ण राहू नये यासाठी आयोजित केली होती. या कार्यशाळेस उपवनसंरक्षक केशव वाबळे यांनी वनखात्याकडे मंजुरीसाठी परिवेश पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव कशाप्रकारे करायचा व वन जमिनीच्या अनुषंगाने ना हरकत बाबत विस्तृत मार्गदर्शन केले. 

00000







 वृत्त क्रमांक 844

डिजिटल क्रांतीमुळे ज्येष्ठ, विधवा व दिव्यांगांना घरबसल्या ‘जीवन प्रमाणपत्र’ सुविधा

 

नांदेड दि. 13 ऑगस्ट :- विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सुविधेची सुरुवात करून प्रशासनाने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांग व्यक्तींना दरवर्षी हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.

 

आता बेनिफिशियरी सत्यापन अॅप आणि आधार फेस आरडी अॅपच्या मदतीने लाभार्थी आपल्या स्मार्टफोनवरून अवघ्या काही मिनिटांत ही प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करू शकतात. ही सुविधा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना यासाठी लागू आहे. या योजनांचा लाभ सातत्याने मिळण्यासाठी दरवर्षी हयातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. या नवीन डिजिटल सुविधेमुळे ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि जलद झाली आहे.

 

फायदे :

घरबसल्या सुविधा - मोबाईलवरून प्रमाणपत्र सादर.

वेळेची बचत - काही मिनिटांत प्रक्रिया पूर्ण.

सुरक्षित व पारदर्शक - आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन.

ज्येष्ठ व दिव्यांगांसाठी सोय - प्रवासाचा त्रास टळणार.

 

प्रक्रिया सोपी असून लाभार्थ्यांनी प्ले स्टोअर/अॅप स्टोअरवरून दोन्ही अॅप्स मोफत डाउनलोड करावेत.आधार क्रमांक नोंदवून चेहरा स्कॅन करावा आणि यशस्वी सत्यापनानंतर डिजिटल प्रमाणपत्र आपोआप विभागाकडे पाठवले जाईल. लाभार्थ्यांनी ही सुविधा त्वरित वापरून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन  संगायो तहसीलदार प्रगती चोंडेकर यांनी केले आहे.

000

वृत्त क्रमांक 843

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड दि. 13 ऑगस्ट : नांदेड जिल्ह्यात 15 ऑगस्टचे सकाळी 6 वाजेपासून ते 29 ऑगस्ट 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 15 ऑगस्टचे सकाळी 6 वाजेपासून ते 29 ऑगस्ट 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.
त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000

#हरघरतिरंगा अभियानांतर्गत #नांदेड जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आज विद्युत रोशनाई करण्यात आली.





 

वृत्त क्रमांक 842

कृपया सुधारीत वृत्त

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण 

नांदेड दि. 13 ऑगस्ट :- भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9.05 वा. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांच्या ध्वजारोहणाचे कार्यक्रम सकाळी 8.35 वाजेपूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत. सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोशाखात समारंभ सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कृपया बँग सोबत आणू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, 

00000

वृत्त क्रमांक 841

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई 

•  ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन  

नांदेड दि. 13 ऑगस्ट :- राष्ट्रीय कार्यक्रम,  महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  

दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.  

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

00000

वृत्त क्रमांक 840

13 ऑगस्ट रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता ;

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

नांदेड दि. 13 ऑगस्ट :-प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 14:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 13 ऑगस्ट 2025 या एक दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट व दि. 14 ते 17 ऑगस्ट 2025 या चार दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 13 ऑगस्ट 2025 या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार (64.5 - 115.5 mm) ते अतिमुसळधार (115.6 - 204.4 mm) स्वरूपाचा पाऊस व दि. 15 ऑगस्ट 2025 या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार (64.5 - 115.5 mm) स्वरूपाचा पाऊस व दि. 14, 16 व 17 ऑगस्ट 2025 हे तीन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या गोष्टी करा
विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तुमच्या स्मार्ट मोबाईल फोन मध्ये 'दामिनी', 'सचेत' हे दोन ॲप डाउनलोड करा 'दामिनी' ॲप तुमच्या आजूबाजूला वीज विषयक संभाव्य धोके दर्शविते तर 'सचेत' ॲप मुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या हवामानाविषयी अचूक इशारे व माहिती मिळते.
या गोष्टी करु नका
आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0000

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...