Tuesday, July 29, 2025

 वृत्त क्र. 776  

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेच्या

निकालासह विविध तपशील जाहीर


नांदेड दि. 29 जुलै :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल 29 जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे. दहावीची पुरवणी परीक्षा 24 जून ते 8 जुलैबारावीची पुरवणी परीक्षा 24 जून ते 16 जुलै या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेच्या निकालाची कार्यपध्दती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे दिला आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार 30 जुलै ते शुक्रवार 8 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहे.

 

या निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून इ. 10 वी व 12 वी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना स्वतः अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी-शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्ट पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करतांना ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card / Credit Card / UPI / Net Banking) याद्वारे भरता येईल.

 

जून-जुलै 2025 पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

 

जून-जुलै 2025 च्या इ. 10 वी व इ. 12 वी परीक्षेमध्ये सर्व विषयांसह प्रथम प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी तरतुदींच्या अधीन राहून लगतच्या तीन संधी (फेब्रुवारी-मार्च 2026, जून-जुलै 2026 व फेब्रुवारी-मार्च 2027) उपलब्ध राहतील.

 

फेब्रुवारी-मार्च 2026 इ. 10 वी व 12 वी परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट व्हावयाचे आहे अशा नियमित, पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे व आटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) द्वारे Transfer of Credit घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने स्विकारली जातील. त्याच्या तारखा मंडळामार्फत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्य मंडळाचे सचिव यांनी दिली आहे.

0000

 वृत्त क्र. 777

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन 

नांदेड दि. 29 जुलै :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 4 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे. 

 या दिवशी महसूल,  गृह,  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,  पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिली आहे.

00000

 वृत्त क्र. 778  

आयआयपीएच्या नांदेड शाखेची निवडणूक संपन्न

नांदेड दि. 29 जुलै :- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन नवी दिल्ली (आयआयपीए) ही भारत सरकारच्या कर्मचारी, लोकतक्रार व निवृत्तीवेतन मंत्रालयाअंतर्गत लोकप्रशासन विकास, प्रशिक्षण, संशोधन व प्रशासकीय सुधारणा या महत्वपूर्ण क्षेत्रात कार्य करणारी एक मूलभूत संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे.

केंद्र शासनाच्या  भारतीय लोकप्रशासन संस्था ( आय.आय.पी. ए.)  नवी दिल्ली यांच्याकड़ून नांदेड येथे स्थानिक शाखेला स्थापन्यास मान्यता प्राप्त झाले असल्याची माहिती आयआयपीए नांदेड शाखेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिली आहे. या महत्वपूर्ण संस्थेच्या इतर पदाधिकारी यांची निवड करण्यासाठी नांदेड स्थानिक शाखेची सर्वसाधारण सभा व निवडणूक प्रक्रीया नुकतीच संपन्न झाली आहे.

आयआयपीए नांदेड संस्थेच्या शाखा उपाध्यक्षपदी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची तर सचिवपदी देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग व संशोधन केंद्रप्रमुख प्रा. डॉ. बी आर कतूरवार कोषाध्यक्षपदी प्रतिभा निकेतन महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ.दीपक सुभाष वाघमारे आणि कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून महात्मा फुले महाविद्यालय, मुखेड येथील प्रा.डॉ. चांदोबा कहाळेकर व प्रा. डॉ. रवी बरडे यांची निवड करण्यात आली आहे. प्रस्तुत निवडणूक प्रक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर आणि निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कुमार बाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयआयपीएच्या या शाखेद्वारे जिल्हा प्रशासनातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देण्यासाठी, प्रशासकीय  क्षमता बांधणी विकसित करण्यासाठी आणि प्रशासकीय सुधारणेच्या अनुषंगाने लोकप्रशासन विषयात लेखन, संशोधन व प्रशिक्षण इत्यादी विविध कार्य करण्यासाठी विशेष उपक्रम राबविन्यात येणार आहेत.

नांदेड जिल्ह्यामध्ये आयआयपीएची शाखा स्थापन झाल्यामुळे नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करणे, माहिती व तंत्रज्ञानाच्या  मदतीने प्रशासकीय सेवा सुलभ, पारदर्शक व गतीशील बनविने, विविध  विकास कामांमध्ये लोकसहभाग वाढविणे,  प्रशासकीय अधिकारी वर्गांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन शारीरिक, मानसिक, बौद्धिक व नैतिक क्षमता विकसित करणे, लोककल्याणकारी, संवेदनशील  व लोकाभीमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरनार आहे. जिल्हा प्रशासनातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, लोकप्रशासन विषयाचे प्राध्यापक व संशोधक, नागरिक यांच्यात विचारमंथन करण्यासाठी आय आय पी ए ची नांदेड शाखा एक वरदान ठरणार आहे.


0000

वृत्त क्र. 779  
नांदेड जिल्ह्यास 15 मिनीमाती तपासणी प्रयोग शाळा मंजूर
 
प्रयोगशाळा उभारणीसाठी 8 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
 
नांदेड दि. 29 जुलै : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम 2025-26 मध्ये नांदेड जिल्ह्यात 15 ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे. प्रयोगशाळेसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या व ईच्छूकांनी 8 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
 
जिल्हा कृषी विभागाने पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम सन 2025-26 साठी 2 लाख 22 हजार मृद नमुने ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळेकडून तपासणी करण्याबाबत सन 2025-26 च्या राज्याच्या वार्षिक कृती आराखड्यामध्ये मान्यता दिली आहे. सन 2025-26 चे राज्यस्तरीय वार्षिक कृती आराखड्यामध्ये राज्यासाठी एकूण 444 नवीन ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा उभारण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे.
 
कृषीसंचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण), कृषी आयुक्तालय, पुणे यांनी नांदेड जिल्ह्यात 15 ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर प्रयोगशाळा उभारण्यासाठी अर्थसाहाय्य खासगी व्यक्ती, शेतकरी उत्पादक संस्था, कृषी चिकित्सालये आणि कृषी व्यावसायिक केंद्रे, माजी सैनिक बचतगट, शेतकरी सहकारी संस्था, कृषी आवश्यक सेवा, निविष्ठा किरकोळ विक्रेते तसेच शाळा, कॉलेज, युवक-युवती यांना दिले जाणार आहे. नांदेड जिल्ह्यासाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागवले जात असून इच्छुकांनी 8 ऑगस्ट, 2025 पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. ग्रामस्तरीय मृद चाचणी प्रयोगशाळेसाठी अर्थसहाय्य रक्कम 1 लाख 50 हजार रुपये आहे. लक्षांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरीय निवड समितीकडून सोडत काढून लाभार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

प्रयोगशाळेसाठी लाभार्थी पात्रता 
 
लाभार्थी पात्रता युवक, युवती 18 ते 27 वयोगटातील असावा. व्यक्ती, शेतकरी उत्पादक संस्था (FPOs), कृषी चिकित्सालय आणि कृषी-व्यवसाय केंद्रे, कृषी आवश्यक, माजी सैनिक, बचतगट, शेतकरी उत्पादक संस्था, गट, शेतकरी सहकारी संस्था, निविष्ठा किरकोळ विक्रेते आणि शाळा, कॉलेज युवक / युवती हे अर्ज करू शकतात. लाभार्थ्यांची शैक्षणिक अर्हता किमान 10 वी (विज्ञान विषयासह) उत्तीर्ण असावी. अर्जासोबत शैक्षणिक अर्हतेसोबत आधार कार्ड व पॅनकार्ड जोडणे आवश्यक आहे. अर्जदार/गटाची स्वतःची इमारत किंवा किमान 4 वर्षांचा भाडेकरार असलेली इमारत असणे आवश्यक आहे. 8 ऑगस्ट 2025 पर्यंत संबंधित कार्यालयात अर्ज सादर करता येणार आहेत. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
00000

वृत्त

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, मराठवाड्यात 3 हजार रुग्णांना 25 कोटींची मदत

·         आरोग्य शिबिरातून 12 हजार नागरिकांना दिलासा

 

छत्रपती संभाजीनगर, दि.29 : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः मराठवाडा विभागात जानेवारी ते जून 2025 या अवघ्या सहा महिन्यांत तब्बल 3 हजार 39 रुग्णांना 25 कोटी 58 लाख 31 हजार रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून नागरिकांचा विचार करून जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले. त्यातून लाभार्थी नागरिकांची संख्या वाढली. त्यासोबतच आरोग्य शिबिर व रक्तसंकलन आदी उपक्रम प्रभावीपणे राबविणे सहज शक्य होत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

जिल्हानिहाय मदत :-

मागील सहा महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 633 रुग्णांना 5 कोटी 33 लाख 38 हजारांची मदत करण्यात आली.  बीड -610 रुग्णांना 4 कोटी 89 लाख 6 हजार, परभणी 533 रूग्णांना 4 कोटी 67 लाख 82 हजार, लातूर- 385 रूग्णांना 3 कोटी  29 लाख 55 हजार, जालना-367 रूग्णांना 3 कोटी 11 लाख 45 हजार, नांदेड- 323 रूग्णांना 2 कोटी 80 लाख 20 हजार, धाराशिव-257 रूग्णांना 2 कोटी 21 लाख आणि हिंगोली-  132 रूग्णांना 1 कोटी 16 लाख रूपये प्रमाणे वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.  

आरोग्य शिबिरे आणि रक्तदान  

            1 मे ते 25 जुलै दरम्यान जिल्हा कक्षाच्या मदतीने घेण्यात आलेल्या आरोग्य व रक्तदान शिबिरांमध्ये 12,409 नागरिकांची आरोग्य तपासणी तर 2,353 नागरिकांनी रक्तदान केले.

जिल्हा

लाभार्थी नागरिक

रक्तदाते

छत्रपती संभाजीनगर

3,058

161

बीड

1,100

75

परभणी

763

467

लातूर

2,522

852

जालना

373

64

नांदेड

226

639

धाराशिव

742

38

हिंगोली

3,625

57

 

 

 

20 गंभीर आजारांकरिता मदत

       मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून 20 गंभीर आजारांवर मदत केली जाते: त्यात, कॉक्लियर इम्प्लांट, हृदयविकार, किडनी/लिव्हर/बोन मॅरो प्रत्यारोपण, कर्करोग, अपघात, नवजात बालकांचे आजार, मेंदू विकार, डायालिसिस, भाजलेले रुग्ण, विद्युत अपघात आदींचा समावेश आहे. 

जिल्हा कक्षाच्या माध्यमातून मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ज्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही.

रुग्णांनी प्रथम महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होतो आणि निधीचा उपयोग खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचतो.

आवश्यक कागदपत्रे :-

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र (१.६० लाखांपेक्षा कमी)
  • वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र
  • रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असावी
  • अपघात असल्यास एफआयआर किंवा एमएलसी
  • अवयव प्रत्यारोपण असल्यास झेडटीसीसी नोंदणी पावती

सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात aao.cmrf-mh@gov.in या ईमेल वर पाठवावीत.  अधिक माहिती करिता टोल फ्री क्र. १८०० १२३ २२११ या क्रमांकावर कॉल करावा.

०००





 

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...