Tuesday, July 19, 2022

 नांदेड जिल्ह्यात 10 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 180 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, नांदेड ग्रामीण 1, माहूर 2, लातूर 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे मुखेड 1, देगलूर 2 असे एकूण 10 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 37 एवढी झाली असून यातील 1 लाख 297 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 48 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 6  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 7 असे एकूण 13 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 17, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 26, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, अश्विनी हॉस्पिटल 1 असे एकुण 48 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 11 हजार 186
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 90 हजार 793
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 37
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 297
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.33 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-48
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.
0000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 3.70 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात मंगळवार 19 जुलै रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 3.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 631.60 मिलीमीटर पाऊस झाला आहे.


जिल्ह्यात मंगळवार 19 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड-4.60 (619.80), बिलोली-0.80(669.80), मुखेड- 0.40 (577.40), कंधार-1.50 (622.90), लोहा-1.50 (580.80), हदगाव-8.90 (583.70), भोकर-5.30 (729.20), देगलूर-1.20 (548.80), किनवट-5.70 (649.40), मुदखेड- 3.50 (807.80), हिमायतनगर-11.70 (823.80), माहूर- 8.20 (542.70), धर्माबाद- 1.90 (650.60), उमरी- 2(774.60), अर्धापूर- 4.60 (606.50), नायगाव-1.30 (589.30) मिलीमीटर आहे.

0000

दहावी, बारावी पुरवणी परीक्षा केंद्राच्या

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जुलै / ऑगस्ट-2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी 12 वीची पुरवणी परीक्षा 15 विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे. परीक्षेतील गैरप्रकार/कॉपी रोखण्यासाठी परीक्षा केंद्र परिसरात 21 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. 

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रापासून शंभर मीटरच्या परिसरात 21 जुलै ते 1 ऑगस्ट 2022, 3 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2022 सुट्टीचे दिवस, रविवार वगळून व 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, पेजर, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  

000000

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत

आवेदनपत्रातील त्रुटीची पुर्तता करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 19 :-  अनु.जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंअतर्गत शैक्षणिक वर्ष 2020-21 व 2021-22 या वर्षात आवेदनपत्र सादर केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या आवेदनपत्रात त्रुटी आहेत. त्यांच्या आवेदनपत्रातील त्रुटीची पूर्तता करून घेण्याची कार्यवाही सुरु आहे. विद्यार्थ्यांनी आवेदन पत्रातील त्रुटीची पूर्तता करून घ्यावी. पात्र असलेल्या आवेदनपत्रातील विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येणार आहेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी  केले आहे.  

या योजनेअंतर्गत समाज कल्याण कार्यालयामार्फत पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याबाबत विद्यार्थ्यांचे काही प्रश्न अथवा शंका असल्यास अथवा या योजनेसंबधी माहिती हवी असल्यास थेट सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय नांदेड येथे संपर्क साधावा. याबाबत कोणत्याही अनभिज्ञ व्यक्तीशी संपर्क साधू नये अथवा कोणत्याही अमिषास बळी पडू नये. अनधिकृत व्यक्तीशी संपर्क केल्यास होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील याची नोंद घ्यावी. संबधीत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष समाज कल्याण कार्यालयातील संबंधीत कार्यासनाशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

0000

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या

पात्र परिसरात कलम 144 लागू 

नांदेड (जिमाका) दि. 19 :-  मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 जुलै ते 19 ऑगस्ट 2022 पर्यत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत. 

याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 ऑगस्ट 2022 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 हर घर तिरंगा” साठी

लोकसहभागाची त्रिसूत्री निश्चित

 

·  दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या घरावर तिरंगासाठी

शासकिय अधिकारी-कर्मचारी देणार योगदान  

 

नांदेड, (जिमाका) दि. 19 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हर घर तिरंगा उपक्रमाला लोकसहभागाच्या व्यापक चळवळीचा एक नवा मापदंड आज निश्चित करण्यात आला. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला या अमृत महोत्सवी वर्षाचा आनंद व आत्मिक समाधान घेता यावे यादृष्टिने जिल्हा प्रशासनाने नियोजनासाठी आज व्यापक बैठक घेतली होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, उद्योजक, व्यापारी व इतर प्रतिनिधींच्या सहमतीने हर घर तिरंगा अधिक व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला.

 

हर घर तिरंगा व इतर प्रशाकीय नियोजनाबाबत आज आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, सहायक जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार, सौम्या शर्मा, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले व सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.  

 

लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन

जिल्हा परिषद यशस्वी करणार उपक्रम - वर्षा ठाकूर-घुगे

नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गाव, ग्रामपंचायत, पंचायत समिती यांचा सहभाग हर घर तिरंगा उपक्रमाला लोकसहभागाचा आदर्श मापदंड निर्माण करून देणारा आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी या उपक्रमात सहभागासाठी स्वयंस्फूर्त तत्पर आहेत. प्रत्येकाचे योगदान यात सर्वात महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषदेचे 11 हजार 900 कर्मचारी आहेत. प्रत्येक कर्मचारी आपल्या वैयक्तिक घरासह गरजू तीन व्यक्तींना तिरंगा देईल. एकट्या जिल्हा परिषदेमधून जवळपास 50 हजार जिल्ह्यात गरीब, दारिद्रयरेषेखाली व्यक्तींना आपला तिरंगा देईल, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. देशभक्तीसह देशाप्रती कर्तव्य बजावण्यासाठी तत्पर असलेल्या प्रत्येक नागरिक, प्रतिनिधी यांचा सहभाग हा व्यापक करण्यासाठी जिल्हा परिषद लवकरच विशेष बैठक घेत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.

 

दरवर्षी नित्यनेमाने जिल्ह्याच्या काना-कोपऱ्यात असलेल्या वस्ती-तांड्यावर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी हे प्रत्येकाच्या मनामध्ये प्रभातफेरी द्वारे राष्ट्रप्रेमाचे स्फूलिंग निर्माण करतात. या मोहिमेसाठी हे विद्यार्थी अमृत महोत्सवी वर्षाच्यादृष्टिने व्यापक जनजागृती करून राष्ट्राप्रती कर्तव्य भावनाही निर्माण करतील. हर घर तिरंगासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, जिल्ह्यातील सर्व शाळा, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी योगदान देतील, असा विश्वास वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेतर्फे लोकसहभागाची स्वतंत्र त्रिसूत्री तयार करीत असून सर्वांचा सन्मानाने सहभाग यासाठी आम्ही विशेष भूमिका बजावू असे त्यांनी स्पष्ट केले.

 

महानगर आणि नगरपरिषदेच्या सहभागासाठी नियोजन

महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात लोकांचा उर्त्स्फूत सहभाग दिसून येत आहे. लोक हर घर तिरंगा” साठी पुढे येत आहेत. शहरात राहणाऱ्या नगरिकांची संख्या, एकुण कुटूंब संख्या लक्षात घेऊन तिरंगाचे नियोजन केले जात आहे. यात वितरण हा खूप महत्वाचा भाग असून महानगरपालिकेतर्फे प्रत्येक विभाग निहाय तिरंगा विक्रीचे वितरण केंद्र तयार करू असे मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी सांगितले. जिल्ह्यात 16 नगरपरिषदा असून या क्षेत्रातील 121 बचतगटांमार्फत सुमारे 79 हजार कुटुंबापर्यंत तिरंगा पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रात 1 हजारापेक्षा अधिक बचतगट आहेत. सर्व बचतगटांना सहभागी करून घेण्याबाबत माविमतर्फे नियोजन केले जात आहे.

0000 





  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...