Friday, July 16, 2021

 

शेतीला पशू व दुग्ध व्यवसायाची जोड

यातूनच शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

 

·         भोकर तालुक्यातील मोघाळी, नागापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रासह कांडली येथील पशू वैद्यकिय दवाखाण्याचे भुमीपूजन 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- भोकर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी येथील भौगोलिक परिस्थिती पाहून शेतीसह शेतीपूरक उद्योगांना जोड देणे आवश्यक आहे. यादृष्टिने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी यादृष्टिने संबंधित विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. शेतीला पाण्याच्या नियोजनासह पशुपालनासाठी अत्यावश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून कांडली येथे 35.15 लाख रुपये खर्चून उभारण्यात येणारे हा पशू वैद्यकीय दवाखाणा या पंचक्रोशीतील पशुपालक शेतकऱ्यांना नवी दिशा देईल असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियांनातर्गत भोकर तालुक्यातील मोघाळी, नागापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि कांडली येथे पशू वैद्यकिय दवाखाण्याच्या भुमीपूजन सोहळ्याच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी आमदार अमर राजूरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, भोकर पंचायत समितीच्या सभापती सौ. निता व्यंकटेश रावलोड, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उपायुक्त पशूसंवर्धन डॉ. मधुसूदन रत्नपारखी, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद बोधनकर, पशूधन विकास अधिकारी (तांत्रिक) डॉ. अरविंद गायकवाड, पशूधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. दिपक बच्चंती, भोकरचे पशूधन विकास अधिकारी डॉ. अविनाश बुन्नावार, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. 

भोकर येथील पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी रेणापूर सुधा प्रकल्पाची उंची वाढविण्याचा निर्णय आपण घेतला आहे. ही उंची वाढविल्यामुळे या प्रकल्पातील पाण्याची उपलब्धताही वाढणार आहे. याचबरोबर पिंपळढव, जाकापूर, पाकी, दिवशी, सोनारी, लघळूद, हाडोळी आदी साठवण तलावाबाबत शासन स्तरावरील प्रक्रिया सुरु आहे. भोकर येथे शंभर खाटाचे नवीन उपजिल्हा रुग्णालय, या भागातील रस्त्यांचा विकास यासाठी भरीव तरतुद करुन विकासाला चालना देण्यासाठी मी कटीबद्ध असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी आमदार अमर राजूरकर आणि जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांची यथोचित भाषणे झाली.

*****






 नांदेड जिल्ह्यात 16 व्यक्ती कोरोना बाधित तर 9 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 669 अहवालापैकी 16 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 11 तर अँटिजेन तपासणीद्वारे 5अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 104 एवढी झाली असून यातील 87 हजार 368 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 80 रुग्ण उपचार घेत असून यात एका बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 656 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, माहूर 1, मुदखेड 1, मुखेड 6, तेलगंना 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, लोहा तालुक्यांतर्गत 1, धर्माबाद 1, मुखेड 1 असे एकूण 16 बाधित आढळले.

आज जिल्ह्यातील 9 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, नायगाव तालुक्यातर्गंत 2, भोकर तालुक्यातर्गंत 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

आज 80 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 9, देगलूर कोविड रुग्णालय 1, हदगाव कोविड रुग्णालय 1, मुखेड कोविड रुग्णालय 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 50, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 9 व खाजगी रुग्णालय 2 व्यक्ती उपचार घेत आहेत.

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 127, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 139 खाटा उपलब्ध आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 36 हजार 645

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 34 हजार 711

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 104

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 368

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 656

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.96 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-7

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-65

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-80

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1

00000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 5.9 मि.मी. पाऊस

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यात शुक्रवार 16 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 5.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात एकुण 211 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात शुक्रवार 16 जूलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 2.2 (251.7), बिलोली- 6.1 (274.2), मुखेड- 7.1 (197.9), कंधार- 4 (201.5), लोहा- 5.5 (203.4), हदगाव- 14.1 (145.8), भोकर- 9.4 (186.7), देगलूर- 6.4 (194.5), किनवट- 7.2 (214.4), मुदखेड- 0.9 (269.8), हिमायतनगर-11.2 (145.2), माहूर-6.7 (154.1), धर्माबाद-0.6 (222.1), उमरी- 2.5 (270.8), अर्धापूर-1.1 (284.6), नायगाव- 3.7 (223े) मिलीमीटर आहे.
0000

 

जिल्हा कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे

जागतिक युवा कौशल्य दिनानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 नांदेड (जिमाका) दि. 16 :- जागतिक युवा कौशल्य दिनानिमीत्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे 15 जुलै  रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किमान कौशल्य विकास कार्यक्रमातर्गंत केमिसीस लेबोरेटरी सिडको नांदेड या प्रशिक्षण संस्थेत 1 फार्मसी असिस्टंट  2- लॅबोरेटरी असिस्टंट या दोन कोर्सच्या प्रशिक्षण तुकडीचे उदघाटन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकतेच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांचे हस्ते ऑनलाईन संपन्न झाले.

प्रोजेक्ट उद्यमिता व मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबीनारमध्ये प्रकाश शेंडे, प्रोग्राम  ऑफिसर, प्रोजेक्ट उद्यामिता आणि जिल्हा कौशल्य विकास समन्वयक इरफान खान यांनी मार्गदर्शन केले. अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळ व सुशिल ट्रॅक्टर्स दाभड रोड नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने लाभार्थ्यांना एकूण ६ ट्रॅक्टर्सचे वितरण सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक शुभम शेवनकर यांनी महामंडळाच्या विविध योजनांची यावेळी माहिती दिली.

 

जिल्ह्यातील 71 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 71 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शनिवार 17 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 18 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

 

तर श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 18 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर शहरी दवाखाना सिडको येथे 50 डोस उपलब्ध आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव या 6 केंद्रावर  कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय भोकर, बारड येथे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्मागाद, हिमायतनगर, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी या 12 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय कंधार व बारड या केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्यात ग्रामीण भागातील 38 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 15 जुलै पर्यंत एकुण 7 लाख 8 हजार 725 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 16 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 5 लाख 98 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 79 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 7 लाख 77 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

खेळाडू भरतीसाठी पात्र खेळाडूनी कामगिरी प्रमाणित करुन घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 16 :- केंद्र शासनाच्या आयकर विभागाद्वारे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यप्राप्त खेळाडूंसाठी विविध पदांच्या खेळाडू भरतीचा कार्यक्रम 8 जुलै 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या इच्छूक खेळाडू उमेदवारांनी त्यांची कामगिरी प्रमाणित करुन घेण्यासाठी नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात शुक्रवार 20 ऑगस्ट 2021 पूर्वी कार्यालयीन वेळेत प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतिसह परिपूर्ण अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे. 

या जाहिरातीत ॲथलेटिक्स, जलतरण, स्ववॅश, बिलियर्डस, बुद्धीबळ, कॅरम, ब्रिज, बॅडमिंटन, लॉनटेनिस, टेबलटेनिस, शुटींग, वेटलिफ्टिींग, कुस्ती, बॉक्सिंग, ज्युदो, जिम्नॅस्टीक्स, बॉडी बिल्डींग, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, कबड्डी व क्रिकेट इत्यादी खेळप्रकारामध्ये भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करुन सहभाग अथवा प्राविण्यप्राप्त केलेले खेळाडू या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. अधिक माहितीसाठी आयकर विभागाची 8 जुलै 2021 रोजीची जाहिरात पहावी, असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

जिल्ह्यातील 91 गावांना स्मशानभूमीसाठी शासकीय जागा प्रदान

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आढावा बैठकीत दिले होते निर्देश 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यातील काही गावात स्मशानभूमीचा प्रश्न हा भावनिक आणि तितकाच महत्वाचा होता. अनेक खेड्यांना स्वत:ची स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांची होणारी विवंचना लक्षात घेवून "गाव तेथे स्मशानभूमी" अंतर्गत जवळपास 91 खेड्यांना शासकीय जागा प्रदानचे आदेश आज काढण्यात आले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रश्नाचा आढावा घेऊन जिल्हा परिषद व महसूल विभागाने समन्वय साधून हा जागेचा विषय मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते.  

अर्धापूर, उमरी, कंधार, किनवट, देगलूर, धर्माबाद, नांदेड, बिलोली, भोकर, माहूर, मुखेड, मुदखेड, हदगाव या तालुक्यामध्‍ये स्मशानभूमी नसलेल्या खेड्याची संख्या लक्षणीय होती. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या निर्देशानुसार गत सहा महिन्यापासून जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनातर्फे प्रशासकीय स्तरावर आवश्यक असलेली मंजुरी व प्रक्रीया युध्दपातळीवर पुर्ण करण्यात आली. जवळपास 91 खेड्यांचा स्मशानभूमीचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.  

जिल्ह्यातील साधारणता 300 खेड्यांपेकी 91 गावांचे आदेश पारीत करण्यात आले असून उर्वरित 209 गावांच्या स्मशानभूमीचे आदेशही लवकर वितरीत केले जाणार आहेत. गावातील स्मशानभूमी ही अधिकाधिक वृक्षवल्ली व स्वच्छतापूर्ण असावी यासाठी त्या-त्या गावातील ग्रामस्थांचा सहभागही अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहे. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय स्मशानभूमी आदेश पारीत झालेल्या गावे पुढीलप्रमाणे आहेत. अर्धापूर तालुक्यातर्गंत 3, उमरी तालुक्यातर्गंत 2, कंधार तालुक्यातर्गंत 2, किनवट तालुक्यातर्गंत 17, देगलूर तालुक्यातर्गंत 7, धर्माबाद तालुक्यातर्गंत 1, नांदेड तालुक्यातर्गंत 4, बिलोली तालुक्यातर्गंत 7, भोकर तालुक्यातर्गंत 10, माहूर तालुक्यातर्गंत 20, मुखेड तालुक्यातर्गंत 6, मुदखेड 4, हदगाव तालुक्यातर्गंत 8 याप्रमाणे एकूण 91 गावांचा समावेश आहे.



00000

 

 

दहावीच्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध 

नांदेड (जिमाका) दि. 16:- इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा बैठक क्रमांक उपलब्ध झाला नसल्यास अशा विद्यार्थी व संबंधितांनी मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरील सूचनेप्रमाणे कार्यवाही करुन आपला बैठक क्रमांक उपलब्ध करुन घ्यावा, असे आवाहन शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. 

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सन 2021 मध्ये इयत्ता 10 वी ची परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देण्यात आली नाहीत. माध्यमिक शाळांना त्यांचे लॉगइन आयडी व युजर पासवर्डद्वारे सर्व विद्यार्थ्यांचे नाव व बैठक क्रमांकनिहाय माहिती उपलब्ध करुन दिली होती. सर्व संबंधित विद्यार्थ्यांना त्यांचा बैठक क्रमांक अवगत करुन देण्याबाबत सूचित केले होते. बैठक क्रमांकाबाबत माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधितांनी संकेतस्थळावरील सूचनेनुसार कार्यवाही करावी, असेही आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.  

0000

 

 

अनुदान, बिजभांडवल कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने मांतग समाज व 12 पोटजातीसाठी अनुदान व बिजभांडवल योजनेचा राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ बँकेमार्फत देण्यासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षाचे उद्दिष्टे प्राप्त झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू लाभार्थीनी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. 

अनुदान योजनेची प्रकल्प मर्यादा ही 50 हजार रुपयापर्यंत असून गुंतवणूक असणाऱ्या रक्कमेत 10 हजार रुपये अनुदान व उर्वरीत बॅंकेचे कर्ज राहणार आहे. बिजभांडवल योजनेच्या निकषात प्रकल्प मर्यादा ही 50 हजार 1 ते 7 लाख रुपयापर्यंत आहे. लाभार्थ्याचा सहभाग 5 टक्के तर महामंडळाचे कर्ज 20 टक्के (10 हजार रुपये अनुदानासह ) तसेच बँकेचे कर्ज 75 टक्के राहिल. या योजनेत स्थिर भागभांडवल निर्मितीच्या उद्योगाचे कर्ज प्रस्ताव जसे वाहन, यंत्रे, मशिनरी खरेदी, इतर विविध व्यवसायासाठी उद्दिष्टे देण्यात आली आहेत.

या दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला, उत्पनाचे प्रमाणपत्र, दोन छायाचित्र, रेशनकार्ड, आधारकार्ड, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेचा पुरावा, व्यवसायाचे कोटेशन, अनुभव प्रमाणपत्र, शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले प्रमाणपत्र व शौचालय बांधल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, निवडणूक ओळखपत्र, दुकानचा परवाना, लायसन्स, बॅच, परमीट इत्यादी कागदपत्राची आवश्यकता राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची वयोमर्यादा 18 ते 50 वर्षाच्या आत आवश्यक आहे, असेही आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...