Saturday, January 6, 2018

सर्वांगिण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध
- जिल्हाधिकारी डोंगरे
"सिद्धी 2017 - संकल्प 2018" उपक्रमाची पत्रकार परिषदेत माहिती
नांदेड,दि. 6 :- जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रशासनाच्यावतीने विविध विकास योजना राबविण्यात येत असून त्या अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
"सिद्धी 2017 - संकल्प-2018" या उपक्रमांतर्गत पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री डोंगरे हे पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, प्र. जिल्हा माहिती अधिकारी मीरा ढास व विविध वृत्तपत्रांचे संपादक, प्रतिनिधी, ईलेक्ट्रॉनिक्स मिडियाचे प्रतिनिधी, छायाचित्रकार आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी उपस्थित पत्रकारांना जिल्ह्यातील मागील वर्षभरातील विकास कामांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यात प्रामुख्याने भटक्या विमुक्त प्रवर्गातील बेरोजगार तरुणांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. डिजीटल इंडिया या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात भुमिअभिलेख आधुनिकीकरण जिल्ह्यात 1 हजार 547 गावाचे काम पूर्ण झाले असून जिल्हा राज्यात सहाव्या स्थानी  आहे. ई-डिसनिक प्रणाली 26 कार्यालयात कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामध्ये 3 हजार 205 प्रकरणे हाताळण्यात आली आहेत. नांदेड जिल्ह्याची अद्ययावत माहिती असलेल्या मोबाईलॲपचा 12 हजार 900 लोकांनी वापर केला आहे. हस्सापूर नसरतपूर वाडी पश्चिम वळण रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. ई-पॉस या बायोमॅट्रीक पद्धतीने अन्न-धान्य वाटप करण्यासाठी 1 हजार 988 रेशन दुकानाला ई-पॉस मशिन वाटप करण्यात आले आहेत. या बायोमॅट्रीक पध्दतीने 72.6 टक्के अन्न-धान्य वाटप करण्यात आले असून एकुण लाभार्थ्यांपैकी 6 लाख 5 हजार 724 पैकी 4 लाख 36 हजार 298 लाभ मिळाला आहे. मतदार छायाचित्रासहित निवडणूक ओळखपत्राचे वाटप जानेवारी 2017 मध्ये 99.51 टक्के करण्यात आले आहे. राज्यात प्रथमच तृतीय पंथीयासाठी निवडणूक ओळखपत्र शिबीर नांदेड जिल्ह्यात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 53 तृतीय पंथांना निवडणूक ओळखपत्र वाटप करण्यात आले आहे.   
जलयुक्त शिवार अभियानातंर्गत सन 2016-2017 मध्ये 226 गावाची निवड करण्यात आलेले असून 7 हजार 89 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. 226 गावापैकी 124 गावे शंभर टक्के पूर्ण झाली असून त्यांतर्गत आज अखेर 8 हजार 220 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यात  324 कामे प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत रुपये 65.53 कोटी खर्च करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 32378.82 टिएसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्याअंतर्गत एक संरक्षीत सिंचन दिल्यास 12107.48 हे. व दोन संरक्षीत सिंचन 6 हजार 358.77 हे. क्षेत्र निर्माण झाले आहे. या कामांमुळे पाणी पातळीत 0.30 ते 2.50 मी. ने वाढ झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील उमरी नगरपरिषदेचे स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत उत्कृष्ट काम केल्यामुळे मराठवाडा विभागातून प्रथम पारितोषिक मिळाले आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात उमरी नगरपरिषदेची महाराष्ट्रातील पहिल्या 25 शहरामध्ये हाय पोटेंशीयल सिटी म्हणून निवड करण्यात आली आहे. सन 2016-17 मध्ये नगरपालिका व नगरपरिषद निवडणूक ऑनलाईन पध्दतीने पार पाडण्यात आली असून हे एक जिल्हा प्रशासनाचे मोठे यश आहे, असे सांगितले.  त्याचप्रमाणे उदय योजनेतंर्गत वंचित घटकांचा शोध घेवून त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. उदय योजनेद्वारे वंचितांसाठी कार्य करण्यात येत आहे. ( लोहा व नांदेड तालुक्यामध्ये). प्रामुख्याने भटक्या विमुक्त जाती जमातींतील वैदु, नामजोगी, पारधी, कैकाडी, मसनजोगी, वडार, तांबकरी, बहुरुपी, वसुदेव, जोशी, गोंधळी, कतारी, पाथरव, लवंगी गोसावी, तृतीयपंथी, कचरा वेचणारे आदी घटक वंचित असल्याने या घटकांसाठी नियोजनबध्द कार्यक्रम आखण्यात आला आहे. अशा घटकांना शोधून त्यांना त्यांचे हक्क देण्यासाठी त्यांचे पुनर्वसन, आरोग्य, शिक्षण, निवारा, अन्न-धान्य, शिधापत्रिका व्यवसायासाठी अर्थसहाय्य या सारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतची अंमलबजावणी करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यावेळी दिली. नांदेड जिल्ह्याचा सर्वांगिण विकासाचा आढावा जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी घेतला.

00000
पत्रकारिता एक व्रत - मीरा ढास
नांदेड, दि. 6 :- पत्रकारांनी समाजामध्ये घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा तटस्थ, नि:पक्ष निर्भिड ठेवणे आवश्यक असून आपल्या पत्रकारितेच्या समाज मनावर सकारात्मक अमीट ठसा उमटवावा यासाठी पत्रकारिता हा केवळ व्यवसाय, नोकरी मानता ते एक व्रत म्हणून अंगीकारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्र. जिल्हा माहिती अधिकारी मीरा ढास यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे पत्रकार दिन मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमाचे द्घाटक म्हणून श्रीमती ढास बोलत होत्या. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास साप्ताहिक ज्ञानविश्वचे संपादक रमेश मस्के, ग्रंथपाल आरती कोकुलवार यांची उपस्थिती होती.
रमेश मस्के यांनी पत्रकारितेचे आव्हान पेलतांना पत्रकारांची आजची स्थिती विशद करुन पत्रकारितेत तत्वनिष्ठ विचारांची गरज आवश्यक असल्याचे सांगीतले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी समाजामध्ये खासकरुन स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी पत्रकारितेचे, वर्तमानपत्राचे महत्व सांगून मराठी भाषा सवंर्धनाच्या कार्यामध्ये सर्वांनी स्वयंफुर्ते सहभागी होऊन मराठी भाषेचा गौरव, अभिमान बाळगणे गरजेचे असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक आरती कोकुलवार यांनी केले तर सूत्रसंचालन आभार अजय वटटमवार यांनी मानले. यावेळी संजय कर्वे, कोंडीबा गाडेवाड, मयूर कल्याणकर, संजय पाटील, गजानन कळके, महेन्द्रसिंग रामगढीया, यशवंत राजेगोरे, बालाजी कदम आदीसह वाचक विद्यार्थी उपस्थित होते.

000000
आपले पोलीस, आपली अस्मिता
लोकराज्यचा जानेवारी विशेषांक प्रकाशित
नांदेड, दि. 6 : महाराष्ट्र पोलीस दलाच्या नेत्रदीपक कामगिरीचा आढावा घेणारा लोकराज्यचा  जानेवारी  महिन्याचा 'आपले पोलीस, आपली अस्मिता' हा विशेषांक प्रकाशित झाला आहे.
या अंकात फोर्स वन, नक्षलवाद्यांशी सामना, महामार्ग पोलीस, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई पोलिसांचे शौर्य, नागपूर तसेच पुणे पोलिसांची कामगिरी, मुंबई लोहमार्ग पोलीस, मुस्कान आणि शोध उपक्रम, अवैध दारुनिर्मितीवर प्रतिबंध, आपत्ती प्रतिसाद दल, गुन्हे सिद्धीचे शास्त्रीय तंत्र, डिजिटल तपास, सायबर युगाची आव्हाने, सायबर क्राईम म्हणजे काय, वाहनचालकांनी घ्यावयाची काळजी, पोलिसांना उच्च शिक्षणाची संधी, सायबर गुन्हांचा पाठलाग (सत्य कथा), सागरी सुरक्षा आदी विषयांवर मान्यवरांनी विस्तृत लेख  लिहिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री (शहरे) रणजित पाटील, अपर मुख्य सचिव (गृह) सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथूर यांचे विशेष लेख या अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत. 76 पृष्ठांच्या या अंकाची किंमत फक्त 10 रुपये असून हा अंक सर्वत्र उपलब्ध आहे.

00000
जिल्हाधिकारी कार्यालयात
मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 6 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 9 जानेवारी 2018 रोजी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 यावेळेत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदन दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने केले आहे.

0000
वेतन पडताळणी पथकाचा दौरा
नांदेड, दि. 6 :- वेतन पडताळणी  पथकाचा माहे जानेवारी 2018 चा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे. 
हे पथक मंगळवार 9 जानेवारी 2018 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय व बुधवार 10 ते शुक्रवार 12 जानेवारी 2018 काळात जिल्हा व तालुका स्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी  हे पथक या कालावधीत कोषागार कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहील. ज्या कर्मचाऱ्यांचे दि. 1 जानेवारी 2006 रोजीची वेतन पडताळणी अद्याप झालेली नाही त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी केले आहे.

0000
वंचितांना न्याय देण्यासाठी
पत्रकारांनी समाजाचे नायक व्हावे  
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणदिन निमित्त अभिवादन
नांदेड,दि. 6 :- वंचित घटकांना न्याय देण्यासाठी पत्रकारांना समाजाचा नायक या भुमिकेतून सकारात्मक दृष्टीने काम करावे लागेल, असा सूर आज येथे व्यक्त झाला. निमित्त होते दर्पण दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय नांदेड आणि महात्मा गांधी मिशन संचलित वृत्तपत्र विद्या व माध्यमशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी मिशन संस्थेतील संगणक शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. शिरीष कोडगीरे होते.
एमजीएम शिक्षण संकुलातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार देवदत्त तुंगार, अनिकेत कुलकर्णी, आकाशवाणीचे सहायक निदेशक भिमराव शेळके, सकाळचे सहयोगी संपादक संजय कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे लातूर विभागाचे सचिव तथा सामनाचे प्रतिनिधी विजय जोशी, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मीरा ढास, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे, वृत्तपत्र विद्या  माध्यमशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.गणेश जोशी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास विविध माध्यमांचे प्रतिनिधी, महाविद्यालयातील पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात श्री. कोडगीरे म्हणाले, मागील दहा ते पंधरा वर्षाच्या काळापासून माध्यम क्षेत्रात संगणकशास्त्राने मोठी क्रांती केली असून इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे सोशल मिडिया हातात असला तरी नागरिकांमध्ये वृत्तपत्र वाचनाची आवड आजही आहे. वृत्तपत्र माध्यमाचे महत्व टिकून ठेवण्यामागे पत्रकारांचा खूप मोठा त्याग आहे. त्यामुळे सकारात्मक पत्रकारितेतून सामान्य माणसाला सन्मानाने जगण्याची संधी मिळते, असे सांगितले.
प्रा. तुंगार यांनी पत्रकारांनी कमीत कमी शब्दात चांगली बातमी लिहिण्याचे कौशल्य आत्मसात करुन इतर महत्वाच्या बातमीला जागा दिली पाहिजे. तर जुन्या पिढीने नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत केले पाहिजे.  असे सांगितले. अनिकेत कुलकर्णी यांनी, जीवनात अभिमानाचे क्षण जास्त यावे तर आत्मपरिक्षणाचे क्षण कमी यावे यासाठी संकल्प करण्याचे आवाहन केले. श्री. शेळके म्हणाले, पत्रकारांनी लिखाणामधून इतरांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. सकारात्मकदृष्टी ठेवली तर संकट येत नाहीत. अशिक्षित व्यक्तीला  छायाचित्रातून बातमीचा अंदाज येतो तर एका छायाचित्रातून कांदबरी निर्माण होते. आकाशवाणीत लिहिण्याची व बोलण्यातून काम करण्याच्या अनेक संधी आहेत असे सांगून जाहिरात व वृत्त मांडणी, मुलाखतीचे तंत्र याबाबत मार्गदर्शन केले. संजय कुलकर्णी म्हणाले, पत्रकार हा मुकनायक असला पाहिजे. पत्रकारिता हे क्षेत्र त्यागाचे असून इतरांना प्रेरीत करण्याचे काम आहे. पत्रकारांनी सकारात्मक दृष्टी ठेवून लिखाण केल्यास समाजात चांगला संदेश जातो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेची गती वाढली असून या क्षेत्रात निरंतर वाचनाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. विजय जोशी यांनी दर्पण दिनाचे महत्व सांगून आचार्य बाळशास्त्री यांच्या सामाजिक जाणीवेतून केलेल्या कार्याची माहिती दिली. वैचारीक ताकद वृत्तपत्रात असून जनमाणसाचा आरसा म्हणून वृत्तपत्रे काम करत आहेत, असे सांगून वाचा म्हणजे वाचाल अशा संदेश त्यांनी दिला. प्र. जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मिरा ढास यांनी दर्पण दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची भुमिका स्पष्ट केली. छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी वृत्तपत्रातील छायाचित्राचे महत्व सांगितले.
प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन तसेच दिपप्रज्वलन करण्यात आले. महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी प्रकाशित केलेल्या स्पंदन भित्तीपत्रिकेचेही मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्राचार्य डॉ. जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविकात केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद आदींचीही उपस्थिती होती. ज्येष्ठ पत्रकार ऋषीकेश कोंडेकर यांनी सुत्रसंचलन केले तर प्रा. राज गायकवाड यांनी आभार मानले.

000000
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- 2017 साठी
प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
नांदेड, दि. 6 :- राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दि. 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत बुधवार 31 जानेवारी 2018शी आहे.
            स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा  www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथेही उपलब्ध आहेत.  
 राज्यस्तरीय पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे- बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी), बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी), मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू), यशवंतराव चव्हाण पुरस्कार - शासकीय गट (मराठी) (मा. व ज.), पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.), सोशल मीडिया पुरस्कार, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (सर्व पुरस्कार प्रत्येकी 51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
विभागीय पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे- अनंतराव भालेराव पुरस्कार (औरंगाबाद विभाग) (लातूरसह), आचार्य अत्रे पुरस्कार (मुंबई विभाग), नानासाहेब परूळेकर पुरस्कार (पुणे विभाग), शि. म. परांजपे पुरस्कार (कोकण विभाग), ग. गो. जाधव पुरस्कार (कोल्हापूर विभाग), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार (अमरावती विभाग), ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार (नागपूर विभाग) (सर्व पुरस्कार प्रत्येकी 51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) तर दादासाहेब पोतनीस पुरस्कार (नाशिक विभाग) (51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तसेच याव्यतिरिक्त रुपये 10 हजार दै. गावकरीने पुरस्कृत केले आहेत.) या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना
जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन
नांदेड, दि. 6 - जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे दर्पण दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मीरा ढास यांच्या हस्ते कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  
यावेळी छायाचित्रकार विजय होकर्णे यांच्यासह विवेक डावरे, अलका पाटील, काशिनाथ आरेवार, प्रवीण बिदरकर, महमंद युसूफ, बालनरसय्या अंगली यांनीही आचार्य जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

00000 

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...