Friday, March 22, 2024

 वृत्त क्र. 271 

जिल्ह्यातील कोणत्याच मतदान केंद्रावर

दिव्यांगांना त्रास होता कामा नये : जिल्हाधिकारी

 

·  दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर सुविधा पुरविणाऱ्या सनियंत्रण समितीची बैठक

 

नांदेड दि. 22 : अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये ,यासाठी भारत निवडणूक आयोग दक्ष असून जिल्हास्तरावरही दिव्यांगांना कोणता त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे दिले.

 

दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर सुविधा पुरविणाऱ्या सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच संपन्न झाली.या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबोधित केले.यावेळी प्रत्यक्ष व दूरदुष्यप्रणालीद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, सहाय्यक आयुक्त नगर प्रशासन गंगाधर इरलोड,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे,निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, उपविभागीय अधिकारी विकास माने, यांच्यासह दिव्यांगाचे प्रतिनिधी प्रशिक्षक नितीन निर्मळ, विशेष शिक्षक पाटील सर आदींची उपस्थिती होती.

 

दिव्यांगांना मतदानासाठी अडचण जाणार नाही अशा पद्धतीचे मतदान केंद्राकडे जाणारे रस्ते, प्रत्येक मतदान केंद्रावर ज्यांची मतदान आहेत अशांची यादी, त्यांना रांगेत उभे राहावे लागणार नाही यासाठी प्रतीक्षालय, सुलभ रस्ते, पाणी, शौचालय, दृष्टीहीन मतदारांसाठी ब्रेल लिपी, मुबलक प्रकाश व्यवस्था, उपलब्ध करण्याबाबत सूचित करण्यात आले.

 

लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्व ठिकाणी ही व्यवस्था करण्यात यावी. सर्व ठिकाणच्या व्यवस्थेबाबतची खातरजमा संबंधित अधिकाऱ्यांनी करावी असे निर्देशही यावेळी देण्यात आले. यावेळी उपस्थित दिव्यांग प्रतिनिधींकडून या संदर्भात आणखी काय काय उपाययोजना करण्यात येऊ शकतात याबाबतची माहिती प्रशासनाने घेतली. मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांना बेसिक साईन लँग्वेजचे प्रशिक्षण देण्याची सूचना यावेळी करण्यात आली. तसेच दिव्यांगांना मदत करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्याबाबतही स्पष्ट करण्यात आले. या समितीचे सदस्य सचिव समाज कल्याण अधिकारी डॉ. सत्येंद्र  आऊलवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

00000






 वृत्त क्र. 270

लोकसभा निवडणुकीसंदर्भात

जिल्हाधिकाऱ्याची शनिवारी आकाशवाणीवर मुलाखत

नांदेडदि. 22 :- लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात शनिवारी रात्री आठ वाजता आकाशवाणी नांदेड वर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची मुलाखत प्रसारित केली जात आहे.

जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणूक शांतता व सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाची प्रशासकीय पातळीवर जोरात तयारी सुरु आहे. जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक विषयक तयारीच्या त्याअनुषंगाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची मुलाखत आकाशवाणी नांदेड केंद्रावरुन प्रसारित होणार आहे.

त्यांची मुलाखत नांदेड येथील पत्रकार अनुराग पोवळे यांनी घेतली आहे. सदर मुलाखतीचे प्रसारण शनिवार दिनांक 23 मार्च 2024 रोजी रात्री 8.00 वाजता आकाशवाणी नांदेड केंद्र वरून प्रसारित होणार आहे.

0000

वृत्त क्र. 269

ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथ खरेदीची यादी जाहीर

नांदेड, दि. 22 : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेंतर्गत ४८ व ४९ व्या ग्रंथ भेट योजनेंतर्गत ग्रंथांच्या खरेदीसाठी सन २०२१ व सन २०२२ मध्ये प्रकाशित व ग्रंथालय संचालनालयास प्राप्त ग्रंथांपैकी निवड केलेल्या मराठी ४८५, हिंदी २०४ व इंग्रजी २२१ अशा एकूण ९१० ग्रंथांची निवड करण्यात आली आहे. या ग्रंथांची यादी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या https://htedu.maharashtra.gov.in/maim/ या संकेतस्थळावर १८ ते ३० मार्च २०२४ या कालावधीत अवलोकनार्थ खुली ठेवण्यात आली आहे. या ग्रंथ यादीतील ग्रंथ किमान ३० टक्के सूट दराने वा त्यापेक्षा अधिक सूट दर देण्यास तयार असल्यास त्या सूट दराप्रमाणे ग्रंथांचा पुरवठा करणे आवश्यक राहील. याबाबत प्रकाशक, वितरकांनी देयकात स्पष्टपणे नमूद करावे.

या संदर्भात यादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत सूचना, हरकती, आक्षेप असल्यास ३० मार्च २०२४ पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगरभवन, मुंबई- ०१ यांच्याकडे लेखी स्वरूपात कार्यालयीन वेळेत हस्त बटवड्याने, टपालाने किंवा ई- मेलवर मुदतीत पाठवावेत. त्यानंतर आलेल्या सूचना, हरकती आणि आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. तसेच यादीत ग्रंथाचे नाव, लेखक, प्रकाशक, किमतीत काही बदल असल्यास निदर्शनास आणून द्यावे, असे अशोक मा. गाडेकर, प्र. ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००

 वृत्त क्र. 268

निवडणूक प्रचारासाठी वापरात येणाऱ्या वाहनांवर

पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावण्यास मनाई

नांदेड, दि. 22 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता कालावधीत प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इ. बाबीसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत.

भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची 16 मार्च 2024 रोजी घोषणा केली असून घोषणेच्‍या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. नांदेड जिल्‍ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेतनिर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून जिल्‍हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इ. बाबीसाठी निर्बंध आदेश निर्गमीत केले आहेत. हे आदेश 6 जून 2024 पर्यत लागू राहतील.

फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्यापुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून 2 फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसना मागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही असेही आदेशात नमुद केले आहे.

0000

 वृत्त क्र. 267

दारु दुकाने सोमवारी बंद 

नांदेड दि. 22 :- जिल्ह्यात येत्या 25  मार्च रोजी धुलिवंदन उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी सोमवार 25 मार्च 2024 रोजी दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.   


जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टिने महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी सोमवार 25 मार्च रोजी धुलिवंदन निमित्त जिल्ह्यातील सर्व एफएल-2, एफएल-3, सीएल-3, टी.डी-1, सिएलएफएलटीओडी-3  एफएल/बीआर-2 अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध नियमानुसार कठोर कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

0000

वृत्त क्र. 266

सीईओ करनवाल व आयुक्त डोईफोडे

स्वीप कक्षासाठी नोडल अधिकारी घोषित

नांदेडदि. 22 :- मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी व नांदेड महानगर व नांदेड ग्रामीण मध्ये मोठ्या संख्येने मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी कार्यरत असणारी निवडणूक काळातील स्वीप यंत्रणेचे प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात नवमतदार व महिला मतदारांची संख्या वाढविण्यावर निवडणूक विभागाच्यावतीने भर दिला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नवमतदाराची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यात स्वीप कक्षाची स्थापना करुन विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन मतदारामध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

मतदार व मतदान वाढविण्यासाठी निवडणूक विभागाच्यावतीने जिल्हास्तरावर स्वीप कक्षाची स्थापना केली आहे. या स्वीप कक्षासाठी आता दोन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहेअसे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत निर्गमित केले आहेत.

स्वीप कक्षात ग्रामीण क्षेत्रासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवालनांदेड जिल्हा नागरी क्षेत्रासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्तमहेशकुमार डोईफोडे यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात महानगर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्वीप उपक्रमांतर्गत निवडणुकीतील मतदान वाढविण्यासाठी प्रचार प्रसार करण्यात येत आहे.

0000

वृत्त क्र. 265

स्वामित्वधनाच्या रक्कमा तात्काळ शासन खाती जमा करा : जिल्हाधिकारी

• विभागांनी लेखाशिर्ष 0853 वर जमा रकमा जमा कराव्यात 

नांदेडदि. 22 :- जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांनी मंजूर विकास कामाच्या अंदाजपत्रकानुसार कपात करण्यात आलेल्या स्वामित्वधनाच्या रक्कमा लेखाशिर्ष 0853 वर जमा न करता स्वतंत्र खात्यावर ठेवल्या तर तो शासकीय रक्कमेचा अपहार समजला जाईल. विभागांनी अशा प्रकारच्या रक्कमा आढळून आल्यास तात्काळ लेखाशिर्ष 0853 वर शासन खाती जमा कराव्यात. तसे न केल्यास संबंधित अधिकारीकर्मचारी यांच्यावर शासकीय रक्कमेचा अपहार केल्याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील जि.प. बांधकामसार्वजनिक बांधकाम विभागविविध स्थानिक स्वराज्य संस्थापंचायत समितीग्रामपंचायतनगरपरिषदनगरपंचायतीच्या अंतर्गत विविध विकास कामेप्रकल्पांचे कामेबांधकामे इत्यादीसाठी अवैध व विनापरवानगी गौण खनिजाचे उत्खनन व वाहतुक होवू नये. तसेच या माध्यमातून कामाच्या मंजूर अंदाजपत्रकानुसार 0853 या लेखाशिर्षावर स्वामीत्वधनाची रक्कम कपात होवून लेखाशिर्ष 0853 अंतर्गत महसूल शासनखाती जमा होणे अपेक्षित आहे. परंतु विविध विकास कामेप्रकल्पांची कामेबांधकामे इत्यादींच्या मंजूर अंदाजपत्रकानुसार स्वामीत्वधनाच्या रक्कम कपात करुन 0853 या लेखाशिर्षाअंतर्गत शासन खाती भरणा न करता स्वतंत्र खात्यावर वेगळी काढून ठेवली जातेही बाब अतिशय गंभीर आहे. विभागांनी अशा रक्कमा तात्काळ शासनखाती जमा कराव्यातअसे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्देशित केले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...