Monday, June 18, 2018


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी
जमात प्रमाणपत्र पडताळणीकरिता विशेष मोहीम

पुणे, दि. 18 – सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इ. 10 वी, 12 वी नंतर पदविका/पदवी अभ्यासक्रमाकरिता तसेच इतर अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेताना अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्रची आवश्यकता असते. त्यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे विेशेष मोहीम राबविण्यात येत आहे.  
वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सवलती मिळू शकतात. राज्यात नुकताच इयत्ता 10 वी व 12 वीच्या परिक्षेचा निकाल प्रसिद्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांची विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धावपळ सुरु झालेली आहे. परिणामी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, औरंगाबाद, अमरावती, नंदूरबार व गडचिरोली अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समित्यांकडे मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होत आहेत.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने त्यांना अनुसूचित प्रमाणपत्र त्वरित मिळण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ई-ट्राईब पोर्टलवर https://www.etribevalidity.mahaonline.gov.in येथे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्राधान्याने वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. यासंदर्भात संबंधित समितीच्या पोलीस दक्षता पथकाला देखील गृह व शालेय चौकशीची व कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे हेल्पलाईन क्रमांक 020-26360941 सुरू करण्यात आलेला असून सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत दूरध्वनीवरून वैधता प्रमाणपत्रावर मार्गदर्शन करण्यात येईल.
सर्व आठही अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कक्षामार्फत आवश्यक ती माहिती पुरविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच सदर मोहिमेच्या कामकाजाचा वरिष्ठ व अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घेतला जात असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना त्वरित वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या दृष्टीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. सर्व समित्यांच्या स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरध्वनी सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी पुणे समितीसाठी पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या कार्यक्षेत्राकरिता 28, क्विन्स गार्ड, पुणे (020-26336961), ठाणे समितीत ठाणेसह मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्गसाठी वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालय, वर्तकनगर, ठाणे (पश्चिम), ठाणे (022-25883503), नाशिक समितीमध्ये नाशिक व अहमदनगरकरिता  आदिवासी विकास भवन, जुना आग्रा रोड, नाशिक (0253-2577059), औरंगाबाद समितीतील औरंगाबाद, हिंगोली, परभणी, जालना, नांदेड, बीड, लातूर व उस्मानाबाद या कार्यक्षेत्रासाठी सेंट लॉरेन्स हायस्कूलजवळ, टाऊन सेंटर सिडको, औरंगाबाद (0240-2362901), अमरावती समितीत अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळसाठी शासकीय विश्रामगृहाजवळ, राज्य माहिती आयुक्त यांच्या कार्यालयासमोर, सना हाऊस, जुना बायपास रोड, चपराशीपुरा, अमरावती (0721-2550995), नागपूर समितीसाठी नागपूर, वर्धा, भंडारा व गोंदियाकरिता आदिवासी विकास भवन, गिरी पेठ, नागपूर (0712-2560031), नंदूरबार समितीसाठी नंदुरबार, धुळे, जळगावकरिता  शासकीय दूध डेअरी इमारत, आरटीओजवळ, नंदूरबार (02564-210130) तर गडचिरोली समितीसाठी गडचिरोली व चंद्रपूरकरिता जिल्हा परिषद कॉलनी कॉम्प्लेक्स, गडचिरोली (07132-223179 याठिकाणी संपर्क साधावा.
00000

धर्माबाद तालुक्यातील नागरी सुविधांची कामे
त्वरीत सुरु करण्याचे रामदास कदम यांचे निर्देश

मुंबई, दि. 18 : धर्माबाद शहर व तालुक्यातील नागरी सुविधांची कामे त्वरीत सुरु करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
प्रारंभी श्री. कदम यांनी नियोजन विभाग, जिल्हा परिषद, नाविण्यापूर्ण योजनेचा निधी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या निधीचा आढावा घेऊन नागरी सुविधांच्या प्रस्तावांवर चर्चा केली. उपलब्ध निधीमधून ग्रामीण भागातील 230 किमीची रस्त्यांची कामे करणे, तलावांची दुरुस्ती व स्वच्छता करणे, पथदिवे लावणे, स्मशानभूमी बांधणे, सांस्कृतिक भवन उभारणे, ग्रामीण भागातील विविध आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपकरणांची खरेदी करणे, शाळांची दुरुस्ती करणे, धर्माबाद एस.टी. आगारासाठी जागा देणे, आरोग्य केंद्रात ॲम्बुलन्स खरेदी करणे अशा अनेक सोयी सुविधांच्या प्रस्तावावर निधी खर्च करण्याचे निर्देश श्री. कदम यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला महसूल विभागाचे अधिकारी तसेच परिवहन, विद्युत मंडळ, शिक्षण विभाग, कृषी, रस्ते विभाग, आरोग्य, समाजकल्याण विभाग, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
००००

  वृत्त क्र.  432   नविन   पाच   इंटरसेप्टर वाहनांद्वारे   रस्ता सुरक्षा  विषयी  प्रबोधन   ·       रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मद...