Thursday, February 25, 2021

 

जिल्हा सत्र न्यायालयाच्या

स्पेशल ड्राईव्हमध्ये 394 प्रकरणे निकाली 

नांदेड, दि. 25 (जिमाका) :- जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप नांदेड यांच्या मागर्दशनाखाली उच्च न्यायालय, मुंबई यांच्या पुर्व परवानगीने दिनांक 23 फेब्रुवारी, 2021 रोजी जिल्हा सत्र व सत्र न्यायालय, नांदेड येथे स्पेशल ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. या स्पेशल ड्राईव्हमध्ये एकूण 783 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी एकूण 394 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. 

या स्पेशल ड्राईव्हमध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती आर.पी. घोले, प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालय दुसरे जी. सी. फुलझळके, प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालय तिसरे श्रीमती एन. एल. गायकवाड, प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालय चौथे श्रीमती एम.एन. देशमुख, प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालय पाचवे पी.यु. कुलकर्णी, प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालय सहावे मुदसर नदीम, प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालय सातवे श्रीमती एस. आर. बडवे, प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालय आठवे सहभागी होते. स्पेशल ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी प्रथम प्रमुख जिल्हा न्यायाधीश नांदेड तसेच न्यायीक अधिकारी, न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

00000

 

मुरघास निर्मिती सायलेज बेलर मशिन युनिटसाठी 

10 मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 25:-  जिल्ह्यात राष्ट्रीय पशुधन अभियांतर्गत मुरघास निर्मितीसाठी सायलेज बेलर मशिन युनिट स्थापन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सहकारी उत्पादक संघ, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता बचतगट व गोशाळा, पांजरपोळ, गोरक्षण संस्था यांना या योजनेंतर्गत या मशिनसाठी  अर्थसहाय्य मिळणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील संस्थांनी अर्ज सादर करता येणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 मार्च 2021 पर्यंत असून पात्र संस्थांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे.   

या योजनेसाठी प्रति युनीट 20 लाख रुपये खर्चापैकी 50 टक्के 10 लाख रुपये केंद्र शासनाचे अर्थसहाय्य राहणार आहे. उर्वरीत 50 टक्के 10 लाख रुपये संस्थेचे स्वत: खर्च करावयाचे आहे. हा निधी सर्वसाधारण योजनेतील असल्याने योजनेसाठी जिल्ह्यात एक युनिट स्थापन करावयाचे आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

00000

 

नांदेड जिल्ह्यात 70 व्यक्ती कोरोना बाधित तर

1 हजार 302 अहवालापैकी 1 हजार 225 निगेटिव्ह  

नांदेड (जिमाका) दि. 25 :- गुरुवार 25 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 70 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 48 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 22 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  40 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 1 हजार 302 अहवालापैकी 1 हजार 225अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 23 हजार 409 एवढी झाली असून यातील 22 हजार 131 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 470 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 595 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 11, खाजगी रुग्णालय 8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 12, गोकुंदा कोविड रुग्णालय 4 असे एकूण 40 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.54 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 36, हदगाव तालुक्यात 3, नायगाव तालुक्यात 1, यवतमाळ 3, निजामबाद 1, नांदेड ग्रामीण 1, लोहा तालुक्यात 1, लातूर 1, वाशिम 1, असे एकुण 48  बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 14, किनवट तालुक्यात 3, देगलूर तालुक्यात 2, अर्धापूर तालुक्यात 3 असे एकूण 22 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 470 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 47, किनवट कोविड रुग्णालयात 19, हदगाव कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 6, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 268, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 64, खाजगी रुग्णालय 41 आहेत.   

गुरुवार 25 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 161, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 57 एवढी आहे.   

·         जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 26 हजार 802

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 98 हजार 927

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 23 हजार 409

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 131

एकुण मृत्यू संख्या-595                            

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 94.54 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-470

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14.                       

00000

अतिविलंब शुल्काने 12 वी परीक्षेचे अर्ज स्विकारण्याच्या तारखा जाहीर 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी फेब्रुवारी, मार्च 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षेस नियमीत, पुर्नपरिक्षार्थी, तुरळक विषय श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतिविलंब, विशेष अतिविलंब, अतिविशेष अतिविलंब शुल्काने परीक्षेचे अर्ज स्विकारण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

 

इयत्ता 12 वी परीक्षेसाठी अतिविलंब शुल्क अंतिम मुदत 50 रुपये प्रतिदिनी, प्रतिविद्यार्थी प्रमाणे सोमवार 22 फेब्रुवारी ते सोमवार 8 मार्च 2021 पर्यंत. विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत 100 रुपये प्रतिदिनी, प्रतिविद्यार्थी प्रमाणे मंगळवार 9 मार्च ते 23 मार्च 2021 पर्यंत. तर अति विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत 200 रुपये प्रतिदिनी, प्रतिविद्यार्थी प्रमाणे बुधवार 24 मार्च ते रविवार 4 एप्रिल 2021 पर्यंत राहील, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

0000

 जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रीयेबाबत

जनजागृतीसाठी शुक्रवारी वेबिनारचे आयोजन 

नांदेड, (जिमाका) दि. 25 :- जातप्रमाणपत्र पडताळणी प्रक्रीयेची संपूर्ण माहिती देण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी शुक्रवार 26 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 4 वाजता झूम ॲपवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या वेबिनारचा  सर्व अर्जदार, पालक, विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिकांनी  लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव आ.ब. कुंभारगावे यांनी केले आहे.   

अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग या प्रवर्गातील अर्जदारांना शैक्षणिक, सेवा, निवडणूक व इतर कारणासाठी जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करावे लागते. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रीयेबाबत जनजागृती करणेसाठी व गरजु अर्जदारांना विहित वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज कसा करावा, त्यासोबत कोणते पुरावे सादर करावेत. यासाठी वेबिनार आयोजित केला आहे. हा बेबिनार सर्वांसाठी खुला असून जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अनुषंगाने नागरीकांच्या अडी अडचणी व शंकाचे निराकरण करणेसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. या वेबिनारचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम झूम ॲप डाऊनलोड करावे. जॉईंन मिंटींग हा पर्याय निवडावा. त्यानंतर मिटींग आयडी 3341568480 हा समाविष्ट करण्यात यावा व पासवर्ड 1234 हा समाविष्ट करावा, असेही संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

000000

 

मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजनेंतर्गत फिरत्या पशुचिकित्सा वाहनाचे

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण  

नांदेड, (जिमाका) दि. 25 :- राज्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील पशुधनाचे विविध साथीच्या आजारातून संरक्षण मिळावे आणि पशुपालकांना त्यांच्या पशुसाठी त्या-त्या गावातच वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी तीन फिरते पशु चिकित्सा वाहन मिळाले असून यांचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येत आहे. 

कोविडची परिस्थिती लक्षात घेता शासनाच्या विविध निकषाचे पालन करुन जिल्हा परिषदेच्या प्रागंणात  आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमरनाथ राजुरकर, आमदार रावसाहेब अंतापुरकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्‍याणकर, आमदार राजेश पवार, आमदार राम पाटील रातोळीकर ,आमदार भिमराव केराम, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार तुषार राठोड, जिल्हाधिकारी विपीन ईटनकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्‍हा परिषद उपाध्‍यक्षा तथा आरोग्‍य सभापती पदमा सतपलवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती बालासाहेब कदम रावणगावकर, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाजकल्‍याण सभापती रामराव नाईक, महिला व बालकल्‍याण सभापती सुशिलाबाई पाटील बेटमोगरेकर, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शदर कुलकर्णी इतर पदाधिकारी व पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.

 

सदर फिरते पशु चिकित्सा वाहन सद्यस्थितीत भोकर, हदगाव व देगलूर या तीन तालुक्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या वाहनात आजारी पशुवर उपचाराची सुविधा देण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक उपकरणे, रोग प्रतिबंधक लसीकरण, उच्च उत्पादन क्षमता असणाऱ्या वळूच्या रेतमात्रा वापरुन कृत्रिम रेतम, पशु आहार व आरोग्याबाबत पशु वैद्यकीय तज्ञामार्फत मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध असणार आहे. याचबरोबर आवश्यक त्या लहान व मोठया शस्त्रक्रिया पशुच्या आजारानुरुप त्या त्या गावातच करता याव्यात यासाठी या वाहनात सुविधा असेल असे जिल्हा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.           

आनंद डेअरीच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्यातही मोठया प्रमाणात दुग्धोव्यवसायाची संधी

- मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर  

नांदेड जिल्ह्यात असलेली भौगोलिक परिस्थिती गोदावरी, आसना, लेंडी, पैनगंगा सारख्या नद्याचे विस्तीर्ण जाळे, या नदयाचे पानलोट क्षेत्र लक्षात घेता जिल्ह्यात मोठया प्रमाणात दुग्ध व्यवसायाची संधी दडली आहे. आनंद डेअरीच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्यातही मोठया प्रमाणात दुग्धव्यवसाची संधी उपलब्ध आहे. येथील शेतीच्या विविध पिकातून निर्माण होणारे पशुखाद्य आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेत भविष्यात याला चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत आम्ही व्यापक मोहिम हाती घेत असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी स्पष्ट केले. 

आजच्या घडीला जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 8 लाख 79 हजार 529 गायी, गुरे, 29 हजार 279 शेळी व मेंढया एवढीच पशु जनगणनेत नोंद आहे. जिल्हा कृषी क्षेत्रात आणि पुरेशा पाण्याच्या दृष्टीने समर्थ असूनही आपण जिल्ह्यातील एकूण दुधाच्या मागणीपैकी दहा टक्केही दुधाचे उत्पादन जिल्ह्यात होत नाही. याचाच अर्थ शेतीपूरक उद्योगामध्ये दुग्धव्यवसायाला 90 टक्क्याची संधी उपलब्ध असल्याचे ठाकूर यांनी निर्दशनास आणून दिले. ग्रामीण भागातील बेरोजगार युवा शक्तीना दुग्धव्यवसायाकडे वळविण्यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागातर्फे व्यापक जनजागृती करुन विविध सेवाभावी संस्थाचा यात सहभाग घेवू असे त्यांनी स्पष्ट केले.

0000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...