Thursday, September 1, 2016

महा-अवयदान अभियानात उत्स्फुर्त सहभागींचा
गौरव , स्पर्धांचे पारितोषिक वितरण संपन्न

नांदेड, दि. 1 :- महा-अवयदान अभियानात उत्स्फुर्त सहभाग नोंदविणाऱ्यांचा गौरव तसेच अभियानातील विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावणाऱ्यांना पारितोषिकांचे वितरण अशा संयुक्त कार्यक्रमाने आज महा-अवयवदान अभियानाच्या तीन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे कार्यक्रम संपन्न झाला.
मोठ्या संख्येने अवयवदानाच्या कार्यामध्ये सहभाग घेतला अशा संस्थामध्ये उपजिल्हा रुग्णालय देगलूर, ग्रामीण रुग्णालय भोकर, ग्रामीण रुग्णालय मुदखेड, ग्रामीण रुग्णालय माहूर यांना गौरविण्यात आले.     ग्रामीण भागामध्ये उपजिल्हा रुग्णालय देगलूर यांनी जास्त प्रमाणात नोंदणी केलेली आहे. तसेच ग्रामीण रुग्णालय भोकर रूग्णालयामार्फत अवयवदान जनजागृती अभियानांतर्गत मोठ्याप्रमाणात विविध स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रमास अभियानाच्या जिल्हा समन्वय अधिकारी तथा डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॅा. काननबाला येळीकर, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्यचिकीत्सक डॅा.विजय कंदेवाड, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॅा. भास्कर श्यामकुंवर, आयएमए नांदेडचे अध्यक्ष डॅा. संजय कदम, डॅा. करुणा पाटील, डॅा.उत्तम इंगळे आदींची उपस्थिती होती.
 नांदेड शहरामध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड  , शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड व NCD सेल जिल्हा रुग्णालय, नांदेड या ठिकाणी अवयवदानांच्या नोंदणीसाठी कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नांदेड शहरातील विविध शाळा व महाविद्यालयामध्ये अवयवदानाबाबत जनजागृतीवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
             याशिवाय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, यशवंत महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड, पीपल्स महाविद्यालय, नर्सिंग स्कूल, शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर, बिंदू महाविद्यालय भोकर, शुभकरोती फाऊंडेशन नांदेड तसेच श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रूग्णालय नांदेड येथील विद्यार्थी तसेच अवयवदान महाअभियांतर्गत उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
 जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कंदेवाड यांनी प्रास्ताविक केले. डॉ. यु. एम. इंगळे निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. डी. एन. हजारी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एच.आर.गुंटूरकर नांदेड, डॉ. निळकंठ भोसीकर, डॉ.अविनाश वाघमारे, डॉ. एच.के. साखरे, डॉ. नईम अन्सारी व NCD सेल मधील कर्मचारी यांनी संयोजन केले. 

000000
शबरी महामंडळाचे कर्ज परतफेड
न करणाऱ्या लाभार्थ्यास तुरुंगवास  
          नांदेड, दि. 1 :-  शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत राज्यातील आदिवासी सुशिक्षीत बेरोजगारांना स्वयंम रोजगार करण्याचे मुळ उद्देशाने अल्प 6 टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा केला जातो. कर्जाची नियमीत परतफेड करण्याची जबाबदारी असतानाही काही लाभार्थी हेतू पुरस्कर कर्जाची परतफेड करत नसल्याने त्यांचे विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात येते. अशाच कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थीस पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील न्यायालयाने एका प्रकरणात एक महिना कठोर कारावास व 60 हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
            याबाबत जव्हार कार्यालयांतर्गत रायगड जिल्ह्यातील निबोडे ता. खालापूर येथील लाभार्थी मिलींद नाईक यांना महामंडळामार्फत स्वयंरोजगार करण्यासाठी एप्रिल 2008 मध्ये प्रवासी वाहनासाठी 5 लाख 69 हजार 673 चे कर्ज दिले होते. त्यांनी नियमीत कर्जाची परतफेड करणे आवश्यक असतानाही वेळेत कर्ज भरणा केली नाही. त्यामुळे त्यांचेकडे मोठ्या प्रमाणावर येणे रक्कम थकीत असल्याने त्यांनी कर्ज भरणा करण्यापोटी 50 हजार रुपयाचा चेक दि. 3 जुलै 2013 रोजी दिला होता. मात्र सदरचा चेक न वटल्याने जव्हार कोर्टात केस क्र. 496 / 13 दाखल करण्यात आली असता  जव्हार  न्यायालयाने सर्व साक्षी पुराव्याच्या आधारे  निगोशीएबल ॲक्ट 1881 अंतर्गत कलम 138 अन्वये 19 जुलै 2016 रोजी 60 हजार रुपयाचा दंड व एक महिना कठोर कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
            या लाभार्थीस दुसरी केस क्र. 589/2012 रुपये 25 हजारचा  चेक न वटल्याने जव्हार कोर्टाने दि. 19 जुलै 2016 रोजी 30 हजार रुपयाचा दंड व एक महिला कठोर तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. या केसचे कामकाज कार्यालयामार्फत ॲड प्रसन्न वसंत भोईर यांनी पाहिले आहे.
            दरम्यान, शबरी महामंडळामार्फत कोणत्याही प्रकारचे अनुदान दिले जात नाही किंवा कर्ज माफही केले जात नाही. तसेच कोणीही एजंट किंवा दलाल नेमलेले नसल्याने कोणत्याही भुलथापांना बळी न पडता नियमीत व वेळीच कर्जाची परतफेड करुन प्रशासनास सहकार्य करावे. कोणीही आपणास खोटी माहिती देऊन फसवीत असल्यास किंवा लाच मागत असल्यास जवळच्या लाचलुचपत प्रतिबंध कार्यालय व पोलीस स्टेशनशी संपर्क करावा, असे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

000000
दारु दुकाने 5 सप्टेंबरला बंद 
नांदेड दि. 1 :- नांदेड जिल्ह्यात सोमवार 5 सप्टेंबर 2016 रोजी गणेश स्थापनेचा उत्सव मोठया प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे या उत्सवा दरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुसूचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी सोमवार 5 सप्टेंबर 2016 गणेश स्थापनेच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-2 एफएल-3 (परवाना कक्ष) एफएल-4, एफएल / बिआर-2 व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्याअंतर्गत व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे.   

00000000
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 1  :- जिल्ह्यात गुरुवार 15 सप्टेंबर 2016  रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी काळातील सण, उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनांची शक्यता यांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात गुरुवार 1 सप्टेंबर 2016 ते 15 सप्टेंबर 2016 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

00000
लिपीक टंकलेखक परिक्षा केंद्र परिसरात
रविवारी प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड दि. 1 :- सह. जिल्हा निबंधक वर्ग 1 नांदेड यांचे आस्थापनेवरील लिपीक टंकलेखक पद भरती परीक्षा रविवार 4 सप्टेंबर 2016 रोजी नांदेड शहरातील 9 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळवले आहे.
नांदेड शहरातील विविध 9 विद्यालय, महाविद्यालयातील केंद्रावर दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही परीक्षा होणार असून परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 200 मीटर परिसरातील फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 200 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.

00000000
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे
यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम
          नांदेड, दि. 1 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            शुक्रवार 2 सप्टेंबर 2016 रोजी ठाणे येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.25 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व मोटारीने  शासकीय  विश्रामगृहाकडे  प्रयाण. 8.35 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.  10 वा. शासकीय विश्रागृह येथे शासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत चर्चा. सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे प्रयाण. 10.40 वा. जिल्हा मध्यवर्ती बँक येथे आगमन व आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.  11.20 वा. जिल्हा मध्यवर्ती बँक नांदेड येथून मोटारीने नायगावकडे प्रयाण. दुपारी 12.20 वा. नायगाव येथे आगमन व जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांची पाहणी व जलपूजन कार्यक्रमास उपस्थिती.  1 वा. नायगाव येथून मोटारीने मुखेडकडे प्रयाण. 2 वा. शासकीय विश्रामगृह मुखेड येथे आगमन व राखीव. 2.30 वा. शासकीय विश्रामगृह  मुखेड येथून  मोटारीने  शिकारातांडा / कमळेवाडी ता. मुखेडकडे प्रयाण. 2.35 वा. शिकारातांडा / कमळेवाडी ता. मुखेड येथे आगमन व ग्रामस्थांशी चर्चा. 3 वा. शिकारातांडा / कमळेवाडी येथून मोटारीने बोमनाळी ता. मुखेडकडे प्रयाण. दु. 3.30 वा. बोमनाळी ता. मुखेड येथे आगमन व पाझर तलाव कामांची पाहणी. सायंकाळी 4 वा. बोमनाळी येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. सायं. 6 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायंकाळी 7 वा. नांदेड येथील गुरुद्वारास भेट. रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम.
            शनिवार 3 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 9 वा. शासकीय  विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने मरडगा ता. हदगाव कडे प्रयाण. 10 वा. मरडगा येथे आगमन व डासमुक्ती गावाची पहाणी. 11 वा. मरडगा येथून मोटारीने अर्धापूरकडे प्रयाण. दुपारी 12 वा. अर्धापूर येथे आगमन व गोदावरी अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक अर्धापूर शाखेचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दु. 1 वा. अर्धापूर येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दु. 2 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे प्रयाण. दु. 2.15 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथील आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 4 वा. नियोजन भवन येथे पत्रकार परिषद. सायं. 5 वा. नियोजन भवन येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने रेल्वेस्थानक नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.50 वा. रेल्वे स्थानक नांदेड येथे आगमन व देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000000
जिल्ह्यात हंगामात 71.04 टक्के पाऊस 
          नांदेड, दि. 1 :- जिल्ह्यात  गुरुवार 1 सप्टेंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 200.03 मिलीमीटर  पाऊस झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 12.50 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 678.84 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्याक्रमाने) भोकर- 87.62, लोहा- 85.36, हदगाव- 82.97, नांदेड- 79.08, अर्धापुर- 78.62, माहूर- 77.18, हिमायतनगर- 76.37, बिलोली- 72.55, कंधार- 69.16, नायगाव- 66.64, धर्माबाद- 65.10, मुखेड- 64.58, मुदखेड- 63.81, किनवट- 62.84, देगलूर- 54.52, उमरी- 50.61. जिल्ह्याची यंदाच्या  हंगामातील  पावसाची  टक्केवारी  71.04 इतकी झाली आहे.   
जिल्ह्यात गुरुवार 1 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय  पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड- 20.00 (721.11), मुदखेड- 4.00 (544.68), अर्धापूर- 7.00 (683.66) , भोकर- 8.50 (873.00), उमरी- 1.67 (504.26), कंधार- 8.67 (557.81), लोहा- 9.83 (711.34), किनवट- 17.14 (779.17), माहूर- 34.25 (957.00), हदगाव- 4.71 (810.85), हिमायतनगर- 2.00 (746.32), देगलूर- 28.17 (490.85), बिलोली- 16.80 (702.40), धर्माबाद- 4.00 (596.03), नायगाव- 9.00 (610.20), मुखेड- 24.29 (572.70) आज  अखेर  पावसाची सरासरी 678.84  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 10861.38) मिलीमीटर आहे.  

000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...