वृत्त क्र. 339
1950 नंबरवर आचारसंहिताभंगच्या तक्रारी करा
नांदेड दि. 14 : भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक नागरिकाला आचारसंहिता भंग संदर्भात तक्रारी करता याव्यात यासाठी सहज सोपा संपर्क नंबर म्हणून 1950 हा डायल क्रमांक उपलब्ध केला आहे. या डायल क्रमांकावरून निवडणुकीच्या संदर्भात कुठलाही गैरप्रकार होत असल्यास तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
निवडणुकीच्या संदर्भात 1950 हा क्रमांक आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्यास वापरण्याचा नंबर आहे. अनेकजण यावर आपले मतदान कुठे यासाठी फोन करतात. मात्र याकरीता निवडणूक आयोगाने वेगळे नंबर दिले असून 1950 वर नागरिकांनी निवडणुकीतील गैरप्रकारासंदर्भात आयोगाला माहिती देण्याचे सहकार्य करावे. याठिकाणी आचारसंहिता भंगच्या तक्रारी दाखल कराव्यात.
असे चालते 1950 चे काम
1950 या क्रमांकावर निवडणूक संदर्भात आदर्श आचारसंहिता भंग, पैशांचा वापर, दारूचा वापर, अफवा कोणी पसरवत असेल तर त्याची माहिती देता येते. आपल्या हातातील मोबाईलवरूनही आपल्याला संपर्क साधता येते. 24 तास ही सेवा उपलब्ध आहे. आपल्या मतदानाच्या माहिती संदर्भात नव्हे तर निवडणुकीच्या संदर्भात काही तक्रारी असेल तर याचा वापर करण्यात यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
000000