Friday, September 30, 2022

तर वेळप्रसंगी लम्पी लसीकरणासाठी

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनाही सोबत घेऊ

- जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 

· रुजू होत जिल्हाधिकाऱ्यांनी सेवा पंधरवडा, लम्पी लसीकरण, पीएम किसान योजनेबाबत घेतला आढावा  

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज रुजू होताच लम्पी आजाराबाबत सविस्तर आढावा घेऊन यात अधिकाधिक जागरुकता आणि लोकसहभागातून व्यवस्थापन अधिक परिणामकारक कसे करता येईल यावर भर दिला. जिल्ह्यात उपलब्ध असलेली पशुधनाची संख्या, पशुवैद्यकिय विभागाकडे असलेले मनुष्यबळ याची सांगड नियोजनातूनच परिपूर्ण होऊ शकते. आजच्या घडीला लम्पी नियंत्रणात आहे ही चांगली गोष्ट आहे. तथापि इतर राज्यांच्या अनुभव लक्षात घेता यासाठी सर्व पातळीवर तयार असणे अत्यंत आवश्यक आहे. वेळप्रसंगी लसीकरणासाठी ग्रामपंचायतींचाही सहभाग घेऊन त्यांच्या नियोजनाप्रमाणे ही जबाबदारी देऊ याची सुतोवाचही त्यांनी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियाळे, अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

 

मध्यप्रदेश, राज्यस्थान या राज्यांच्या अनुभव लक्षात घेता चराईबंदी करणे अत्यावश्यक आहे. मध्यप्रदेश, गुजरातच्या सीमेवर नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात सामुहिक चराई मुळे जनावरातील लम्पीचे प्रमाण वाढले. हे लक्षात घेता चराईबंदीचे काटेकोर पालन व लसीकरणावर भर देण्याचे निर्देश त्यांनी पशुसंवर्धन विभागाला दिले.

 

प्रारंभी प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील प्रशासकिय कामांचा आढावा त्यांना सादर केला.

00000 

 बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज

करण्याचे वेळापत्रक जाहीर

 

नांदेड, (जिमाका) दि. 30 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्याच्या तारखा व तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 

नियमित शुल्कासह उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्रकला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डाटाबेसवरुन ऑनलाईन पध्दतीने शनिवार 1 ऑक्टोंबर 2022 ते शुक्रवार 21 ऑक्टोंबर 2022 हा कालावधी आहे. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी (Hsc Vocational Stream) पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीने ऑनलाईन भरावयाच्या तारखा शनिवार 22 ऑक्टोंबर 2022 ते 5 नोव्हेंबर 2022 पर्यंत आहेत. उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क आरटीजीएसद्वारे भरणा करणे व आरटीजीएस / एनईएफटी पावती / चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे याची सर्व शाळा प्रमुख / प्राचार्यांनी नोंद घ्यावी.

 

सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमीट केल्यानंतर अर्ज भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगीनमधून प्रिलिस्ट उपलब्ध करुन दिलेली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टर नुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्ट वर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी.

 

इयत्ता 12 वी परीक्षेची अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यानी अर्ज त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. शासन निर्णय 14 ऑगस्ट 2017 नुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यासाठी सरल डाटाबेस विद्यार्थ्यांची नोंद आवश्यक आहे. सदर सरल डाटावरुनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाची आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या नियमित विद्यार्थ्यांची माहिती सरल डाटा मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने ऑनलाईनच भरावयाची आहेत. त्याच्या तारखा वरीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत. नियमित शुल्काने अर्ज भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणारी नाही, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

000000

उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित अभिजित राऊत नांदेड जिल्हाधिकारी पदावर रुजू

नांदेड (जिमाका) दि. 30 :- सन 2013 च्या भारतीय प्रशासकिय तुकडीतील अभिजित राऊत यांनी आज नांदेड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. सन 2014-15 मध्ये त्यांनी सांगली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या प्रशासकिय कारकिर्दीस प्रारंभ केला. सन 2015 ते 2017 या कालावधीत त्यांनी तळोदा येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक म्हणून वैशिष्ट्यपूर्ण कार्य केले आहे. सन 2017 ते 2020 या कालावधीत ते सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. जून 2020 पासून त्यांनी आजवर जळगाव जिल्हाधिकारी म्हणून आपल्या अभ्यासपूर्ण कारकिर्दीचा ठसा उमटविला.

स्वच्छता क्षेत्रात सांगली जिल्हा राष्ट्रीय पातळीवर पहिला आल्याबद्दल सन 2017 मध्ये भारत सरकारचा स्वच्छता दर्पण पुरस्काराने ते सन्मानित आहेत. सन 2017-18 मध्ये सांगली जिल्हा परिषदेत त्यांनी महत्वपूर्ण योगदान देऊन जिल्हा परिषदेला पंचायतराज क्षेत्रात सर्व प्रथम आणले. महाराष्ट्र शासनाचा यशवंत पंचायतराज पुरस्कारानेही ते सन्मानित आहेत. सन 2020-2021 व 2021-2022 अशी सलग दोन वर्षे अभिजित राऊत यांना माझी वसुंधरा अभियानातील सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सन 2021-22 मध्ये राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार, भारत सरकारचा बेस्ट मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कारानेही ते सन्मानित आहेत. ग्रामीण विकास हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.

आजवर त्यांनी मसुरी येथील एलबीएसएनएए कार्यशाळा, स्वच्छ भारत मिशन नवी दिल्ली येथील राष्ट्रीय परिषद, उदयपूर येथे ओडीएफ सस्टॅनॅबिलिटी, आपत्ती व्यवस्थापन आदी विषयांवरील राष्ट्रीय कार्यशाळा-परिषदांमध्ये त्यांनी सहभाग व मुख्य वक्ता म्हणून मार्गदर्शन केलेले आहे.
00000







 नांदेड जिल्ह्यात 183 गायवर्ग पशुधन लम्पी बाधित    

3 लाख 35 हजार 223 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- नांदेड जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या (गाय वर्ग) 183 एवढी झाली असून जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर अधिक भर दिला आहे. शुक्रवार  दिनांक 30 सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्हाभर लसीकरणावर नियोजनबद्ध भर देऊन आज रोजी 17 हजार 405 एवढ्या पशुधनाचे लसीकरण करण्यात आले. आजवर जिल्ह्यात एकुण 3 लाख 35 हजार 223 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. 

 

लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छता, पशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

 

आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील 45 गावे लम्पी बाधित आहेत. या 45 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 22 हजार 715 एवढे आहे. यातील 183 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 283 एवढी आहे. एकुण गावे 328 झाली आहेत. या बाधित 45 गावाच्या 5 किमी परिघातील 328 गावातील (बाधित 45 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 92 हजार 400 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 16 एवढी झाली आहे. उपलब्ध लस मात्रा 4 लाख 8 हजार 250 एवढी असून पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

000000

 माहिती  अधिकार कायदा अंमलबजावणीत होणार प्रभाव  

या विषयावर कार्यशाळा संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा देशभरात 2005 पासून लागू करण्‍यात आला. शासनाने वेळोवेळी जाणीवपुर्वक उचलेल्‍या पावलांमुळे अल्‍पावधीतच राज्‍यात हा कायदा लक्षणीय स्‍वरूपात लोकाभिमुख झाला.  माहिती अधिकार दिनानिमित्त माहिती अधिकार अधिनियम 2005 व  आरटीआय ऑनलाईन   माहिती व तंत्रज्ञानाचा-माहिती अधिकार कायदा अमंलबजावणीत होणारा प्रभाव ” या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. 28 सप्टेंबर हा दिवस अंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो.

 

या प्रशिक्षणास उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी प्रफुल्ल कर्णेवार, सहाय्यक जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी प्रदीप डुमणे, यशदाचे सेवानिवृत्‍त अॅड. भिमराव हाटकर आणि जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील प्रथम अपिलीय अधिकारी व जनमाहिती अधिकारी, सहाय्यक जन माहिती अधिकारी हे सहभागी झाले होते.  

 

माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायदयाच्‍या व्‍यापक प्रसिद्धीकरिता व प्रभावी अमंलबजावणीकरिता आरटीआय  प्रणालीचा वापर प्रशासनात कसा करावा  याविषयीची  माहिती उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना देण्‍यात आली आहे.  आरटीआय प्रणाली  जिल्‍हाधिकारी कार्यालय, महानगरपालीका, पोलीस अधिक्षक कार्यालय,   जिल्‍हा परिषद, या कार्यालयात कार्यान्‍वीत करण्‍यात आली आहे. ही सुविधा https://rtionline.maharashtra.gov.in संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. त्‍यानुसार नागरिकांनी  ऑनलाईन प्रणालीव्‍दारे  अर्ज व अपिल दाखल करू शकतात. तसेच   www.nanded.gov.in या वेबसाईटवर माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4 अन्‍वये प्रत्‍येक कार्यालयनिहाय, सर्व कार्यासन प्रमुख,  , सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसिलदार यांनी   1 ते 17 मुदयांची माहिती ही संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द केली आहे. त्‍यानुसार नागरिकास सदर माहिती सहज उपलब्‍ध होउ शकते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केले.

00000

 धान खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी 

 नांदेड (जिमाका) दि. 30 : आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये धान खरेदी करण्यासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी दिनांक 24 सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोबर पर्यत ऑनलाईन नोंदणी करावी.

 

बिलोली येथील खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. धान उत्पादक शेतऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सातबारा, पिकपेरा, राष्ट्रीयकृत बँक पासबुक, आधार कार्ड व इतर कागदपत्रे सोबत घेवून बिलोली कासराळी येथील खरेदी केंद्रावर यावे,असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे. 

00000

 नवरात्रोत्सवात ध्वनिक्षेपक, ध्वनीवर्धक वापराबाबत अधिसूचना निर्गमित   

 नांदेड (जिमाका) दि. 30 :- नवरात्रोत्सवासाठी दिनांक 1 ऑक्टोबर 2022 रोजी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापर ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत करण्यात येईल अशी अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केली आहे.

 

या अधिसूचनामध्ये म्हटले आहे की, मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र.173/2010 दिनांक 16 ऑगस्ट 2016 रोजी दिलेल्या आदेश / निकालपत्रामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल या अटीवर ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोते गृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी नवरात्रोत्सवासाठी दिनांक 1 ऑक्टोबर 2022 रोजी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीचा वापर ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल. ध्वनीवर्धक व ध्वनिक्षेपक वापराबाबतची सूट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सबंधित महानगरपालिका आयुक्त स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारण यांची राहील.

00000

समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...