Friday, September 30, 2022

उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित अभिजित राऊत नांदेड जिल्हाधिकारी पदावर रुजू

नांदेड (जिमाका) दि. 30 :- सन 2013 च्या भारतीय प्रशासकिय तुकडीतील अभिजित राऊत यांनी आज नांदेड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. सन 2014-15 मध्ये त्यांनी सांगली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या प्रशासकिय कारकिर्दीस प्रारंभ केला. सन 2015 ते 2017 या कालावधीत त्यांनी तळोदा येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक म्हणून वैशिष्ट्यपूर्ण कार्य केले आहे. सन 2017 ते 2020 या कालावधीत ते सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. जून 2020 पासून त्यांनी आजवर जळगाव जिल्हाधिकारी म्हणून आपल्या अभ्यासपूर्ण कारकिर्दीचा ठसा उमटविला.

स्वच्छता क्षेत्रात सांगली जिल्हा राष्ट्रीय पातळीवर पहिला आल्याबद्दल सन 2017 मध्ये भारत सरकारचा स्वच्छता दर्पण पुरस्काराने ते सन्मानित आहेत. सन 2017-18 मध्ये सांगली जिल्हा परिषदेत त्यांनी महत्वपूर्ण योगदान देऊन जिल्हा परिषदेला पंचायतराज क्षेत्रात सर्व प्रथम आणले. महाराष्ट्र शासनाचा यशवंत पंचायतराज पुरस्कारानेही ते सन्मानित आहेत. सन 2020-2021 व 2021-2022 अशी सलग दोन वर्षे अभिजित राऊत यांना माझी वसुंधरा अभियानातील सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सन 2021-22 मध्ये राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार, भारत सरकारचा बेस्ट मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कारानेही ते सन्मानित आहेत. ग्रामीण विकास हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.

आजवर त्यांनी मसुरी येथील एलबीएसएनएए कार्यशाळा, स्वच्छ भारत मिशन नवी दिल्ली येथील राष्ट्रीय परिषद, उदयपूर येथे ओडीएफ सस्टॅनॅबिलिटी, आपत्ती व्यवस्थापन आदी विषयांवरील राष्ट्रीय कार्यशाळा-परिषदांमध्ये त्यांनी सहभाग व मुख्य वक्ता म्हणून मार्गदर्शन केलेले आहे.
00000







No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...