Sunday, February 26, 2017

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे
श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर स्वागत
नांदेड, दि. 26 :- महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे आज नांदेड दौऱ्यासाठी श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळ येथे आगमन झाले. विमानतळावर त्यांचे राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि वस्त्रद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी पुष्पगूच्छ देऊन स्वागत केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्वागत केले.
राज्यपाल महोदयांचे विमानतळ विश्रामगृह येथे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार हेमंत पाटील यांनीही स्वागत केले. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनीही स्वागत केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने माध्यम संकुलाचे संचालक डॅा. दिपक शिंदे यांनी स्वागत केले. 
विमानतळ येथून राज्यपाल महोदय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या 19 व्या दिक्षांत प्रदान समारंभाकडे रवाना झाले.

0000000
कृषीप्रधान वर्गाच्या क्षमतांचा विकास साधणाऱ्या शिक्षणाची गरज - पवार
कुलपती विद्यासागर राव यांच्या हस्ते शरद पवार यांना डि. लिट. प्रदान
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 19 वा दिक्षांत समांरभ संपन्न
नांदेड, दि. 26 :- कृषी प्रधान वर्गाच्या क्षमतांचा विकास साधणाऱ्या शिक्षणाची गरज आहे, ज्यामुळे नवीन संसाधन-संपत्ती निर्मितीचे मार्ग उपलब्ध होतील , असे मत ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा खासदार शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या 19 व्या दिक्षांत प्रदान समारंभात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव होते. विद्यापीठाच्यावतीने श्री. पवार यांना राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांच्या हस्ते मानद डि. लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले.
विद्यापीठाच्या  प्रांगणात दिक्षांत प्रदानाचा शानदार समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर कुलगुरू डॅा. पंडित विद्यासागर, राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि वस्त्रद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, प्र-कुलगुरू डॅा. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव बी. बी. पाटील, विद्यापीठाचे मुख्य परीक्षा नियंत्रक डॅा. रवि सरोदे यांच्यासह व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद, अधिसभा तसेच विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता यांची उपस्थिती होती.
समारंभास नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी, खासदार डॅा. सुनिल गायकवाड, आमदार सर्वश्री अमर राजूरकर, विक्रम काळे, वसंतराव चव्हाण, प्रताप पाटील-चिखलीकर, नागेश पाटील-आष्टीकर, हेमंत पाटील,  प्रदीप नाईक, नांदेड परीक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक चिरंजीव प्रसाद, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, माजी कुलगुरू डॅा. जनार्दन वाघमारे, माजी मंत्री कमलकिशोर कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दिक्षांत भाषणात बोलताना श्री. पवार यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उभारणीतील महत्त्वपुर्ण टप्प्यांचा आवर्जून आढावा घेतला. स्वामी रामानंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामातील योगदान आणि त्यांचा शिक्षणविषयक दृष्टीकोन गौरवाने नमुद केला. मराठवाड्याविषयीची आस्था स्पष्ट करून ते म्हणाले की , शेतीवरचं अवलंबित्त्व कमी करण्याचा माझा आग्रह आहे. ज्या ठिकाणी शेतीवरचा वर्ग अन्य क्षेत्रात गेला, तेथे परिस्थिती बदलली. त्यामुळे इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका, कॅनडा सारखे देश प्रगत दिसताहेत. याऊलट शेतीवर अधिक लोकसंख्या अवलंबून राहिल्याने इंडोनेशिया, श्रीलंका, बांग्लादेश यांच्यासह भारतात बेरोजगार, दारिद्रय पहायला मिळते. शेतीचे तुकडे, निसर्गांवरील अवलंबित्त्व आणि वाढती लोकसंख्या यामुळे शेतीवर अधिक बोजा आहे. तो कमी करण्यासाठी कृषी प्रधान वर्गाला शिक्षण देण्याची गरज आहे. त्या शिक्षित वर्गातून नवीन संसाधन आणि संपत्ती निर्मितीचे मार्ग उपलब्ध करून देण्याची आज गरज आहे. ग्रामीण भागात ज्या शेतकऱ्याच्या घरात शिक्षण वाढले, त्या कुटुंबात सुबत्ता आल्याचा अनुभव आहे. मराठवाडा हा प्रदेश कृषीवरती अवलंबून असणाऱ्या कुटुंबाचा प्रदेश आहे. त्यामुळे इथल्या तरुणांनी शिक्षणाविषयी आग्रही राहायला हवे. शिक्षणच त्यांना तारू शकते. आपल्या देशातील तरुणांची लोकसंख्या ही आपली ताकद आहे. हे ओळखून, त्याला शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. शिक्षणाच्या माध्यमातून होणारी प्रगती स्थायी आणि प्रगल्भ असते हे लक्षात घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.  
यावेळी श्री. पवार यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वाटचालीचा आणि विद्यापीठातील विविध नाविन्यपुर्ण उपक्रमांचाही कौतुकाने उल्लेख केला. तसेच पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून विद्यापीठाकडे पन्नास लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले. या निधीतून महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, सहकार महर्षी शामराव कदम, तसेच पवार यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांच्या नावाने पुढील शैक्षणीक वर्षापासून किमान दहा जणांना शिष्यवृत्ती देण्यात यावी. यात किमान आठ विद्यार्थी ग्रामीण भागातील आणि त्यापैकी दोन विद्यार्थींनी असाव्यात, असेही नमूद केले.
तत्पुर्वी राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांनी कुलपती म्हणून विविध विद्याशाखांतील स्नातकांना पदवी प्रदान केल्याची घोषणा केली. तसेच दिक्षांत समारंभाच्या प्रथेप्रमाणे संदेशही दिला, त्यामध्ये ते म्हणाले की, राष्ट्राच्या उन्नतीसाठी देता येईल, ते योगदान देण्यासाठी सज्ज रहावे. सत्यनिष्ठा आणि देशाप्रती जाणिवा जागृत ठेवून काम केल्यास, स्वतः बरोबराच राष्ट्राची प्रगती साधता येईल. समता, बंधुता आणि एकता या तत्त्वाप्रती  तसेच माता-पित्यांप्रती आदर ठेवण्यातूनच आपल्याला ही प्रगती साधता येईल.
कुलगुरू डॅा. विद्यासागर यांनी आपल्या भाषणात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक, प्रशासकीय, विस्तार कार्यक्रम, क्रीडाविषयक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरींचा आढावा घेतला. त्यामध्ये त्यांनी विद्यापीठाच्या श्रेयांक पद्धतीबरोबरच, ऑनलाईन प्रश्नपत्रिका पोहचविण्याची प्रणाली, श्री गुरुगोबिंदसिंघजी अध्यासन केंद्र, नाविन्यपुर्ण-इन्नोव्हेशनमध्ये पॅालिमर संशोधन प्रकल्पास विदेशातील 28 कंपन्यांनी प्रतिसाद दिल्याचे, संशोधन क्षेत्रात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानासाठी विद्यापीठास 5 कोटी 57 लाख रुपये अनुदान मिळाल्याच्या बाबींचाही अभिमानाने उल्लेख केला.
सुरवातीला विद्यापीठाच्या प्रांगणातून दिक्षांत मिरवणुकीतून मान्यवरांचे दिक्षांत समारंभाच्या व्यासपीठावर आगमन झाले. एमजीएम महाविद्यालयाच्या चमूने विद्यापीठ गीत सादर केले. कुलपती तथा राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलन तसेच स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विविध विद्याशाखांतील विषयनिहाय सुवर्ण पदकांचे मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. विविध विद्याशाखांच्या अधिष्ठातांनी कुलपती महोदयांना स्नातकांना पदवी प्रदान करण्यासाठी सादर केले. राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांच्या हस्ते श्री. पवार यांना डि.लिट. ही मानद पदवी आणि मानपत्र प्रदान करण्यात आले. प्रा. केशव देशमुख यांनी मानपत्राचे वाचन केले, तर कलाशाखेचे अधिष्ठाता प्रा. जे. एम. भिसे यांनी कुलपतींना पदवी प्रदान करण्याची विनंती केली. या शानदार दिक्षांत समारंभाचा प्रारंभ आणि समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...