वृत्त
जनतेच्या विश्वासार्हतेला आम्ही प्राणपणे जपू - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
· नांदेड जिल्ह्यात विविध विकास कामांचे खासदार डॉ. शिंदे यांच्या हस्ते
भूमिपूजन
· ही विकास कामे म्हणजे खासदार हेमंत पाटील यांच्या दूरदृष्टीचे प्रतिक
· सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील
नांदेड (जिमाका) दि. 27 :- राज्यातील सर्वसामान्य जनतेला, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांसह महानगरातील जनतेला हे सरकार आपले सरकार वाटत आहे. वृद्ध महिलांसह निराधार व्यक्तीही विश्वासाने आमच्याशी संवाद साधू इच्छित आहेत. आपले म्हणून बोलत आहेत. ही विश्वासर्हता संपादन करण्यासाठी दिवसाची रात्र करून महाराष्ट्र शासनाने विविध विकास कामांना जी गती दिली आहे त्याचे हे आदर्श मापदंड आम्ही समजतो. ज्या कष्टावर, साधेपणावर व लोककल्याणकारी भूमिकेतून हा विश्वास आम्ही मिळवला तो कोणत्याही परिस्थितीत आम्ही जपू अशी नि:संदिग्ध ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या हदगाव तालुक्यातील तळणी-साप्ती-कोहळी-शिरड-पेवा-करोडी-उंचेगाव-भानेगाव-हदगाव रस्ता व पुलाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. भानेगाव येथे कयाधू नदीच्या जवळ आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास खासदार हेमंत पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, भोकरच्या सहायक पोलीस अधीक्षक शफकत आमना, आनंदराव जाधव, बाबुराव कदम कोहळीकर, उमेश मुंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मतदारसंघातील सर्वच घटकांचा विकास व्हावा यासाठी खासदार हेमंत पाटील ज्या पद्धतीने आग्रह धरतात व विकास कामे मंजूर करून आणतात त्याला तोड नाही. वेळप्रसंगी माझ्या शेतकऱ्यांसाठी ही कामे महत्वाची आहेत, असे सांगून त्यांनी आमच्याशी भांडणही करायचे सोडले नाही, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. ऊर्ध्व पैनगंगा, नदीवरील सात उच्च पातळी बंधाऱ्यांना त्यांनी मंजूर मिळवून घेतली. केवळ मंजूरीच नव्हे तर यासाठी आर्थिक तरतूद करून घेतली. यामुळे 10 हजार 610 हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली येईल. यातून अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाला अंदाजित 1600 कोटी रुपये खर्च होणार असून प्रति वर्षी 500 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. या भागात हळद उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांना अधिकचे उत्पन्न मिळावे यादृष्टिने खासदार हेमंत पाटील यांच्या आग्रहावरून वसमत येथे हळद संशोधन केंद्रासाठी शंभर कोटी रुपयांची मान्यता व केंद्र शासनाने दिले आहे.
हिंगोली, नांदेड जिल्ह्यात सिंचनाच्या
सुविधा व पाण्याची उपलब्धता इतर जिल्ह्याच्या तुलनेत चांगली आहे. यामुळे
ज्यांच्याजवळ पाण्याची सुविधा आहे असे शेतकरी ऊसाच्या पिकाकडे वळले आहेत. ऊसाच्या
शेतीतून शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न हे साखर कारखानदार यांच्या मर्जीवर असल्याने
अनेकवेळा शेतकऱ्यांना ऊसाच्या उत्पादनातून लाभ होईल, असे सांगता येत नाही. यातून
शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पोफाळी साखर कारखानाच्या पूर्नजीवनाचा आग्रह
त्यांनी धरला. अवघ्या दोन महिन्यात हा कारखाना सूरू करून इथल्या शेतकऱ्यांनाही
सर्वांपेक्षा अधिक भाव दिला याचे आम्हाला कौतूक आहे. सर्वांगिन विकासाची दूरदृष्टी
खासदार हेमंत पाटील यांनी जपल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना झुकते माप दिल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी
सांगितले.
शासन आपल्या दारी हा सुशासनाचा आदर्श
महानगरापासून राज्याच्या
कानाकोपऱ्यात, दुर्गम भागात, दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे ही शासनाची
भूमिका आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी याला अधिक लोकाभिमूख करून शासन आपल्या दारी हा अभियानाची जोड दिली आहे. हा
उपक्रम प्रशासनातील सर्व घटक व शासनाच्या विविध विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या
अनेक योजनांना पात्र असलेले नागरिक यांच्यामध्ये सवर्णमध्य साधणारा आदर्शमापदंड
असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. शासनासमवेत या अभिनव योजनेसाठी
प्रत्येक गावातील पाच शिवदूत यांनी पुढे येऊन या उपक्रमाला अधिकाधिक लोकाभिमूख
करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जेंव्हा खासदार डॉ. शिंदे व्यासपीठावरून उतरतात
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हदगाव तालुक्यातील विविध कामांच्या भूमिपूजन समारंभात आपल्या भाषणापूर्वी उपस्थित असलेल्या महिलांपैकी अंजनाबाई विणकरे या वृद्ध महिलेशी व्यासपीठावरून खाली उतरून संवाद साधला. अंजनाबाईने घरकुलाची मागणी करताच त्याला होकार देत त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले. अंजनाबाईनेही धीटपणे खासदार डॉ. शिंदे यांना नाव व फोन नंबर मागितल्यावर खासदार डॉ. शिंदे यांनी तिला जवळ घेत आश्वस्त केले.
सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री
म्हणूनच विकास कामांना गती
- खासदार हेमंत पाटील
राज्याच्या मुख्यमंत्री पदाची
धुरा ही एकनाथ शिंदे यांनी अहोरात्र मेहनत करून यशस्वीपणे सांभाळली आहे.
सर्वसामान्याच्या कुणबी कुटुंबातील एक व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत
पोहोचू शकतो हे त्यांनी घेतलेल्या अहोरात्र कष्टाचे प्रतीक आहे. ग्रामीण भागातील
शेतकऱ्यांचे दु:ख आणि त्यांच्यावर येणार प्रसंग याची जाणिव त्यांना आहे. या
जाणिवेतूनच विविध शासकीय योजनांना त्यांनी लोकाभिमुखतेची जोड देऊन ग्रामीण भागातील
सिंचन, रस्ते, वाहतुकीची सुविधा यावर भर दिल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले.
हिंगोली-नांदेड जिल्ह्यातील बहुसंख्य वर्ग हा शेतीशी निगडीत आहे. या दोन्ही
जिल्ह्यात नद्यांची संख्या व ठराविक वर्षानंतर होणारी अतिवृष्टी यामुळे अनेक गावे
संपर्कापासून वंचित राहतात. आज ज्या कामाचे भूमिपूजन झाले तो या कयाधू नदीवरील पूल
आता उभा झाल्यानंतर नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या गावांचा सुमारे 20
कि.मी. चा फेरा आता वाचणार
असल्याचे त्यांनी सांगितले.
000000
छाया :- सदा वडजे, नांदेड