Friday, November 4, 2022

 विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यासाठी फिरते वाचनालय उपयुक्त

- पालकमंत्री गिरीश महाजन  

नांदेड, (जिमाका) दि. 4 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्हा परिषद व अभंग पुस्तकालय यांच्या संयुक्त विद्यमाने फिरत्या वाचनालयाचा शुभारंभ आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्राम विकास, पंचायत राज, वैद्यकिय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. 

जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या या समारंभास माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा सदस्य अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार अमर राजुरकर, आमदार भीमराव केराम, आमदार राजेश पवार, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय माळोदे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम कदम, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदुरकर, प्रविण साले यांची उपस्थित होती. 

नांदेड जिल्ह्यातील 75 जिल्हा परिषद शाळांमध्ये फिरते वाचनालय हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जात आहे. या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये हे फिरते वाचनालय एका पुस्तकाची संपूर्ण माहिती व परिचय करून देणार आहे. दिवसभर थांबून शाळेतील विद्यार्थ्यांना 75 पुस्तके ज्यामध्ये शैक्षणिक, वैचारिक, सामाजिक बांधिलकी, स्पर्धा परीक्षा विषयक, वैज्ञानिक विषयक, थोर हुतात्मे, स्वातंत्र्यसैनिक, भारतीय संविधान, थोर राष्ट्रीय नेते, पर्यटन विषयक तसेच राष्ट्रीय क्रांतिकारक आदी विषयांची पुस्तके वाचण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे. 

बाल वयातच विद्यार्थ्यांना विविध चरित्र संपन्न व्यक्तींचे ग्रंथ वाचण्यात आले तर त्याच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडतो. यासोबतच विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवणे महत्त्वाचे आहे असे उद्गार पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी काढले. नांदेड जिल्हा परिषद राबवत असलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी या उपक्रमाची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी दिली. अभंग पुस्तकालयाचे उमेश कस्तुरे यांनीही याबाबतची माहिती सर्व उपस्थितांना करून  दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश कुलकर्णी, प्रलोभ कुलकर्णी, सुधीर शिंदे यांनी परीश्रम घेतले.

00000




 जिल्ह्यातील 2833 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

4 लाख 15 हजार 636 पशुधनाचे लसीकरण  

नांदेड (जिमाका) दि. 4 :- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 1117 बाधित गावात 2 हजार 833 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे.  

आतापर्यंत 137 पशुधन मृत्यूमुखी पडले असून आजारातून बरे झालेले पशुधनाची संख्या 1 हजार 816 आहे. औषधोपचार चालू असलेले पशुधन 880 आहे. सद्यस्थितीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 15 हजार 636 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 54 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

0000

 आधारभूत किंमत खरेदी योजनेत

ऑनलाईन नोंदणीसाठी 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी धान/भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी बिलोली (कासराळी) केंद्रावर सुरू आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी गुरुवार 10 नोव्हेंबर 2022 पर्यत मुदतवाढ दिलेली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे. 

नोंदणीसाठी चालू हंगामातील पीकपेरा, ऑनलाईन नोंद असलेला सातबारा, बँक खात्याची साक्षांकीत प्रत, आधार कार्ड प्रत तसेच शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रासह शेतकऱ्यांनी स्वत: हजर राहून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी दरम्यान लाईव्ह फोटो अपलोड करावा, असे जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा 

नांदेड, (जिमाका)दि. 4 :- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मस्त्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

शनिवार 5 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 11.10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शिवाजीनगर नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. आगमन व दिलीप कंदकुर्ते यांचेकडे राखीव. स्थळ-साईप्रसाद निवास, शिवाजीनगर नांदेड . दुपारी 12.30 वा. आर्य वैश्य समाज उपवर-उपवधु परिचय मेळावा उदघाटन समारंभास उपस्थिती . स्थळ-चांदोजी पावडे मंगल कार्यालय, नांदेड बायपास रोड, अष्टविनायक नगर, नांदेड . दुपारी 2.15 वा. डॉ. नंदकुमार बिडवई यांच्याकडे राखीव. स्थळ-बिडवई नर्सिग होम, 12-डॉक्टर लेन, घामोडिया कॉम्प्लेक्स, नांदेड. सायं. 4 वा. खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या निवासस्थानी  भेट व कार्यकर्त्यांसमवेत चर्चा. स्थळ-साई सुभाष, वसंत नगर, जि. नांदेड. सायं. 5 वा. नांदेड जिल्हा (ग्रामीण) भाजपा कार्यालयास भेट. सायं. 5.10 वा. मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं. 5.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व  विमानाने मुंबईकडे प्रयाण.

0000

 शिपाई पदासाठी दरपत्रके पाठविण्याचे

नगर रचना कार्यालयाचे आवाहन

लातूर, दि.04 (विमाका):-  लातूर नगर रचना कार्यालयातील वर्ग चारची शिपाई (अकुशल) दोन  पदे स्थानिकरित्या बाह्यस्त्रोताव्दारे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. शासन निर्णयानुसार नेमलेल्या मान्यताप्राप्त खासगी संस्था, कंपनी यांनी शिपाई (02) पदे भरण्याकरिता 9 नोव्हेंबर 2022 पर्यंत वेतन व भत्ते सर्व तपशीलासह दरपत्रके सीलबंद पाकिटात सादर करण्याचे आवाहन नगर रचना विभागाचे सहायक संचालक सु.प्र.मिटकरी यांनी केले आहे.

          शिपाई पदाकरिता उमेदवार हा किमान चौथी पास असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराची सेवा ही केवळ तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपात अकरा

(11) महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध करून घेण्यासाठी  दरपत्रके मागविण्यात येत आहेत, असेही त्यांनी कळविले आहे.***

 एकही विद्यार्थी शाळेपासून वंचित राहणार नाही

- पालकमंत्री गिरीश महाजन

 

जिल्हा वार्षिक योजनेच्या एकूण  623.52 कोटीच्या

नियोजनास मंजुरी

जिल्हा वार्षिक योजनेची बैठक संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- कोरोनानंतरच्या काळात जिल्हा परिषदांमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण जिल्ह्यात वाढले ही चांगली बाब आहे. राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील, दुर्गम डोंगराळ भागातील एकही विद्यार्थी शाळेपासून वंचित राहणार नाही ही भूमिका आम्ही पूर्वीपासूनच घेतलेली आहे. तथापि अनेक भागात अवघ्या तीन-चार विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांसाठी तेवढेच शिक्षक त्या ठिकाणी ठेवणे हे इतर जास्त विद्यार्थी संख्या व कमी शिक्षक असलेल्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांवर अन्याय केल्यासारखे आहे. याचा साकल्याने विचार करून सर्वच विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची सहज उपलब्धता होण्याच्यादृष्टिने शिक्षण विभागाने विचार करणे आवश्यक आहे. त्यादृष्टिने नियोजन करून जिल्ह्यातील सुमारे 335 शाळेतील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षणाचे मार्ग देऊ असा विश्वास नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्राम विकास, पंचायत राज, वैद्यकिय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. नांदेड येथील कै. शंकरराव चव्हाण नियोजन भवनाच्या सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. 

या बैठकीस माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा सदस्य अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार अमर राजूरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर,  आमदार तुषार राठोड, आमदार भिमराव केराम, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. राजेश पवार, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार जितेश अंतापूरकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले, देगलूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा, मनपा आयुक्त सुनिल लहाने, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे व संबंधित सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. 

राज्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या अनेक योजनांसह शेतकऱ्यांनाही राज्य शासनातर्फे मोठा दिलासा देण्याचे काम गत दोन महिन्यात आम्ही केले. यात शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी पूर्वी 2 हेक्टर असलेली मर्यादा 3 हेक्टर पर्यंत वाढविली. सुमारे 700 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी आपण देऊ शकलो. कोणताही व्यक्ती घरावाचून, गॅस कनेक्सन, नळाद्वारे पाणी आणि वैद्यकिय उपचारावाचून राहणार नाही याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. हर घर नल योजना ही अत्यंत दूरदृष्टिची योजना आहे. ज्यांच्यासाठी योजना आहे त्या योजनांची कामे गुणवत्तापूर्ण झाली पाहिजे व योजनेचा उद्देश सफल झाला पाहिजे, असे स्पष्ट करून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नळ योजनेसाठी पाण्याचे जे स्त्रोत निवडलेले आहेत ते बारामाही पाणी उपलब्ध करून देणारे असले पाहिजे, असे स्पष्ट केले. जिल्ह्यातील विविध विकास कामांसह जलसंधारणाच्या योजनेबाबत आमदार डॉ. तुषार राठोड व सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींनी चर्चेद्वारे अमूल्य सूचना केल्या. 

विविध महाविद्यालयात प्रवेश घेताना जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत समितीकडून वेळेच्या आत निर्णय व प्रमाणपत्र बहाल होणे आवश्यक आहे. अनेक विद्यार्थी पडताळणी मुळे हवालदिल होतात. यात पालकांच्याही तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त असून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुकर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला पालकमंत्री महाजन यांनी दिले.  याबाबत खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील व इतर सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या जात वैधता पडताळणीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. 

जिल्हा वार्षिक योजनेच्या एकूण  623.52 कोटीच्या

नियोजनास मंजुरी 

नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सन 2022-23 च्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेच्या एकुण 623 कोटी 52 लाख रुपयांच्या नियोजनास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्राम विकास, पंचायत राज, वैद्यकिय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी 400 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 163 कोटी आणि आदिवासी उपयोजनेसाठी 60 कोटी 52 लाख रुपयाची तरतूद मंजूर आहे. मंजूर तरतुदीपैकी शासनाकडून बीडीएस प्रणालीवर 161.15 कोटी निधी आजवर प्राप्त झालेला आहे. 

संबंधित यंत्रणेने तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. मंजूर निधीचा शंभर टक्के खर्च व्हावा यादृष्टिने काळजी घेण्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत ऐनवेळी आलेल्या विषयांवरही चर्चा करण्यात आली. गत 29 जून 2022 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तावरील अनुपालनास मान्यता देण्यात आली.

00000  







  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...