Saturday, December 17, 2016

निवृत्तीवेतनधारकांच्या हयात प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन
जीवन प्रमाणपत्र सुविधा उपलब्ध-कोषागाराचे आवाहन
नांदेड दि. 17 :- राज्य शासकी निवृत्तीवेतन धारकांना हयातीचे दाखले देण्यासाठी बायोमेट्रीक म्हणजेच त्यांच्या बोटांचे ठसे किंवा त्यांच्या डोळयातीलआयरीस’ Finger Prints Reader किंवा Iris Reader या यंत्रावर ठेवून संबंधित निवृत्तीवेतन धारकाची ओळख पटविता येणे शक्य झाले आहे. नुकतेच जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड येथे बोटांचे ठसे वाचण्यासाठी Finger Prints Readers ही यंत्रे बसविण्यात आली आहेत. निवृत्तीवेतनाचे प्रदान नियमीतपणे होण्यासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये तसेच त्यांनतर देखील या नवीन जीवन प्रमाणपत्र ‘Digital Life Certificate’ सुविधेचा जास्तीतजास्त सेवा निवृत्तीवेतनधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मनोग गग्गड यांनी केले आहे.
शासनाने जीवनप्रमाण www.jeevanpramaan.gov.in या नावाने वेबपोर्टल तयार केल आहे. सेवा निवृत्तीवेतनधारकांना दरमहा प्राप्त होणारे निवृत्तीवेतन नियमितपणे सुरू राहण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये निवृत्तीवेतन धारकांना आपले हयातीचे प्रमाणपत्र आपल्या बँकेमार्फत अथवा थेट कोषागारामध्ये जमा करावे लागते.
            बोटांचे ठसे घेण्याची सुविधा आपल्या जिल्हा कोषागारामध्ये आणि सर्व उपकोषागार कार्यालयांमध्ये करण्यात आलेली आहे तसेच इतर कोषागार कार्यालय उपकोषागार कार्यालयातही ही सुविधा उपलब्ध झालेली आहे. नजीकच्या काळात ही सुविधा जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, राष्ट्रीयकृत बँका येथे देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी निवृत्तीवेतन धारक व्यक्तीने आपली सर्व वैयक्तिक माहिती म्हणजेच त्यांचा पी.पी.. क्रमांक (Pension Payment Order), बँक पासबुक, नाव, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती घेउन यावे. तेथे त्यांना ही माहितीजीवन प्रमाणपोर्टल वर भरण्यासाठी मदत केली जाईल. त्यांचे बायोमेट्रीक ऑथेंटीकेशन पूर्ण झाल्यावर त्याबाबत त्यांच्या मोबाईलवर त्यांना एसएमएस प्राप्त होईल. यासाठी पी.पी.. क्रमांक अचुक भरण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
            जीवन प्रमाणपत्र प्राप्त करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरजीवन प्रमाणसंकेतस्थळावर 'Pensioner Log-in’ केल्यास Digital Life Certificate सादर करण्याची कोषागार कार्यालयात स्वीकृती यशस्वीरीत्या झाली किंवा नाही याची देखील माहिती संकेतस्थळावर आपल्याला मिळू शकेल. अर्थातच ही नवीन (Digital Life Certificate) सुविधा आपल्याला मिळालेली एक जास्तीची सुविधा आहे. आतापर्यंत आपण वापरत असलेलीकागदी हयातीचे प्रमाणपत्र किंवा दाखलेहे यापुढे देखील देता येतील. त्यामुळे ज्यांना या सुविधेचा लाभ घेता येणे, अडचणीचे वाटत असेल, त्यांना यापूर्वी प्रमाणेच आपले हयातीचे दाखले आपल्या बँकेमार्फत, पोस्टाव्दारे किंवा थेट कोषागार किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या उपकोषागारामध्ये पाठविता येतील.

000000
महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी
आयुर्वेद महाविद्यालयात तीन मतदान कक्ष
 नांदेड, दि. 17 : - महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2016 साठी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे तीन मतदान कक्ष स्‍थापन करण्‍यात आले आहेत. निवडणुकीसाठी रविवार 18 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 8 ते सायं. 5 या कालावधीत मतदान घेण्‍यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2016 ही प्रत्‍येक जिल्‍ह्याच्‍या मुख्‍यालयी घेण्याबाबत अवर सचिव तथा नि‍वडणूक निर्णय अधिकारी महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक-2016 यांनी कळविले आहे.  नऊ सदस्‍यांच्‍या या निवडणुकीकरीता एकूण 49 उमेदवार आहेत. महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी झालेले नांदेड जिल्‍ह्यातील एकूण 1 हजार 883 वैद्यकीय व्‍यावसायिक ( एमबीबीएस झालेले डॉक्‍टर्स) या निवडणुकीचे मतदार आहेत. ही मतदार यादी प्रबंधक महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद यांचेमार्फत प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. निवडणुकीसाठी 14 अधिकारी-कर्मचारी आणि 4 चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच प्रत्‍येक मतदान कक्षा करीता 2 पोलीस कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

00000
दहावी परीक्षेसाठी शुल्कासह
अर्ज करण्याचे मंडळाचे आवाहन   
 नांदेड , दि. 17 : - माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षा मार्च 2017 साठी नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषयासह परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची अर्ज स्विकारण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मंगळवार 13 डिसेंबर नंतर प्राप्त होणारी अर्ज ही शाळांनी स्वहस्ताक्षरात भरुन त्यावर विद्यार्थी व मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह मंडळास सादर करण्यात यावेत.  हे अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे आवाहन लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षा अतिविलंब शुल्क अंतिम मुदत 50 रुपये प्रतिदिन, प्रति विद्यार्थी प्रमाणे बुधवार 14 डिसेंबर 2016 ते रविवार 15 जानेवारी 2017 तर विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत 100 रुपये प्रतिदिनी, प्रती विद्यार्थी प्रमाणे सोमवार 16 जानेवारी ते 30 जानेवारी 2017. अति विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत 200 रुपये प्रतिदिनी, प्रती विद्यार्थी प्रमाणे मंगळवार 31 जानेवारी 2017 ते 14 फेब्रुवारी 2017 पर्यंत राहील.  
मंडळ विनियम 1977 नियम क्र. 46 अन्वये मार्च 2017 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेत नियमित प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषयासह परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या व विलंब शुल्कासह ऑनलाईन परीक्षेची अर्ज स्विकारण्याची मुदत संपल्यानंतरही श्रेणी, तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होण्यापुर्वी 33 दिवसाचा कालावधी वगळून त्या अगोदर प्रतिदिन 50 रुपये याप्रमाणे अतिविलंब शुल्क, अतिविलंब शुल्काच्या निर्धारित तारखेनंतर लेखी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेच्या आगोददर जी परीक्षा सुरु होणार आहे, त्यातील सुरुवातीच्या 15 दिवसापर्यंत प्रती विद्यार्थी प्रतीदिन 100 रुपये व त्यांनतरच्या 15 दिवसांकरीता व परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत 200 रुपये याप्रमाणे अतिविशेष अतिविलंब शुल्क आकारुन अर्ज स्विकारण्याच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.

0000000
नुतन वर्ष स्वागताच्या करमणुकीच्या
 कार्यक्रमासाठी परवानगी आवश्यक
नांदेड, दि. 17 :- जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, कल्ब, अथवा मॉटेल कल्ब आणि अन्य करमणूक केंद्रे चालकांना व तत्सम करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांना नुतन वर्षाच्या आगमनानिमित्त करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करावयाचे असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेत अर्ज सादर करावा व रीतसर परवानगी मिळवावी. विनापरवाना आयोजित करमणुकीच्या कार्यक्रमावर शासन नियमानुसार करमणूक शुल्काची दंडासह आकारणी करण्यात येईल.
विनापरवाना करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करणे मुंबई करमणुक शुल्क अधिनियम 1923 मधील कलम 5 (क) गुन्हा असून विनापरवाना करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर सदर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
मुंबई करमणूक शुल्क अधिनियम 1923 व तदांतर्गत मुंबई करमणूक शुल्क नियम 1958 च्या अधिन राहून नांदेड जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, कल्ब अथवा मॉटेल कल्ब आणि अन्य करमणूक केंद्रे येथे नुतन वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ठिकाणी करमणुकीच्या कार्यक्रमावर मुंबई करमणूक शुल्क अधिनियम 1923 मधील कलम 3 (1) (बी) नुसार करमणूक कराची आकारणी करण्यात येते.  

000000
हरभरा, तुर पिकासाठी कृषि संदेश
 नांदेड , दि. 17 : - देगलूर, मुखेड, नायगाव, बिलोली, धर्माबाद या पाच तालुक्यासाठी तुर व हरभरा पिकासाठी क्रॉपसॅप योजनेअंतर्गत पिकावरील किडरोग सर्वेक्षणानुसार शेतकऱ्यांनी कृषि संदेश उपविभागीय कृषि अधिकारी देगलूर यांनी दिला आहे.
हरभरा शेंगा खाणाऱ्या अळ्याच्या नियंत्रणासाठी बेन्जोएट 5 टक्के एसजी 0.45 ग्रॅम प्रती लिटर किंवा क्लोरॅनट्रयानीप्रोल 18.5 टक्के एससी 0.3 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. घाटे अळीसाठी प्रती हेक्टर 5 कामगंध सापळे लावावेत. पक्षीथांबे प्रती हेक्टर 50 उभारावेत. घाटे अळीच्या यजमान वनस्पती नष्ट कराव्यात. निंबोळी अर्क 5 टक्के किंवा एचएएनपी 500 मिली प्रती हेक्टर याप्रमाणे फवारणी करावी. पक्षी थांबे प्रती हेक्टर 50 उभारावेत.
तुर शेंगा खाणाऱ्या अळ्याच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्जोएट 5 टक्के एसजी 0.45 ग्रॅम लि. किंवा क्लोरॅनट्रयानीप्रोल 18.5 टक्के एससी 3 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या यजमान वनस्पती नष्ट कराव्यात. तसेच स्पिनोस्याड 45 टक्के 0.25 मिली किंवा इमामेक्टीन बेन्जोएट 5 टक्के 0.2 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. स्पिनोस्याड 45 टक्के 0.25 मिली किंवा इमामेक्टीन बेन्जोएट 5 टक्के 0.2 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
000000


नगरपरिषद , नगरपंचायत निवडणुकीसाठी
आज मतदान , निवडणूक यंत्रणा सज्ज
सकाळी 7.30 वा. पासून मतदानास प्रारंभ
नांदेड, दि. 17 :-  राज्य निवडणूक आयोगाकडून नांदेड जिल्ह्यातील 9 नगरपरिषद व 2 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या 9 नगरपरिषदांच्या अध्यक्षांची निवडही थेट मतदानाद्वारे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानुसार रविवार 18 डिसेंबर 2016 रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी निवडणूक यंत्रणांनी जय्यत तयारी केली आहे. मतदारांनी निर्भय आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करावे यासाठी यंत्रणांनी काटेकोर व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील (कंसात प्रभाग संख्या) देगलूर (12), धर्माबाद (09), बिलोली, कुंडलवाडी, उमरी, मुखेड, कंधार, हदगाव, मुदखेड (प्रत्येकी 08) या नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तसेच अध्यक्ष पद निवडीसाठी आणि माहूर व अर्धापूर (प्रत्येकी 17) नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवार 18 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 7.30 ते सायं.5.30 या वेळेत मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यात 283 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. नगरपरिषद व नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या जागांसाठी 793 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर नगर परिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 53 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरिक्षक तसेच निवडणूक निरिक्षक म्हणून चार असे पाच अधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे. याशिवाय निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक अधिकारी असे एकूण 33 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय 72 क्षेत्रीय अधिकारी, 1 हजार 711 कर्मचारी यांच्यासह अतिरिक्त 1 हजार 821 मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. मतदानासाठी 778 मतदान यंत्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. या निवडणुकीसाठी पात्र मतदारांची संख्या 2 लाख 5 हजार 5 इतकी आहे. या निवडणुकीसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी काटेकोर नियोजनाचे निर्देश देण्यात आले आहेत.                             0000000
नांदेड जिल्हा डिजीटल पेमेंट युक्त रोकडरहीत
व्यवहारासाठी साक्षर करण्याचा निर्धार करा
- जिल्हाधिकारी काकाणी
गावा-गावातील नागरिकांपर्यंत पोहचण्याचे आवाहन
नांदेड, दि. 17 :- जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला रोकडरहीत (कॅशलेस) व्यवहारांबाबत प्रशिक्षणाद्वारे सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा. डिजीटल पेमेंटच्या माध्यमातून जिल्ह्याच्या डिजीटल नांदेडसाठी योगदान द्या, असे आवाहन नांदेड सेतू समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे केले. जिल्हा सेतू समिती व स्टेट बँक आँफ इंडिया यांच्यावतीने जिल्ह्यातील नागरी सेवा केंद्र चालकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये जिल्हाधिकारी श्री. काकाणी बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या या आवाहना बरोबरच नांदेड जिल्हा रोकडरहीत (कॅशलेस) व्यवहारात अग्रेसर ठेवण्यासाठी उपस्थित नागरी सेवा केंद्र चालकांनीही प्रतिज्ञाही घेतली. यात किमान शंभर नागरिकांना आणि पन्नास व्यापारी-व्यावसायिकांना डिजीटल पेमेंटबाबत साक्षर करण्याचा निर्धारही करण्यात आला. यावेळी या केंद्र चालकांना पीओएस ( प्वाईंट आँफ सेल-POS) उपकरणांचेही  वितरण करण्यात आले. या प्रशिक्षणास नांदेड सेतू समितीचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रफुल्ल जोगी, समीर पाटील आदींची उपस्थिती होती.
मार्गदर्शनात पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की , गावा-गावात रोकडरहित (कॅशलेस) व्यवहारांसाठी साक्षरता निर्माण करण्याची, नागरिकांना माहिती देण्याची मोठी जबाबदारी नागरी सेवा केंद्रांकडे आहे. हा व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी आणि डिजीटल पेमेंटमुळे होणारे फायदे याबाबतही वेळोवेळी माहिती द्यावी लागेल. प्रत्येक तालुक्यातून किमान दोन ते तीन गावांना रोकडरहित (कॅशलेस) आणि डिजीटल पेमेंट सुविधेंतर्गत स्वंयपुर्ण केल्यास, केंद्र सरकारकडून अशा गावांना पुरस्कृत केले जाणार आहे. त्यामुळे यात नागरी सेवा केंद्र चालकांची मोलाची भुमिका राहणार आहे. माहिती तंत्रज्ज्ञान युगाची वाटचाल आणि गावांना विकासाभिमुख करण्यासाठी डिजीटल करावेच लागेल. त्यासाठी गावातल्या प्रत्येक नागरिकाला या डिजीटल पेमेंट सुविधेशी जोडून घ्यावे लागेल. त्यामुळे केंद्र चालकांना बँक खाते काढण्यापासून, विविध प्रकारच्या कार्ड सुविधा आणि त्याद्वारे करावे लागणारे व्यवहार यांचे प्रशिक्षण द्यावे लागेल. बहुतांशी केंद्र चालक तरूण आणि होतकरू आहेत, आपल्या संगणक साक्षरतेचा लाभ गावातील शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी वर्गाला व्हावा यासाठी सामाजिक बांधिलकीही जपण्याचा प्रयत्न करावा, असेही श्री. काकाणी यांनी आवाहन केले.
जिल्ह्यात बाजारपेठांच्या (मोंढ्यामध्ये) प्रायोगीक तत्त्वावर मोफत वाय-फाय सुविधा देण्याचा प्रयत्न राहील. छोटे व्यापारी-व्यावसायींकापर्यंत पोहचून, युपीआय, विद्यार्थ्यांना ई-वॅलेट सुविधा देणे अशा गोष्टींची सुरुवात करता येईल, त्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करा. यासाठी जिल्हा प्रशासन विविध स्तरावरून आपल्याला सर्वोतोपरी सहकार्य करेल, असेही श्री. काकाणी यांनी यावेळी सांगितले.
सुरुवातीला श्री. जोगी तसेच पाटील यांनी युपीआय, पीओएस उपकरणांचा वापर, इंटरनेट बँकीग तसेच ई-वॅलेट अशा रोकडरहीत (कॅशलेस) डिजीटल पेमेंट व्यवहारांबाबत उपस्थित केंद्र चालकांना संगणकीय सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या हस्ते प्रातिनीधीक स्वरुपात केंद्र चालकांना पीओएस उपकरणांचेही वितरण करण्यात आले. उपस्थित केंद्र चालकांनी डिजीटल पेमेंटबाबत किमान शंभर नागरिकांना आणि पन्नास व्यावयायिक-व्यापाऱ्यांना साक्षर करण्याचा निर्धारही प्रतिज्ञेद्वारे केला.
उद्योजकांनाही रोकडरहित (कॅशलेस) व्यवहारास प्राधान्य देण्याचे आवाहन
जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध समित्यांच्या सभाही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या. या समिती सभांतही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी डिजीटल पेमेंट-रोकडरहित (कॅशलेस) व्यवहारांसाठी उद्योजक-व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यातील विविध घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या प्रणालीचा अंगिकार करावा लागेल, असे आवाहन केले. या प्रणालीबाबत जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी सादरीकरणही केले. तसेच बँक प्रतिनिधींनाही उद्योजक-व्यावसायीक तसेच कामगार-कर्मचारी वर्गाच्या सुविधांसाठी तत्पर व प्रयत्नशील राहण्याचे निर्देश दिले. जिल्हा उद्योग मित्र, जिल्हा सल्लागार समिती, रोजगार-स्वयंरोजगार प्राधान्य जिल्हास्तरीय समिती, आजारी उद्योग पुनरूज्जीवन जिल्हास्तरीय समिती अशा समित्यांच्या बैठका झाल्या. यासाठी समित्यांचे सदस्य, अधिकारी आदी उपस्थित होते. जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक  बी. टी. यशवंते यांनी समिती सभांचे संयोजन व संचलन केले.

0000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...