नांदेड जिल्हा “डिजीटल पेमेंट” युक्त रोकडरहीत
व्यवहारासाठी साक्षर करण्याचा
निर्धार करा
- जिल्हाधिकारी काकाणी
गावा-गावातील नागरिकांपर्यंत
पोहचण्याचे आवाहन
नांदेड, दि. 17 :- जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला रोकडरहीत
(कॅशलेस) व्यवहारांबाबत प्रशिक्षणाद्वारे सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा. डिजीटल
पेमेंटच्या माध्यमातून जिल्ह्याच्या डिजीटल नांदेडसाठी योगदान द्या, असे आवाहन
नांदेड सेतू समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे केले. जिल्हा
सेतू समिती व स्टेट बँक आँफ इंडिया यांच्यावतीने जिल्ह्यातील नागरी सेवा केंद्र
चालकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे प्रशिक्षण सत्र आयोजित
करण्यात आले होते. यामध्ये जिल्हाधिकारी श्री. काकाणी बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी
यांच्या या आवाहना बरोबरच नांदेड जिल्हा रोकडरहीत (कॅशलेस) व्यवहारात अग्रेसर
ठेवण्यासाठी उपस्थित नागरी सेवा केंद्र चालकांनीही प्रतिज्ञाही घेतली. यात किमान
शंभर नागरिकांना आणि पन्नास व्यापारी-व्यावसायिकांना डिजीटल पेमेंटबाबत साक्षर
करण्याचा निर्धारही करण्यात आला. यावेळी या केंद्र चालकांना पीओएस ( प्वाईंट आँफ
सेल-POS) उपकरणांचेही वितरण करण्यात आले. या प्रशिक्षणास नांदेड सेतू
समितीचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे
प्रफुल्ल जोगी, समीर पाटील आदींची उपस्थिती होती.
मार्गदर्शनात पुढे बोलताना
जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की , गावा-गावात रोकडरहित (कॅशलेस)
व्यवहारांसाठी साक्षरता निर्माण करण्याची, नागरिकांना माहिती देण्याची मोठी
जबाबदारी नागरी सेवा केंद्रांकडे आहे. हा व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी आणि
डिजीटल पेमेंटमुळे होणारे फायदे याबाबतही वेळोवेळी माहिती द्यावी लागेल. प्रत्येक
तालुक्यातून किमान दोन ते तीन गावांना रोकडरहित (कॅशलेस) आणि डिजीटल पेमेंट
सुविधेंतर्गत स्वंयपुर्ण केल्यास, केंद्र सरकारकडून अशा गावांना पुरस्कृत केले
जाणार आहे. त्यामुळे यात नागरी सेवा केंद्र चालकांची मोलाची भुमिका राहणार आहे. माहिती
तंत्रज्ज्ञान युगाची वाटचाल आणि गावांना विकासाभिमुख करण्यासाठी डिजीटल करावेच
लागेल. त्यासाठी गावातल्या प्रत्येक नागरिकाला या डिजीटल पेमेंट सुविधेशी जोडून
घ्यावे लागेल. त्यामुळे केंद्र चालकांना बँक खाते काढण्यापासून, विविध प्रकारच्या
कार्ड सुविधा आणि त्याद्वारे करावे लागणारे व्यवहार यांचे प्रशिक्षण द्यावे लागेल.
बहुतांशी केंद्र चालक तरूण आणि होतकरू आहेत, आपल्या संगणक साक्षरतेचा लाभ गावातील
शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी वर्गाला व्हावा यासाठी सामाजिक बांधिलकीही जपण्याचा
प्रयत्न करावा, असेही श्री. काकाणी यांनी आवाहन केले.
जिल्ह्यात बाजारपेठांच्या
(मोंढ्यामध्ये) प्रायोगीक तत्त्वावर मोफत वाय-फाय सुविधा देण्याचा प्रयत्न राहील. छोटे
व्यापारी-व्यावसायींकापर्यंत पोहचून, युपीआय, विद्यार्थ्यांना ई-वॅलेट सुविधा देणे
अशा गोष्टींची सुरुवात करता येईल, त्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करा. यासाठी
जिल्हा प्रशासन विविध स्तरावरून आपल्याला सर्वोतोपरी सहकार्य करेल, असेही श्री.
काकाणी यांनी यावेळी सांगितले.
सुरुवातीला श्री. जोगी तसेच
पाटील यांनी युपीआय, पीओएस उपकरणांचा वापर, इंटरनेट बँकीग तसेच ई-वॅलेट अशा
रोकडरहीत (कॅशलेस) डिजीटल पेमेंट व्यवहारांबाबत उपस्थित केंद्र चालकांना संगणकीय
सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या हस्ते
प्रातिनीधीक स्वरुपात केंद्र चालकांना पीओएस उपकरणांचेही वितरण करण्यात आले.
उपस्थित केंद्र चालकांनी डिजीटल पेमेंटबाबत किमान शंभर नागरिकांना आणि पन्नास
व्यावयायिक-व्यापाऱ्यांना साक्षर करण्याचा निर्धारही प्रतिज्ञेद्वारे केला.
उद्योजकांनाही रोकडरहित
(कॅशलेस) व्यवहारास प्राधान्य देण्याचे आवाहन
जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध
समित्यांच्या सभाही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
झाल्या. या समिती सभांतही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी डिजीटल पेमेंट-रोकडरहित
(कॅशलेस) व्यवहारांसाठी उद्योजक-व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यातील विविध
घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या प्रणालीचा अंगिकार करावा लागेल, असे आवाहन
केले. या प्रणालीबाबत जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी सादरीकरणही केले. तसेच बँक
प्रतिनिधींनाही उद्योजक-व्यावसायीक तसेच कामगार-कर्मचारी वर्गाच्या सुविधांसाठी
तत्पर व प्रयत्नशील राहण्याचे निर्देश दिले. जिल्हा उद्योग मित्र, जिल्हा सल्लागार
समिती, रोजगार-स्वयंरोजगार प्राधान्य जिल्हास्तरीय समिती, आजारी उद्योग
पुनरूज्जीवन जिल्हास्तरीय समिती अशा समित्यांच्या बैठका झाल्या. यासाठी समित्यांचे
सदस्य, अधिकारी आदी उपस्थित होते. जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक बी. टी. यशवंते यांनी समिती सभांचे संयोजन व
संचलन केले.
0000000
No comments:
Post a Comment