Monday, September 30, 2024

 वृत्त क्र. 885

1 ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा

- सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे 

नांदेड दि. 30 सप्टेंबर : समाज कल्याण कार्यालय, विधीसेवा प्राधिकरण व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, फेस्कॉम मराठवाडा प्रादेशिक विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हा कार्यक्रम नियोजन भवन येथे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे व फेस्कॉमचे उपाध्यक्ष अशोक तेरकर यांनी केले आहे. 

या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजनाविषयक बाबींची माहिती, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, ज्येष्ठ  नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्धघाटक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज, प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

00000

वृत्त क्र. 884

नवरात्र उत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यास प्रतिबंध

· मिरवणूक व उत्सवादरम्यान लेजर लाईटच्या वापरास प्रतिबंध

नांदेड दि. 30 सप्टेंबर : जिल्ह्यात नवरात्र उत्सवाच्या काळात 3 ऑक्टोंबर 2024 ते  15 ऑक्टोबर 2024 च्या मध्यरात्रीपर्यतच्या श्री नवरात्र उत्सव कालावधीत जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम मालक, चालक व इतर कुण्‍याही व्‍यक्‍तीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (1) नुसार डॉल्बी सिस्टीमचा वापर करणेस, चालविण्यास तसेच सदर मिरवणूक/उत्सवादरम्यान लेजर लाइटच्या वापरासही जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे.

नवरात्र उत्सवाच्या काळात जिल्हयातील डॉल्बी चालक व मालक यांचेकडे असलेल्या डॉल्बी सिस्टीम उत्सव कालावधीत रोखून ठेवणे आवश्यक आहे. डॉल्बी सिस्टीम मालक, चालक व इतर कुणीही व्यक्ती  हे डॉल्बी सिस्टीम वापरू / चालवू नये याकरीता सदर डॉल्बी सिस्टीम मालक व  चालक यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (1) प्रतिबंधात्‍मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केला आहे. संबंधीतावर नोटीस बजावून त्‍यांचे म्‍हणने ऐकूण घेण्‍यास पुरेसा अवधी नसल्‍याने आणीबाणीच्‍या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (1) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत 26 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्‍यात आला आहे.   

00000

वृत्त क्र. 883

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी

आज भोकर, हिमायतनगर व धर्माबाद येथे उद्योग मेळावा

नांदेड दि. 30 सप्टेंबर : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी  मंगळवार 1 ऑक्टोबर 2024  रोजी पंचायत समिती सभागृह भोकर व पंचायत समिती सभागृह हिमायतनगर, पंचायत समिती सभागृह धर्माबाद येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2024-25 नांदेड जिल्हयास एकुण 1000 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्याचे महाराष्ट्र शासनाचे लक्षांक आहे. 

या योजनेतून मोठया प्रमाणात स्वत:चा उद्योग उभारणी करुन त्यातंर्गत स्वयंरोजगार निर्मिती होणार असल्याने मुदतीत लक्षांक पूर्ती होण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या योजनेतर्गंत उद्या 1 ऑक्टोबर 2024 रोजी भोकर, हिमायतनगर व धर्माबाद या तीन तालुक्यामध्ये मेळावे आयोजित केले आहेत. या मेळाव्यात कर्ज मंजुरीचे प्रस्ताव, अर्ज अपलोड करणे, मंजुरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे अधिकारी तसेच बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा  लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी अनुषंगिक व आवश्यक त्या कागदपत्रांसह या मेळाव्यास उपस्थित रहावे. तसेच कर्ज प्रस्ताव प्रलंबित असलेल्या अर्जदारांनीही आवश्यक त्या कागदपत्रासह/कारणासह पूर्ततेसाठी उपस्थित रहावे, असे कळविले आहे.

मेळाव्यास येताना आधार कार्ड. पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, दोन फोटो, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल,जातीचा दाखला, व्यवसायानुंषिक इतर परवाने ही आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून अधिक माहितीसाठी सदर योजनेचे https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळ आहे. तालुक्यातील व परिसरातील पात्र-होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 882

माजी सैनिकांना शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात नौकरीची संधी

नांदेड दि. ३० सप्टेंबर : माजी सैनिक महामंडळ (मेस्को) महाराष्ट्र शासनामार्फत कै. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, विष्णुपूरी नांदेड येथील रुग्णालय व आस्थापनेसाठी सुरक्षा सुपरवायझर, सुरक्षागार्ड पुरुष, सुरक्षागार्ड महिला यांच्या जागा भरावयाच्या आहेत.

माजी सैनिक, माजी सैनिक पाल्य व माजी सैनिक विधवा यांच्यातून कंत्राटी पध्दतीने  पदे भरण्यात येणार आहे. तरी  जिल्ह्यातील पात्रताधारक माजी सैनिक, पाल्य व माजी सैनिक विधवा यांनी तात्काळ कै. शं.च. शासकीय रुग्णालयातील माजी सैनिक महामंडळाचे कार्यालयात सुरक्षा अधिकारी/सुपरवायझर यांच्याशी मोबाईल  क्रमांक 7378593708 वर संपर्क करावा, असे आवाहन मेस्को अधिकारी विश्वास लक्ष्मण यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 881

7 ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

नांदेड दि. 30 सप्टेंबर : सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी  प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 7 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे. 

 या दिवशी महसूल,  गृह,  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,  पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.

 लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली आहे.

00000

 वृत्त क्र. 880

नवा मोंढा मैदानावर लाडक्या बहिणींचा आनंद सोहळा साजरा होणार 

 ७ ऑक्टोबरला नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती 

 जिल्हा प्रशासनाकडून महिला सशक्तिकरण अभियानाची तयारी सुरु 

नांदेड दि. ३० सप्टेंबर : संपूर्ण महाराष्ट्रातील महिला भगिनींसाठी आर्थिक सक्षमीकरणाची क्रांती ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व अन्य योजनांचा आनंद सोहळा ७ ऑक्टोबरला नांदेडमध्ये होत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील हजारो महिला सहभागी होणार असून प्रशासन या दृष्टीने तयारीला लागले आहे.

राज्य शासनाने मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान सुरू केले असून या संकल्पनेतून सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाच्या पथदर्शी योजनांमधील लाभार्थ्यांची संवाद साधने व त्यांना प्रत्यक्ष या योजनाचा कार्यक्रमांमध्ये लाभ देणे सुरू आहे. विविध जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत कार्यक्रम झाले असून आता नांदेडमध्ये देखील ७ ऑक्टोबरला हा कार्यक्रम होणार आहे.

आज या संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, यांच्यासह जिल्हा जिल्हा परिषद व महानगरपालिकेतील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यामध्ये विविध विभाग प्रमुखांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नवा मोंढा येथील मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन ,महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे.

जिल्ह्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे त्यामुळे हजारोच्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे जिल्हा प्रशासन या मोठ्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले आहे.

0000





 वृत्त क्र. 879

मतदानाची टक्केवारी वाढविणे आगामी निवडणुकीतील प्रथम लक्ष्य: अभिजीत राऊत 

 विधानसभा निवडणुकी संदर्भातील चार जिल्ह्याचे प्रशिक्षण नांदेडमध्ये संपन्न 

नांदेड दि. ३० सप्टेंबर : यावेळी महाराष्ट्राची निवडणूक वेगळी आहे. निवडणूक आयोगाचे या निवडणुकीकडे अतिशय गांभीर्याने लक्ष असून मतदानाची टक्केवारी वाढविणे हे पहिले लक्ष्य ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले. छत्रपती संभाजी नगर विभागातील नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर या चार जिल्ह्याच्या निवडणूक नोडल अधिकारी व प्रशिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, आतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, राष्ट्रीय स्तरांवरील प्रशिक्षक उपजिल्हाधिकारी ललित क्हाडे, गणेश पवार, दत्तू शेवाळे, अनिकेत सोनवणे यांच्यासह चार जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मुंबई येथे झालेल्या भारत निवडणूक आयोगाच्या बैठकीचा संदर्भ देऊन निवडणूक आयोगाने ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्याबाबतची माहिती उपस्थितांना दिली. ते म्हणाले, यावेळी महाराष्ट्रातील मतदान प्रक्रियेवर लक्ष वेधले असून राज्यात प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना मतदान करणे सुखद वाटले पाहिजे. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये घसरलेली टक्केवारी आणि मतदारांमध्ये मतदानातील अनास्था दूर करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यासाठी सिद्ध रहा, असेही त्यांनी सांगितले.

 नवनवीन उपक्रमासोबतच लोकशाही प्रक्रियेत सामान्य नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी उत्तम असे प्रशिक्षण देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी प्रशिक्षकांना केल्या.अतिरेकी कारवाया होत असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकांची आकडेवारी उत्तम आहे मात्र महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात त्यामध्ये घट होत आहे त्यामुळे संपूर्ण यंत्रणेने यासाठी एकजूट होऊन काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाकडून प्रशिक्षण घेऊन आलेले उपजिल्हाधिकारी ललित वऱ्हाडे,अनिकेत सोनवणे, गणेश पवार, दत्तू शेवाळे,  यांनी यावेळी अनुक्रमे निवडणुकीतील उमेदवारांची पात्रता अपात्रता, पोस्टल बॅलेट, असुरक्षा उपयोजना, निवडणूक खर्च,पेड न्यूज या संदर्भात मार्गदर्शन केले. तत्पूर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी निवडणूक हा विषय दरवेळी नव्याने प्रशिक्षण घेण्याचा व सातत्याने उजळणी करण्याचा असून अतिशय बिनचुकता या कर्तव्यात येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

0000






वृत्त क्र. 877

कर्तव्यात कसूर, नेरली ग्रामपंचायत अधिकारी निलंबित


नांदेड दि. 30 सप्टेंबर : शेकडो लोकांना दूषित पाण्यामुळे अतिसाराला बळी पडावे लागले. ग्राम पंचायत अधिकारी पाणीपुरवठ्यासारख्या जोखमीच्या विषयावर हलगर्जीपणा केला असा ठपका ठेवून जिल्हा परिषद प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. नेरली दुर्घटनेत ग्रामपंचायत अधिकारी निलंबित करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत नेरली येथे 27 नोव्हेंबर 2024 रोजी पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील दुषीत पाण्यामुळे गावात अतिसार साथ रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे अनेक लोकांना मळमळ,उलटी, जुलाब होवून अनेक रुग्णांना साथीचा आजार झाला.याबाबत अनेक रुग्णांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले.आता परिस्थिती आटोक्यात असून आरोग्य विभागाचे पथक लक्ष ठेवून आहे.

याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नेरली येथील ग्रामपंचायत अधिकारी आर.एस. हटकर यांना निलंबित केले आहे.  

याबाबतचे आदेश 28 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित केले आहे.
गटविकास अधिकारी, पंचायत समिती नांदेड यांनी सादर केलेल्या अहवालावरुन ग्रामपंचायत अधिकारी आर.एस.हटकर हे नेरली येथे कार्यरत असताना त्यांनी ग्रामपंचायत येथे पाणी पुरवठा निर्जतुकीकरण करण्यासाठी टीसीएल पावडरचा नियमितपणे वापर केल्याचे अभिलेखे ग्रामपंचायतीमध्ये आढळून आलेले नाही. नळ योजनेच्या पाण्याची टाकी वेळोवेळी स्वच्छ करणे, योग्य प्रमाणात टीसीएल पावडरचा वापर करणे आवश्यक असताना तसे केल्याचे दिसून आलेले नाही.
0000

शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अनुदान वितरण सुरू

पहिल्या टप्प्यात सुमारे २हजार ३९९ कोटींचे वाटप

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ

मुंबई, दि.३०:- राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२३ च्या 

खरीप हंगामासाठीचे अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टर असे दोन हेक्टर च्या मर्यादेत प्रत्येकी ५ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे.

पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये २३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात येत आहेत. राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे ९६ लाख ७८७ इतकी आहे. 

त्यापैकी ६८ लाख ६ हजार ९२३ खात्यांची माहिती पोर्टलवर भरली गेली आहे. 

यात नमो शेतकरी महासन्मान च्या माहिती सोबत आधार जुळणी व ७० टक्के पर्यंत नावाची पडताळणी झालेली संख्या ४१ लाख ५० हजार ६९६ इतकी आहे. तर आधार जुळणी व ६९ टक्क्यांहून माहितीची पडताळणी झालेल्यांची संख्या ४ लाख ६०हजार ७३० इतकी आहे. 

याव्यतिरिक्त आधारसंमतीपत्रानुसार माहिती भरलेल्या खात्यांची संख्या १७ लाख ५३ हजार १३० इतकी आहे. 

अशारीतीने ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या ६३ लाख ६४ हजार खात्यांवर अनुदानचे अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे. त्यासाठी २ हजार ३९८ कोटी ९३ लाख रुपयांची तरतूद लागणार आहे.

0000



दिनांक : 29 सप्टेंबर 2024

  वृत्त क्र. 876

नेरली येथील साथरोग नियंत्रणात

सर्व रुग्ण धोक्याबाहेर ; गावात स्वच्छता अभियान

नांदेड दि. 29 सप्टेंबर :  नांदेड जिल्ह्यातील नेरली येथे दुषित पाणी पिल्यामुळे विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सर्व रुग्ण धोक्याबाहेर असून गावामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

या गावात दुषीत पाण्यामुळे मळमळ, जुलाब व उलटी अशा रुग्णांचा साथीचा उद्रेक झाला होता. त्याठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी भेट देवून तात्काळ प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख आणि त्यांचा आरोग्य विभागाची संपूर्ण टीम तळ ठोकून त्या ठिकाणी आहेत. आता परिस्थिती आटोक्यात असून साथरोग नियंत्रणात आहे.

सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोताचे सर्व विहिर, हातपंप व बोर व नळ योजना पाण्याची टाकी यांचे बिल्चींग पावडरद्वारे पाणी शुध्दीकरण करण्यात आले आहे. 17 पाणी नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. ब्लिचिंग पावडरचा एक नमुना प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. अनुजैविक व रासायनिक तपासणीसाठी भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणा प्रयोगशाळा वर्कशाप नांदेड व जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा नांदेड येथे पाठविण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी , आरोग्य सहाय्यक, आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत गृहभेटीद्वारे रुग्ण शोध मोहिम सुरु केली आहे. ज्या कुटूंबामध्ये  मळमळ, जुलाब, उलटी यासारखे लक्षणे रुग्णालस दिसून आल्यास रुग्णास आरोग्य उपकेंद्रामध्ये उपचार सुरु करण्यात आले आहे. गावातील नागरिकांना पाणी पुरवठा टॅकरद्वारे सुरु करण्यात आले आहे ते पाणी शुध्द आहे. किंवा नाही याची जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी स्वत: ओटी टेस्ट करुन खात्री करत आहेत.

नेरली येथील आता पर्यतच्या रुग्णांची संख्या 344 आहे. यापैकी रेफर 210 पैकी जिल्हा रुगालय 94, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 89, नवोदय हॉस्पीटल 27 रुग्ण आहेत. सर्व रुग्ण धोक्याबाहेर आहेत.

नेरली येथील परिस्थीती नियंत्रणात येत आहे याकडे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत , मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्याच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सुर्यवंशी, गट विकास अधिकारी नारवटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री खेडकर, डॉ. बालाजी मिरकुटे, समुदाय आरोग्य अधिकारी , विस्तार अधिकारी , ग्रामपंचायत पद अधिकारीव कर्मचारी साथ नियंत्रणासाठी परिश्रम घेत आहेत.

नेरली येथील नागरिकांनी  पाणी गाळून उकळून प्यावे, शिळे अन्न व उघड्यावरचे अन्न खाऊ नये, जेवणापूर्वी व स्वच्छालयाला जावून आल्यानंतर साबनाने हात स्वच्छ धुवावे. मुलांना जेवण भरविण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे. स्वंयपाक करण्यापूर्वी महिलांनी हात स्वच्छ धुवावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी  केले. स्तनदा माता व गरोदर माता अंगणवाडीतील सॅम व मॅम मुले व लहान मुले यांचे तपासणी करण्यात येत आहे. मळमळ उलटी व जुलाब यासारखे लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी आरोग्य कर्मचारी व आरोग्य उपकेंद्राशी संपर्क करावा, असेही आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000







दिनांक : 28 सप्टेंबर 2024

 वृत्त क्र. 875

नेरली येथे अतिसाराचे २७३रूग्ण आढळले 

 ६ रुग्ण अत्यवस्थ ; आरोग्य यंत्रणा कार्यरत

 ५० आरोग्य कर्मचारी गावामध्ये कर्तव्यावर 

 दूषित पाणी पुरवठयाचे नमुने प्रयोगशाळेत 

नांदेड दि. २८ सप्टेंबर : नांदेड जिल्ह्यातील नेरली येथील तीव्र अतिसाराच्या उद्रेकात २७३ नागरिकांना लागण झाली असून त्यांना जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय व शहराच्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहा रुग्णअत्यवस्थ असून अन्य सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

 जिल्हा आरोग्य यंत्रणेचे परिस्थितीवर नियंत्रण असून  गावामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या नेतृत्वात सहा वैद्यकीय चमू कार्यरत आहे. यामध्ये जवळपास 50 आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल परिस्थितीवर लक्ष ठेवून असून गावातील नागरिकांनी आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार गावांमधील दूषित पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्हा यंत्रणेने विशेष आरोग्य शिबिर गावात लावले आहे.   

 सद्यस्थिती संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सांकडून आलेली अधिकृत माहितीनुसार सर्व रुग्णांची परिस्थिती धोक्याबाहेर आहे. मात्र 273 पैकी सहा रुग्ण गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये 90 तर अन्य रुग्ण विष्णुपरी येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात आहे. 

जिल्हा यंत्रणेला या संदर्भातील माहिती काल कळल्यानंतर रात्रीपासून या संदर्भातील उपचार सुरू झाले आहे. आरोग्य पथकाने उपकेंद्रावर एकूण २५६ रुग्णांची तपासणी केली.त्यापैकी ९९ रुग्णांना उच्च केंद्रात पाठवण्यात आले.इतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

 गावात नळ योजनेतून पाणीपुरवठा होत असून त्यातून प्रादुर्भाव झाला अथवा काय यासाठी प्रयोग शाळेला नमुने पाठविण्यात आले आहे. पूर्वी साठवलेले जलस्रोत रिकामे केले गेले.गावात सध्या 4 पाण्याचे टँकर पोहोचले आहेत, पाण्याच्या टँकरचे क्लोरीनेशन करून ओटी टेस्ट करून गावकऱ्यांना पाणी पुरवठा केला जात आहे.

गावपातळीवर रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली जिल्हा व तालुका जलद प्रतिसाद पथक घटनास्थळी सकाळीच पोहोचले असून शमन उपाययोजना केल्या आहेत. 5 आरोग्य पथकांसह घरोघरी सर्वेक्षण सुरू. 4 आरोग्।य पथके सध्या गावात औषधांसह उपस्थित आहेत.

गावातील नागरिकांनी स्वच्छते संदर्भात आरोग्य यंत्रणेचे निर्देश दिले आहेत त्याचे पालन करावे. गावातील विहिरी व अन्य स्त्रोतांद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा वापर सध्या करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

दिनांक : 28 सप्टेंबर 2024

वृत्त क्र. 874

कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणाच्या माध्यमांतून

दिव्यांगाना सक्षम करण्याचा स्तुत्य प्रयत्न -देवसटवार

 दिव्यांगांना कृत्रीम अवयव व सहायक उपकरणांचे वाटप 

नांदेड दि. २८ सप्टेंबर :  इतरांवर अवलंबून राहिल्यास प्रगती प्रभावित होते. त्यामुळे प्रत्येक दिव्यांगाला आवश्यक कामांसाठी स्वयंपूर्ण करणे महत्त्वाचे आहे.कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणे मोफत देत दिव्यांगाना सक्षम करण्याचा प्रयत्न स्तुत्य असल्याचे प्रतिपादन लातूर समाज कल्याण विभागाचे  प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे. 

जनरल इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया उपक्रमाच्या सीएसआर योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व राजस्थानी एज्युकेशन सोसायटी संचालित आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय नांदेड यांच्या सहकार्याने शनिवार २८ सप्टेंबर रोजी नवा मोंढा मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात दिव्यांगांना  कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणे वितरित करण्यात आले. 

यावेळी देवसटवार बोलत होते व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख, अधिक्षक वाय. एच. चव्हाण समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, सचिव प्रकाश मालपाणी, अलीम्कोचे कनिष्ठ प्रबंधक कमलेश यादव, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, जयप्रकाश काबरा, कमल कोठारी, अंकिता अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

यावेळी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवारसह मान्यवरांनी विचार मांडले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील दिव्यांगांना मोटाराईज्ड ट्रायसीकल, कव्हेंश्नल ट्रायसीकल, श्रवणयंत्र, ब्रेल कीट,  स्मार्ट मोबाईल फोन, स्मार्ट केन, क्रचेस, व्हिल चेअर, सी.पी. चेअर, चालण्याची काठी, रोलेटर, वॉकर इत्यादी साहित्यांचे वितरण करण्यात आले.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बापू दासरी तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

00000








  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...