Monday, September 30, 2024

 वृत्त क्र. 879

मतदानाची टक्केवारी वाढविणे आगामी निवडणुकीतील प्रथम लक्ष्य: अभिजीत राऊत 

 विधानसभा निवडणुकी संदर्भातील चार जिल्ह्याचे प्रशिक्षण नांदेडमध्ये संपन्न 

नांदेड दि. ३० सप्टेंबर : यावेळी महाराष्ट्राची निवडणूक वेगळी आहे. निवडणूक आयोगाचे या निवडणुकीकडे अतिशय गांभीर्याने लक्ष असून मतदानाची टक्केवारी वाढविणे हे पहिले लक्ष्य ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले. छत्रपती संभाजी नगर विभागातील नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर या चार जिल्ह्याच्या निवडणूक नोडल अधिकारी व प्रशिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, आतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, राष्ट्रीय स्तरांवरील प्रशिक्षक उपजिल्हाधिकारी ललित क्हाडे, गणेश पवार, दत्तू शेवाळे, अनिकेत सोनवणे यांच्यासह चार जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मुंबई येथे झालेल्या भारत निवडणूक आयोगाच्या बैठकीचा संदर्भ देऊन निवडणूक आयोगाने ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्याबाबतची माहिती उपस्थितांना दिली. ते म्हणाले, यावेळी महाराष्ट्रातील मतदान प्रक्रियेवर लक्ष वेधले असून राज्यात प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना मतदान करणे सुखद वाटले पाहिजे. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये घसरलेली टक्केवारी आणि मतदारांमध्ये मतदानातील अनास्था दूर करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यासाठी सिद्ध रहा, असेही त्यांनी सांगितले.

 नवनवीन उपक्रमासोबतच लोकशाही प्रक्रियेत सामान्य नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी उत्तम असे प्रशिक्षण देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी प्रशिक्षकांना केल्या.अतिरेकी कारवाया होत असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकांची आकडेवारी उत्तम आहे मात्र महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात त्यामध्ये घट होत आहे त्यामुळे संपूर्ण यंत्रणेने यासाठी एकजूट होऊन काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाकडून प्रशिक्षण घेऊन आलेले उपजिल्हाधिकारी ललित वऱ्हाडे,अनिकेत सोनवणे, गणेश पवार, दत्तू शेवाळे,  यांनी यावेळी अनुक्रमे निवडणुकीतील उमेदवारांची पात्रता अपात्रता, पोस्टल बॅलेट, असुरक्षा उपयोजना, निवडणूक खर्च,पेड न्यूज या संदर्भात मार्गदर्शन केले. तत्पूर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी निवडणूक हा विषय दरवेळी नव्याने प्रशिक्षण घेण्याचा व सातत्याने उजळणी करण्याचा असून अतिशय बिनचुकता या कर्तव्यात येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

0000






No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...