Thursday, August 5, 2021

नांदेड जिल्ह्यात 7 व्यक्ती कोरोना बाधित

  7 कोरोना बाधित झाले बरे, तर एकाचा मृत्यू  

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 972 अहवालापैकी  7 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे 3 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 202 एवढी झाली असून यातील 87 हजार 504 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 42  रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

 

बुधवार 4 ऑगस्ट 2021 रोजी देगलूर तालुक्यातील मुजलगा येथील 40 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या हजार 656 एवढी आहे.

आज जिल्ह्यातील 7 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात देगलूर कोविड रुग्णालय 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 6 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 42 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2किनवट कोविड रुग्णालय 2नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 33नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 5 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सायंकाळी वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 131जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- लाख 69 हजार 897

एकुण निगेटिव्ह स्वॅब- लाख 67 हजार 668

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 202

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 504

एकुण मृत्यू संख्या-हजार 656

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.00 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-21

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-31

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-42

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

जिल्ह्यातील 82 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 82 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. दिनांक 6 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील श्री. गुरु गोविंदसिंग जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी,  दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), रेल्वे हॉस्पिटल पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगरयेथे एकूण 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, शहरी दवाखाना सिडको या 2 केंद्रावर  कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री. गुरु गोविंदसिंग जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग,शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर) सिडको, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 18 रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीनचेही प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.तर रेल्वे हॉस्पिटल येथे कोव्हॅक्सीनचे 50 डोस उपलब्ध केले आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, कंधार, लोहा, माहूर, मुदखेड, बारड,नायगाव, उमरी  या 13 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस  दिले आहेत. तर ग्रामीण रुगणालय मांडवी येथे कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस  उपलब्ध करुन दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर,हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी 16 ठिकाणी कोव्हॅक्सीन प्रत्येकी 100 डोसग्रामीण भागात 41 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस तर 6 प्राथमिक आरोग्य केंद्रावर 6 केंद्रावर 50 डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 4 ऑगस्ट 2021 पर्यत एकुण 8 लाख 41 हजार 814 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 5 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 6 लाख 63 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 9 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 8 लाख 72 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 सुधारित वृत्त

 मातृभाषेतून ज्ञानाची होणारी उकल अधिक सुलभ आणि महत्वाची 

-         राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राज्यपालांनी साधला विभाग प्रमुखांशी संवाद 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- बदलत्या काळानुरुप ज्ञानशाखा, विषय बदलत चालले आहेत. शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचेही महत्व वाढले आहे. अभियांत्रिकी, वैज्ञानिक व इतर क्षेत्राशी निगडीत असलेले शिक्षणाचे प्रवेशद्वार मातृभाषेतून उपलब्ध केल्यास प्रत्येक विषयातील होणारी सहज उकल विद्यार्थ्यांसाठी अधिक सहायभूत ठरेल. यात मातृभाषेच्या अभिनामासमवेत शिक्षणाचा होणारा विस्तार आणि विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारा आत्मविश्वास लाखमोलाचा असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी तथा कुलपती श्री भगत सिंह कोश्यारी यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सिनेट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, प्रभारी कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांची उपस्थिती होती. 

देशातील काही राज्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण आपआपल्या मातृभाषेतून सुरु केले आहे. यात महाराष्ट्राचाही सहभाग आहे. शिक्षणाच्यादृष्टिने काळानुरुप होणारे बदल हे विद्यापीठाने अंगिकारून विद्यार्थ्यांना तात्काळ तशा सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला पाहिजे. व्यवसायभिमूख अभ्यासक्रमांची अधिक जोड असेल तर स्वयंरोजगाराच्यादृष्टिने विद्यार्थ्यांना त्याची अधिक मदत होईल यादृष्टिकोणातून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सुरु केलेल्या अभ्यासक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 

मराठवाडा ही संतांची भूमी आहे. श्री गुरु गोबिंदसिंघजी, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या योगदानातून ही भूमी पुनित झाली आहे. या भूमीला येऊन या संतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासमवेत येथील नवनवीन प्रयोगाची पाहणी करता यावी, येथे जे काही चांगले आहे ते इतरत्र सांगता यावे या भूमिकेतून मला येथे उपस्थित राहतांना आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले. 

यावेळी कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठातील विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. यात प्रामुख्याने जैवविविधता, जलपूनर्भरण, आरटीपीसीआर लॅब, क्रीडाक्षेत्र व उपक्रम याविषयी विस्तृत सादरीकरण केले. विद्यापीठातील प्राध्यापक व विभाग प्रमखांशीही त्यांनी संवाद साधला व अडचणी जाणुन घेतल्या. डॉ. राजाराम माने, डॉ. जगदीश कुलकर्णी, डॉ.  घनश्याम यळणे, डॉ. गजानन झोरे, डॉ. सिंकू  कुमार सिंह, व्यवस्थापन परिषद सदस्य परमेश्वर हासबे आदींनी राज्यपालांशी चर्चेत सहभाग घेतला. यानंतर राज्यपालांनी विद्यापीठातील परिसराला भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केली. प्रारंभी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार,  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासमवेत जिल्ह्यातील विकास कामांबाबत चर्चा केली.    

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले तर प्रभारी कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी उपस्थितांचे आभार मानले.

000000






 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारास भेट देवून घेतले पायरीचे दर्शन   

नांदेड (जिमाका) दि. 5 :- राज्यामध्ये विविध ठिकाणी विकासाचे वेगवेगळे प्रकल्प सुरु आहेत. महाराष्ट्राच्या सेवेची संधी मिळाल्यानंतर माझा अशा प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करण्याचा, कुठे काही नवीन असेल तर ते शिकण्याचा व त्यांचा प्रसार करण्याचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. याचबरोबर महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. नांदेड ही यातील महत्वपूर्ण तीर्थस्थळापैकी एक आहे. श्री गुरु गोबिंद सिंघजी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीस माझी यायची मनोमन इच्छा होती. त्या इच्छेने मला इथे येता आले व तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारात जावून पायरीचे दर्शन घेता आले याचा मला मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. आपल्या नांदेड दौऱ्यात त्यांनी आवर्जून तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराची भेट देवून दर्शन घेतले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपाचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने उपस्थित होते. गुरुद्वाराच्यावतीने यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. 



00000

 

आदिवासी विकासासाठी मुली व महिलांच्या 

शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक 

-         - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- राज्यातील आदिवासी क्षेत्राला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुलींच्या शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे. ज्या प्रमाणात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढेल त्याप्रमाणात आदिवासी भागातील महिलांचा विविध विकास योजनेत कृतिशील सहभाग घेता येईल. यादृष्टिने पेसाअंतर्गत आदिवासी विकासासाठी असलेल्या योजनांना अधिक लोकाभीमूख करुन प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत योजना पोहचवाव्यात असे निर्देश महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले. नांदेड येथील मिनी सह्याद्री अतिगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. 

या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, किनवटचे सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी पुरेशी सिंचन व्यवस्था आणि कृषिक्षेत्राला इतर व्यवसायाची जोड असणे आवश्यक आहे. त्यादृष्टिने जिल्ह्यात सिंचनाचे प्रलंबित असलेले प्रकल्प लवकर मार्गी लागल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल. पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन उच्च कृषि तंत्रज्ञानाला चालना दिली पाहिजे. यात बाजारपेठेतील कृषि उत्पादनांच्या मालांना अधिक विश्वासर्हता निर्माण व्हावी यादृष्टिने जीओ टॅग व ग्लोबल गॅप सारख्या प्रणालींचा अधिकाधिक भर देणे आवश्यक असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील विविध विकास योजनांची माहिती राज्यपालांना सादर केली. जिल्ह्यातील पाणंद रस्ते विकास, गाव तेथे स्मशानभूमी, विकेत ते पिकेल, वृक्षलागवड, माझे गाव सुंदर गाव, सामाजिक न्याय आदी विभागातर्फे राबविलेल्या योजनांबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी समाधान व्यक्त केले. हाती घेतलेली कामे गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत याचा ध्यास शासकिय अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे. नांदेड हा केळीसाठी ओळखला जातो. केळीच्या वाहतुकीसाठी किसान रेलच्यादृष्टिने अधिक विचार करण्याचे त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना सांगितले.




ा भ

 

 मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी

सारथी मार्फत स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी मार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य सेवा-अराजपत्रित संयुक्त (गट-ब) पदाच्या स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. सारथीने उपलब्ध करुन दिलेल्या या नि:शुल्क प्रशिक्षणाच्या सुवर्णसंधीचा जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन यश प्राप्त करावे, असे आवाहन व्यवस्थापकिय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे. या सर्व प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत शुक्रवार 13 ऑगस्ट 2021 पर्यंत असून अधिक माहितीसाठी http://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. 

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे मार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी (अराजपत्रित) गट-ब (पीएसआय-एसटीआय- एएसओ) पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. त्यासंबंधीची जाहिरात सारथी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. 

महाराष्ट्र राज्यातील अनेक होतकरु विद्यार्थी राज्यसेवेत आपले भविष्य घडविण्याचे स्वप्न पाहतात परंतू अनेकवेळा आर्थिक पाठबळ व कोचिंग अभावी होतकरु व हुशार विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या रिंगणातून बाहेर पडतात. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेकवेळा आर्थिक विवंचनेमुळे शिक्षण पूर्ण करु शकत नाहीत. त्यामुळे लक्षित गटातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्यसेवा क्षेत्रात सक्षम व उच्चशिक्षित अधिकारी घडविण्यासाठी सारथीमार्फत एमपीएससी (अराजपत्रित) गट-ब (पीएसआय-एसटीओ-एएसओ) ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आयोजित केले आहे. 

या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी सारथी मार्फत अर्ज मागविण्यात आले असून यासाठी विद्यार्थी कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड कागदपत्रे पडताळणीद्वारे करण्यात येईल, असेही आवाहन व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...