Wednesday, March 15, 2017

ग्राहक दिनानिमीत्त वैध मापनच्यावतीने  
गुजराती हायस्कुलमध्ये प्रदर्शन संपन्न
नांदेड दि. 15 :- दरवर्षी 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने यावर्षी साजरा करावयाच्या जागतिक ग्राहक हक्क दिन 2017 साठी "डिजीटल युगात ग्राहकांचे हक्क" या संकल्पनेवर आधारीत सहायक नियंत्रक, वैध मापन शास्त्र नांदेड जिल्हातर्फे गुजराती हायस्कूल, वजिराबाद, नांदेड येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
            या प्रदर्शना मुलांनी ग्राहकांचे हक्क याबाबत माहिती करुन घेतली. ग्राहकांचे हक्क तसेच वजन मापासंबंधात खरेदी करतांना तसेच आवेष्टीत वस्तू खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत वैध मापन शास्त्र सहायक नियंत्रक एस. एन. कवरे, निरीक्षक के. एन. रिठे, एम. आर. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  यावेळी शाळेचे पर्यवेक्षक एस. के.नाईक, आदी शिक्षक तसेच सहायक नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

000000
व्यसन मुक्त क्षेत्रात कार्यरत संस्थांकडून
केंद्रीय अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव मागवले
नांदेड दि. 15 :- नांदेड जिल्ह्यातील व्यसन मुक्त क्षेत्रात काम करीत असलेल्या स्वयंसेवी संस्थांकडून केंद्रीय अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहे , अशी माहिती नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने पाठवावी लागेल. त्यासाठी व्यवसन मुक्ती क्षेत्रात काम करीत असलेल्या संबंधीत स्वयंसेवी संस्थांनी संस्थेची सर्व माहिती पॉवर पॉईंट प्रेझेन्टेंशन स्वरुपात तयार करुन जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयातील समाज कल्याण निरीक्षक कैलास मोरे यांच्याकडे शुक्रवार 18 मार्च 2017 पर्यंत सादर करावेत , असे आवाहन करण्यात आले आहे.

000000
कॅशलेस व्यवहार प्रचार-प्रसारासाठी
जिल्हास्तरीय घोषवाक्‍य स्‍पर्धा
नांदेड दि. 15 :-  रोकडरहीत (कॅशलेस) व्यवहारास अर्थात डिजीटल अर्थप्रणालीला चालना देण्‍यासाठी  भारत सरकार आणि महाराष्‍ट्र शासन यांच्यावतीने शुक्रवार 24 मार्च 2017 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे डिजीधन मेळाव्‍याचे योजन करण्‍यात आले आहे. या मेळाव्‍याचे औचित्‍य साधुन कॅशलेस व्‍यवहारांच्‍या प्रचार आणि प्रसारासाठी शासनातर्फे घोषवाक्‍य स्‍पर्धा आयोजीत करण्‍यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
स्‍पर्धेतील विजेत्‍यांना शुक्रवार 24 मार्च 2017 रोजी डिजीधन मेळाव्‍यात पारितोषिक सन्‍मानित करण्‍यात येणार आहे. यास्‍पर्धेत सहभागी होण्‍यासाठी nanded.gov.in या नांदेड जिल्‍हयाच्‍या अधिकृत संकेस्‍थळावरील घोषवाक्‍य स्‍पर्धा किंवा जिल्‍हयाच्‍या अधिकृत मोबाईल अॅप "आपलं नांदेड"चा वापर करावा लागेल.
या स्पर्धेसाठी अटी पुढील प्रमाणे- घोषवाक्‍य स्‍पर्धेत सहभागी होण्‍यासाठी केवळ ऑनलाईन प्रणालीचाच वापर करावा. छापील किवा हस्‍तलिखीत किंवा अन्‍य कोणत्‍याही माध्‍यमातून प्रवेशिका स्‍विकारल्‍या जाणार नाहीत. स्‍पर्धेसाठी जास्‍तीत जास्‍त दोन घोषवाक्‍य पाठविण्‍यात याव्‍यात. एका स्‍पर्धकाला एकच प्रवेशिका भरता येईल. स्‍पर्धक नांदेड जिल्‍हयाचा रहिवाशी असावा. स्‍पर्धेचा कालावधी गुरुवार 16 मार्च ते सोमवार 20 मार्च 2017 असून त्‍यानंतर ऑनलाईन सुविधा बंद करण्‍यात येईल. स्‍पर्धेचा निकाल डिजीधन मेळाव्‍यात जाहीर करण्‍यात येईल. स्‍पर्धेत पात्र झालेल्‍या स्‍पर्धकांना बुधवार 22 मार्च 2017 रोजी स्‍वत:चे ओळखपत्र  पडताळणीसाठी घेऊन समक्ष उपस्थित रहावे लागेल. ओळखपत्र पडताळणीस अनुपस्थित राहिलेल्या स्पर्धकाचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही. ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल. या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी , असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  

0000000
अवकाळी पावसाबाबत सतर्कतेचा इशारा
नांदेड दि. 15 :- मराठवाड्यासह विदर्भात येत्या 48 तासात  काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यापार्श्वभुमीवर सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती नियंत्रण कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.  
भारतीय हवामान खात्याच्या या इशारात येत्या 48 तासात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविल्याच्या पार्श्वभुमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने विविध यंत्रणांना सतर्क राहण्याचे सूचना दिल्या आहेत. नागरिकांनीही विशेषत: शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या शेतमालाबाबत दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले.
याशिवाय अत्यावश्यक बाबींसाठी तातडीच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाशी तसेच पुढील दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा. हे क्रमांक असे जिल्हाधिकारी कार्यालय  नियंत्रण कक्ष- 02462-235077, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 1077, महानगरपालिका नियंत्रण कक्ष- 02462 234461, पोलीस नियंत्रण कक्ष- 02462 234720, आरोग्य विभाग- 02462 236699, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 108. आपत्तकालीन परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधता येईल.

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...