Thursday, September 5, 2024

 वृत्त क्र.  811 

गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद शांततेत साजरे करा :  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 शांतता समितीची बैठक ;उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन 

एक गाव एक गणपती संकल्पना, ध्वनी प्रदूषण मुक्त उत्सव राबविण्यावर भर दयावा 

नांदेड दि. 5 सप्टेंबर :-  गणेश उत्सव आणि ईद- ए -मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आले आहेत. जिल्ह्यात हे दोन्ही सण साजरे करतांना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द व शांततेला गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊन एकोप्याने व आनंदाने सण साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आज शांतता समितीच्या बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव,   तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यासह शांतता समितीचे सदस्य व इतर सदस्यांची उपस्थिती होती. 

सोशल मिडियाच्या अफवांना दुर्लक्ष करा 

जिल्ह्यात गणेश उत्सव व ईद ए मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सोशल माध्यमावरील संदेशामुळे जिल्ह्यात शांततेचा भंग होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. याबाबत अगोदर सोशल माध्यमावरील संदेशाची सत्यता तपासून मगच प्रतिक्रिया द्यावी. कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता प्रत्येक नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. कोणत्यातरी वर्षा मधल्या कुठल्यातरी व्हिडिओमुळे संदेशामुळे किंवा पोस्टमुळे आपल्या आजूबाजूंच्या लोकांमध्ये अफवांचा बाजार पसरणार नाही यावर नियंत्रण ठेवण्याचे ही आवाहन त्यांनी केले. तसेच गणेश मंडळानी परवानगी घेवूनच गणेश मुर्तीची स्थापना करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 

यावर्षी दोन्ही धर्मीयाचे सण एकत्र आले आहेत. दोन समाजाने या कालावधीत शांतता व संयम पाळून सण साजरे करावेत. गणपती मंडळानी समाजात तेढ निर्माण होणार नाहीत याची काळजी घेवून देखावे करावेत. तसेच ध्वनी प्रदुषणमुक्त गणेश उत्सव साजरा करण्यावर भर द्यावा ,असे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले. नागरिकांनी स्वत: होवून नियम पाळले तर शांततेचा भंग होणार नाही. प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखून सण आनंदाने साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले. 

जिल्ह्यात एक गाव एक गणवती या संकल्पनेवर भर द्यावा, एकोपा ठेवून सामाजिक सलोखा ठेवावा, गणेश मंडळानी विसर्जनाचा मार्ग प्रशासनास कळावावा. सुरक्षितेच्या दृष्टीने गणेश मंडळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याच्या सूचनाही पोलीस विभागाच्यावतीने देण्यात आल्या.  

मनपाच्यावतीने गणेश उत्सवादरम्यान करण्यात आलेल्या उपाययोजनाबाबत माहिती देण्यात आली. तसेच विसर्जनाच्या दिवशी संकलन केंद्र उभे करण्यात येणार असून नागरिकांनी गणेश मुर्ती संकलन केंद्रातच जमा कराव्यात, पीओपी व प्रतिबंधित मुर्त्यांची स्थापना करू नये मनपाच्यावतीने कळविण्यात आले आहे. 

यावेळी  गणेश उत्सवात विद्युत पुरवठा नेहमी सुरळीत राहील याची काळजी घेतली जाईल. दहा दिवसासाठी पुरविण्यात येणाऱ्या विद्युत पुरवठ्याविषयी विद्युत विभागाच्यावतीने माहिती दिली. प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वाहनाची तपासणी नियमानुसार करुन प्रमाणपत्र निर्गमित केले जाईल. याबाबत पुरविण्यात येणाऱ्या सेवा वेळेत देण्याबाबत माहिती दिली.शांतता समितीच्या सदस्यांनी गणेश उत्सव व ईद ए मिलाद या सणामध्ये येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्या निवारण्यासाठी संबंधित विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगितले. सण उत्सवाच्या काळात शांतता समितीचे सदस्य व सर्व सामाजिक नेत्यांनी आपापल्या समूहात, मोहल्यात, गावात, नगरात शांतता राहील यासाठी स्वतः प्रयत्न करावे. तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.                            

00000











वृत्त क्र.  810 

नुकसानग्रस्त भागाची विभागीय आयुक्तांकडून पाहणी 

नांदेड, दि. 5 सप्टेंबर : - अर्धापूर तालुक्यात 1 ते 3 सप्टेंबर 2024 रोजी अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यातील बराच भाग अतिवृष्टीने बाधीत झाला आहे. महसुल विभागाकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नुकतीच नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पाहणी करताना त्यांच्यासोबत अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार अर्धापूर, नायब तहसिल महसुल-1 , मंडळ अधिकारी, तलाठी  हे उपस्थित होते. 

अर्धापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. विशेषत: दांडेगाव नदी प्रवाहामुळे व आसना नदीच्या बॅक वॉटरमुळे नदी किनाऱ्यावरील गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. नदी लगतचे क्षेत्र 2-3 दिवस पाण्याखाली होते. या क्षेत्रातील पिकांचे व जनावरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. पेरणीलायक असलेल्या 26 हजार 440 हे. आर क्षेत्रापैकी प्राथमिक अहवालानुसार 22 हजार 650 हे. आर. क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज असून,  याबाबतचा अहवाल शासनास कळविला आहे. गटविकास अधिकारीतालुका कृषी अधिकारी या कार्यालयाचे कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्यामार्फत पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. तरी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी आपले आधार कार्डबँक पासबुकची प्रत व मोबाईल क्रमांक सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याकडे द्यावेतअसे आवाहन तहसिलदार अर्धापूर यांनी केले आहे.

00000 

कृपया पंचनामे सुरू असतानाची छायाचित्रे या वृत्ता सोबत वापरावी ही विनंती.









 



 

 


 वृत्त क्र.  809 

शहरात नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक मदत करा : गिरीश महाजन

 पालकमंत्र्यांकडून शहरातील अनेक वस्त्यांची पाहणी 

नांदेड दि. 5 सप्टेंबर : नांदेड महानगर व जिल्ह्यामध्ये एक व तीन सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीने शहराच्या अनेक भागात नुकसान झाले आहेत. ज्यांची नुकसान झाले ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले अशा सर्व लोकांना तातडीची मदत करा असे निर्देश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत.    

लातूर येथील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री गिरीश महाजन गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी लातूर व नांदेड दोन्हीही ठिकाणी नुकसान झालेल्या क्षेत्रात जाऊन पाहणी केली. मंगळवारी त्यांनी लोहा तालुक्यातील नुकसानाची पाहणी केली त्यानंतर काल राष्ट्रपती महोदयांच्या दिल्ली येथील प्र स्थानानंतर रात्री उशिरा त्यांनी शहरातील ज्या भागांमध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसान झाले,त्या भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. 

महानगरातील गाडीपुरा भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, उपायुक्त गिरीश कदम यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले, अनेक घरांची पडझड झाली. या भागातील नागरिकांसोबत, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः संवाद साधून वस्तुस्थिती जाणून घेतली. पूर परिस्थिती नंतर प्रशासनाकडून कोणती तत्कालिक व्यवस्था झाली याबाबत ही माहिती घेतली. तसेच राहण्यायोग्य घरे होईपर्यंत ज्यांना ज्यांना निवारा दिला आहे त्यांना तातडीची मदत करण्याचे ही त्यांनी यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांना आदेश दिले. 

राज्य शासनाने तातडीच्या मदतीचे सर्व निकष बदलले असून नव्या निकषानुसार तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी. निवारा भोजन व अन्य व्यवस्था करून देण्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी महानगरपालिका व शहरातील पंचनामांचे काम युद्ध पातळीवर करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. एक-दोन दिवस पावसाची शक्यता असल्यामुळे पंचनाम्याला वेळ झाला तरी प्रत्येक नुकसानग्रस्त घराची पाहणी करण्याबाबतही त्यांनी स्पष्ट केले. 

नदीकाठच्या वस्त्यांमध्ये झालेले नुकसान व त्यावरच्या कायमस्वरूपी तोडग्याबाबत महानगरपालिका करत असलेल्या उपाययोजना त्यांनी जाणून घेतल्या. अधिक गतीने कामे करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

00000








महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...