Tuesday, January 25, 2022

 जिल्‍हयात राष्‍ट्रीय मतदार दिन उत्‍साहात साजरा

लोकशाही संकल्‍प पत्र, आकाश कंदील आणि भित्‍तीपत्रक प्रदर्शनाचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 25 :- मतदारामध्ये मोठया प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो. आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने 12 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी उपस्थितांना राष्‍ट्रीय मतदार दिनाची शपथ देवून, लोकशाही बळकट करण्‍यासाठी मतदारामध्‍ये मोठया प्रमाणात जन जागृती करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. 

जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे मार्गदर्शनाखाली यावर्षीचा 12 वा राष्ट्रीय मतदार दिन कोविड -19 संदर्भात शासनाने निर्धारीत केलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्‍हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उप जिल्‍हाधिकारी प्रदीप कुलकर्णी व उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी श्रीमती दीपाली मोतीयेळे, उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) श्रीमती संतोषी देवकुळे, उपविभागीय अधिकारी भोकर राजेंद्र खंदारे, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार किरण आंबेकर व अधिकारी /कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

यावेळी जिल्ह्यातील नवमतदार, दिव्‍यांग, बेघर मतदार यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते मतदान ओळखपत्राचे वाटप करण्‍यात आले. उत्‍कृष्‍ट मतदार नोंदणी अधिकारी म्‍हणून राजेंद्र खंदारे, उत्‍कृष्‍ट निवडणूक नायब तहसिलदार म्‍हणून श्रीमती उर्मिला कुलकर्णी, उत्‍कृष्‍ट बीएलओ म्‍हणून राजेंद्र कळसे व आर सी दंडेकर यांना मान्‍यवरांचे हस्‍ते मानचिन्‍ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्‍यात आले. राज्‍य स्‍तरावरील लोकशाही भोंडला स्‍पर्धेतील विजेत्‍या श्रीमती डॉ. उज्‍वला सदावर्ते यांनाही मान्‍यवरांचे हस्‍ते मानचिन्‍ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्‍यात आले. जिल्‍हा व तालुकास्‍तरावर राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून निवडणूक प्रक्रिया व मतदान अधिकार याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्‍यात आलेल्‍या विविध स्‍पर्धेतील विजेत्‍यांना मानचिन्‍ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्‍यात आले. 

प्रास्‍ताविक उपजिल्‍हाधिकारी निवडणूक श्रीमती दीपाली मोतीयेळे यांनी केले तर सूत्र संचालन नायब तहसिलदार श्रीमती स्‍नेहलता स्‍वामी यांनी केले. आभार प्रदर्शन तहसिलदार किरण आंबेकर यांनी केले. कार्यक्रमाच्‍या यशस्वी करण्यासाठी नायब तहसिलदार देविदास पोटे, नायब तहसिलदार श्रीमती स्नेहलता स्‍वामी / श्रीमती उर्मिला कुलकर्णी निवडणूक शाखेतील अधिकारी /कर्मचारी व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले. जि.प. वाघी शाळेतील स्‍काऊट गाईड विद्यार्थींनीही या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

0000





 बेरोजगार युवक-युवतींसाठी ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 25 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्रातर्फे 26 ते 29 जानेवारी 2022 या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे हस्ते 26 जानेवारी रोजी पोलीस मुख्यालय, कवायत मैदान, वजिराबाद नांदेड येथे होणार आहे.

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी महास्वयंम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक (02462)251674 किंवा कार्यालयाचा ई-मेल आयडी nandedrojgar@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. या रोजगार मेळाव्यास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर हे उपस्थिती असणार आहेत. या रोजगार मेळाव्यात एकूण 32 नामांकित कंपन्याचे एकूण 3 हजार 550 रिक्त पदांची ऑनलाईन भरती होणार आहे असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
000000

 

 ई-पीक ॲपद्वारे पीक पेऱ्याची नोंदणी करण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 25 :- आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत 2021-22 मध्ये तूर, हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपद्वारे पीक  पेऱ्यांची नोंद सातबारा उतारा जोडणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना 15 फेब्रुवारीपर्यत पीक पेरा नोंदणी करता येणार आहे. ई-पीक ॲपद्वारे पीक पेऱ्याची नोंद केल्यास ऑनलाईन नोंदणी करता येणार नाही. ई-पीक ॲपद्वारे पीक पेऱ्याची नोंद करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.  

0000

 नांदेड जिल्ह्यात 454 व्यक्ती कोरोना बाधित

तर 510 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 746 अहवालापैकी 454 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 330 तर अँटिजेन तपासणीद्वारे 124 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 99 हजार 433 एवढी झाली असून यातील 92 हजार 572 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 4 हजार 201 रुग्ण उपचार घेत असून यात 5 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे धर्माबाद तालुक्यातील करखेली येथील 68 वर्षाच्या एका महिलेचा सोमवार 24 जानेवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 660 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 211, धर्माबाद 5, लोहा 15, हिमायतनगर 1, माहूर 2, पुणे 1, वाशीम 2, नांदेड ग्रामीण 28, कंधार 9, मुदखेड 3, अर्धापूर 3, परभणी 8, उमरखेड 2, निजामाबाद 1, भोकर 2, हदगाव 2, मुखेड 4, बिलोली 2, हिंगोली 2, मुंबई 1, चंदिगड 1, देगलूर 13, किनवट 3, उमरी 1, नायगाव 5, यवतमाळ 1, औरंगाबाद 1, उत्तर प्रदेश 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 23, देगलूर 5, माहूर 3, नांदेड ग्रामीण 14, धर्माबाद 25, मुदखेड 2, अर्धापूर 4, कंधार 1, नायगाव 16, बिलोली 13, किनवट 18 असे एकुण 454 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 398, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 96, खाजगी रुग्णालय 11, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1 असे एकुण 510 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 39, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 3 हजार 97, हदगाव कोविड रुग्णालय 4, खाजगी रुग्णालय 34, किनवट कोविड रुग्णालय 2 असे एकुण 4 हजार 201  व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 35 हजार 351

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 20 हजार 896

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 99 हजार 433

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 92 हजार 572

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 660

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.09 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-49

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-4 हजार 201

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-5. 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

माझा मराठवाडा, माझे नांदेड आणि माझा महाराष्ट्र

या भूमिकेतून विकासाला न्याय देऊ

-  पालकमंत्री अशोक चव्हाण

 

·         नांदेड शहरात लवकरच सहा पदरी सिमेंट रस्ते

·         सहसंचालक धर्मादाय कार्यालय लवकर येणार    

नांदेड (जिमाका) दि. 25 :- नांदेड जिल्ह्याच्या विकासाची बांधिलकी ही  राजकीय भूमिकेतून नाही तर आत्मीयतेतून स्विकारलेली आहे. स्व. शंकरराव चव्हाण यांनीही हाच बाणा आयुष्यभर जपून तो वारसा आमच्याकडे दिला आहे. त्यांनी जी दूरदृष्टी आणि जो पाया नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी रचला त्या पायावर नांदेड जिल्ह्यासह नांदेडला महानगराचे वैभव विविध विकास कामांच्या माध्यमातून आणू असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

सार्वजनिक बांधकाम  मंडळ नांदेड यांच्यावतीने शहर रस्ते सुधारणा प्रकल्प अंतर्गत विविध विकास कामांचे प्रातिनिधीक भूमिपूजन आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.  

ओम मंगल कार्यालय कौठा येथे आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर सौ. जयश्री पावडे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, मनपा सभापती संगिता डक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बसवराज पांढरे, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले आदींची उपस्थिती होती. 

नांदेड महानगर शैक्षणिक हब म्हणून नावारुपास आले आहे. आरोग्य सेवा-सुविधेचे हब म्हणूनही नांदेड महानगर विकसीत झाले आहे. या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालय व इतर सेवा-सुविधा लक्षात घेता आणखी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या तर आपण इतर महानगराच्या तुलनेत कुठेही कमी नाही आहोत. या महानगराच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध असून विकास कामांसाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

कुठल्याही शहराची ओळख ही तेथील रस्त्यावरून होत असते. ज्या शहरातील रस्ते चांगले असतात तेथे विकासही चांगला होतो, ही बाब लक्षात घेवून नांदेड शहरात सहा पदरी रस्ते तयार करण्यात येणार आहेत. नांदेड शहरातील डॉ. शंकराराव चव्हाण चौक-माळटेकडी गुरूव्दारा-नमस्कार चौक-एमजीएम कॉलेज संरक्षण भिंत-महाराणा प्रताप चौक-बाफना टी पॉईंट या रस्त्याचा विकासात अंर्तभाव आहे. याचबरोबर बसस्थानक-रेल्वेस्टेशन ते बाफना टी पॉईंट पर्यंत रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटीकरण, नाली बांधकाम, रस्ता दुभाजकासह संगमस्थळांची सुधारणा या पहिल्या टप्पयातील कामाची सुरुवात केली. ही सर्व विकास कामे तीन टप्प्यामध्ये पूर्ण करुन नांदेडचा कायापालट करू, असे त्यांनी सांगितले. 

या कामामुळे  वाहतुक व्यवस्थेवरील ताण कमी होणार असून  यामुळे शहराचा विकास जलगतीने होणार आहे. ही सर्व कामे तातडीने आणि जलद गतीने येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. रस्ते तयार करताना सांडपाणी, वाहुन नेणाऱ्या पाईपाईलनची उत्तम व्यवस्था तयार करण्यात येणार आहे.

00000





 प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री

अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन 

नांदेड (जिमाका) दि. 25  :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार 26 जानेवारी 2022 रोजी नांदेड वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे.  

कोविड-19 चा प्रादुर्भाव असल्याकारणाने सर्व निमंत्रितांनी मास्क घालुनच कार्यक्रमास उपस्थित रहावे. तसेच सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्यादृष्टिने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ, आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.

000000


 गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून

नांदेड पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कौतुक

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :-  राज्याच्या सिमेवर असलेल्या जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनराज्य उत्पादन शुल्क तसेच इतर विभागांना नेहमीच दक्षता घ्यावी लागते. कर्नाटकाच्या सीमेवर देगलूर व मुखेड तालुक्यात नांदेड पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने दोन दिवसापुर्वी धाडसी कारवाई करुन सुमारे 20 लाख 50 हजार रुपये किंमतीचा अवैध दारु साठा जप्त केला.  या कारवाई व दक्षतेबद्दल राज्याचे गृह (ग्रामीण)वित्तनियोजनराज्य उत्पादन शुल्ककौशल्य विकासरोजगार व उद्योजकतापणन राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी समाधान व्यक्त केले. येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी नांदेड जिल्ह्यातील गृह विभागाचा आढावा घेतला. 

या आढावा बैठकीस विशेष पोलीस महानिरीरीक्षक निसार तांबोळीपोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळेराज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थिती होते.

 

जिल्ह्यात मागील दोन दिवसापूर्वी राज्य उत्पादक शुल्क देगलूर विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे दारूबंदी गुन्ह्याखाली मुखेड तालुक्यातील एकलारा व देगलूर तालुक्यातील तमलूर येथे छापा मारून 20.50 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे उत्पादन शुल्क भरलेले हजार 100 बॉक्स घेऊन निघालेल्या वाहनातील मद्यसाठा अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने इतरत्र साठवून नंतर त्या वाहनाची तुळजापूर येथे अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला होता. यातील 415 बॉक्स तुळजापूर पोलीसांनी तर 30 बॉक्स हट्टा पोलीसांनी जप्त केले आहेत. उर्वरीत 262 बॉक्स मद्यसाठा निरीक्षक देगलूर यांनी मुखेड व देगलूर तालुक्यात ठिकाणी जप्त केला आहे. या कारवाईत राज्य उत्पादक शुल्क व पोलीस विभागाच्या कामाचे कौतुक केले.

000000

 पेंटर जनरल पदासाठी

अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बिलोली येथे नियमित शिक्षक रुजू होईपर्यत पेंटर जनरल  या व्यवसायाचे एक पद निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर शिल्प निदेशकांची आवश्यकता आहे. यासाठी As per DGT norms & conditions https://dgt.gov.in/cts-details या संकेतस्थळावर शैक्षणिक अर्हता व अनुभव याबाबत व्यवसाय निहायपदनिहाय माहिती उपलब्ध आहे. शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेल्या उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह अर्ज बुधवार 26 जानेवारी 2022 पर्यंत कार्यालयात पाठवावे, असे आवाहन बिलोली औद्योगिक प्रशिक्षण संस्थचे प्राचार्य यांनी केले आहे.

 

विहित मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. प्राप्त अर्जापैकी पात्रताधारक उमेदवारांनी कौशल्य चाचणी व प्रात्यक्षिक चाचणी इत्यादीसाठी भ्रमणध्यवनी किंवा ईमेलद्वारे कळविण्यात येईल. तासिका तत्वावरील पदासाठी मानधन व अटी शर्ती कौशल्य विकास उद्योजकता विभाग शासन निर्णय क्रमांम आटीसी-2615/प्र.क्र.146 व्यशि-3 दि. 15 नोंव्हेंबर 2018 नुसार राहतील, असेही औद्योगिक प्रशिक्षण संस्था बिलोली यांनी कळविले आहे.

0000

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...