Monday, December 23, 2024

 वृत्त क्र. 1226

माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी

 २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक  

नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी उद्या नांदेडचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण व लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे माळेगाव तीर्थक्षेत्राला २५ डिसेंबरला दुपारी 2 वा. आढावा बैठक घेणार आहेत. सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माळेगाव येथे बोलवण्यात आले आहे. 

दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळेगाव येथील यात्रेला 29 तारखेपासून सुरूवात होणार आहे. 29 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत विविध आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या परंपरेनुसार व निर्धारीत हे कार्यक्रम होणार आहेत. तथापि या ठिकाणी येणाऱ्या लाखोच्या संख्येतील श्रद्धाळू भाविक व यात्रेकरूंचा ओघ बघता प्राथमिक सुविधा चौख असाव्यात यासाठी हे आयोजन असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी यासंदर्भात संबंधित सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

0000

 वृत्त क्र. 1225

अडचणीतील महिलांनी निवाऱ्यासाठी

महिला राज्यगृहाशी संपर्क साधावा  

नांदेड दि. 23 डिसेंबर :- निराधार, विधवा, कुमारीमाता, परितक्त्या, अत्याचारित महिलांसाठी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा व पुनर्वसनाची जबाबदारी शासन घेत आहे. अशा महिलांनी न बिचकता शासनाच्या सुविधांचा वापर करावा व निवाऱ्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय महिला राज्य गृह नांदेड येथील अधिक्षक श्रीमती ए. पी. खानापूरकर यांनी केले आहे.  

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतीगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रित व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. 18 ते 60 वर्षापर्यंतच्या निराधार, विधवा, कुमारीमाता, परितक्त्या, अत्याचारित महिला यांना याठिकाणी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन व पुनर्वसनाची व्यवस्था केली जाते. संबंधित महिलांनी किंवा अशा पद्धतीच्या गरजू महिला लक्षात आलेल्या कोणत्याही नागरिकांनी यासाठी अशा महिलांना मदत करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.  

समस्याग्रस्त 18 वर्षापुढील महिलांनी कोणावरही अवलंबून न राहता आपल्या या हक्काच्या शासकीय निवाऱ्याची सोय स्वत:साठी करून घ्यावी. अधिक माहितीसाठी माता अनुसया शासकीय महिला वसतीगृह हॉटेल भाईजी पॅलेजच्या पाठीमागे शिवाजीनगर उड्डानपूल परिसर शिवाजीनगर नांदेड येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक 02462-233044 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधिक्षक श्रीमती ए. पी. खानापूरकर यांनी केले आहे. 

0000

 वृत्त क्र. 1224

सुशासन सप्ताह अंतर्गत रोजगार हमी 

लसंधारणाच्या कामाचा आढावा 

 नांदेड दि. 23 डिसेंबर :-  19 ते 25 डिसेंबर सुशासन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सुशासन सप्ताहमध्ये दिर्घकालीन व शाश्वत विकासाच्या अनेक उपक्रमांना स्थानिक प्रशासनाने गती देण्याला प्राधान्य दिले आहे. आज या सुशासन सप्ताह अंतर्गत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्ह्यातील यंत्रणेचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनामध्ये आज या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रामुख्याने यावेळी रोजगार हमी व जलसंधारणाच्या संदर्भातील आढावा घेतला. यात जलयुक्त शिवार, नरेगा, पांदण रस्ते, विहिर बांधकाम, गाळमुक्त तलाव, शेततळे, शोषखड्डे, घरकुल, चारा लागवड, बांबुलागवड तसेच जलसंधारणांतर्गत शेततळे, तुषारसिंचन, सुक्ष्मसिंचन, मृदजलसंधारण आदी संदर्भात आढावा घेण्यात आला. 

पावसाळा लागण्यापूर्वी यासंदर्भातील कामांचे नियोजन आवश्यक आहे. तसेच या आर्थीक वर्षातील पुढील तीन महिने बाकी असून यामध्ये खर्चाचे नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे तातडीने संपूर्ण यंत्रणेने याबाबत काम करावे, असे आवाहनही करण्यात आले. बैठकीला उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी रोहयो ललीतकुमार वऱ्हाडे यांच्या विभाग प्रमुख उपस्थित होते. 

0000








 वृत्त क्र. 1223

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड चाचणी 

नांदेड दि. 23 डिसेंबर :- राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन राजस्थान राज्यात जयपूर येथे 7 ते 13 जानेवारी 2025 पर्यंत केले आहे. या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांसाठी खुल्या गटाची राज्य निवड चाचणी घेतली जाणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड करण्याचे प्रयोजन आहे. या निवड चाचणीसाठी क्रीडापटूंनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. 

इंडियन असोसिएशनद्वारा ऑलिम्पिक अॅडहॉक समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. अॅडहॉक समिती व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. महिला व पुरुष गटासाठी पुणे येथील आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे 26 डिसेंबर रोजी सकाळी 8 वा. चाचणी घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी पुणे येथील जिल्हा क्रीडा अधिकारी श्री कसगावडे मो.नं. 9422518422  यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड कार्यालयाने केले आहे.

0000

 दि. 22 डिसेंबर, 2024

                                                                                  वृत्त क्र. 304

राज्य मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर

 

मुंबई, दि.22 : - राज्य  मंत्रिमंडळांचे खातेवाटप  21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाचे खाते वाटप पुढील प्रमाणे-

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस : गृह, ऊर्जा (अपारंपारिक ऊर्जा वगळून) विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय.

उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे : नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम)

उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार : वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क. 

 

मंत्री 

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : महसूल

श्री. राधाकृष्ण विखे - पाटील : जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)

श्री. हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण 

श्री. चंद्रकांत(दादा) पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य 

श्री. गिरीश महाजन : जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन.

श्री. गणेश नाईक : वने

श्री. गुलाबराव पाटील: पाणी पुरवठा व स्वच्छता. 

श्री. दादाजी भुसे: शालेय शिक्षण.

श्री.  संजय राठोड : मृद व जलसंधारण.

श्री. धनंजय मुंडे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण. 

श्री. मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता. 

श्री. उदय सामंत : उद्योग, मराठी भाषा 

श्री. जयकुमार रावल : पणन, राजशिष्टाचार. 

श्रीमती पंकजा मुंडे : पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन. 

श्री. अतुल सावे : इतर मागास बहूजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक उर्जा 

श्री.  अशोक उईके : आदिवासी विकास. 

श्री. शंभूराज देसाई : पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण.

अॅड.आशिष शेलार : माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य. 

श्री. दत्तात्रय भरणे : क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ. 

कु. आदिती तटकरे : महिला व बालविकास. 

श्री. शिवेंद्रसिंह  भोसले : सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून).

अॅड. माणिकराव कोकाटे : कृषी. 

श्री. जयकुमार गोरे : ग्रामविकास व पंचायतराज. 

श्री. नरहरी झिरवाळ : अन्न व औषध प्रशासन , विशेष सहाय्य. 

श्री. संजय सावकारे : वस्त्रोद्योग. 

श्री.  संजय शिरसाट : सामाजिक न्याय. 

श्री. प्रताप सरनाईक : परिवहन 

श्री. भरत गोगावले : रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास. 

श्री. मकरंद जाधव-(पाटील): मदत व पुनर्वसन.

श्री. नितेश राणे : मत्स्यव्यवसाय व बंदरे. 

श्री. आकाश फुंडकर : कामगार. 

श्री. बाबासाहेब पाटील : सहकार. 

श्री. प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण. 

 

राज्यमंत्री

अॅड. आशिष जयस्वाल : वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार, 

श्रीमती माधुरी मिसाळ : नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ. 

डॉ पंकज भोयर : गृह ( ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म. 

श्रीमती मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम). 

श्री. इंद्रनील नाईक : उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद आणि जलसंधारण. 

श्री. योगेश कदम : गृह ( शहरी) महसूल, ग्रामविकास आणि पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन. 

0000

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...