Saturday, October 20, 2018


टंचाईग्रस्त भागात कायमस्वरुपी  
उपाय योजनांसाठी शासन प्रयत्नशील
- पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर  
नांदेड, दि. 20 :- टंचाईग्रस्त भागात कायमस्वरुपी उपाय योजनांसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या भेटीच्या अनुषंगाने पशुसंवर्धन मंत्री श्री. जानकर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांचे दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
बैठकीस आमदार सुभाष साबणे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. मिनल पाटील-खतगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी,  जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा उपनिबंधक पी. आर. फडणीस, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. रत्नपारखे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी श्री. डोईफोडे, जिल्हा कृषि अधिकारी श्री. नादरे यांची प्रमुख उपस्थिती होती.   
श्री. जानकर म्हणाले, एकात्मिक शेतीसह दुग्धव्यवसाय, कुक्कुट पालन, मत्स्यव्यवसाय यांची एकत्रीत जोड करुन वर्षेभर रोजगार व उत्पन्न मिळेल अशी व्यवस्था ग्रामीण स्तरावर करण्यात यावी. शेतकऱ्यांनी किमान 20 गुंठे चारा लागवड करुन उत्पादीत चाऱ्यातून जिल्ह्याची गरज भागवून इतर टंचाईग्रस्त भागास चारा पुरवठा करावा. तसेच राष्ट्रीय दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत समाविष्ट जिल्ह्यातील पाच तालुक्यांना वगळून इतर तालुक्यांना जिल्हा नियोजन समितीकडून मदत करावी. पांदण रस्ते राज्य मार्गात समाविष्ट झाल्यास पक्के रस्ते करण्यासाठी निधी दिला जाईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील. विकास कामांबाबत मंत्रालयात नागरिकांच्या चकरा होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांचे अधिकार वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती श्री. जानकर यांनी दिली.   
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कॅन्सरमुक्त जिल्हा करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे श्री. जानकर यांनी अभिनंदन केले.   
आमदार सुभाष साबणे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. मिनल पाटील-खतगावकर यांनी पिक परिस्थितीसह विविध विकास कामांबाबत चर्चेत सहभाग घेऊन उपयुक्त सुचना केल्या. जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी उभारी योजनेतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत केली जात असल्याने सांगून जिल्ह्यातील विविध विकास कामांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. काकडे यांनी जिल्हा परिषदेतील विविध विकास कामांना लागणारा निधी व योजनेची माहिती दिली.
बैठकीत पर्जन्यमान, टँकर, हवामान, पिक परिस्थिती, पिक कापणी प्रयोग, पैसेवारी, दुष्काळ सदृष्य परिस्थिती, चाराटंचाई / चारा छावणी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व सोयाबीन पिकातील खोडकिडीचे व्यवस्थापन आदी विषयांवर चर्चा करुन उपयुक्त सुचना देण्यात आल्या.
शेवटी आभार निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वेणीकर यांनी मानले. बैठकीस पाणी पुरवठा, सहाय्यक आयुक्त व पशुधन विकास अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...