Saturday, June 10, 2023

कृपया सुधारित वृत्त

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नांदेड विमानतळावर स्वागत 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे आज दुपारी येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनीही त्यांचे स्वागत केले.


यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार प्रविण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. एस. एम. महावरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले, मनपा आयुक्त महेश डोईफोडे, संजय कोडगे, व्यंकटराव गोजेगावकर, चैतन्यबापू देशमुख, संतुक हंबर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

000000


छाया : सदा वडजे








तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले दर्शन  

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- केंद्रीय गृह  व  सहकार मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे जाऊन गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने त्यांचा पारंपरिक पद्धतीने केसरी चोला, पगडी, शिरोपा देवून सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे मुख्य प्रशासक डॉ. पी. सी. पसरीचा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  

00000










एमएच-बीएससी नर्सिग सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 एमएच-बीएससी नर्सिग सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- एमएच-बीएससी नर्सिग सीईटी परीक्षा-2023 रविवार  11 जून 2023 रोजी तीन सत्रात जिल्ह्यात 2 परीक्षा केंद्रावर सकाळी 9.30 ते सायं 4.30  या वेळेत घेण्यात येणार आहेत. या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होऊ नये व परीक्षा स्वच्छ सुसंगत पार पाडण्याच्यादृष्टिने या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी काढले आहेत. 

 

या परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात रविवार 11 जून 2023 रोजी सकाळी 7 ते सायं 7 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता  येणार नाही. परीक्षा कालावधीत या परीसरात 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, पेजर, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  

00000

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

 दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे

संभाव्य वेळापत्रक जाहीर   

नांदेड (जिमाका) दि. 10:-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीची पुरवणी लेखी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये आयोजित केली आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) लेखी परीक्षा मंगळवार 18 जुलै 2023 ते मंगळवार 8 ऑगस्ट 2023 या कालावधी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) व्यवसाय अभ्यासक्रम लेखी परीक्षा मंगळवार 18 जूलै 2023 ते शनिवार 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत होईल. तर इयत्ता 10 वी लेखी परीक्षा मंगळवार 18 जुलै ते मंगळवार 1 ऑगस्ट 2023  या कालावधीत होईल. दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. 

परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम राहील. छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटस्ॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये. 

इ. 10 वी प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा मंगळवार 18 जुलै 2023 ते मंगळवार 1 ऑगस्ट 2023 व इ. 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा मंगळवार 18 जुलै 2023 ते शनिवार 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे संबंधितानी यांची नोंद घ्यावी असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

00000

 छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर

यांचा सामाजिक समतेचा वारसा जपण्याची आवश्यकता

- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर आदी मान्यवरांचा सामाजिक समतेचा वारसा लाभलेला आहे. हा समृद्ध वारसा अधिक जबाबदारीने जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. बोंढार हवेली येथे अक्षय भालेराव याची हत्या ही अत्यंत दुर्देवी असून सामाजिक समतेच्या विचाराचा हा पराभव असल्याची खंत केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तिकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. बोंढार हवेली येथे आज त्यांनी पिडित कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. याचबरोबर केंद्र शासनाच्यावतीने पिडित कुटूंबियांना शासनाच्या तरतुदीप्रमाणे 8 लाख 25 हजार रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली. यातील 4 लाख 12 हजार 500 रुपयांचा धनादेश त्यांनी पिडित कुटुंबियांकडे हस्तांतरीत केला.

 

या भेटीनंतर त्यांनी नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाला निर्देशही दिले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, समाज कल्याण अधिकारी बापु दासरी, सत्येंद्र आऊलवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

पिडित कुटुंबाला पुन्हा आत्मविश्वास देऊन उभे करणे हे सर्व समाजाचे कर्तव्य आहे. याचबरोबर जिल्हा प्रशासनानेही शासन स्तरावर उपलब्ध असलेल्या तरतुदीप्रमाणे सर्वतोपरी सहाय्य केले पाहिजे. आजही या गावात जे कुटुंब भयाच्या सावटाखाली राहत आहे त्यांची इतर ठिकाणी व्यवस्था होते का हे तपासून घेण्याची आवश्यकता असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. या गावात पिडित व भयाच्या सावटाखाली जर कोणी कुटुंब असतील तर त्यांचे पूनर्वसनही होणे गरजेचे आहे. यादृष्टीने सिडको, मनपाची घरे अथवा बाहेरगावी त्यांच्या निवाऱ्यासाठी नियमाप्रमाणे उपलब्धतेप्रमाणे 33 बाय 33 आकाराचा प्लॉट / जागा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या. प्लॉट / मनपाची घरे, सिडकोची घरे यापैकी ज्या ठिकाणी नियमाप्रमाणे जे शक्य असेल त्याबाबत जिल्हा प्रशासनाने तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

 

समाजातील सर्वच घटकांचा विकास व्हावा ही भूमिका सामाजिक न्याय विभागाचा राज्यमंत्री म्हणून कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या गटातील मराठा समाजालाही आरक्षण मिळावे ही भूमिका आम्ही घेतली आहे. सर्वांनाच समान विकासाची संधी मिळावी, ही त्यामागची भूमिका आहे. महाराष्ट्रात सामाजिक न्यायासाठी सर्व समाजात परस्पर न्यायाची असलेली भूमिका ही अत्यंत महत्वाची असून सामाजिक सलोखा व एकात्मता वाढवण्यासाठी सर्वांनीच अधिक जबाबदार भूमिका घेतली पाहिजे, अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

00000







  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...