Thursday, September 29, 2016

स्तन कर्करोग जागृती, मार्गदर्शन आणि उपचारासाठी
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोहिम
नांदेड दि. 29 :- महिलांमध्ये स्तन कर्करोगाबाबत जागृती व्हावी व मोठ्या प्रमाणात विनामूल्य तपासणी व्हावी या उद्देशाने ऑक्टोबर महिना हा जागतिक स्तन कर्करोग जागृती महिना म्हणून राज्यभरात साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे.
त्यानिमित्ताने डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नांदेड येथे 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2016  या कालावधीत अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे स्तनाच्या कर्करोगाबद्दल विनामूल्य तपासणी, प्रशिक्षण, उपचार व जनजागृतीची  मोहीम आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र बाह्यरुग्ण विभाग क्र. 118  येथे स्वतंत्र कक्ष स्थापित करण्यात आला आहे. 
शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 10.30 वा. या तपासणी मोहिमेचे औपचारिक उद्घाटन  जिल्हाधिकारी सुरेश काकाणी  यांच्या  उपस्थितीत  होणार आहे. यात  महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी भित्तीपत्रकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. शनिवार 1 ऑक्टोबर पासून या उपक्रमास सुरुवात होईल. जास्तीत जास्त महिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. काननबाला येळीकर यांनी केले आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक अशा मॅमोग्राफी या तपासणीने स्तन कर्करोगाचे निदान करणे सोपे झाले आहे. स्तन कर्करोगाच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी सध्या एक अत्याधुनिक वेदनारहित, क्ष किरणमुक्त सोपी पद्धत उपलब्ध आहे. या पद्धतीचे नाव “विनास्पर्श स्तन तपासणी पद्धती असून तिचा जास्तीत जास्त वापर करून रुग्णांचा फायदा व्हावा या साठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्टोबर महिन्यामध्ये स्तन कर्करोगाबाबत जनजागृती आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महिलांची मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. याबाबत महिलांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी आणि निदानात त्यांचे सहकार्य लाभावे हे मोहिम राबविण्याचे उद्दिष्ट आहे.

000000
माजी सैनिकांसाठी सीएसडी कॅन्टीन सुविधा सुरु होणार
नांदेड दि. 29 :- माजी सैनिक, विधवांसाठी सीएसडी कॅन्टीन नांदेड येथील विष्णुपुरी येथे सुरु करण्याची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे.
विष्णुपुरी येथे नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या कॅन्टीनची पाहणी औरंगाबाद छावणीचे स्टेशन कमांडर ब्रिगेडियर सुरिंदर विज यांनी नुकतीच केली. सर्वांचे अभिनंदन करुन माजी सैनिकांची कॅन्टीन येत्या दिवाळीच्या अगोदर सुरु करण्याचे आश्वसित केले. कॅन्टीन सुरु करण्यासाठी नांदेड जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार तसेच माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी संजय पोतदार, कमलाकर शेटे, हयुन पठाण, रामराव थडके, श्री. देशमुख यांनी प्रयत्न केले आहे.

000000
दुय्यम निबंधक नांदेड क्र. 3 कार्यालयाकडून
आय-सरीता प्रणालीद्वारे कामकाज सुरु
नांदेड दि. 29 :- दुय्यम निबंधक नांदेड यांच्या कार्यालयात आय-सरीता प्रणालीद्वारे कामकाज सुरु झाल्याची माहिती सहजिल्हा निबंधक वर्ग 1 यांनी दिली आहे.
दुय्यम निबंधक नांदेड क्र. क्र. 3 कार्यालयास 2014 मध्ये मान्यता मिळाली होती. या कार्यालयात आय-सरीता या प्रणालीसाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून त्याद्वारे आज 29 सप्टेंबर रोजी कामकाजास सुरुवात झाली आहे. या कार्यालयाचा पत्ता दुय्यम निबंधक नांदेड  क्र. 3 श्री. चव्हाण यांची बिल्डींग श्री वेद बँकेच्या पाठीमागे आनंदनगर नांदेड असा असून संबंधितांनी याची नोंद घ्यावे, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग -1 नांदेड यांनी कळविले आहे.

000000
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त
स्त्री रुग्णालय शामनगर येथे आरोग्य तपासणी
नांदेड दि. 29 :-  जागतिक ह्रदय दिन 2016 व आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन व सप्ताह निमित्त स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड येथे 1 ऑक्टोंबर ते 7 ऑक्टोंबर 2016 या कालावधी सकाळी 9 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, मौखीक आरोग्य, ह्दयविकार, मोतीबिंदू इत्यादी आरोग्य विषयक तपासणी व पुढील उपचार करण्यात येणार आहे. या आरोग्यसेवेचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय कंदेवाड यांनी केले आहे.   
राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग  नियंत्रण  कार्यक्रमांतर्गत  जागतिक ह्रदय दिन, आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन व सप्ताह दिनानिमित्त आज जिल्हा रुग्णालय नांदेड येथे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला नर्सिंग स्कुलचे विद्यार्थी, एनसीडी, एनएचएम, ज्येष्ठ नागरिक व जिल्हा रुग्णालयातील  अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा कार्यक्रम नोडल अधिकारी डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी सर्वाना ह्दयविकार आजारापासून दूर राहण्यासाठी दररोज किमान अर्धा तास पायी चालावे. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्यदायी जीवन शैलीचा अवलंब करावा याविषयी माहिती दिली.
जिल्हा  क्षयरोग  अधिकारी डॉ. नागापूरकर म्हणाले की , मानवाची भौतिक सुविधांमुळे शरीराची हालचाल दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे ह्दयविकारासारखे आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी सर्वांनी शरिराची हालचाल होईल अशी कामे करावी. सर्व अवयवांची योग्य हालचाल झाल्यामुळे हृदयविकारापासून दूर राहता येते. डॉ. भोसीकर यांनी लहान मुलांना होणा-या ह्दयविकार बद्दल माहिती दिली. जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ दिपक हजारी यांनी ह्दयविकाराबद्दल  माहिती दिली व ज्येष्ठ नागरिकांनी नेहमी व्यायाम करावे असे सांगितले.
000000



विधानपरिषद उपसभापती
ठाकरे यांचा दौरा पुढे ढकलला  
             नांदेड दि. 29 :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा पूर्वनियोजित शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 रोजीचा नांदेड दौरा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे. अशी माहिती उपसभापती यांच्या कार्यालयाच्यावतीने जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 

000000

लेख

अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांना
कृषि उत्पादन वाढीसाठी अनुदानाच्या विविध योजना  


अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे कृषि उत्पन्न वाढवून त्यांना दारिद्रय रेषेच्यावर आणण्यास सहाय्य करण्याचे दृष्टीने शासनाच्या कृषि विभागामार्फत अनुसूचित जाती उपयोजना ( विशेष घटक योजना ) सन 1982 पासून राज्यात राबविण्यात येते. सन 2016-17 या आर्थीक वर्षात ही योजना राज्यात राबविण्यासाठी शासनाने दिनांक 30 जुलै 2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार 196 कोटी 34 लाख 31 हजार रुपयाची या कार्यक्रमास प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली असून निधी जिल्हास्तरावर उपलब्ध करुन दिलेला आहे. या योजनेविषयी थोडक्यात माहिती…
             
या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पीक संरक्षण, शेतीची सुधारीत अवजारे, बैलगाडी, बैलजोडी, रेडेजोडी, इनवेल बोअरिंग, जुनी विहीर दुरुस्ती, पाईप लाईन, पंप संच, नवीन विहीर, शेततळे, परसबाग लागवड, तुषार / ठिबक सिंचन संच व ताडपत्री या बाबींचा विहित अनुदान मर्यादेत लाभ देण्यात येतो.
            अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या कृषि उत्पादनात वाढ करुन त्यांची आर्थिक उन्नती करणे हे योजनेचे उद्दीष्ट आहे. योजनेची व्याप्ती राज्यातील सर्व 34 जिल्ह्यात आहे.  
            पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत. लाभार्थी अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील असणे बंधनकारक आहे. जमिनीच्या सात/बारा व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे. दारिद्र्य रेषेवरील शेतकऱ्यांसाठी उत्पन्न मर्यादा रुपये 50 हजाराच्या मर्यादेत व उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. लाभार्थींची जमीनधारणा 6 हेक्टर पेक्षा कमी असणे बंधनकारक आहे. दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांना प्राधान्य असणार आहे.  
योजना राबविणारी यंत्रणा जिल्हास्तरावर कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद व तालुकास्तरावर गट विकास अधिकारी कृषि अधिकारी पंचायत समिती आहे.
योजनेच्या लाभाचे स्वरुप पुढील प्रमाणे आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या कृषि विकासाकरीता 14 बाबींवर योजनांतर्गत अनुदान अनुज्ञेय आहे. यामध्ये जमीन सुधारणा एक हेक्टर मर्यादेत 40 हजार रुपयाच्या मर्यादेत. निविष्ठा वाटप एक हेक्टर मर्यादेत 5 हजार रुपयेच्या मर्यादेत. पीक संरक्षण, शेती सुधारीत अवजारे 10 हजार रुपयेच्या मर्यादेत. बैलजोडी / रेडेजोडी 30 हजार रुपयेच्या मर्यादेत. बैलगाडी 15 हजार रुपयेच्या मर्यादेत. जुनी विहिर दुरुस्ती 30 हजार रुपयेच्या मर्यादेत. इनवेल बोअरिंग 20 हजार रुपयेच्या मर्यादेत. पाईप लाईन तीनशे मीटरपर्यंत 20 हजार रुपयेच्या मर्यादेत, पंपसंच 20 हजार रुपयाच्या मर्यादेत. नवीन विहिर (रोहयो योजनेनुसार) 70 हजार ते 1 लाख रुपयेच्या मर्यादेत. शेततळे 35 हजार रुपयेच्या मर्यादेत. परसबाग कार्यक्रम 200 रुपये प्रती लाभार्थी. तुषार, ठिबक सिंचन संच पुरवठा 25 हजार रुपये प्रती हेक्टरच्या मर्यादेत. ताडपत्री 10 हजार रुपये प्रती लाभार्थीच्या मर्यादेत राहील यांचा समावेश आहे.
            या घटकांपैकी लाभार्थींच्या मागणीनुसार आवश्यक त्या घटकांचा लाभ देण्यात येतो. नवीन विहिर घटकांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीना उच्चतम लाभ मर्यादा 70 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत अनुज्ञेय आहे. या लाभार्थीना इतर घटकांचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. नवीन विहीर घटकाव्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना 50 हजार रुपये मर्यादेपर्यंत अनुदान अनुज्ञेय आहे. योजनेचा लाभ लाभार्थ्यास दोन आर्थिक वर्षात देण्यात येतो. इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घेवून आर्थिक उन्नती साधावी.

-         काशिनाथ आरेवार
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड
000000


माजी राष्ट्रपती कलाम यांचा जन्मदिवस
"वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करावा
नांदेड, दि. 29 :-  माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्टोंबर हा त्यांचा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार हा दिन साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा‍ प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
शासन निर्णयानुसार  शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यामध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने यापुर्वी शासनाकडून सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याच्यादृष्टिने सर्व विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था, मंडळ, सार्वजनिक उपक्रम इत्यादी कार्यालयांनी देखील विविध उपक्रमांचे आयोजन करावे.
            शनिवार 15 ऑक्टोंबर रोजी शासकीय कामकाजाच्या वेळेमध्ये किमान अर्धा तास वाचनासाठी देण्यात यावा.  वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी आपले मित्र, कुटुंबातील सदस्य इत्यादींना किमान एक पुस्तक भेट दयावे. व्हॉटशॉप, इंटरनेट, फेसबुक, टिवटर अशा प्रकारच्या सामाजिक प्रसार माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धींगत होईल, वाचनास प्रेरणा मिळेल असे संदेश प्रसारीत करावेत. व्याख्यान, भाषण, चर्चासत्र, सामुहिक वाचन, अभिवाचन, वाचन अनुभव कथन, ग्रंथप्रदर्शन, विविध स्पर्धा इत्यादी पैकी सुयोग्य उपक्रम राबवावेत. विविध क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्ती ज्यांचा वाचक म्हणूनही लौकिक आहे. त्याचे सहकार्य घेऊन आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यात यावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड कार्यालयास सादर करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय सामान्य प्रशासन शाखा यांनी दिले आहे.

00000
ज्येष्ठ नागरिकांसाठी बुधवारी कार्यशाळा
नांदेड, दि. 29 :- जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील कायदे, शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची एक दिवशीय कार्यशाळा बुधवार 5 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 11 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतीक सभागृह ज्ञानमाता शाळेसमोर नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.  
दरवर्षी 1 ऑक्टोंबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 तसेच राज्य शासनाने सन 2013 मध्ये राज्याचे ज्येष्ठ नागरीक धोरण जाहीर केले आहे.


0000000
विधानपरिषद उपसभापती
माणिकराव ठाकरे यांचा दौरा
             नांदेड दि. 29 :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.  
            शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 रोजी उमरखेड येथून सायंकाळी 6 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 6.30 वा. नांदेड येथील आयटीएम कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8 वा. कार्यक्रम स्थळ येथून मोटारीने यवतमाळकडे प्रयाण करतील.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...