Thursday, September 29, 2016

स्तन कर्करोग जागृती, मार्गदर्शन आणि उपचारासाठी
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोहिम
नांदेड दि. 29 :- महिलांमध्ये स्तन कर्करोगाबाबत जागृती व्हावी व मोठ्या प्रमाणात विनामूल्य तपासणी व्हावी या उद्देशाने ऑक्टोबर महिना हा जागतिक स्तन कर्करोग जागृती महिना म्हणून राज्यभरात साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे.
त्यानिमित्ताने डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नांदेड येथे 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2016  या कालावधीत अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे स्तनाच्या कर्करोगाबद्दल विनामूल्य तपासणी, प्रशिक्षण, उपचार व जनजागृतीची  मोहीम आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र बाह्यरुग्ण विभाग क्र. 118  येथे स्वतंत्र कक्ष स्थापित करण्यात आला आहे. 
शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 10.30 वा. या तपासणी मोहिमेचे औपचारिक उद्घाटन  जिल्हाधिकारी सुरेश काकाणी  यांच्या  उपस्थितीत  होणार आहे. यात  महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी भित्तीपत्रकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. शनिवार 1 ऑक्टोबर पासून या उपक्रमास सुरुवात होईल. जास्तीत जास्त महिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. काननबाला येळीकर यांनी केले आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक अशा मॅमोग्राफी या तपासणीने स्तन कर्करोगाचे निदान करणे सोपे झाले आहे. स्तन कर्करोगाच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी सध्या एक अत्याधुनिक वेदनारहित, क्ष किरणमुक्त सोपी पद्धत उपलब्ध आहे. या पद्धतीचे नाव “विनास्पर्श स्तन तपासणी पद्धती असून तिचा जास्तीत जास्त वापर करून रुग्णांचा फायदा व्हावा या साठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्टोबर महिन्यामध्ये स्तन कर्करोगाबाबत जनजागृती आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महिलांची मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. याबाबत महिलांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी आणि निदानात त्यांचे सहकार्य लाभावे हे मोहिम राबविण्याचे उद्दिष्ट आहे.

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...