Tuesday, August 15, 2017

आत्महत्याग्रस्त शेतकरी व्यंकटी हाळे यांच्या 
कुटुंबियांना पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते
एक लाख रुपयांची मदत सुपुर्द
नांदेड दि. 15 :- आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी शासन खंबीरपणे उभे असून समाजानेही त्यांना आधार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.  
 लोहा तालुक्यातील बामणी येथील व्यंकटी हाळे या शेतकऱ्याने परिस्थितीमुळे असहाय्य झाल्याने आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून एक लाख रुपयाची मदत देण्यात आली. पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते 30 हजार रुपयाचा धनादेश त्यांच्या पत्नी जनाबाई व्यंकटी हाळे यांना त्यांच्या घरी जाऊन देण्यात आला. तर उर्वरीत 70 हजार रुपये पोस्ट कार्यालयात एमआयएस योजनेत बचत करण्यात आली. याप्रसंगी त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी आमदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, लोहा तहसिलदार डॉ. अशिषकुमार बिरादार, सरपंच, नागरीक उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. खोतकर यांनी हाळे कुटुंबियांची आस्थेवाईक विचारपूस केली. शेतकऱ्यांनी त्रस्त होऊन आत्महत्या करु नये. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे मनौधैर्य कायम ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे आहे. शासनाच्या विविध योजनेतून  हाळे कुटुंबियांना उभे करण्यासाठी आवश्यक ती मदत जिल्हा प्रशासनाने त्वरीत करावी. मुलांचे शिक्षण, वसतिगृह प्रवेशासाठी जिल्हा परिषदेकडून मदत करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गावातील नागरिकांशी पालकमंत्री श्री. खोतकर यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांनी कोणती चिंता करु नये. शासनाकडून शेतकऱ्यांना सर्व सहकार्य राहील, असे सांगितले.  
हाळे कुटुंबियांना केलेल्या मदतीबद्दल गावातील नागरिकांनी पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचे आभार मानले व शासन आमच्या सोबत असल्याचे सांगितले.
000000


  संगणकीकृत सातबारा सुविधेचा
शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - पालकमंत्री खोतकर

नांदेड दि. 15 :- डिजीटल स्वाक्षरीचा संगणकीकृत सातबारा देण्याची चांगली सुविधा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेचा लाभ नांदेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.
डिजीटल इंडीया भूमीअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत नांदेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा वितरणाचा कार्यक्रम नांदेड तहसिल कार्यालयातील व्हेंडिंग मशिन कक्षात किऑस्‍क सातबारा व्‍हेंडीग मशीनचे उद्घाटन पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आ. अमर राजुरकर, आ. डी. पी. सावंत, आ. हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे (एनआयसी) चे  माहिती अधिकारी सुनील पोटेकर यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात तहसिलदार किरण अंबेकर यांनी संगणीकृत सातबारा शेतकऱ्यांना देण्यासाठी किऑस्‍क सातबारा व्‍हेंडींग मशीन एटीएमप्रमाणे मनुष्‍य विरहीत आहे. या मशीनद्वारे 20 रुपयात सातबारा देण्‍याची सोय उपलब्‍ध असल्याची माहिती दिली.   
यावेळी पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते प्राथमिक स्वरुपात शेतकऱ्यांना डिजीटल स्वाक्षरी सातबाराचे वाटप करण्यात आले. त्यानंतर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपनही करण्‍यात आले.  
सुत्रसंचालन नायब तहलिसदार विजय चव्‍हाण यांनी केले. संगणकीकृत सातबारा वितरण कार्यक्रमात उत्‍कृष्ट काम केल्‍याबद्दल नायब तहसिलदार वि. ना. पाटे, मंडळ अधिकारी श्री. जोंधळे, श्री. सहारे, तलाठी पठाण यांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे संयोजन नायब तहसिलदार मुगाजी काकडे, गजानन नांदगावकर, श्री. पोकले, कुणाल जगताप, मधुकर फुलवळे, मंडळ अधिकारी नागरवाड, जोंधळे  लक्ष्‍मण नरमवार, टेभूर्णेवार, गोडबोले यांनी केले.  
000000
नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाची घडीपत्रिका,
"आपला जिल्हा नांदेड" पुस्तिकेचे 
पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते विमोचन

नांदेड, दि. 15 :- शासनाच्या तीन वर्षपुर्ती निमित्त तयार करण्यात आलेल्या "वाटचाल विकासाची" या घडीपत्रिकेचे आणि नांदेड जिल्ह्याची सर्वांगीण माहिती देणाऱ्या "आपला जिल्हा नांदेड" या पुस्तिकेचे विमोचन  राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण समारंभानंतर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कक्षात विमोचन कार्यक्रम झाला. यावेळी  आ. अमर राजुरकर, आ. डी. पी. सावंत, आ. हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.
"आपला जिल्हा नांदेड" या पुस्तिकेत नांदेड जिल्ह्याची ओळख अधोरेखित करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना व अभ्यासकांना आवश्यक असणारी नांदेड जिल्ह्याची आकडेवारी व माहिती यात समाविष्ट करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्याच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि भौगोलिक माहितीचा नेमका संगम या पुस्तिकेत साधतांना जिल्ह्यातील धार्मिक व पर्यटन स्थळांचीही माहिती रंगीत छायाचित्रांसह देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याशिवाय "नांदेड वाटचाल विकासाची तीन वर्षपूर्तीची" या घडीपत्रिकेत गेल्या तीन वर्षातील नांदेड जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेण्यात आला आहे. नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाची दोन्ही प्रकाशने सर्वसामान्यांना उपयुक्त ठरतील, असा विश्वास पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.
पुस्तिका व घडीपत्रिका निर्मितीसाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, औरंगाबाद विभागाचे संचालक (माहिती) देवेंद्र भुजबळ आणि लातूर विभागीय कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) यशवंत भंडारे यांनी मार्गदर्शन केले. तर पुस्तिकेचे संपादन जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर यांनी केले आहे. यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील विजय होकर्णे, अलका पाटील, काशिनाथ आरेवार, महमद युसुफ, प्रविण बिदरकर, बालनरस्या अंगली, चंद्रकांत आराध्ये यांनी सहकार्य केले. पुस्तिकेतील छायाचित्रे विजय होकर्णे यांची आहेत.
0000000
"उदय" योजना वंचितांसाठी वरदान   
- पालकमंत्री खोतकर
स्वातंत्र्यदिन ध्वजवंदनाचा मुख्य समारंभ उत्साहात संपन्न
नांदेड, दि. 15 :- भटक्या जमातीतील वंचित लोकांचे स्थलांतर रोखणे, त्यांना स्वत:च्या पायावर उभे करुन विविध योजनेचा लाभ मिळवुन देण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाची वंचितांसाठी "उदय" योजना वरदान  ठरेल, असा विश्वास राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.  
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शुभेच्छा संदेशपर भाषणात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात मोठ्या उत्साहात राष्ट्रध्वज वंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या समारंभास ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, आ. अमर राजुरकर, आ. डी. पी. सावंत, आ. हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, नांदेड जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा परिषद, महापालिकेतील पदाधिकारी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक त्यांचे कुटुंबीय, माजी सैनिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरीक, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
शुभेच्छा संदेशात पालकमंत्री श्री. खोतकर म्हणाले की, कमी पर्जन्यमानामुळे पीक परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत. कृषि विभागांतर्गत महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. पर्जन्यमानातील खंड, पाण्याची टंचाई यामुळे कोरडवाहु क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनावर विपरीत परीणाम होऊ नये, यासाठी दिर्घकालीन उपाययोजना म्हणून "मागेल त्याला शेततळे" ही योजना राबविण्यात आली आहे. सद्यस्थितीत 1 हजार 127 शेततळे पूर्ण असून 95 शेततळयांचे काम प्रगतीपथावर आहे. पंतप्रधान पिक विमा योजनेत राज्यात सर्वात जास्त नांदेड जिल्हयातील 6 लाख 97 हजार 42 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलीत हवामान केंद्र उभारण्यासाठी महावेध प्रकल्प राबविण्यात येत आहे. जिल्हयात 80 स्वयंचलीत हवामान केंद्र उभारण्यात येणार असून सद्यस्थितीत 69 केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे हवामानाची आकडेवारी उपलब्ध होणार होऊन नुकसान भरपाई निश्चित होण्यास मदत होईल. शेतकरी राजाला दिलासा देण्यासाठी देशातील सर्वात मोठा कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन त्यांनी केले.  
जिल्हा प्रशासनाच्यावतीने महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी हृदयरोगापासून ते कर्करोगापर्यंत सर्व आरोग्य तपासण्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम महाराष्ट्रासाठी पथदर्शी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हागणदारीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. जिल्हा प्रशासन शौचालय नसलेल्या कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांना शौचालय बांधण्यास प्रेरीत करत आहे. जिल्ह्यात दोनच दिवसात 24 हजार शौचालयाची खड्डे खोदुन शौचालय बांधण्यास गती दिली आहे. डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत अचुक ऑनलाईन सातबारा वितरण कामात नांदेड राज्यात अग्रस्थानी आहे. यावर्षी पर्जन्‍यमान जरी अपेक्षेप्रमाणे नसले तरी आगामी काळात समाधानकारक पाऊस होईल. त्‍यामुळे कोल्‍हापुरी पद्धतीच्‍या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होऊन त्‍याचा जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांना नक्‍कीच फायदा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.   
यावेळी पालकमंत्री श्री. खोतकर यांनी स्वातंत्र्य सेनांनीच्या योगदानाप्रती अभिवादन केले आणि सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी, नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांची आस्थेवाईक विचारपूसही केली.
कार्यक्रमात पालकमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते विविध परीक्षेतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी व मुगाजी काकडे यांनी सुत्रसंचालन केले.
0000000



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...